प्रादेशिकता विरुध्द राष्ट्रीय भाव

विवेक मराठी    22-Jan-2019
Total Views |

 

 

महागठबंधन रॅलीत गोळा झालेल्या सर्व राजकीय पक्षांची विषयसूची कमालीची स्वार्थाची विषयसूची आहे. त्यांना आपल्या नेत्याला मोठे करायचे आहे, आपल्या पक्षाची ताकद वाढवायची आहे. देशाचे काय करायचे, याबद्दल कुणीही काहीही बोलत नाही. बोलायचे असेल तर त्याचा अभ्यास हवा, देश समजायला हवा, देशातील सामान्य माणूस समजायला हवा. आपल्या जातीपुरती ज्यांची ओळख आहे किंवा आपल्या मतबँकांपुरत्या त्यांच्या जाणिवा आहेत, ते देश उभा करू शकत नाहीत.

  

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/


ममतादीदी यांनी कोलकात्याला 19 जानेवारीला महागठबंधन रॅलीचे आयोजन केले होते. लेखाचे शीर्षक 'महाठगबंधन रॅली' असे द्यावे असे माझ्या मनात आले. पण थोडा विचार केल्यानंतर मी टाळले. शेवटी रॅलीत जमा झालेले सगळे राजकीय नेते आहेत. आपले शरद पवार आहेत, आपले केजरीवाल आहेत, मायावती तर आहेतच, आणि नुकतेच भांजे झालेले अखिलेश यादवदेखील आहेत. या सर्वांना ठग कसे काय म्हणायचे, ते असंसदीय होईल, असा विचार माझ्या मनात आला आणि ते मी टाळले.

महागठबंधन रॅलीत दहा लाख लोक जमले होते, असे वृत्तपत्राच्या बातम्या सांगतात. आपण विचारायचे नाही की, या सर्वांची डोकी मोजलीत का? नसतील मोजली, तर संख्या निश्चित करण्याचा शास्त्रशुध्द मार्ग कोणता? असे प्रश्न आपण वर्तमानपत्रांना विचारायचे नसतात. वर्तमानपत्रे, त्यांचे बातमीदार, आणि संपादक सर्वज्ञ असतात. त्या मानाने आपण अज्ञानी असतो. ते जे काही म्हणतील ते आपण खरे मानायचे आणि त्यावर चर्चा करीत बसायचे.

आपण गृहीत धरू की दहा लाख लोक आले. एकटया कोलकाता शहरातून एवढे लोक येणे शक्य नाही. ते बंगालमधून आणले गेले. राजकीय पक्षाच्या रॅलीसाठी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून, दूरवरून येण्याचे दिवस आता संपले आहेत. लोकांना 'आणावे' लागते. त्यांचा जाण्या-येण्याचा खर्च करावा लागतो. प्रवासात त्यांच्या खाण्याची सोय करावी लागते. आणि काही लोक एवढे निगरगट्ट असतात की ते दोन दिवसांचा भत्ता मागतात, तो द्यावा लागतो. रॅलीच्या ठिकाणी खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी लागते. दहा लाख लोक आले, प्रत्येकी कमीत कमी शंभर रुपये खर्च गृहीत धरला, तर दहा कोटी झाले. एवढा पैसा कुठून आणला? असा प्रश्न मंचावर बसलेल्या आपल्या आदरणीय नेत्यांना, जे उद्या दिल्लीत जाऊन बसण्यासाठी कोलकात्याला आले होते, त्यांना विचारता येत नाही. आपण सामान्य जनता आहोत आणि सामान्य माणसाने आपली पायरी ओळखून राहायचे असते, फार मान वर करायची नाही आणि प्रश्न तर विचारायचे नसतात.

महागठबंधन रॅलीचा एकच विषय होता - तो म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार घालवायचे. लोकशाही राज्यव्यवस्थेत राज्यबदलाचा हा मौलिक अधिकार आहे. त्यावर कुणाला आक्षेप घेता येणार नाही. मोदी सरकार का घालवायचे? कारण मोदी सरकार काम करते, मोदी सरकार रस्ते बांधते, मोदी सरकारने भ्रष्टाचार कमी कमी करीत आणला आहे, नेहमीची भ्रष्टाचाराची जी कुरणे होती ती नाहीशी केली आहेत. पैसा खायला आता फारशी संधी मिळत नाही. नोटात पैसा लपवून ठेवता येत नाही, त्याचा शोध लागतो आणि मग त्यावर कर भरावा लागतो. मोदी सरकारने खेडोपाडी वीज आणि घरोघर गॅस नेण्याचा धूमधडाका लावलेला आहे. असले सरकार काय कामाचे? सरकार असले पाहिजे की ज्या सरकारात राहिल्यामुळे जेथे तेथे हात मारता येईल, खिसे भरता येतील, घराच्या तिजोऱ्या भरता येतील, आणि परिवार, जातिबांधव यांना सत्तेचा लाभ करून देता येईल. ही सत्ता सर्वोत्तम सत्ता.


 

महारॅलीत मंचावर बसलेले सर्व सन्माननीय नेते आपआपल्या प्रदेशातील मोठे नेते आहेत. आपल्या महाराष्ट्रातील आदरणीय शरद पवार 'जाणता राजा' आहेत. अरविंद केजरीवाल 'दिल्लीपती' आहेत आणि मायावती 'दलितांच्या राणी' आहेत. अखिलेश 'यादवांचे कन्हय्या' आहेत. आपआपल्या परीने प्रत्येक जण मोठा आहे. ममता दीदींविषयी तर बोलायलाच नको. त्या सर्वांच्याच दीदी आहेत. त्यांना दिल्लीच्या सिंहासनावर जाऊन बसायचे आहे, पंतप्रधान व्हायचे आहे, म्हणून गठबंधनाची रॅली कोलकात्यात. त्यांनीत्ती बारामतीत घेतली नाही किंवा लखनऊला नाही घेतली. राहुल गांधींना आमंत्रण नव्हते. ममताने रॅलीमध्येच राहुलचा पत्ता कापला आहे, मोदी यांचा पत्ता त्यांना कापायचा आहे.

हे प्रादेशिक राजे आणि राण्या समग्र भारताचा विचार करू शकतात का? भारत म्हणजे बंगाल नव्हे आणि भारत म्हणजे महाराष्ट्र नव्हे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप असा भारत आहे. एका प्रदेशाची समस्या दुसऱ्यासारखी नाही. एका प्रदेशातील विषय दुसऱ्या प्रदेशातील नसतात. या सर्व भारताचे नेतृत्व करायचे, तर भारत समजावा लागतो. सर्वांचे मिळून जे समान विषय होतात, ते जाणून घ्यावे लागतात. जातींचे विषय जातींपुरते मर्यादित असतात. जाणता राजांचे राजकारण मराठा जातीचे आहे, ममताचे राजकारण मुस्लीम राजकारण आहे, अखिलेशचे राजकराण यादवीचे आहे आणि केजरीवाल यांचे राजकराण अराजकाचे आहे.

यातील प्रत्येकाला असे वाटते की, आता जर जोर लावला आणि पुरेशा प्रमाणात खासदार निवडून आणले, तर पंतप्रधानपदाची माळ आपल्याही गळयात पडू शकते. देवेगौडा पंतप्रधान होऊ शकतात, इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान होऊ शकतात, मग ममता आणि मायावती यांनी काय घोडे मारले? शरद पवारदेखील पंतप्रधान होऊ शकतात, असे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले बहुतेक नेते महागठबंधनाच्या व्यासपीठावर बसलेले होते.

त्यांनी बंगालला काय संदेश दिला माहीत नाही, पण देशाला एक संदेश दिला आहे - तो त्यांच्या भाषणातून आलेला नाही किंवा आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या वृत्तपत्रीय संपादकीयातून आलेला नाही. तो संदेश असा आहे की, आम्हाला अखिल भारतीय पक्ष नको, आम्ही प्रादेशिक पक्षांचे कडबोळे करून सत्ता चालवू.

हा संदेश त्यांच्यासाठी चांगला असला, तरी देशासाठी अत्यंत खतरनाक आहे. देशात भ्रष्टाचाराचा पाऊस पाडणारा आहे, आणि देशाला आंतकवाद्यांच्या हवाली करणारा आहे, देशाच्या आर्थिक प्रगतीला ब्रेक लावणारा आहे, देशाचा धार्मिक सलोखा आणि प्रादेशिक सलोख्याला तडे देणारा आहे, एका भयानक राजकीय संकटाची जाणीव करून देणारा आहे.

भारताचा इतिहास आपल्याला सांगतो की, जेव्हा जेव्हा भारत राजकीयदृष्टया केंद्रस्थानी दुर्बळ झाला, तेव्हा तेव्हा भारतावर संकटे कोसळली आहेत. स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या वेळी भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाली, त्या वेळी पाकिस्तानच्या कारवाया वाढत गेल्या आहेत, दहशतवादी हल्ले वाढत गेले आहेत, अगदी राजीव गांधींच्या हत्येपर्यंत परिस्थिती गेली. काश्मीरमधील घुसखोरी वाढते आणि काश्मीर अशांत होत जातो. आपली सुरक्षा मजबूत केंद्रावर अवलंबून आहे. खिचडी खायला चांगली असते, परंतु खिचडी सरकार सहन करायलादेखील अतिशय वाईट असते.

महागठबंधन रॅलीत गोळा झालेल्या सर्व राजकीय पक्षांची विषयसूची कमालीची स्वार्थाची विषयसूची आहे. त्यांना आपल्या नेत्याला मोठे करायचे आहे, आपल्या पक्षाची ताकद वाढवायची आहे. देशाचे काय करायचे, याबद्दल कुणीही काहीही बोलत नाही. बोलायचे असेल तर त्याचा अभ्यास हवा, देश समजायला हवा, देशातील सामान्य माणूस समजायला हवा. आपल्या जातीपुरती ज्यांची ओळख आहे किंवा आपल्या मतबँकांपुरत्या त्यांच्या जाणिवा आहेत, ते देश उभा करू शकत नाहीत.

महागठबंधन रॅली हे भाजपाला आव्हान आहे, तसेच ते काँग्रेसलाही आव्हान आहे. या दोन्ही पक्षांनी या आव्हानाचा कसा स्वीकार करायचा, हे त्यांचे ते पाहतील. भारतीय नागरिक म्हणून भारताचा राष्ट्रीक म्हणून जे आव्हान तुमच्या-माझ्यासमोर आहे, ते आपणच समजून घ्यायचे आहे, आपणच त्याच्यावर विचार करायचा आहे. आम्हाला विचार करावा लागेल की, आम्हाला खिचडी सरकार पाहिजे की मजबूत सरकार पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त सरकार पाहिजे की भ्रष्टाचाराची कोळशाची खाण असलेले सरकार पाहिजे. आम्हाला भारतीयांचे सरकार पाहिजे की विविध जातींचे सरकार पाहिजे. आम्हाला उद्योग देणारे, शिक्षणाची चांगली व्यवस्था करणारे, चांगली आरोग्यसेवा देणारे सरकार पाहिजे की याचा बट्टयाबोळ करणारे सरकार पाहिजे. सीमा सुरक्षा ठेवणारे सरकार पाहिजे की सीमा पेटलेल्या ठेवणारे सरकार पाहिजे. आपल्या पुढचे हे आव्हान आहे. म्हणून प्रादेशिकता कितीही जवळची असली, तरीही राष्ट्रभाव त्यापेक्षा फार मोठा आहे. मोठी आग पेटवल्याने जो उजेड होईल त्याची सर सूर्याने निर्माण केलेल्या उजेडाशी कशी येणार! म्हणून नेहमीच राष्ट्रभाव हा प्रादेशिकतेच्या वर असायला हवा.

vivekedit@gmail.com