धार्मिक कर्मकांडे हे संघाचे काम नाही

विवेक मराठी    24-Jan-2019
Total Views |

 विवेकमधील 'त्वं मे सहव्रता भव' या लेखावरून फेसबुकवर जो विनाकारण वादंग उठवण्यात आला, त्यालाही उत्तर देणं आम्ही आमची जबाबदारी समजतो. याउप्पर विवेकसाठी ही चर्चा इथेच थांबवत आहोत.

सुमेध आणि दीपाली यांच्या विवाहाचा लेख विवेकमध्ये प्रकाशित झाल्यानंतर काही जणांचा असा समज झाला की, जर असे विवाह होत गेले तर हिंदू धर्म रसातळाला जाईल. विवेक संघाचे, म्हणून अशा विषयांना संघाची मान्यता आहे का? अशी चर्चा काही जणांनी सुरू केली. त्या सर्वांसाठी सांगणे आहे की, संघाचे काम धार्मिक कर्मकाडांचे संरक्षण करण्याचे नाही. डॉ. हेडगेवार प्रवासात सांगली येथे गेले असता तेथील कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना प्रश्न विचारला, ''तुमच्या संघात गोपाळकाला आहे, सर्व जातीतील लोक एकत्र जेवतात, यातून धर्माचे रक्षण कसे होणार?'' डॉक्टरांनी उत्तर दिले, ''संघाचे काम धर्मरक्षणाचे आहे.'' असे वचन आहे - 'धर्मो रक्षति, रक्षितः' - जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो.

  

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....
 https://www.facebook.com/VivekSaptahik/

 
धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे सत्यनारायणाची पूजा, चतुर्थीचा उपवास, आणखी विविध प्रकारची कर्मकांडे, विष्णुसहस्रनाम नव्हे. धर्म म्हणजे समाजाची धारणा करणारे नियम. समाजातील व्यक्तींनी परस्परपूरक बनून कसे राहायचे, हे सांगणारे नियम. त्यासाठी सत्य, अहिंसा, शौच, इंद्रियनिग्रह, अस्तेय इत्यादी नियमांचे पालन करावे लागते. या नियमांचे पालन म्हणजे धर्मपालन, या नियमांचे रक्षण म्हणजे धर्मरक्षण.

डॉक्टरांनी जो संघ सुरू केला, त्यात कोणतेही धार्मिक कर्मकांड आणले नाही. संघाच्या एका तासाच्या शाखेत फक्त राष्ट्रचिंतन होते. सत्यनारायणाची पूजा, गणपतीची पूजा, मारुतीची पूजा, चतुर्थीचा उपवास आणि एकादशी असले कार्यक्रम शाखेत होत नाहीत, ते ज्याचे त्याने आपआपल्या घरी करायचे असतात. संघाचा त्याला विरोध नसतो आणि प्रोत्साहनही नसते. या बाबतीत संघाची भूमिका पूर्णपणे तटस्थतेची आहे.

त्वं मे सहव्रता भव

लेख 

http://www.evivek.com/Encyc/2019/1/10/dnyan-prabodhini-wedding-culture

धार्मिक विधी कसे करायचे, कुणी करायचे, का करायचे, कुठे करायचे, केव्हा करायचे, हे सांगणे संघाचे काम नाही. हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत आचारधर्म आहे. त्याने त्याच्या बुद्धीला पटेल अशा प्रकारे त्याचे पालन करायचे. परंपरा अशी आहे म्हणून असेच केले पाहिजे, नाहीतर पाप लागेल, अशा गोष्टी सांगून भीती उत्पन्न करणे सर्वस्वी चुकीचे आहे. आचारधर्म सोडा असे संघ कुणालाही सांगत नाही, पण त्याच वेळी पुरोहित म्हणतील तोच आचारधर्म आणि त्याचेच पालन करा, असे संघ कधीही सांगत नाही.

आपल्या देशात एका विशिष्ट जातीने पुरोहितशाही दीर्घकाळ निर्माण केली. देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यासाठी ज्ञानदेवांना ज्ञानेश्वरी सांगावी लागली आणि तुकोबांना म्हणावे लागले की, 'वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा, येरांनी वाहावा भार माथा।' मक्तेदारी योग्य नाही, हिंदू समाजाच्या हिताची नाही, म्हणून संघाच्या प्रेरणेने विविध जातींतील तरुणांना पुजारी विधींचे प्रशिक्षण दिले जाते. केरळमध्ये आणि तामिळनाडूत हा प्रयोग अनेक वर्षे चालू आहे. दर वर्षी नाशिकच्या पुण्यक्षेत्री या वर्गाचे आयोजन केले जाते. धार्मिक विधी करण्याचा अधिकार सर्व हिंदूंना आहे. त्यात कुठल्याही जातीची मक्तेदारी आताच्या काळात ठीक नाही.

काळ बदलतो, त्याप्रमाणे धार्मिक आचारधर्मात आणि रूढीत बदल करावे लागतात. हिंदू समाजाचे हे मोठे वैशिष्ट्य आहे, तो काळानुरुप बदलत जातो. 'माझे बापजादे खाऱ्या पाण्याच्या विहिरीतून पाणी पीत, म्हणून मीसुद्धा तेच करणार' असे तो म्हणत नाही. आचारधर्मातील गाभ्याचा विषय मूलतत्त्वाचा असतो. सुमेध आणि दीपाली यांच्या लग्नातील गाभ्याचा विषय पती आणि पत्नी दोघांनी आपआपल्या धर्माचे पालन करण्याचा आहे. पत्नीने पत्निधर्माचे आणि पतीने पतिधर्माचे पालन करायचे. येथे धर्म म्हणजे कर्तव्य असा अर्थ करावा लागतो. त्यामध्ये एकमेकांशी एकनिष्ठ राहणे आणि प्रपंचाची जबाबदारी दोघांनी मिळून आपल्या खांद्यावर घेणे अपेक्षित आहे. या गाभ्याच्या विषयाला जोपर्यंत धक्का लावला जात नाही, तोपर्यंत कोणते मंत्र म्हटले, ते कुणी म्हटले, या प्रश्नांना तसा काही अर्थ नसतो. मंत्र तेव्हाच सजीव होतो, जेव्हा त्याचा पूर्ण अर्थ जाणून त्याचे उच्चारण आणि आचरण केले जाते, नुसतीच शाब्दिक बडबड काय कामाची? 'अर्थेविण पाठांतर कासया करावे, व्यर्थचि मरावे घोकुनिया।' सुमेध आणि दीपाली यांनी अर्थ जाणून अर्थपूर्ण जगण्याचा संकल्प केला, म्हणून त्यांचे अभिनंदन!