मुंब्र्याची कोल्हेकुई

विवेक मराठी    29-Jan-2019
Total Views |

 जितेंद्र आव्हाडांना जातिद्वेषाचे पित्त इतके झाले आहे की त्यामुळे आपल्या आसपासच्या घडामोडीही दिसेनाशा झाल्या आहेत. जातीय द्वेषाचे वारंवार उसळणारे पित्त म्हणजेच पुरोगामित्व असे समजणाऱ्या आव्हाडांना आज महाराष्ट्र जरी शांतपणे सहन करत असला, तरी त्यांची ही कोल्हेकुई फार दिवस ऐकली जाणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

भगवद्गीता तोंडपाठ असल्याचा दावा करणारे आणि स्वतःला अखिल बहुजनाचे तारणहार म्हणवून घेणारे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच महाराष्ट्र पेटवण्याची घोषणा केली. अर्थात जितेंद्र आव्हाडांचा पूर्वेतिहास पाहता त्यांनी अशी घोषणा करणे यात काहीच नवीन नाही. सातत्याने काहीतरी विध्वंसक घोषणा करायची आणि प्रसिद्धीच्या वलयात राहायचे, हा त्यांचा सरावाचा विषय आहे. आपण जगावेगळे आहोत किंवा जगातील सारे ज्ञान आपण कोळून प्यालो आहोत, अशा गुर्मीत वावरणाऱ्या या महाशयांनी नुकतीच महाराष्ट्र पेटवण्याची भाषा केली आहे. त्याला कारण आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार. ज्याचे सारे जीवन शिवमय आहे, शिवचरित्र हाच ज्याच्या जगण्याचा श्वास आहे, अशा प्रज्ञावंत इतिहासपुरुषाचा सन्मान व्हावा हेच या महाशयांच्या पोटशूळाचे कारण आहे. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब पुरंदरेंना जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला, तेव्हाही याच माणसाने जातीय विद्वेष पसरवून सामाजिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. बाबासाहेबांच्या शिवचरित्रातील काही शब्दांवर, घटनांवर आक्षेप घेत आव्हाडांनी तेव्हा विखाराची आणि विद्वेषाची ओकारी करून महाराष्ट्राचे समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा तोच खेळ नव्याने खेळावयास जितेंद्र आव्हाड सज्ज झाले आहेत.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/


जितेंद्र आव्हाड यांचा विरोध हा बाबासाहेब पुरंदरे नावाच्या एका व्यक्तीला नसून एका दीर्घ परंपरेला आणि संस्कारांना आहे. ज्या संस्कारातून राष्ट्राभिमान जागृत होतो, जगायचे कशासाठी याची जाणीव निर्माण होते, त्याच विचाराला, संस्काराला विरोध करण्यात जितेंद्र आव्हाड कायम अग्रेसर राहिले आहेत. अशा प्रकारचा विरोध म्हणजे तथाकथित अल्पसंख्याकांचे आणि बहुजनांचे तारणहार होणे असे आव्हाडांना वाटते आणि देशद्रोही दहशतवादी व्यक्तीला शहीद ठरवून तिच्या नावाने रुग्णवाहिनी सेवा सुरू करण्यात त्याची परिणती होते. जितेंद्र आव्हाडांचा विरोध ही एक विकृती आहे. संस्कारक्षम, राष्ट्रहितैषी विचारांना विरोध म्हणजेच पुरोगामित्व असा समज करून घेतलेल्या या विकृतीतील आव्हाड हे एक हिमनगाचे टोक आहे. जितेंद्र आव्हाड ज्या पक्षाचे मुंब्र्यातून प्रतिनिधित्व करतात, त्या पक्षाचे वैचारिक अधिष्ठानच द्वेष आणि विखार असल्यामुळे जितेंद्र आव्हाड तोच वैचारिक वारसा पुढे नेत आहेत. आता त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे ते महाराष्ट्र कधी आणि कसा पेटवतात हे पाहिले पाहिजे. खरे तर लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्या रणधुमाळीत कोल्हेकुई करण्यासाठी आव्हाडांना आणि त्यांच्यासारख्या अनेक बोलभांडांना आयती संधी आहे. मताचे राजकारण न करता द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणायला हवी. आणि म्हणूनच बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होताच त्यांनी महाराष्ट्र पेटवण्याची भाषा केली आहे. अर्थात या पेटवापेटवीसाठी लागणारे विद्वेषाचे इंधन आव्हाडांमध्ये ठासून भरलेले आहे, याचा अनुभव याआधी अनेक वेळा महाराष्ट्राने घेतला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड महाराष्ट्र पेटवणार म्हणजे काय करणार, याची पूर्वकल्पना उभ्या महाराष्ट्राला आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही.

पण आव्हाडाच्या मुंब्र्यात जी आग लागली आहे, त्याचे काय? गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणा मुंब्र्यात धाडी टाकत आहेत. आणि एकाच धर्मातील होऊ घातलेले दहशतवादी पकडत आहेत. मागील दहा-बारा दिवसांत इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेक तरुण मुंब्रा परिसरातून पकडले गेले आहेत. जलकुंभात विष कालवून खूप मोठया प्रमाणात हत्या घडवून आणण्याचा डाव तपास यंत्रणांनी उघड केला असून अटक केलेले सर्व धर्मनिष्ठ या कटात सामिल होते. या कटाबद्दल आणि अटक केलेल्यांबद्दल अजूनतरी जितेंद्र आव्हाडांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आपल्या मतदारसंघात घडलेल्या या मोठ्या घटनेबाबत आव्हाडांना काही माहीत नाही काय? की आपल्या तथाकथित पुरोगामित्वाला तडा जाईल याची त्यांना भीती वाटते आहे? इशरत जहाँला शहीद घोषित करणारे आव्हाड या तरुणांसाठी नवी बिरुदावली शोधत आहेत काय? असे अनेक प्रश्न या निमित्ताने आज समाजासमोर उभे आहेत. आज नाही तर उद्या त्यांना या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. आपल्या बुडाखाली राष्ट्रविरोधाची आग कशामुळे लागली, त्याची पाळेमुळे कुठे रुजली आहेत याचा शोध घ्यायचा सोडून महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना जातिद्वेषाचे पित्त इतके झाले आहे की त्यामुळे आपल्या आसपासच्या घडामोडीही दिसेनाशा झाल्या आहेत. जातीय द्वेषाचे वारंवार उसळणारे पित्त म्हणजेच पुरोगामित्व असे समजणाऱ्या आव्हाडांना आज महाराष्ट्र जरी शांतपणे सहन करत असला, तरी त्यांची ही कोल्हेकुई फार दिवस ऐकली जाणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

महाराष्ट्रात जातीय राजकारण करून, जातीय द्वेषाचा आधार घेऊन महाराष्ट्राचे समाजमन कलुषित करून आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून काही मंडळी सातत्याने करत असतात. त्यातून त्यांचा तात्कालिक फायदा होत असला, तरी त्यातून पुरोगामी महाराष्ट्राच्या भावविश्वाला तडा जात असतो, हे आपल्या स्वार्थासाठी द्वेषाचे खेळ खेळणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे आणि आज बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार दिला म्हणून महाराष्ट्र पेटवण्याची कोल्हेकुई करणाऱ्या आव्हाडांनी स्वतःच्या पायाशी काय जळते आहे, याचा विचार करायला हवा.