बुध्दमय तिबेट

विवेक मराठी    14-Jan-2019
Total Views |

 

 

भौगोलिकदृष्टया, सांस्कृतिकदृष्टया, धार्मिकदृष्टया आणि भावनिकदृष्टयाही भारताला जवळचा असणारा पहाडी देश म्हणजे तिबेट. दोन्ही देशांतील हे सहसंबंध उलगडणारा लेख.

हिमालयाच्या पलीकडे असलेल्या विस्तीर्ण पठारावर तिबेटचा प्रदेश आहे. हा थंड प्रदेश पर्जन्यछायेत असल्याने इथे पाऊस कमीच. जराही वनराई नसलेला हा गवताचा आणि झुडपांचा प्रदेश आहे. येथील पर्वतरांगांमध्ये आशियातील अनेक मोठया नद्यांचा उगम आहे. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, मेकाँग (थायलंड), यांगत्झे (चीन) व येल्लो (चीन) या नद्या तिबेटमध्ये उगम पावतात. भारत, नेपाळ व तिबेट येथील रहिवाशांचे तीर्थक्षेत्र असलेला कैलास पर्वत आणि मानसरोवर तिबेटमध्ये आहेत. तसेच सागरमाथा (माउंट एव्हरेस्ट) हे जगातील सर्वात उंच शिखर तिबेट-नेपाळच्या सीमेवर आहे.  

चीनमधून तिबेटमध्ये येण्याजाण्याकरिता सुलभ मार्ग आहेत. परंतु भारतातून तिबेटमध्ये जाण्यासाठी सुगम मार्ग नाही. त्यातल्या त्यात उत्तरेला लडाखमधून व पूर्वेला अरुणाचलमधून तिबेटमध्ये जाणारे रस्ते आहेत. पण हे रस्तेसुध्दा अतिशय बिकट असल्याने, शेजारी असूनसुध्दा खूप काळापर्यंत भारत आणि तिबेट यांचा संबंध आला नाही.

सहाव्या-सातव्या शतकात तिबेटमध्ये साँगत्सेन गॅम्पो (Songtsen Gampo) नावाचा राजा राज्य करत होता. याची पहिली पत्नी नेपाळनरेश अंशुवर्माची कन्या भृकुटी, तर याची दुसरी पत्नी चीन सम्राट ताईत्सूची कन्या वेनचेंग होती. या दोन्ही राजकन्या माहेरहून बौध्द धर्म घेऊन आल्या. चिनी राजकन्येने मैत्रेय बुध्दाची, तर नेपाळी राजकन्येने शाक्यमुनी बुध्दाची उपासना तिबेटमध्ये आणली. या दोघींच्या प्रभावाने तिबेटमध्ये बौध्द धर्माच्या प्रचाराला वेग आला. तिबेटमध्ये यापूर्वी असलेला बॉन (Bon) धर्म पुढे बौध्द धर्मात विलीन झाला. त्या धर्मातील रूढी, परंपरा तिबेटी बौध्द धर्माचा भाग बनल्या. 

 


राजा साँगत्सेन गॅम्पोने आपला मंत्री थोनमी संभोता (Thonmi Sambhota) याला भारतात लिपी शिकण्यासाठी पाठवले. या काळात पूर्व भारतात गुप्त लिपी वापरात होती. गुप्त लिपी ही ब्राह्मी लिपीची कन्या. पुढच्या काळात गुप्त लिपीमधून शारदा, नागरी, सिध्दम् आदी लिप्या तयार झाल्या. थोनमी संभोताने भारतात येऊन गुप्त लिपीचा व संस्कृत भाषेचा अभ्यास केला. त्याने गुप्त लिपीवर आधारित अशी तिबेटी लिपी तयार केली. तसेच संस्कृत व्याकरणावर आधारित असलेले व्याकरण तिबेटी भाषेसाठी लिहिले. संस्कृतचे ज्ञान, नवीन लिपी आणि त्याने स्वत: लिहिलेले ग्रंथ घेऊन थोनमी मायदेशी परत गेला. त्यावर साँगत्सेन गॅम्पो राजाने थोनमी संभोताकडून लिपी शिकली. मग या राजाने 20 संस्कृत बौध्द ग्रंथांचा तिबेटी भाषेत अनुवाद केला. 

साँगत्सेन गॅम्पोने ल्हासा ही राजधानी वसवली, तिबेटच्या सीमा विस्तारल्या आणि अनेक लोकोपयोगी कामे केली. तिबेटी लोकांनी या प्रजावत्सल राजाला अवलोकितेश्वराचा अवतार मानले, तर त्याच्या दोन्ही राण्यांना तारादेवीचा अवतार मानले. तिबेटमधील बौध्द मंदिरांतून या तिघांच्या रेखीव मूर्ती पाहायला मिळतात.

त्याच्या नंतरच्या तिबेटी राजांनी भारतातून धर्मरक्षित, पद्मसंभव, कमलशील आदी बौध्द आचार्यांना पाचारण केले. आठव्या शतकात तिबेटमध्ये वज्रयान हा बौध्द पंथ स्थिरावला.

तेराव्या शतकात मोंगोल कुब्लई खानने चीनवर आक्रमण करून चीन ताब्यात घेतला. तसेच अनेक लहान-मोठी राज्ये ताब्यात घेऊन मध्य आशियाचा काही भाग काबीज केला. याने जपान, कोरिया, व्हिएतनाम, जावा, बर्मा (म्यानमार) या देशांवरसुध्दा हल्ला केला होता. कुब्लई खानने चीनमध्ये युआन राज्य स्थापन केले. त्याबरोबरच त्याने तिबेटदेखील जिंकले. परंतु तिबेटमध्ये तो बौध्द धर्माने प्रभावित झाला. त्याने बौध्द धर्म तर स्वीकारलाच, तसेच त्याने व तिबेटमधील बौध्द गुरू ड्रोगोन कोग्यल फॅग्पा (Drogon Chogyal Phagpa) यांना आपला राजगुरू म्हणून नेमले. कुब्लई खानने तिबेटचा प्रांत युआनच्या प्रशासनाखाली न आणता, बौध्द भिक्षूंवर ते काम सोपवले. मोंगोलांचे युआन राज्य संपुष्टात आल्यावर, चीनमध्ये मिंग राजे आले आणि तिबेटमध्ये प्रशासक असलेले बौध्द भिक्षू राज्यकर्ते झाले.

सतराव्या शतकापासून दलाई लामा हे तिबेटचे आध्यात्मिक गुरू तिबेटचा राज्यकारभार पाहू लागले. सध्याचे 14वे दलाई लामा आहेत तेन्झीन ग्यात्सो. चीनने तिबेटवर आक्रमण केल्यानंतरच्या काळात त्यांनी भारतात आश्रय घेतला. तेव्हापासून ते भारतात धरमशाला येथे स्थायिक झाले आहेत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटनने रशियाच्या दक्षिण मोहिमेला आळा घालण्यासाठी पश्चिमेला अफगाणिस्तान आणि पूर्वेला तिबेट ही दोन राष्ट्रे आघात प्रतिबंधक प्रदेश म्हणून वापरली. चीनलासुध्दा ब्रिटिश इंडियापासून हे संरक्षण कवच हिताचे असल्याने त्याला पाठिंबा होता. या दरम्यान तिबेट एका बाजूला चीन व दुसऱ्या बाजूला ब्रिटिश इंडिया अशा दोनच राष्ट्रांशी संबंध ठेवू शकत होता.

ज्या काळात भारताचे विभाजन झाले, त्या दशकात चीनने मांचुरिया, दक्षिण मोंगोलिया, पूर्व तुर्कस्तान, कॅन्टोनिया, तिबेट आदी प्रदेश गिळंकृत केले. 1951मध्ये तिबेटचा प्रचंड मोठा प्रांत काबीज केला. त्यानंतर अरुणाचल प्रदेशला 'दक्षिण तिबेट' असे संबोधून त्या प्रांतावरसुध्दा चीनने अधिकार सांगण्यास सुरुवात केली. भारतीयांची तीर्थस्थाने चीनच्या आधिपत्याखाली आली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतातील मोठया नद्यांचे स्रोत सौम्य अशा बौध्द लामांच्या ताब्यातून कम्युनिस्ट चीनच्या ताब्यात गेले.

भारताने युध्द न करता गेली 15-16 शतके तिबेटी मनावर अधिराज्य केले. भारताचे तिबेटी मनातील स्थान दलाई लामा यांच्या वक्तव्यातून कळते. ते एका कार्यक्रमात म्हणाले, ''मी दिसायला तिबेटी असलो, तरी भारताचा पुत्र आहे. आध्यात्मिक दृष्टीने मी पूर्णपणे भारतीय आहे.''

संदर्भ -

  1. The Silent Chinese Invasion - Bhaskar Dutta Baruah

2.The Online Enclyclopedia of writing systems and languages.

 

दीपाली पाटवदकर

9822455650