आहे हे असं आहे...

विवेक मराठी    16-Jan-2019
Total Views |

  'उत्सव शारदेचा' असं विवेकने ज्याचं वर्णन केलं होतं, ते 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनपेक्षितपणे वादाच्या भोवऱ्यात सापडलं. प्रसारमाध्यमांनी, काही दुष्ट प्रवृत्तींनी त्याविषयी निराशाजनक अपप्रचार करून सगळं वातावरण गढूळ करून टाकलं. संमेलनावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन (की दबाव?) होऊ लागलं आणि आता हे संमेलन कसं फसतंय याचं चित्र रंगवलं गेलं. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करत किती आशादायक, ऊर्जादायक वातावरणात हे संमेलन, हा शारदेचा उत्सव संपन्न झाला, तेही सर्वांना कळलं पाहिजे. त्यासाठी आम्ही एक परिसंवाद घेतला आहे. या परिसंवादाची भूमिका.

गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलन आणि वादविवाद हा अद्वैत समास असल्याचा समज दृढ झाला आहे. यंदाचं संमेलन मात्र या समजाला अपवाद ठरेल अशी अटकळ होती आणि अपेक्षाही. निवडणूक न होता, संमेलनाध्यक्षपदी सर्वसंमतीने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांची झालेली निवड हे त्यामागचं कारण. उल्लेखनीय साहित्यिक कारकिर्द, तसंच संयत, मृदू आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती असल्याने संमेलन दर्जेदार होईलच, शिवाय ते कोणत्याही वादाशिवाय पार पडेल अशा अपेक्षांचे इमले आमच्यासारखे अनेक साहित्यरसिक रचत होते. त्यातली पहिली अपेक्षा या संमेलनाने 100 टक्के पूर्ण झाली. मात्र दुसऱ्या अपेक्षेचा भंग झाला. वाद झाला (की जाणीवपूर्वक निर्माण केला गेला? हे महामंडळाचे बहुचर्चित, विवाद्य माजी अध्यक्ष आणि परमेश्वर या दोघांनाच माहीत!), तो शक्य तेवढा तापवला गेला आणि त्याचं सावट संमेलनावर राहावं यासाठी तर अनेक विघ्नसंतोषी लोकांनी अथक प्रयत्न केले. या सर्वांनी आणि त्यांना बहुमोल सहकार्य करणाऱ्या प्रसारमाध्यमातील अनेक प्रस्थापितांनी, संमेलनाआधीच्या आठवडयात निर्माण झालेला वाद असा काही तापता ठेवला की सर्वसामान्य साहित्यप्रेमी त्या गदारोळाने भांबावून गेला.

मात्र नेहमीच 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट' असतेच असं नाही, याची प्रचिती या संमेलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या हजारो लोकांनी घेतली. प्रसारमाध्यमं जे सांगताहेत, त्याहून वेगळं आणि दर्जेदार असं काही संमेलनस्थळी चालू आहे, एवढंच नव्हे, तर या रंगवलेल्या वादाचा मागमूसही संमेलनस्थळी नाही याचा अनुभव सर्वांनी घेतला. इतक्या आडगावात संमेलनाचं आयोजन करताना ते सर्व प्रकारे यशस्वी व्हावं यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले. त्यांच्या श्रमांचा मान राखत आणि अरुणाताईंवरील प्रेमामुळे, त्यांच्याविषयीच्या आदरामुळे साहित्यरसिकांनी तिथवर पोहोचण्याचा निर्णय घेतला. या सर्वांनी आणि बहिष्काराच्या दडपणाला झुगारून देत संमेलनाच्या विविध सत्रांत सहभागी झालेल्यांनीही हे संमेलन कमालीचं यशस्वी करून दाखवलं. 'अनेक विषयांत नवे विक्रम स्थापित करणारं संमेलन' अशी या संमेलनाची इतिहासात नोंद होईल असं हे संमेलन झालं. मात्र, संमेलनाचं यश डोळयांना दिसत असूनही डोळयांवर बांधलेली द्वेषाची पट्टी दूर करणं प्रसारमाध्यमांनी नाकारलं आणि संमेलनाचं सूप वाजल्यावरही त्यातले काही आपल्या हेकेखोर आणि नकारात्मक वृत्तीला साजेशी टीका करत राहिले. संमेलनस्थळी चाललेल्या विविध सत्रांच्या बातम्या विद्वेषाच्या रंगात रंगवूनच सांगितल्या गेल्या. त्यातून ना उद्धाटनाचं सत्र सुटलं, ना समारोपाचं.

विवेकच्या साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन

अशा कसोटीच्या क्षणी खंबीर राहून, 'शो मस्ट गो ऑन' हा विचार ज्यांनी कृतीत आणला, ते सर्वच अभिनंदनास पात्र आहेत. महामंडळाच्या कणखर प्रभारी अध्यक्षांसह सर्व सन्माननीय सदस्य, 3 महिने दिवसरात्र झटलेले स्थानिक आयोजक, आपल्या संतुलित मांडणीने सर्वांची मनं जिंकणाऱ्या संमेलनाध्यक्षा, सहभागी साहित्यिक-विचारवंत-अभ्यासक-समीक्षक आणि अलोट गर्दी करणारा साहित्यप्रेमी रसिक....या सर्वांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. साहित्यप्रेमी म्हणजे 'मुकी बिचारी कुणीही हाका' अशी जमात नाही आणि दिशाभूल करणाऱ्या बातमीदारीपेक्षा ते स्वानुभवावर विश्वास ठेवतात, हा धडा या प्रकरणाने प्रसारमाध्यमांना दिला आहे. अर्थात, यातून शिकायची ज्यांची इच्छा असेल तेच शहाणे होतील. ज्यांना आपला पराभव मान्यच करायचा नाही, ते अजूनही नाक वर करून आणि जमिनीवरून दोन बोटं चालतच राहतील.

अशा विघ्नसंतोषींना सोडून देणं, त्यांच्या बेगुमान आरोपांकडे दुर्लक्ष करणं मात्र यापुढे होणार नाही, हा संदेशही या संमेलनाच्या निमित्ताने दिला गेला आहे, तोही संयतपणे आणि सनदशीर मार्गाने. या संमेलनावर नियोजित संमेलनाध्यक्षांसह सर्वांनी बहिष्कार टाकावा, यासाठी मोठया प्रमाणावर दडपण आणायला सुरुवात झाली होती. ज्यांनी या बहिष्काराच्या दडपणाचा बाऊ केला, त्यांनी संमेलनाला यायचं धाडसच केलं नाही. (संमेलन उत्तम झालं हे कळल्यावर यातले काही हळहळले, असं समजतं.) मात्र अशा मागे फिरणाऱ्यांची संख्या तुलनेनं नगण्य होती. 'होऊन गेल्या कृत्याबद्दल माफी मागून झाल्यानंतर, संपूर्ण संमेलनावर बहिष्कार टाकण्याचं कारण नाही. ज्यांना विविध सत्रांत सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं आहे, त्यांनी सहभागी होऊन निषेध नोंदवावा' या केलेल्या जाहीर आवाहनाला समाजातल्या अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातूनही संमेलनाला एक बळ मिळालं.

मात्र संमेलनपूर्व आवाहनाने कार्यभाग साधत नाही, हे संमेलनानंतर आलेल्या बातम्यांनी लक्षात आणून दिलं, तेव्हा जबाबदार प्रसारमाध्यम म्हणून आपलं कर्तव्य अद्यापही बाकी आहे याची जाणीव झाली. त्यातूनच, संमेलनात विविध प्रकारे प्रत्यक्ष सहभागी झालेल्यांनी आपले अनुभव लिहावेत आणि ते आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवावेत, हे ठरवलं.

विचारांतली मतभिन्नता ही काही पुरोगामी महाराष्ट्राला नवीन नाही. स्वत:च्या मांडणीशी इमान राखतानाही, एकमेकांच्या मतांचा आदर ठेवता येतो हे दाखवणारी आपल्याकडची परंपरा आहे. विविध विद्याशाखांबरोबरच साहित्यही त्याला अपवाद नाही. 'प्रसारमाध्यमांवर आमची पकड आहे. तेव्हा आम्ही दाखवू, छापू तीच वस्तुस्थिती' असा इथल्या अनेकांना भ्रम झाला होता. या मार्गाने विशिष्ट प्रकारचे विचार पेरायचे, बाकीचे नाकारायचे, वाचकांच्या विचारसरणीवर प्रभाव पाडायचा हे चालू आहे. अडवणारं, प्रश्न विचारणारं कोणी नाही, यामुळे तर अनेकांचं फावलं आहे. त्यांच्याशी प्रतिवाद करण्यात आपली शक्ती घालवावी अशी आमचीही मनीषा नाही. याहून चांगल्या अनेक सकारात्मक गोष्टी खुणावत आहेत. म्हणूनच प्रतिवादात शक्ती खर्च करण्याऐवजी, संमेलनाच्या साक्षीदारांचं मनोगत आम्ही सर्वांसमोर ठेवत आहोत. तुमच्या सुज्ञतेवर आणि सारासार विचारशक्तीवर आमचा पूर्ण भरवसा आहे.

झालं ते असं आहे... आहे हे असं आहे...