समतेची वारी विठ्ठलाच्या द्वारी

विवेक मराठी    02-Jan-2019
Total Views |
  
 
जातीजातींतर्गत वाढलेले ताणतणाव हे सध्या राज्यासमोरचे एक मोठे आव्हान आहे. या समाजविघातक विचारांना रोखण्यासाठी 'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संत चोखोबा यांची पुण्यभूमी असलेल्या मंगळवेढा येथून मंगळवार, दि. १ जानेवारी २०१९ रोजी समतेच्या वारीचे प्रस्थान झाले. बुधवार, दि. २ जानेवारी रोजी टाळ-मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात तल्लीन झालेली ही समतेची वारी पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या द्वारी विसावली. संतांनी सांगितलेला समतेच्या विचारांचा पुन्हा एकदा उच्च रवाने जागर करण्यासाठी निघालेली समता वारी संत नामदेवांच्या, संत चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आणि विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन पुढे मार्गस्थ झाली.


सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 
 समता, बंधुता आणि लीनता या त्रिसूत्रीभोवती संतसाहित्याची गुंफण आहे.  या शिकवणीशी पूर्णपणे विसंगत अशा राज्यांत घडत असलेल्या घडामोडींनी समाज अस्वस्थ आहे. भीमा कोरेगाव येथे उसळलेली दंगल असो वा शहरी , नक्षलवादाचे होत असलेले दर्शन असो वा आरक्षण आंदोलनांमुळे जाती-जातीमध्ये निर्माण झालेली तेढ असो. या सर्वांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. ते पुनःस्थापित करण्याच्या उद्देशाने वृंदावन फाउंडेशन, पुणे आणि संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वारीचे हे दुसरे वर्ष असून सहा जिल्ह्यांतून ९५० किलोमीटरचा प्रवास करत दि. १२ जानेवारी रोजी देहू येथे वारीचा समारोप होणार आहे.

 आणि आधुनिक गाडगेबाबा प्रकटले...!
   
आधुनिक संत गाडगेबाबा म्हणून महाराष्ट्रभर ओळख निर्माण करणारे माढा तालुक्यातील रहिवासी फुलचंद नागटिळक हे संत गाडगेबाबा यांचा वेश परिधान करून समता वारीत सहभागी झाले आहेत. नागटिळक यांनी समतेच्या विचारावर २५ अभंग लिहिले आहेत. या अभंगातून ते समतेचा संदेश जनतेला देणार आहेत. संतांनी समतेचा ध्वज खांद्यावर घेतला होता, आज हा ध्वज पुन्हा खांद्यावर घेण्याची गरज आहे. "समतेचा पाईक म्हणून या वारीत पूर्णवेळ सहभागी होत असल्याने मला खूप आनंद होत आहे" असे फुलचंद नागटिळक यांनी सांगितले. आधुनिक गाडगेबाबांचे हे रूप समता वारीचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.
 
 

चोखोबाच्या नगरीत समतेचा जागर 

मंगळवेढा हे संतांचे माहेरघर आहे. या भूमीत १४ संतांनी जन्म घेतला. संत चोखोबा यांचे भव्य स्मारक १३ गुंठे जागेवर होणार आहे. अशा या मंगळवेढा शहरात यंदाच्या समता वारीला थाटात सुरुवात झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत चोखामेळा यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.  'अजूनही संत कान्होपात्रासह अनेक संत उपेक्षित आहेत. या संतांच्या स्मारकांसाठीही आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि समता वारीचे मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजीराव मोरे देहूकर यांनी या प्रसंगी सांगितले.
  
तर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी, “समाजमाध्यमांतून पसरत असलेला जातीय विद्वेष, विखारी प्रचार थांबवून तरुण मंडळींमध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ही वारी निघत आहे.  या वारीत जास्तीत जास्त युवकांनी सामील व्हावे," असे आवाहन केले.
 
"सध्या समाजाला संतांच्या विचारांची गरज आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी प्रवृत्ती वाढत आहे. आरक्षणामुळे सामाजिक विषमता आणखी वाढेल, त्यासाठी वेळीच जागे होऊन प्रबोधन करणे गरजेचे आहे." असे मत किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केले.
संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा उल्काताई चंदनशिवे, नगराध्यक्षा अरुणा माळी, अविनाश शिंदे, प्रा. चंदनशिवे आदींनीही आपल्या विचारांतून समतेचा जागर केला.
 
समता वारी ही एक अनोखी वारी आहे. या वारीमध्ये जात, पात, धर्म मानला जात नाही. लहान-थोर, स्त्री-पुरुष भेदभाव केला जात नाही, हा वारकरी संप्रदायाचा विचार अंगीकारण्यात येतोय. या वारीत सर्व जाति-पंथांचे नागरिक सहभागी झाले आहेत.
 
 

समता रथ व चित्रफीत या माध्यमांतून प्रबोधन
 
  
समाजाची प्रगती व्हावी, जातीयता कमी व्हावी, आपण सर्व जण भारतीय आहोत अशी शिकवण देणारी चित्रफीत समतेच्या वारीत दाखविण्यात येत आहे. १५ मिनिटांची ही चित्रफीत असून यात विविध समस्यांवर विचार करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे, वारीचे मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजीराव मोरे, अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी समता वारीला शुभेच्छापर मनोगते चित्रफितीमध्ये दाखविण्यात आली आहेत. नागरिक मोठ्या उत्सुकतेने ही चित्रफीत पाहत आहेत. समतेचा संदेश देणारा समता रथही तयार करण्यात आला आहे. या रथातून समतेविषयी प्रबोधन करण्यात येत आहे.
 
 
 
अन् अवघी पंढरी दुमदुमली
 
 पंढरीच्या वारीला विशेष असे महत्त्व आहे. संतांचे माहेरघर म्हणून पंढरीची ओळख आहे. पंढरीच्या या वारीमध्ये अनेक राज्यांतील भाविक भक्त सामील होतात. अनेक जाति-धर्माचे वारकरी सामील होतात. या वारीमध्ये जात-पात-धर्म मानला जात नाही. लहान-थोर स्त्री-पुरूष भेद भाव केला जात नाही. सारे जण विठूरायाची लेकरेच आहेत असे मानले जाते. सर्व समाज पांडुरंगाची लेकरे आहेत, हे सूत्र घेऊन समता वारी प्रबोधन करत आहे. समतेच्या या पाइकांनी विठ्ठलाच्या चरणी मस्तक टेकवून पुढील प्रवासास प्रस्थान केले. वारकरी शिक्षण संस्थेच्या शिष्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात तल्लीन होऊन समतेच्या वारीचे स्वागत केले. पंढरीतील रस्ते संतांच्या नामघोषांनी दुमदुमून गेले होते. संत चोखोबा, संत नामदेव यांच्या समाधीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि समता वारीचे मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजीराव मोरे, साधना भोसले (नगराध्यक्षा, पंढरपूर), शंकुतला नडगिरे (मंदिर समिती सदस्या), संजय वायकर (शहराध्यक्ष भाजपा), रामेश्वर महाराज जाधव (वारकरी शिक्षण संस्था), रामकृष्ण महाराज वीर (राष्ट्रीय प्रवक्ते, वारकरी संप्रदाय पाईक संघ), रवींद्र साळे (पश्चिम महाराष्ट्र प्रांत समरसता प्रमुख, विहिंप), तुकाराम खंदाडे (कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), सौरभ थिटे (श्री शिवप्रतिष्ठान) यांच्यासह पंढरीतील प्रतिष्ठित नागरिकांनी समता वारीला शुभेच्छा दिल्या. वारी निमंत्रक सचिन पाटील यांच्यासह समतेचे वारकरी उपस्थित होते.
 

 
डी.एस. काटे यांनी प्रस्थान सोहळ्याचे प्रास्ताविक केले, तर प्रा. अजिंक्य भालेकर यांनी सूत्रसंचालन व वहिदपाशा शेख यांनी आभारप्रदर्शन केले. या प्रसंगी जयराज शेंबडे, सतीश दत्तू, सचिन पाटील व वारी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
 
समता वारी ही एक अनोखी वारी आहे. या वारीमध्ये जात-पात-धर्म मानला जात नाही, लहान-थोर, स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जात नाही, या वारकरी संतांनी दिलेल्या शिकवणीचा अंगीकार करण्यात येतोय.