मर्यादा सोडणारी पाहुणी

विवेक मराठी    14-Jan-2019
Total Views |

 

 

नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी न बोलविण्याचा निर्णय खूप गाजला आणि पुढे गाजविला जाणार आहे. अनेक जण क्षमायाचनेच्या मानसिकतेत गेलेले आहेत. नयनतारा सहगल काय बोलणार होत्या, हे भाषण नेटवर आहे. क्षमायाचना करणाऱ्यांनी ते वाचले असते, तर ज्यांनी न बोलविण्याचा निर्णय केला, त्यांची त्यांनी निंदा केली नसती. नयनतारा सहगल यांचे भाषण पूर्णपणे राजकीय आहे. त्या म्हणतात की, आजच्या राजकीय वातावरणात निर्माणशील प्रतिभा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांना काही स्थान राहिलेले नाही. वैचारिक स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकार, तसेच लेखन या धोकादायक कृती झालेल्या आहेत. आम्ही काय खावे, कुणाशी विवाह करावा, कुठे पूजा करावी याच्यावर आघात होऊ लागले आहेत, वगैरे वगैरे.

एका महान नाटककाराने, नयनतारा सहगल, इंदिरा गांधी यांच्या आत्येच्या कन्या आहेत, राजघराण्यातील आहेत, वगैरे सांगून न बोलविण्याचा अवमान केला ही चांगली गोष्ट नाही, असे लिहिले आहे. घराण्यातील माणसाला कुणावरही कसलेही बेलगाम आरोप करण्याचे स्वातंत्र्य आहे, असा त्याचा अर्थ झाला.

संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचे अध्यक्षीय भाषण संपूर्णपणे साहित्य या विषयाला वाहिलेले आहे. साहित्य संमेलनात हेच अपेक्षित असते. अरुणाताईंनी साहित्य व्यवहाराविषयी, भाषेविषयी जे मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर चर्चा झाली तर ती मराठी संस्कृतीच्या विकासाला पूरक होईल. राजकीय भाषणे करायला राजकीय व्यासपीठे आहेत. नयनतारा यांनी आपल्या घराण्याच्या राजपुत्राच्या सभेत जाऊन राजकीय भाषण करायला पाहिजे. अशा प्रकारचे भाषण लिहिण्याचे, ते छापण्याचे, ते नेटवर आणण्याचे अमर्याद स्वातंत्र्य असताना, आम्हाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही, लेखनस्वातंत्र्य नाही असे म्हणून महान पुरस्कारवापसीचा विनोद झाला, असे वाटते. अगोदर सहगल यांच्या आगमनाला विरोध आणि नंतर टीका होऊ लागल्यानंतर शेपूट घालून माघार, हे वाघ परंपरेशी नाते सांगणाऱ्याला शोभत नाही. बाळासाहेब यांनी ''होय, आम्ही बाबरी मशीद पाडली'' असे ठणकावून सांगितले. त्यांचे न बोललेले वाक्य असे होते - असेल हिम्मत, तर लावा आमच्या अंगाला हात. हा आहे मराठी बाणा! जो स्वाभिमान आणि तेज प्रकट करतो. पाहुण्याने आपल्याच घरात येऊन आपल्यालाच शिव्या घालाव्यात आणि अतिथी सन्मान म्हणून त्या स्वीकाराव्यात... अन्य कुणाच्या अस्मितेत ते बसत असेल, पण मराठी अस्मितेत ते बसत नाही.

vivekedit@gmail.com