प्रजातंत्राची शक्ती

विवेक मराठी    23-Jan-2019
Total Views |

 

 

व्यक्तीच्या मताची किंमत आहे आणि ती खूप मोठी आहे. भारतीय प्रजातंत्राने प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येक मताचे मूल्य समान आहे. श्रीमंत-गरीब, उच्च आणि कनिष्ठ जातीतील, स्त्री आणि पुरुष अशी वर्गवारी मताधिकार करीत नाही. तो सर्वांना समान आहे, सारखाच आहे.

प्रजातंत्रात आपण - म्हणजे प्रजा, सर्व शक्तीचे उगमस्थान असतो, याचा नेमका अर्थ काय होतो? कोणत्या प्रकारच्या शक्ती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत? त्या कुणी आपल्याला दिल्या आहेत की त्या अंगभूत आहेत? अंगभूत याचा अर्थ जन्मतःच आपल्याला जसा आपल्याला रंग प्राप्त होतो, शरीराची रचना प्राप्त होते, तशा या शक्ती जन्मतःच प्राप्त होत असतात.

या शक्ती जशा एकेका व्यक्तीला प्राप्त होतात, तशा या शक्ती समाजालाही प्राप्त होतात. व्यक्तींचा मिळून समाज होतो. आणि जसे व्यक्तीला शरीर असते, मन असते, बुध्दी असते, तशी समाजालादेखील एक शरीर असते, मन असते आणि त्याची बुध्दी असते. व्यक्तींची बेरीज किंवा व्यक्तींच्या मनाची, बुध्दीची, शरीराची बेरीज म्हणजे समाजाची शरीर, मन, बुध्दी नव्हे. त्याचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे.

'गाव करी ते राव काय करी' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजे समाज जे करील ते एक व्यक्ती करू शकत नाही. म्हणीतील राव म्हणजे पैशाने किंवा अन्य साधनाने सशक्त असलेला माणूस. त्याची शक्ती समाजाच्या शक्तीपुढे कमीच असते. प्रजातंत्राने समाजरूपी मनाला, बुध्दीला आणि शरीराला अफाट शक्ती दिलेली आहे.

त्यातील एका राजकीय शक्तीचा आपण विचार करू. ही राजकीय शक्ती मतदानाची शक्ती असते. मतदान हा शब्द तसा योग्य वाटत नाही. कारण मतांचे दान करायचे नसते. मताची अंमलबजावणी करायची असते. परंतु मतदान हा शब्दप्रयोग रूढ झाल्यामुळे तो वापरावा लागतो.

म्हटले तर एका व्यक्तीच्या मताला किंमत आहे आणि ती खूप मोठी आहे. भारतीय प्रजातंत्राने प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येक मताचे मूल्य समान आहे. श्रीमंत-गरीब, उच्च आणि कनिष्ठ जातीतील, स्त्री आणि पुरुष अशी वर्गवारी मताधिकार करीत नाही. तो सर्वांना समान आहे, सारखाच आहे.

मताचे मूल्य असाधारण असले, तरी एका मताचे मूल्य असाधारण ठरत नाही. ही मतदानाची शक्ती जेव्हा संघटित होते, तेव्हाच ती परिणामकारक होते. पावसाची एक सर आली आणि गेली, याने शेतीला काही फायदा नाही, पिण्याच्या पाण्याची साठवण करता येत नाही, विहिरी-तलावदेखील भरत नाहीत, म्हणून पाऊस संघटितपणे कोसळावा लागतो. असा कोसळला की त्याचा परिणाम सुखकारक होतो.

मतेदेखील संघटित होऊन अभिव्यक्त झाली, तर त्याचे परिणाम चांगले दिसू लागतात आणि मतांचे वाटेल तसे विभाजन होऊन ही राजकीय शक्ती विभाजित झाली, तर त्याचे परिणाम विभाजित होतात. मते संघटित होऊन दिली, तर कोणता तरी एखादा राजकीय पक्ष सत्तेवर येतो. राजकीय पक्षांची उपज प्रजेतूनच होत असते. त्यामुळे प्रजेने त्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय इच्छाशक्तीचे प्रकटीकरण केले, असा त्याचा अर्थ होतो.

या राजकीय इच्छाशक्तीचे विभाजन झाले, तर विभाजित परिणाम दिसायला लागतात. परिणाम कोणते दिसले पाहिजेत, हे प्रजातंत्र सांगत नाहीत त्या बाबतीत ते तटस्थ असतात. परिणाम कोणते असले पाहिजेत, हे ठरविण्याचे सगळे अधिकार आणि शक्ती प्रजातंत्राने प्रजेला दिलेली आहे. प्रजेची राजकीय शक्ती विभाजित झाली की मग कोणत्याही एका पक्षाला निर्णायक मत मिळत नाही आणि त्याची सत्ता येत नाही. मग युती करावी लागते. युतीतील पक्ष सत्तेत राहून एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा लोकांना वाटते की सत्ता म्हणजे चरण्याचे कुरण आहे आणि मग ते पोट फाटेपर्यंत चरत राहतात.


 

यासाठी आपल्या राजकीय इच्छाशक्तीची ओळख आपल्याला जशी व्यक्तिशः करून घ्यायला पाहिजे, तशी समाजरूपानेदेखील करून घ्यायला पाहिजे. ही ओळख कशी केली पाहिजे, हे भगवान गौतम बुध्द या उपदेशात सांगतात. गृधकूट पर्वतावर भगवान गौतम बुध्दांचा निवास असताना वस्सकारब्राह्मण त्यांच्याकडे आला आणि त्याने वज्जी लोकांचे बलाढय राज्य जिंकून घेण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा भगवतांनी त्याला उत्तर न देता भिख्खू आनंदाकडे वळून ते म्हणाले, ''आनंद, आजपर्यंत वज्जी वारंवार एकत्र जमवून राजकारणाचा खल करीत आहे काय?'' ''होय भगवन'' आनंदाने उत्तर दिले.

''आनंद, वज्जी जेव्हा एकत्र होतात आणि घरी जातात, तेव्हा त्यांच्यात एकसारखी एकी असते काय?'' आनंद म्हणाला, ''हो भगवन'' ''आपण केलेल्या कायद्यांचा वज्जी भंग करीत नाही ना किंवा कायद्याचा भलताच अर्थ करीत नाहीत ना? ते कायद्याला अनुसरून वागत आहेत ना?'' आनंद म्हणाला, ''होय भगवन'' भगवननी पुढचा प्रश्न केला, ''वज्जींच्या राज्यांत वृध्द राजकारणी पुरुषांना मान आहे ना? स्त्रीजातीचा सन्मान करतात ना?'' अशा प्रकारचे सात प्रश्न भगवान गौतम बुध्दांनी विचारलेले आहेत आणि त्यावर शेवटी भगवान गौतम बुध्द म्हणतात, ''वज्जी जोपर्यंत या नियमांचे पालन करीत आहेत, तोपर्यंत ते अजयी आहेत.''

भगवान गौतम बुध्दांना सांगायचे आहे की, आपली राजकीय इच्छाशक्ती ज्यांना नीट समजली आणि त्याचे अनुसरण करणे ज्याला समजले, ते अजयी असतात.

प्रजातंत्रात प्रजा सर्वशक्तिमान असते आणि या शक्तीचे एक रूप तिच्या राजकीय शक्तीत असते. ही राजकीय शक्ती काही नियमांचे पालन करून आपण आपल्यामध्ये जागृत करू शकतो. अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुध्दांनी हे नियम सांगितले.

आपल्या देशाची तेजस्वी परंपरा अशा महापुरुषांची आहे. ते प्रत्येक कालखंडामध्ये समाजाने कोणत्या नियमाने स्वतःला बांधून घेतले पाहिजे हे सांगतात आणि आपली सर्वसामान्य माणसांची परंपरा अशी आहे की, महापुरुषांनी जे सांगितले त्याचे ग्रंथ करायचे आणि पुण्यप्राप्तीसाठी त्याचे पारायण करायचे, आचरणात आणायच्या भानगडीत पडायचे नाही.  महापुरुषाला महामानव, महापुरुष, अवतारी पुरुष ठरवून टाकायचे. त्याची देवळे बांधायची, त्याच्यावर पोथी रचायची, त्याची आरती करायची, वर्षातून एक यात्रा करायची आणि बाकीचे दिवस बुध्दी गुडघ्याला बांधून व्यवहार करायचा. गेली हजारो वर्षे आपल्या पूर्वजांनी आणि स्वातंत्र्यानंतर आपण ही परंपरा पाळीत आलेलो आहोत.

याचा परिणाम एवढाच होतो की, आपण कोण आहोत आणि आपली शक्ती कुठे आहे, तिचा वापर कसा करायचा, हेच आपल्याला समजत नाही. रामायणात हनुमंताची गोष्ट सांगितली जाते. असे सांगितले जाते की, जन्मतःच तो सूर्यबिंब ग्रासण्यासाठी आकाशात झेपावला. इंद्राने वज्र टाकून त्याला खाली पाडले. आपल्या शक्तीचा अपव्यय करीत असल्यामुळे तो ऋषींच्या रागाची शिकार झाला. ऋषींनी त्याला शाप दिला की, तुला तुझ्या शक्तीचे विस्मरण होईल आणि क्षमा मागितल्यानंतर त्याला उःशाप दिला की, योग्य वेळी तुझ्या शक्तीचे तुला स्मरण करून दिल्यास ती जागी होईल.

सीताशोध घेत असताना रामेश्वरला आल्यानंतर तो प्रसंग आला आणि हनुमंताला त्याच्या अफाट शक्तीचे स्मरण करून देण्यात आले. पुढचे रामायण आपल्याला माहीत आहे. अशी हनुमंतासारखी अफाट शक्ती प्रजेत असते. ती केवळ मतदानाची राजकीय शक्तीच आहे असे नाही, विचारशक्ती हे तिचे दुसरे रूप आहे.

मतदान करत असताना ते विचारपूर्वक करायचे की विचार घरी ठेवून करायचे, याचा विचारी मतदाराने विचार करायला पाहिजे. शक्तीचे असे असते की, ती सामर्थ्य देते, परंतु हे सामर्थ्य कसे वापरायचे याची अक्कल नसल्यास तीच शक्ती आपल्या अंगावरही उलटण्याची शक्यता असते. पंचतंत्रात याची सुंदर कथा आहे.

विद्याभ्यास संपून चौघे जण आपल्या घरी निघाले होते. जंगलातून जाताना त्यांनी एका झाडाखाली विखुरलेली हाडके बघितली. त्यातील एकाकडे हाडकांचा सांगडा करण्याची विद्या होती. तो आपल्या मित्रांना म्हणाला, ''आपण जी विद्या शिकलो, त्याची परीक्षा करू या.'' असे म्हणून त्याने सर्व हाडके एकत्र केली आणि त्याचा सांगाडा तयार केला. दुसरा म्हणाला, ''मला या सांगडयामध्ये मांस भरण्याची विद्या येते'' आणि त्याने त्याच्यामध्ये आपल्या विद्येचा उपयोग करून मांस भरले. मांस भरल्यानंतर सर्वांच्या लक्षात आले की, जी हाडके पडली होती ती सिंहाची होती. तिसरा म्हणाला, ''मी आता याच्यामध्ये प्राण भरतो.'' चौथ्याला फारशी विद्या येत नव्हती, पण त्याला व्यवहारज्ञान खूप होते. तो म्हणाला, ''हा सिंह आहे, हा जर जिवंत झाला तर तो आपल्या सर्वांना खाऊन टाकेल.''

बाकीच्या तिघांनी त्याचे ऐकले नाही. चौथा म्हणाला, ''तुम्हाला काय करायचे ते करा, मी झाडावर बसतो.'' तिसऱ्याने सिंहामध्ये प्राण फुंकले. सिंह जागा झाला. त्याचे पोट रिकामे होते. त्याने तिघांवर झडप मारून त्यांना ठार केले.

विचार न करता शक्तीचा वापर केला, तर सिंहाच्या पोटात जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. म्हणून विचार कसला करायचा असतो? विचार याचा करायचा असतो की, ज्या लोकांकरवी आपल्याला राज्य करायचे आहे, ते लोक - म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे तर राजनेते - त्या लायकीचे आहेत का? कोणाची लायकी काढली तर ती त्याला आवडत नाही. म्हणून दुसरा शब्द वापरू - ते त्यासाठी पात्र आहेत का?

आपण ज्यांना निवडून देणार आहोत, त्यांची पात्रता कशी ठरविणार? निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराचे वय, संपत्तीचे विवरण, भारतीय नागरिक असल्याचा दाखला वगैरे वगैरे गोष्टी पात्रतेसाठी पुरेशा आहेत. हा कायद्याचा विषय थोडा बाजूला ठेवू या. आपण आपला प्रतिनिधी निवडत असताना केवळ कायद्याचा विचार करून चालणार नाही, दुसऱ्या अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे.

उमेदवाराचे शिक्षण काय? हा पहिला प्रश्न येतो. राज्य चालविण्यासाठी अनेक विषयांचे ज्ञान असावे लागते. अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, विज्ञान, राज्यघटना, कर आकारण्याच्या पध्दती, वस्तूंचे नियोजन अशा एक ना अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतात. अंगठेबहाद्दर लोकप्रतिनिधी फारसे उपयोगाचे नसतात. राजकीय पक्ष प्रचारासाठी असे लोक निवडून त्यांना उभे करतात. फुलनदेवी हे त्याचे उदाहरण सांगता येईल. राजकीय पक्षांना आपल्या डोक्यावर बसू देणे आपण कशासाठी सहन करायचे?

उमेदवाराचे चारित्र्यदेखील पाहिले पाहिजे. तो भ्रष्टाचारी आहे का? अनाचाराच्या घटना त्याच्या खात्यात जमा आहेत का? तो दुर्बळांना पिडणारा आहे का? अशा कसोटया लावून उमेदवाराला मत दिले पाहिजे. माझ्या आवडीच्या पक्षाचा उमेदवार आहे म्हणून मी त्यालाच मत देणार, हा आपल्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे.

उमेदवार खरोखरच समाजसेवक आहे का, की त्याने समाजसेवेचे सोंग घेतले आहे? याची पारख आपण केली पाहिजे. असे काही आमदार आणि नगरसेवक असतात जे नागरिकांना 24 तास उपलब्ध असतात. नागरिकांना सुख लाभावे म्हणून ते जिवापाड परिश्रम करत राहतात. ते खऱ्या अर्थाने कार्यसम्राट असतात. अशी आपली सर्वार्थाने काळजी करणारा उमेदवार निवडला पाहिजे. निवडून येण्याची क्षमता या निकषावर सध्या राजकीय पक्ष उमेदवाराची निवड करतात. त्यांच्या दृष्टीने उमेदवाराकडे पैसा किती आहे आणि भल्या-बुऱ्या कोणत्याही मार्गाने तो मतदारांना मतपेढीकडे खेचून आणू शकतो का? यावरून निवडून येण्याची क्षमता ठरत असते. आपण काय ठरविणार?

सार्वत्रिक निवडणुका झाल्या की प्रसिध्दी माध्यमे काही आकडेवारी प्रसिध्द करतात. या आकडेवारीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले किती प्रतिनिधी निवडून आले, यांची यादी असते. लोकप्रतिनिधींचे मुख्य काम कोणते? तर कायदा बनविण्याचे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप का ठेवले जातात? कारण ते कायदा मोडतात. म्हणजे आपण कायदा मोडणाऱ्यांच्या हातात कायदा करण्याची शक्ती देतो.

विचारशक्तीचा काहीही वापर न करता जेव्हा आपण निर्णय घेतो, तेव्हा याशिवाय दुसरे काय हाती येणार? प्रजातंत्राने आपल्याला जी राजकीय शक्ती दिलेली आहे, ती विचारपूर्वक वापरण्यासाठी दिलेली आहे. (क्रमश:)

vvivekedit@gmail.com

सदर - आपणच आपले रक्षणकर्ते

लेखांक - 4