ही कैसी कळवळ्याची जाति?

विवेक मराठी    25-Jan-2019
Total Views |

 

 नयनातारा सहगल यांची झाल्या प्रकाराबद्दल - स्थानिक आयोजकांसह बहुतेक सर्वांनी जाहीर आणि निःसंदिग्ध माफी मागितल्यानंतरही, झाल्या घटनेचा स्पष्ट शब्दांत निषेध केल्यानंतरही त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेल्या जिव्हाळ्यामुळे (!?) ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा यांनी जाहीर ऋण व्यक्त केल्यानंतरही, यापैकी कशानेही ज्यांचं समाधान झालं नाही, अशांनी हा जाहीर माफीचा कार्यक्रम योजला आहे.

मराठी सारस्वतातल्या अनेक ज्येष्ठ साहित्यिकांना 'निवडणुकीचं तंत्र-मंत्र' अवगत नसल्याने आणि त्यासाठी करावा लागणारा प्रचारप्रक्रियेचीही ऍलर्जी असल्याने संमेलनाध्यक्षपदाची शोभा खऱ्या अर्थाने वाढवू शकतील अशा अनेक व्यक्ती साहित्य संमेलनापासून वर्षानुवर्षं दूर राहिल्या. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला गेल्या काही वर्षांत उतरती कळा लागल्यानंतर, यंदाच्या वर्षीपासून महामंडळाने साहित्य संमेलनाला निवडणुकीच्या जाचक, अवमानास्पद बंधनातून मुक्त केलं.

ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणाताई ढेरे सर्वसंमतीने या पहिल्यावहिल्या संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या. या निवडीने मनस्वी आनंद झालेल्या वाचकांनी संमेलनाअगोदरपासून त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम गावोगावी योजले. ऐन संमेलनावेळी निर्माण झालेला अनपेक्षित ताण सोसून अरुणाताईंनी अतिशय उत्तम, दीर्घकाळ स्मरणात राहील असं भाषण केलं. या पार्श्वभूमीवर यवतमाळ संमेलनाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे एक नवा इतिहास निर्माण झाला.... असं, सर्वसामान्यांना आनंददायक वाटण्याजोगं सगळं झालं असलं, तरी असं झाल्यामुळेच आनंद न झालेला (खरं तर उठलेला असह्य पोटशूळ अनेक दिवस दाबून ठेवलेला) एक मोठा वर्ग एका संधीची वाट पाहत दबा धरून बसला होता. त्याचा हा पोटशूळ अजूनही सोडावॉटरसारखा फसफसून बाहेर येतो आहे... ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या जाहीर माफीचा कार्यक्रम हे तर त्या पोटशूळाला वाट करून देण्यासाठी योजलेलं एक निमित्त.

नयनातारा सहगल यांची झाल्या प्रकाराबद्दल - स्थानिक आयोजकांसह बहुतेक सर्वांनी जाहीर आणि निःसंदिग्ध माफी मागितल्यानंतरही, झाल्या घटनेचा स्पष्ट शब्दांत निषेध केल्यानंतरही त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेल्या जिव्हाळ्यामुळे (!?) ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा यांनी जाहीर ऋण व्यक्त केल्यानंतरही, यापैकी कशानेही ज्यांचं समाधान झालं नाही, अशांनी हा जाहीर माफीचा कार्यक्रम योजला आहे.

संमेलनाच्या काळात तीन दिवस अतिशय एकांगी आणि विकृत बातमीदारी करायचं पुण्यकर्म पार पडल्यावर, अंमळ विश्रांती घेऊन ही मंडळी या माफीनाट्यासाठी तयार झाली आहेत.

संमेलनाची धामधूम संपून बाकी दुनिया आपापल्या कामाला आणि वेगवेगळ्या विषयांत आता गढून गेली असली, तरी यांची माफीकथा काही संपण्याचं नाव घेत नाही.

हे आहे तरी काय गौडबंगाल?

सर्वसामान्यांच्या वतीने, संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने हे आयोजन केलं असल्याचं ते कशाच्या आधारावर सांगत आहेत? या आशयाचे किती विनंत्याअर्ज त्यांच्या दरबारात आले आहेत, याबाबतही त्यांनी जाहीर खुलासा करावा. तोही हा कार्यक्रम होण्याआधी.

या माफीनाट्याच्या पडद्याआडचे कलाकार कोण आहेत याचा अंदाजही बांधता येणार नाही, इतके बाकीचे दूधखुळे आहेत अशी आयोजकांची कल्पना आहे का?

आपण इतकी विघ्नं आणूनही साहित्य संमेलन यशस्वी होतं, आपल्या विचारांचा झेंडा फडकवण्याची एक नामी संधी आपल्या हातून जाते, या पश्चातबुद्धीनंतर मांडलेला हा खेळ आहे.

हे जे कोणी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं बोलत आहेत, त्यांनी स्वत:सह आणखी किमान दोन जणांच्या गळचेपीची उदाहरणं खात्रीच्या पुराव्यानिशी सोशल मीडियासारख्या 'पब्लिक डोमेन'मध्ये ठेवावीत. ते वाचून सर्वसामान्य वाचक मत बनवतील.

अनेकांनी नि:संदिग्ध शब्दांत माफी मागितल्यानंतर सर्व मराठी भाषिकांच्या मनात आता कोणताही सल वगैरे राहिलेला नाही. तेव्हा अशा नाट्यातून त्यांच्याविषयी नसते गैरसमज निर्माण करू नयेत. मुळात नयनतारा सहगल या ज्येष्ठ लेखिका आहेत यापलीकडे अनेकांना त्यांच्याविषयी खरोखरीच काही माहिती नाही, हे लक्षात घ्यावं. अर्थात हे अज्ञान म्हणजे काही अपराध नाही.

तेव्हा सर्वसामान्यांचं मत विचारात न घेता, 'सर्व मराठी भाषिक' असं निमंत्रण पत्रिकेत म्हणून सरसकट सर्वांना आपल्या बाजूला खेचून घेऊ नये. या सर्व मराठी भाषिकांविषयी खरोखरीच काही सद्भावना मनात असेल, तर या माफीनाट्यापेक्षा नयनातारा सहगल यांच्या साहित्यविषयक कामगिरीचं थोरपण सांगणारी 2-4 व्याख्यानं आयोजित करावीत. (पण त्यासाठी अभ्यास करावा लागेल, त्यावर आपलं मत मांडण्याएवढी तयारी करावी लागेल.) हे केल्याने सर्वसामान्यांचं त्यांच्या योगदानाविषयीचं अज्ञान काही प्रमाणात दूर होईलच, शिवाय आपल्या साहित्याचा प्रचार केल्याबद्दल नयनताराबाईही धन्यवाद देतील.

नसलेली भयग्रस्तता, नसलेलं सांस्कृतिक प्रदूषण याचा सातत्याने कंठरवाने उच्चार म्हणजे 'साप, साप' म्हणून भुई धोपटणंच आहे. यातून हीच मंडळी अधिकाधिक हास्यास्पद होत चालली आहेत आणि अधिकाधिक खोटीही.

या कार्यक्रमाच्या आयोजनात म्हणे राजकीय पक्ष/संघटना वा व्यक्ती नाहीत... खरंखोटं तेच जाणोत. मात्र, आयोजक म्हणून नाही, तर प्रेक्षक म्हणून हा खेळ पाहायला तरी सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना आवर्जून निमंत्रित करायला हवं. राजकीय क्षेत्राबाहेर चाललेल्या राजकारणात किती तयारीचे गडी आहेत, तिथे डावपेच कसे आखले जातात यातून त्यांचं प्रशिक्षण होईल, त्यांनाही चार युक्तीच्या गोष्टी समजतील.

'ही ऐसी कळवळ्याची जाति, करी लाभासाठी प्रिती'...याचं उदाहरण म्हणजे हे माफीनाट्य आहे. त्यापासून अलिप्त राहणं आणि त्याच वेळी यातली दांभिकता उघड करणं हे आपल्या हातात आहे. ते आपण नक्की करावं.

- अश्विनी मयेकर