हुकमाचं शेवटचं पान ?

विवेक मराठी    24-Jan-2019
Total Views |

 


 

मोदी हटाव मोहिमेत काँग्रेसने सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं आहे, हेच या घटनेतून अधोरेखित होतं आहे. याहून मोठा हुकमाचा एक्का सध्यातरी या पक्षाकडे नाही. तो टाकून या पक्षाने निवडणुकीतली रंगत वाढवली आहे, हे खरं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही मोदींच्या नेतृत्वाची परीक्षा आहे, तशी काँग्रेसच्या हातातल्या शेवटच्या हुकमी एक्क्याच्या राजकीय वाटचालीची दिशा ठरवणारीही आहे.

कायद्यानुसार सज्ञान असलेल्या व्यक्तीला सक्रिय राजकारणात प्रवेश घेण्याचा अधिकार संविधानानेच आपल्याला दिला आहे. प्रियंका गांधीही त्याला अपवाद नाहीत. काँग्रेसने सरचिटणीसपदावर त्यांची नियुक्ती करून उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. 'मी सक्रिय राजकारणात येणार नाही' असं अनेकदा जाहीर करणाऱ्या आणि आई-भावासाठीच्या निवडणूक प्रचाराव्यतिरिक्त पक्षप्रचारात सहभागी न होणाऱ्या प्रियंकांवर ही वेळ यावी, यामागे त्यांच्या 'राज'घराण्याची, शंभरी ओलांडलेल्या पक्षाची अपरिहार्यता आहे हे समजून घ्यायला हवं आणि त्यांच्या सक्रिय राजकारण प्रवेशाला अपशकुन करू नये. लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षातही जबाबदारीने राजकारण करणारी माणसं असली, तरच योग्य तो समतोल राखला जातो. गेल्या 4 वर्षांत तो पार ढासळला होता. आता राजकारणी म्हणून प्रियंका यांची आजवर गुलदस्त्यात असलेली योग्यता काळाच्या ओघात सिध्द होईलच, तोवर त्यांना एक जबाबदार राजकारणी समजणं हे आपल्या वैचारिक प्रगल्भतेचं लक्षण आहे. प्रियंका यांना त्यांच्या आयुष्यातल्या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा आणि पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सत्ताधाऱ्यांनी या नवीन टाकलेल्या पत्त्याला पुरेशा गांभीर्याने घेत व्यूहरचना करावी, यासाठी शुभेच्छा.

नेहरूंचं घराणं हे स्वातंत्र्योत्तर कालखंडातलं या देशावर सर्वाधिक काळ राज्य करणारं घराणं आणि त्यामुळे ओघानेच काँग्रेस हा सर्वाधिक काळ सत्ता भोगणारा पक्ष. हे घराणं पुन्हापुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी येण्याला केवळ राजकारणातले शह-काटशह जबाबदार नाहीत, तर सर्वसामान्य भारतीयाला असलेलं व्यक्तिपूजेचं अपरंपार वेड हेही त्याला तितकंच कारणीभूत आहे. वैचारिक निष्ठेपेक्षा व्यक्तिपूजा, व्यक्तिनिष्ठा हे भारताच्या सामूहिक मानसाचं वैशिष्टय आहे. केंद्रीय स्तरापासून ते पार अगदी तळागाळापर्यंत त्याचं प्रतिबिंब दिसून येतं. राज्याराज्यातल्या टोकदार झालेल्या प्रादेशिक अस्मिता आणि त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्ती आठवून पाहिल्या, तरी हा मुद्दा पटेल. व्यक्तिपूजा हा भारतीय मतदाराच्या मानसिकतेचा ल.सा.वि. आहे. काही ठिकाणी हे पूजन केंद्रस्तरावरच्या नेत्याचं होण्याऐवजी स्थानिक वा प्रांत पातळीवरच्या नेत्याचं होत असतं. त्याचा प्रतिकूल परिणाम काँग्रेसच्या मतांवर होऊ शकतो.

गांधी घराण्याने जपलेली घराणेशाही पाहता, प्रियंका गांधी राजकारणात येणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. बराच काळ त्यांच्या आगमनाची आवई उठत होती आणि हवेत विरत होती. त्यामागचं एक कारण खुद्द त्यांचे यजमान रॉबर्ट वड्रा आणि त्यांचे उद्योग. या उद्योगांमुळे आणि मागे लागलेल्या ससेमिऱ्यामुळे प्रियंकांचा राजकारणात सक्रिय होण्याचा मुहूर्त पुढे पुढे जात होता. या विषयाची टांगती तलवार अद्यापही त्यांच्या शिरावर आहेच. 

प्रवेशाच्या मुहूर्त लांबणीला दुसरी कारणीभूत व्यक्ती म्हणजे त्यांचा भाऊ. मोठया बहिणीआधी राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळालेल्या युवराजांना गेली काही वर्षं सातत्याने अपयश येऊनही, कर्तृत्व सिध्द करण्यासाठी पुन्हापुन्हा मैदानात उतरवलं जात होतं. अनेकदा त्यात अपयशी झाल्यावर, पार नाकातोंडात माती गेल्यावर गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवल्यानंतर राहुल यांच्याविषयी काँग्रेसीजनांच्या आशा पल्लवित झाल्या आणि प्रियंका सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता धूसर झाली. मात्र तरीही लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं नेतृत्व करण्याइतका युवराजांचा आवाका नाही, हे काँग्रेसमधल्या ज्येष्ठांना पटल्यानंतर प्रियंकांना उत्तर प्रदेशच्या मार्गाने राजकारणाच्या आखाडयात उतरवण्यात येत असावं, असा कयास आहे.

मात्र प्रियंकांना दिलेलं हे मैदान म्हणजे काँग्रेस पक्षाचा मनसबीतला परंपरागत गड आहे. या भागात गांधी घराण्याचे मतदारसंघ येतात. या भागातील लोकांची गांधी घराण्यावर असलेली वंशपरंपरागत निष्ठा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे हे मतदारसंघ कदाचित राखलेही जातील. पण याच पूर्व उत्तर प्रदेशात विद्यमान पंतप्रधान आणि विद्यमान मुख्यमंत्री यांचेही मतदारसंघ येतात. प्रियंका यांच्यातील नेतृत्वक्षमतेचा, धोरणीपणाचा आणि नियोजनाचा कस लागेल तो इथे. त्यासाठी त्यांना मिळत असलेला अवधी खूप कमी आहे, असं वाटतं.

इंदिरा गांधी जाऊन आता 35 वर्षं होत आली. या काळात मतदारांची निम्मी पिढी तरी नवीन आली असेल, ज्यांनी इंदिरा गांधींचा कार्यकाळ पाहिलेला नाही. त्यांना प्रियंकाच्या चेहऱ्याचं आजीच्या चेहऱ्याशी किती साम्य आहे याच्याशी काही देणंघेणं नसावं. तेव्हा त्यांचं आजीच्या चेहऱ्याशी असलेलं साधर्म्य आणि राजकारणातली कोरी पाटी या दोन्ही बाबी जशा जमेच्या ठरू शकतात, तशा वेळप्रसंगी उलटूही शकतात.

उत्तर प्रदेशच्या निकालांमध्ये देशाच्या राजकारणाची, सत्ताकारणाची दिशा ठरवण्याचं सामर्थ्य आहे. प्रियंका यांच्यावर काँग्रेसने 80पैकी 40 मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. त्यातले मूळचे मतदारसंघ राखण्याबरोबरच नवीन ताब्यात घेण्यासाठी कसून तयारी करण्याची गरज आहे.

प्रियंका यांचं आगमन हे भाजपा-सपासाठी आव्हान आहे, या दोन पक्षांवर दडपण आणणारं आहे असा होरा अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. राजकारण ही एक प्रकारची युध्दभूमीच असते. तिथे शह-काटशह चालणारच. आव्हानं-प्रतिआव्हानं दिली जाणारच. त्या आव्हानांना तोंड देण्याची या पक्षांची तयारी नसेल असा समज करून घेणं हा दुधखुळेपणा ठरू शकतो. तसंच उद्या प्रियंका यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरायचं ठरवलं, तर मोदीविरोधातल्या कडबोळयातल्या त्या पंतप्रधानपदासाठीच्या आणखी एक दावेदार असू शकतात, याची जाणीव या बातमीने हर्षवायू झालेल्या अन्य इच्छुकांनी ठेवायला हवी.

मोदी हटाव मोहिमेत काँग्रेसने सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं आहे, हेच या घटनेतून अधोरेखित होतं आहे. याहून मोठा हुकमाचा एक्का सध्यातरी या पक्षाकडे नाही. तो टाकून या पक्षाने निवडणुकीतली रंगत वाढवली आहे, हे खरं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही मोदींच्या नेतृत्वाची परीक्षा आहे, तशी काँग्रेसच्या हातातल्या शेवटच्या हुकमी एक्क्याच्या राजकीय वाटचालीची दिशा ठरवणारीही आहे.