एकतेच्या प्रतीकासह सौराष्ट्र दर्शन

विवेक मराठी    01-Jan-2019
Total Views |
 

स्टॅच्यू ऑॅफ युनिटी हा पुतळा म्हणजे येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणा देणारे हे उत्तुंग स्मारक, एकतेचे प्रतीक. त्यासोबतच सौराष्ट्र दर्शनात12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे नागेश्वर मंदिराचे दर्शन, द्वारकाधीश मंदिर, सोमनाथ मंदिर, सुदामा सेतू, गोमती, स्वामीनारायण मंदिर, गायत्री मंदिर, घाटकेशव्रज, द्वारकाधीश त्रिवेणी संगम, भालका तीर्थ, लक्ष्मीनारायण मंदिर, गीता मंदिर, गोलोक धाम, तसेच अशोक शिलालेख, दामोदर कुंड, राजराजेश्वरी मंदिर, नरसी मेहता समाधी दर्शन आणि साखरबाग प्राणिसंग्रहालय आणि गीर जंगल सफारी अशा अद्भूत सफारीचा आनंद घेता आला.

आमची 11 ज्योतिर्लिंग बघून झाली होती. बारावे ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ राहिले होते. पत्नी शेवटच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मागे लागली असताना विवेक पर्यटनमधून सुशांत डोके यांचा फोन आला. त्यांनी सौराष्ट्र् दर्शन यात्रेची माहिती दिली. शिवाय बरोबर सरदार सरोवर धरण. असा माणिकांचन योग बघून मी तत्काळ हो म्हटले. ही साधारणत: ऑॅगस्टची गोष्ट आहे. अचानक ऑॅक्टोबर महिन्यात स्टॅच्यू ऑॅफ युनिटी 31 ऑॅक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर जनतेसाठी तो खुला होईल अशी बातमी आली. म्हणजे दुधात साखरच. मग मी सुशांत डोके यांना स्टॅच्यू ऑॅफ युनिटी अंतर्भूत करण्यासाठी विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली. कारण आम्ही बडोदा येथे 30 नोव्हेंबरला असणार होतो. अशातच हर्षद पनवेलकर यांनी ''तुम्ही गिरनार पर्वतावर जाणार का?'' असे विचारले, कारण काही मंडळी तेथे जाणार होती. मग मी म्हणालो की ''आम्हाला ते शक्य नाही. त्याऐवजी मी गीर जंगल सफारी करीन व तुमच्याबरोबर नंतर सामील होईन.'' त्याप्रमाणे मी गीर जंगल सफारीचे ऑॅनलाइन बुकिंग केले. पटेलांच्या जयंतीच्या दिवशी 31 ऑॅक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे उद्धाटन केले. स्टॅच्यू ऑॅफ युनिटी बघण्यासाठी जनतेला ऑॅनलाइन बुकिंगची साइट https://www.soutickets.in/ जनतेसाठी खुली झाली. शिवाय तेथे प्रत्यक्ष गेल्यावर बुकिंग खिडकीवरही तिकिटे मिळणार होती. पण मी संपूर्ण स्थलदर्शनासाठी अनुभव हवा, म्हणून 380 रुपयांची दोन तिकिटे बुक केली. अशा रितीने तयारी झाल्यावर व विवेक पर्यटनाने इतर सर्व तयारी केल्यावर 26 नोव्हेंबर रोजी सौराष्ट्र मेलने द्वारकेला मार्गस्थ झालो.

द्वारकेला दि. 27 नोव्हेंबरला दुपारी पोहोचल्यावर द्वारकाधीशाचे सुंदर दर्शन घेतले. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी द्वारकाधीश मंदिर एक अतिशय पवित्र स्थान आहे. गोमतीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर प्रेक्षणीय आहेच, तसेच कृष्णाची मूर्तीही सुंदर आहे. मंदिरावर फडकत असलेला मोठा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेतो. मंदिराचे कोरीव काम सुंदर व नयनरम्य आहे. मंदिराचा आराखडा गुंतागुंतीचा वाटत असला, तरी 2001च्या भूकंपात या पुरातन मंदिराची जरासुध्दा हानी झाली नाही. मंदिराबद्दल इतर माहिती देण्यापेक्षा मी तुम्हाला या पवित्र मंदिराला भेट देऊन द्वारकाधीशाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे असे आवाहन करतो. नंतर सुदामा सेतू, गोमती घाट बघून बाजारहाट करत दिवस पूर्ण झाला. दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. 27 नोव्हेंबरला सकाळी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे नागेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. आपल्या महाराष्ट्रातही औंढा नागनाथ येथेसुध्दा नागेश्वर मंदिर आहे. दोन्ही मंदिरांना तितकेच महत्त्व आहे. नंतर आम्ही फेरी बोटीतून जाऊन बेट द्वारकेला भेट दिली. तेथे केशव्रजी व द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेतले. परत आल्यावर गोपी तलाव बघत रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाला गेलो. हे मंदिरही कोरीव कामाचा सुंदर नमुना आहे. भारतामध्ये रुक्मिणीची वेगळी अशी दोन मंदिरे आहेत. एक पंढरपूरला, तर दुसरे द्वारकेला. दर्शन झाल्यावर सोमनाथकडे प्रयाण केले व रात्री पोहोचलो.

बुधवार दि. 28 नोव्हेंबरला सकाळी सोमनाथ मंदिराकडे निघालो. मोगलांच्या 17 आक्रमणांना तोंड देत उद्ध्वस्त होऊनही काळाबरोबर धैर्याने टिकून राहिलेले व ताठ मानेने, अभिमानाने उभे राहिलेले व स्वत:ची सुंदरता तसूभरही कमी न झालेले हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक व पहिले ज्योतिर्लिंग मंदिर बघून ऊर अभिमानाने भरून आला. शिवाय स्वतंत्र भारतात पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याच पुढाकाराने या मंदिराचा जीर्णोध्दार झालेला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मूळ सोमनाथ मंदिराचा ढाचा तसाच ठेवत जीर्णोध्दार केला गेला. या मंदिराचे आणखी एक महत्त्व म्हणजे चालुक्य शैलीत बांधलेले हे मंदिर अशा त्रिवेणी संगमावर उभे आहे की सोमनाथच्या किनाऱ्यापासून सरळ रेषेत अंटार्टिकापर्यंत कोठेही जमीन नाही. मंदिराच्या आवारात समुद्र संरक्षण भिंतीजवळ बाणस्तंभ उभा करून खाली संस्कृत श्लोक लिहून तसा उल्लेख केला आहे. हा बाणस्तंभ उत्तर-दक्षिण ध्रुवांदरम्यान असलेल्या त्या रेखांशाच्या जमिनीच्या पहिल्या बिंदूवर उभा आहे. गंगाजल अभिषेक व बिल्वपत्र पूजा करून सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. दुपारी त्रिवेणी संगम, भालका तीर्थ, लक्ष्मीनारायण मंदिर, गीता मंदिर, गोलोक धाम अशा ठिकाणांना भेट दिली. भालका तीर्थ येथे श्रीकृष्णाने आपला अवतार संपवून स्वर्गारोहण केले. संध्याकाळी सोमनाथाच्या आरतीला उपस्थित राहून नंतर होणारा प्रकाश आणि आवाज (ध्वनिप्रकाश) आवर्जून पाहावा असा कार्यक्रम पाहिला.

 
 

गुरुवार दि. 29 नोव्हेंबरला आमच्या ग्रूपचे तीन वेगळे ग्रूप झाले. एक गू्रप गिरनार पर्वत चढून जुनागडजवळील इतर प्रेक्षणीय स्थळे बघून राजकोटला येणारा. दुसरा गू्रप सरळ जुनागडजवळील इतर प्रेक्षणीय स्थळे बघून राजकोटला येणारा. तिसरा म्हणजे आम्हा दोघांचा गीर जंगल सफारी करून जुनागडजवळील इतर प्रेक्षणीय स्थळे बघून राजकोटला येणारा. त्याप्रमाणे आम्ही दोघे सकाळी लवकर उठून सासनकडे प्रयाण केले. आमची सफारी सकाळी साडेआठ वाजता बुक केली होती. गीर राष्ट्रीय उद्यान हे सिंहाचे भारतातील एकुलते एक राष्ट्रीय उद्यान आहे. तेथे पोहोचल्यावर गाइड व जीप भाडयाने घेऊन आम्ही सफारीला सुरुवात केली. काही अंतर गेल्यावर आम्हाला सिंहाची मोठी डरकाळी ऐकायला मिळाली. पुढे गेल्यावर चार-पाच जीप सिंहाच्या दर्शनासाठी थांबलेल्या दिसल्या. पण खूप वेळ वाट बघूनही त्याचे दर्शन झाले नाही. शेवटी डरकाळी क्षीण ऐकू येऊ लागल्यावर आम्ही पुढे सरकलो. परत थोडया अंतरावर गेल्यावर समोरून येणाऱ्या जीपने इशारा देऊन आमच्या ड्रायव्हरला सिंहाची जागा सांगितली. त्याप्रमाणे पुढे गेल्यावर, आयाळ असणारा एक मोठा सिंह एका ठिकाणी आडवा बसलेला दिसला. त्याला मनसोक्त बघत असतानाच एक सिंहीण 50 फूट दूर अंतरावरून चालत त्या सिंहाच्या दिशेने आली व त्याच्याजवळून पुढे निघून गेली. जंगलात चालत असलेला सिंह बघण्याचे दुर्मीळ भाग्य आम्हाला लाभले. आता आमची तब्येत एकदम खूश झालेली, कारण फक्त एकाच सफरीत वन्यप्राणी बघायला मिळणे हा तसा दुर्मीळ क्षण. असेच पुढे जात असताना मध्ये ओढयावर असलेल्या पुलावर सिंह व सिंहीण चालताना दिसले आणि आम्ही सगळे तिथल्या तिथे थबकलो. आमच्यापासून केवळ 20 फुटांवर हे जोडपे होते. सिंह पुलावरच बसून राहिला व सिंहीण पाणी पिण्यासाठी खाली उतरून ओढयावर आली. तिचे मनसोक्तपणे जिभल्या चाटत पाणी पिणे बघून मन तृप्त झाले. तिचे पाणी पिऊन झाल्यावर दोघे आमच्या समोरून चालत चालत जंगलात आत निघून गेले. इतक्या जवळून सिंहाचे जोडपे बघून आमचा ड्रायव्हर तर हबकूनच गेला. पुढे खूप वेळ आम्हाला फक्त जंगलच बघावे लागले. अशा रितीने जंगल सफारी करून आम्ही जुनागडकडे प्रस्थान ठेवले. जुनागडजवळ स्थलदर्शनामध्ये स्वामीनारायण मंदिर, गायत्री मंदिर, अशोक शिलालेख, दामोदर कुंड, राजराजेश्वरी मंदिर, नरसी मेहता समाधी दर्शन आणि साखरबाग प्राणिसंग्रहालय. साखरबाग प्राणिसंग्रहालय येथे बस सफारी केल्यावर पूर्ण प्राणिसंग्रहालय बघता आले. तेथून पुढे राजकोटला मार्गक्रमण केले. वाटेमध्ये जलाराम मंदिर व गोंडळ येथील अक्षर मंदिर पाहिले. रेल्वे स्टेशनवर पोहोचेपर्यंत राजकोट शहराचे दर्शन झाले. रात्री राजकोटहून वडोदराकडे प्रयाण.

शुक्रवार, दि. 30 नोव्हेंबरला सकाळी स्टॅच्यू ऑॅफ युनिटी बघण्यासाठी मार्गस्थ. स्टॅच्यू ऑॅफ युनिटी (एकतेचा पुतळा) म्हणजेच एकतेचे प्रतीक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून साकारलेला पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटावा असा भव्यदिव्य, जगातला सर्वात उंच पुतळा. स्टॅच्यू ऑॅफ युनिटी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्मारक आहे. हे गुजरातच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर स्थित आहे. हे स्मारक 20,000 चौ.मी. क्षेत्रात आहे आणि 12 चौ.कि.मी. आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. 192 मीटर (597 फूट) उंचीची ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. ऑॅक्टोबर 2014मध्ये या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी लार्सन ऍंड टुब्रोशी 2989 कोटी रुपयांचा करार केला गेला. 31 ऑॅक्टोबर 2014पासून याचे बांधकाम सुरू झाले आणि मध्य-ऑॅक्टोबर 2018मध्ये पूर्ण झाले. भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केले होते आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी 31 ऑॅक्टोबर 2108 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे उद्धाटन केले. हा जगातला आतापर्यंतचा सर्वांत उंच पुतळा आहे. महाराष्ट्रातले राम सुतार हे या पुतळयाचे शिल्पकार आहेत. सरदार पटेल म्हणजे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि हा पुतळा म्हणजे येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणा देणारे हे उत्तुंग स्मारक. सरदार पटेल म्हणजे राष्ट्रीय अखंडता व सुसंवाद याचे प्रतीक आहे. हे स्मारक म्हणजे अभियांत्रिकी विश्वातील एक अद्भुत चमत्कार आहे आणि आम्हा भारतीयांना त्याचा अभिमान आहे. वडोदरापासून फक्त 95 कि.मी. अंतरावर निसर्गाच्या कुशीत असलेला हा प्रकल्प खरोखरच सर्वांनी आवर्जून पाहावा असा आहे. निरीक्षण डेस्क, फुलांची घाटी, स्मारक, संग्रहालय सरदार सरोवर व उत्तुंग पुतळा आणि हे बघण्यासाठी बस असे सर्व एकाच तिकिटात सर्वांना उपलब्ध.

तेथे पोहोचताच स्वच्छतेचा आणि शिस्तीचा एक पाठच मिळाला. व्यवस्थित नियोजन, सर्वत्र जागोजागी पिण्याच्या थंड पाणी सोय. आम्ही सर्व जण एका बसने स्मारकाकडे निघालो. तेथे आत शिरताना तिकिटे व सुरक्षा तपासणी झाल्यावर पुढे चालताना कोणालाही त्रास नाही. सरकते पादचारी मार्ग व सरकते जिने व दोन मोठया अतिवेगवान लिफ्ट्स यामुळे लोकांचा प्रवास सुखकर होतो. आत शिरतानाच भव्यतेने आपण भारावून जातो. सारखे पुतळयाकडे लक्ष वेधले जाते. तेथे इतर सोयी व सुविधा अतिशय उच्च दर्जाच्या आहेत. तळाशी संग्रहालय पाहत पुढे सरकत असताना आपण सरदार पटेलांचा जीवनपट व त्यांनी केलेले योगदान पाहत जातो. नंतर लिफ्टने 153 फूट उंचावर जाऊन दोनशे माणसांना सामावणाऱ्या गॅलरीमध्ये पोहोचतो. येथे इतक्या उंचावरून नयनरम्य दृश्य बघतो. नंतर पुढे बसने फुलांची घाटी, सरदार सरोवर बघून आपण परततो. शेवटच्या दिवशी सयाजी बाग, वडोदरा म्युझियम व महाराजा फत्तेसिंग गायकवाड राजवाडा व राजा रविवर्मा आर्ट गॅलरी व इतर दुर्मीळ पेन्टिंग्ज बघून आपण परतीच्या प्रवासाला लागतो.

प्रकाश जोशी

9423983506