भाईंच्या चित्रपटाची मैफील

विवेक मराठी    12-Jan-2019
Total Views |

मराठी साहित्य आणि कला विश्वात स्वत:चे उत्तुंग स्थान निर्माण करणाऱ्या पु. ल. देशपांडेंच्या जीवनावरील 'भाई' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले, तर काहींना त्यात त्रुटीही जाणवल्या. पुलंशी त्यांच्या चाहत्यांचे भावनिक बंध होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, त्यांच्या आयुष्याविषयी एक प्रकारचे कुतूहल मराठी मनात कायम होते. 'भाई' पाहिल्यानंतर पुलंचा चाहता म्हणून मनात उमटलेली प्रतिक्रिया व्यक्त करणारा लेख.

 

भाई' पाहून आठेक तास होऊन गेले, पण मी अजूनही त्या चित्रपटामध्येच आहे! एखादा अत्यंत चवदार पदार्थ खाल्ल्यानंतर पुढे अनेक तास त्याची चव जिभेवर रेंगाळत राहावी, असं झालंय!!

ही 'भाई' या चित्रपटाची समीक्षा किंवा परीक्षण नाही. अनेक दिग्गज समीक्षकांनी चित्रपटाची समीक्षा केली आहे, जी तुम्ही वाचली असेल. हा लेख म्हणजे 'भाई' बघून आल्यावर एक सर्वसामान्य चित्रपट रसिक आणि भाईंचा चाहता म्हणून मला काय वाटलं, हे सांगायचा प्रयत्न आहे.

माळयावरची एखादी जुनी ट्रंक काढावी, त्यात आपल्या आजोबांचे तरुणपणीचे फोटो सापडावे आणि वेगवेगळया फोटोंचं कोलाज लावून आपल्या जिवलग माणसाचा आपण कधीही न बघितलेला आख्खा जीवनपट आपल्या डोळयासमोर उभा राहावा, असं काहीसं वाटतंय 'भाई' बघून आल्यावर!!

 भाई-सुनिताबाई यांच्या सहप्रवासाचा चित्रपट

पुलं लहानपणापासूनच आवडणारे. घरी, वाचनालयांमधून पूर्णच वाचलेले. पुस्तकांची पारायणं आणि चिंध्या यथावकाश झालेल्या, पण त्यानंतर नव्या कॉपीजही घरात आलेल्या. 'भाई - व्यक्ती की वल्ली'ची पटकथा लिहिताना या साऱ्या वाचनाचा उपयोग झाला का? तर झाला, पण अप्रत्यक्ष. पुन्हा वाचन सगळयाचंच झालं. पुलंच्या लेखनाचं आणि त्यांच्याविषयी लिहिल्या गेलेल्या लेखांचं, पुस्तकांचंही.

कोणत्याही बायोपिकमध्ये - चरित्रपटात, तो कोणत्या दृष्टीकोनातून, कोणत्या संकल्पनेतून बनवला गेला आहे, याला महत्त्व असतं आणि त्यावरून तो आयुष्याचा किती आणि कोणता कालावधी घेईल हे ठरतं. आम्हा सर्वांच्या डोळयासमोर होते ते भाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, माणूस म्हणून ते कोण होते हे पाहणं, त्यांचा सुनीताबाईंबरोबरचा सहप्रवास आणि त्यात त्यांना भेटलेली असंख्य माणसं.

आम्ही जेव्हा कामाला लागलो, तेव्हाच लक्षात आलं की भाईंनी आयुष्यात अनेक गोष्टी केल्या, यशस्वीपणे केल्या आणि त्यांचं हे अष्टपैलुत्व समोर आणायचं, तर केवळ एक मर्यादित काळ समोर ठेवून चालणार नाही. पूर्ण आयुष्याचाच विचार करावा लागेल. कारण भाईंनी एका वेळी चार गोष्टी केल्या असं झालं नाही. त्यांनी एका वेळी एका प्रकारचं कामच पूर्ण झोकून देऊन केलं. सिनेमा, साहित्य, नाटक, सामाजिक कार्य हे सारं करताना त्यांनी राजकीय भूमिकेबद्दल स्टँड घेणं नाकारलं नाही. वेळोवेळी ते व्यक्तीच्या आणि मुद्दयांच्या पाठीशी आणि विरोधात उभे राहिले. कोणताही विशिष्ट काळ घेतला असता, तर यातलं बरंच त्यात येऊ शकलं नसतं.

असं असूनही मी म्हणेन की 'भाई - व्यक्ती की वल्ली' हा मुळात भाई आणि सुनीताबाई यांच्या सहप्रवासाचा चित्रपट आहे. कदाचित दोन अगदी भिन्न प्रकृतीच्या व्यक्तिरेखांची प्रेमकथा असंही त्याला म्हणता येईल. त्यांचा-आपला परिचय हा त्यांच्या लिखाणातून, इतर कामामधून झालेला आहे. पण व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय व्हावा, ही या चित्रपटामागची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून तो पाहावा, हीच अपेक्षा आहे.

गणेश मतकरी, पटकथा लेखक

 भाई जसं हसवायचे, तसाच हा चित्रपट आपल्याला खळखळून हसवतोही. आणि मधूनच सण्णकन डोळयातून पाणी काढून रडायलाही लावतो. अफाट गुंतवून ठेवतो हा चित्रपट. चित्रपट संपल्यावरही खुर्चीतून उठावंसंच वाटत नाही.... 'आणखी सांगा ना' असं म्हणावंसं वाटतं. (त्यामुळे चित्रपटाचा उत्तरार्ध येतोय हे फारच उत्कंठावर्धक आहे.)

भाई हे महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्त्व. 'एक प्रख्यात विनोदी लेखक' असा शिक्का त्यांच्यावर मारणाऱ्या लोकांना त्यांच्या हरहुन्नरीपणाचा आणि प्रतिभेचा आवाकाच समजलेला नसतो. संगीत, नाटयलेखन, अभिनय, अभिवाचन, वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आभाळाएवढं मोठं काम करून ठेवलं आहे. इतकी अफाट प्रतिभा असलेला हा माणूस अतिशय नितळ मनाचा आणि लहान मुलाप्रमाणे निरागस होता. भाईंवरचा चित्रपट बघताना ती नितळता, तो निरागसपणा जसाच्या तसा आपल्यासमोर उभा राहतो आणि आपल्याला चुंबकासारखा ओढून घेतो.

भाईंचा काळ हा मराठी संगीताचा, नाटयसृष्टीचा, साहित्याचा सुवर्णकाळ होता. त्या काळातल्या अनेक मोठया कलाकारांशी भाईंचे मैत्रीचे, घरोब्याचे संबंध होते. त्या काळात ही सगळी मंडळी एकमेकांशी कसं वागत असतील? एकत्र भेटल्यावर काय करत असतील? काय गप्पा मारत असतील? असे प्रश्न आपल्याला पडत असतील, तर भाई चित्रपटातले काही प्रसंग बघून फारच धमाल येईल!

भाई आणि सुनीताबाई यांचं नातं ही अत्यंत विलक्षण गोष्ट होती हे आपल्याला माहीतच आहे. ते प्रत्यक्षात कसे भेटले असतील, भेटल्यावर कसे बोलले असतील, त्यांचं नातं कसं बांधलं गेलं असेल, हे सारं समोर पडद्यावर बघताना विलक्षण गुंतून जायला होतं. स्वभावाने दोन विरुध्द टोकं असलेल्या दोन साध्या माणसांची प्रेमाची आणि संसाराची गोष्ट मनाला स्पर्श करून जाते.

खरं तर भाईंच्या आयुष्यात काही फार मोठे चढउतार नाहीत. जीवघेणे संघर्ष नाहीत. भांडणं-झगडे नाहीत. थोडक्यात, हल्लीच्या काळातला चित्रपट काढायचा, तर जो मसाला हवा असा कोणताच मसाला नाही. एक अत्यंत आनंदी आणि कलानिर्मितीने समृध्द आयुष्य जगलेला माणूस होता तो. अशा माणसाच्या आयुष्यावर चित्रपट काढला, तर त्यात दाखवणार काय? हा मला प्रश्न पडला होता. पण एक सुंदर आयुष्य जगलेल्या माणसाच्या आयुष्याची गोष्टही सुंदर पध्दतीने सांगता येऊ शकते, हे 'भाई' बघून माझ्या लक्षात आलं.

'हा चित्रपट आवडला नाही', 'चित्रपट सुमार आहे', 'भाईंच्या व्यक्तिमत्त्वाची उंची पोहोचत नाही', 'काही फुटकळ प्रसंग एकत्र जोडले आहेत' अशा प्रकारच्या पोस्ट्सही सोशल मीडियावर पाहिल्या. कोणतीही कलाकृती कोणाला किती आवडावी वा न आवडावी हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. (भाईंच्याच शब्दांत सांगायचं तर, 'हापूस आंबा न आवडणारे लोकही जगात असतातच की!') ज्यांना आवडला नाही, त्यांना तो न आवडण्याचं आणि तसं त्यांनी मांडण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. मुळात हा चित्रपट आहे, भाईंच्या आयुष्यावरचा माहितीपट किंवा डॉक्युमेंटरी नाही हे लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे कोरी पाटी घेऊन, काहीही अपेक्षा न ठेवता चित्रपट बघितला तर एक छान, सुखद अनुभव आपल्याला येऊ शकतो.

पुलंची 'व्यक्ती'रेखा चितारण्यासाठी पटकथा लेखक गणेश मतकरी यांनी जे प्रसंग निवडले आहेत, ते निव्वळ अप्रतिम. अत्यंत महाकाय आयुष्य जगलेल्या महानायकाच्या आयुष्यातून निवडकच प्रसंग घेणं हे अत्यंत अवघड काम. गणेशने ते भन्नाट जमवलंय. सिनियर मतकरींचे संवाद आणि महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शनही अफलातून!!

त्या काळच्या अनेक दिग्गजांच्या व्यक्तिरेखा सध्याच्या कसलेल्या अभिनेत्यांनी केल्यात. सगळयाच भारी जमून आल्यात. अगदी दोन-तीन प्रसंगात आलेली मृण्मयी देशपांडेही लक्षात राहते, एकाच प्रसंगातले हृषीकेश जोशी, वीणा जामकरही. भाईंचे आई-वडील (अश्विनी गिरी-सचिन खेडेकर) फारच गोड झाले आहेत!! म्हातारपणच्या सुनीताबाईंच्या भूमिकेत शुभांगी दामले अक्षरश: सुनीताबाई दिसल्या-जगल्या आहेत.

पण ह्या सगळया सगळया दिग्गजांपेक्षाही तरुणपणचे पुलं-सुनीताबाई यांची भूमिका करणाऱ्या सागर देशमुख-इरावती हर्षेने अफाट कमाल केली आहे!

जाता जाता, चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगामधली भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आणि पुलं यांची खाजगी मैफील निव्वळ विलक्षण! ती मैफील ऐकणाऱ्या हिराबाई बडोदेकर आणि सुनीताबाईंच्या पायाशी सतरंजीवर बसून आपण ती ऐकत आहोत असं वाटत राहतं. आणि समोर जे घडतं, दिसतं, ऐकू येतं ते केवळ स्वर्गीय असतं. शब्द, सूर, अभिव्यक्तीचा ह्याहून सुंदर सोहळा मी आजवर अनुभवलेला नव्हता. ती मैफील हृदयावर कोरली गेली आहे, पुन्हा पुन्हा अनुभवावीशी वाटत आहे!!

मी अजूनही भाईंच्या मैफलीतच आहे. अन इथून बाहेर येण्याचा मार्ग मला नको आहे!!

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)

prasad@aadii.net