बांगला देशात खालिदांचा फालुदा!

विवेक मराठी    05-Jan-2019
Total Views |

 

 

शेख हसिना बांगला देशाच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्या विकासासाठी वाटेल ते करायला तयार होतात, पण त्यांची राजवट ही एकाधिकारशाहीकडे झुकणारी आहे. शेख हसिना यांच्या विरोधक आणि बांगला देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचा बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टी हा पक्ष हा राष्ट्रद्रोह्यांशी संगनमत करून अवामी लीगला पराभूत करू इच्छित होता, हे मतदारांना रुचले नाही.

बांगला देशात लोकशाही आहे का? सध्या ती आहे. बांगला देशात अलीकडच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधकांची धूळधाण झाली, त्याचे कारण काय? विरोधकांचे बेजाबदार वागणे हेच त्याचे कारण आहे. आताही एकेकाळी सत्तारूढ आणि नंतर प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीने या पराभवाचे उट्टे रस्त्यावर उतरून काढण्याची घोषणा केली आहे, यातच ते आपले शहाणपण कसे गमावून बसलेले आहेत हे लक्षात येते. पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानात असलेल्या तेव्हाच्या हुकूमशहांबरोबर मनाने आणि विचाराने राहिलेल्या सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना या निवडणुकीत मतदारांनी हिसका दिला आहे. पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानात ज्यांनी महिलांवर अत्याचार केले, सामान्य स्त्री-पुरुष आणि लहान बालके यांचे ज्या नराधमांनी रक्ताचे पाट वाहवले, अशा युध्द गुन्हेगारांवर जगाची पर्वा न करता खटले भरून शेख हसिना यांनी त्यांना फाशीगेटापर्यंत नेले. आतापर्यंत असे काही जण फासावर गेले, काही त्या रांगेत आहेत. गेल्याच महिन्यात 13 डिसेंबर रोजी जमात ए इस्लामीचा युध्द गुन्हेगार अब्दुल कादर मुल्ला याला फाशी देण्यात आले. या फाशीच्या निषेधार्थ बांगला देशात हिंसाचार झाला, पण शेख हसिना यांनी तो अतिशय कठोरपणे हाताळला. या एकटया पिसाट मुल्लाने 1971च्या मुक्तिलढयाच्या काळात 344 जणांना ठार केले. त्याने कित्येक महिलांवर अत्याचार केले. हा मुल्ला अल बदर या संघटनेशी संबंधित होता आणि पाकिस्तानात खैबर पख्तुनख्वाच्या मनशेरामध्ये या संघटनेचे मुख्यालय आहे आणि ही दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये अधिक सक्रिय आहे. त्याला फासावर चढवायला 47 वर्षे लागली. त्याने एवढे पाशवी गुन्हे केले हे माहीत असूनही त्याच्या बाजूने लोक रस्त्यावर उतरतात आणि बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीसारखा पक्ष त्याचे समर्थन करतो, हे किती भीषण आहे? मतदारांनी म्हणूनच त्यांना झिडकारले आहे. या राजकारण्यांना तरुण वर्गाची ओळख झाली नाही, हेच खरे. या सर्व देशद्रोह्यांविषयीचा लोकक्षोभच या खेपेच्या मतदानातून व्यक्त झाला आहे. तो चुकीचा नाही. याउलट शेख हसिना यांच्या विरोधक आणि बांगला देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचा हा पक्ष अशा गद्दारांशी संगनमत करून अवामी लीगला पराभूत करू इच्छित होता, हे मतदारांना रुचले नाही.

 खालिदा झिया या सध्या दोन वेगवेगळया प्रकरणांमध्ये तुरुंगवास भोगत आहेत. एका प्रकरणात त्यांना पाच वर्षांची, तर दुसऱ्या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा झाली आहे. निवडणूक लढवायला त्या अर्थातच अपात्र ठरल्या. स्वत:च्या झिया ट्रस्टसाठी त्यांनी पावणेचार लाख डॉलर्सची लाच घेतल्याची त्यांच्याविरोधात तक्रार होती. तिचा निकाल लागून त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालाला आव्हान देणारा अर्ज सध्या न्यायालयात आहे. खालिदा झिया यांचे जमात ए इस्लामीसारख्या पक्षाबरोबर असलेले संबंधही मतदारांना मान्य नाहीत. याच जमात ए इस्लामीने बांगला देशाच्या निर्मितीला विरोध केला होता आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांशी हातमिळवणी केली होती. अगदी आजमितीलाही हा पक्ष पाकिस्तानची भलावण करत असतो. ते किती टोकाला जाऊ शकतात, हे पाकिस्तानविरुध्द बांगला देश यासारख्या क्रिकेट सामन्यांमध्येही दिसून येत असते. जमात ए इस्लामी तिथेही पाकिस्तानचीच बाजू घेत असल्याने सामान्य माणूसही त्यांच्या विरोधात बोलू लागला आहे. हा संदर्भ लक्षात घेतला, तर बांगला देशचा मतदार किती सुजाण आहे हे लक्षात येते. असे असूनही, एकही उमेदवार निवडून आणू न शकलेल्या 'इस्लामी आंदोलन बांगला देश' या अत्यंत प्रतिगामी आघाडीने वर्षअखेरच्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीग आणि बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टी यांच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत, हे दुर्दैवाचे आहे. अवामी लीगला 6 कोटी 17 लाखांवर मते पडली, हा कदाचित आजवरचा विक्रम ठरावा, तर त्याखालोखाल बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीने 92 लाख 7 हजारांवर मते मिळवली. इस्लामी आंदोलनाने 12 लाखांवर मते मिळवली आहेत. अवामी लीगचे यश शेख हसिना यांच्या डोक्यावर स्वार झाले नाही, तर त्या पुढल्या चार वर्षांत बांगला देशात अतिशय नेत्रदीपक कामगिरी बजावू शकतील. बांगला देशाच्या निवडणुकीत त्या सलग चौथ्यांदा यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्या विकासासाठी वाटेल ते करायला तयार होतात, पण त्यांची राजवट ही एकाधिकारशाहीकडे झुकणारी आहे. बांगला देश हा तयार कपडयांच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. इतरही अनेक गोष्टी निर्यात होत असतात. सकल वस्तू उत्पादनात तो पाकिस्तानच्या तो बराच पुढे आहे. बांगला देश हा सध्या विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, तो आणखी पाच वर्षांमध्ये विकसित राष्ट्रांच्या पंगतीत जाऊन बसेल, इतकी त्याची प्रगती असणार आहे. इतके असूनही या खेपेच्या निवडणूक निकालावर विश्वास ठेवायला अनेकांनी नकार दिला आहे.

सोनार बांगलाचे स्वप्न पाहणाऱ्या शेख हसिना

बांगला देशात मतपत्रिका वापरल्या जातात आणि तिथेच सर्व घोटाळा होतो, असा शेख हसिनांचे विरोधक दावा करतात. म्हणजे इतके की, अनेक मतपेटया पोलीस संरक्षणात आधीच मतपत्रिकांनी भरून पाठवल्या गेल्या, असे या विरोधकांचे म्हणणे आहे. अर्थात हा आक्षेप काहीसा तथ्यहीन वाटतो. आधीच भरून पाठवण्यात आलेल्या मतपत्रिका असतील, तर एकूण मतदानाशी त्याचा ताळमेळ बसायला हवा. तेव्हा हे सगळे पराभूतांचे मनोगत आहे असे वाटते. (आपल्याकडे जसे त्या बिचाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर पराभवाचे खापर फोडले जाते, तसेच हे आहे.) ज्या दोघा पत्रकारांनी मतदान केंद्रांवर उपस्थित असणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना हाकलून मतदान घडवल्याची माहिती प्रसिध्द केली, त्यापैकी एकाला पकडण्यात आले असून त्याला 'योग्य ती शिक्षा' दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या पत्रकाराचा शोध घेतला जात आहे. हे मात्र अजब आहे. ज्या वृत्तपत्रासाठी हे पत्रकार काम करत होते, त्यांना याबद्दल न विचारता त्या पत्रकारांना दोषी धरून त्यांना 'योग्य ती शिक्षा' देणे न्यायोचित नाही. असो. अवामी लीगच्या हुकूमशाहीविषयी ज्यांची तक्रार आहे, त्यांचेच कार्यकर्ते निवडणुकीच्या दिवशी ठिकठिकाणी झालेल्या दंगलीत सर्वाधिक मारले कसे गेले, ते स्पष्ट झालेले नाही. एकटया ढाक्यात अवामी लीगचे 17 कार्यकर्ते मारले गेले. एका मतदान केंद्राला भेट द्यायला शेख हसिना गेल्या असता त्यांच्या दिशेने जमात ए इस्लामीचा जमाव धावून आला, त्या वेळी अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी शेख हसिना यांच्याभोवती कोंडाळे केले नसते, तर कदाचित त्यांच्याच जिवावर बेतले असते. या हल्ल्यात अवामी लीगच्या महिला शाखेच्या अध्यक्ष मृत्युमुखी पडल्या. दुर्दैवाने आपल्या प्रसारमाध्यमांनाही या गोष्टीचे गांभीर्य राहिले नसावे, त्यामुळे त्यास फारशी प्रसिध्दी मिळाली नाही. असेही म्हणतात की, सुरक्षा यंत्रणांनी या खेपेला जेवढी खबरदारी घ्यायला हवी तेवढी घेतलेली नसल्याने जमात ए इस्लामीचे कार्यकर्ते मोकाट होते. शेख हसिना यांना हा एक प्रकारे गंभीर इशारा असल्याचे मानले जात आहे.

या निवडणुकीत एकूण चित्र कसे उमटले, ते पाहणे ज्ञानात भर घालणारे आहे. अवामी लीगच्या आघाडीला एकूण तीनशे आणि लढवल्या गेलेल्या 299 जागांपैकी (एका उमेदवाराचे निधन झाल्याने ती नंतर होणार आहे.) 288 जागा मिळाल्या आहेत. एकटया अवामी लीगला 266 जागा मिळाल्या आहेत, तर अवामी लीगविरोधात असलेल्या बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या 'जातीय ऐक्य आघाडी'ला (बांगला भाषेत जातीय म्हणजे राष्ट्रवादी किंवा राष्ट्रीय) केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. त्यातही आणखी मजेदार गोष्ट म्हणजे जो पक्ष या आघाडीच्या नेतृत्वपदी आहे, त्या बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीला एकही जागा मिळू शकलेली नाही. एकेकाळी बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या पक्षाला शून्याइतक्या खाली का जावे लागले, याचे उत्तर त्या पक्षाच्या बेछूट वागण्यातूनच मिळाले आहे. 2014मध्ये झालेल्या निवडणुकीत शेख हसिना यांनी जे यश मिळवले होते, त्याला त्यांच्या विरोधी पक्षाने - म्हणजेच बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीने निवडणुकांवर टाकलेल्या बहिष्काराची किनार होती. तेव्हा त्यांचे ते यश निर्भेळ नव्हते असा दावा करण्यात येत होता. आता त्यांची बोलती बंद झाली आहे. बेगम खालिदा झिया यांना 2014मध्ये स्थानबध्द करण्यात आले होते आणि इतरही राजकीय पक्षाच्या नेत्यांना अटकेत टाकण्यात आले होते. तेव्हाच्या त्या निवडणुकीत अवामी लीगने 234 जागा मिळवल्या होत्या. बांगला देशात संसदेत बहुमत मिळवायला 151 जागांची आवश्यकता असते आणि त्या पक्षाला तेवढया जागा (153) आधीच बिनविरोध मिळाल्या होत्या.

 

हुसेन मोहमद ईर्शाद यांच्या जातीय पार्टीला 22 जागा


गेल्या काही वर्षांत खालिदा झिया यांनी शेख हसिना यांना त्रास देण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. 2013मध्ये त्यांनी 85 दिवसांचा देशभर संप घडवून आणला होता. बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीबरोबर तेव्हा अन्य 18 पक्षही होते. दुसरा मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या हुसेन मोहमद ईर्शाद यांच्या जातीय पक्षानेही (नॅशनल पार्टी) 2014च्या निवडणुकांवर बहिष्कार घालायचा निर्णय जाहीर करताच ईर्शाद यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा रक्षकांनी वेढा घातला. तेव्हा तो वेढा उठवण्यात आला नाही तर आपण गोळी घालून घेऊन आत्महत्या करू, अशी धमकी ईर्शाद यांनी दिली. त्यांना तेव्हा स्थानबध्द करण्यात आले. तेव्हा ईर्शाद यांनीच केलेल्या विनंतीवरून त्यांना लष्कराच्या इस्पितळात नेण्यात आले. ईर्शाद हे माजी लष्कर प्रमुख आणि बांगला देशचे माजी अध्यक्षही आहेत. ईर्शाद यांच्या जातीय पक्षाने निवडणुकीत भाग घेतला, पण त्या पक्षाला जेमतेम यश मिळाले. ईर्शाद हे उठावातून सत्तेवर आले, तेव्हा त्यांच्याविरोधात शेख हसिना आणि खालिदा झिया या आंदोलन पुकारण्यास एकत्र आल्या होत्या हे विशेष. आणखी एक विशेष हे की, 2014मध्ये ईर्शाद हे निवडणुकीच्या रिंगणात अवामी लीगच्या विरोधात उतरलेले असतानाही शेख हसिना यांनी त्यांना आपल्या खास दूताचा दर्जा देऊन अनेक देशांमध्ये पाठवले होते. त्यांनीही ते पद स्वीकारले होते. इतकेच नव्हे, तर या पक्षाचे काही नेते विरोधी बाकांवर, तर एक-दोघे शेख हसिनांच्या मंत्रीमंडळातही होते. ईर्शाद यांचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे बांगला देश मुक्तिलढयाच्या वेळी ते पश्चिम पाकिस्तानात होते आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराने अटकेत टाकले होते. सिमला करारानंतर त्यांना पाकिस्तान सरकारने सोडून दिले आणि ते बांगला देशात आले. या खेपेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला, म्हणजे जातीय पार्टीलाच काय त्या 22 जागा मिळाल्या आहेत. तरीही तो पक्ष प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान मिळवू शकलेला नाही. तो पक्ष त्या जागेपासून पाच जागांनी मागे आहे. अर्थातच जर शेख हसिना यांनी मनावर घेतले, तर त्या ईर्शाद यांच्या पक्षाला पुन्हा एकदा उपकृत करू शकतील.सांगायचा मुद्दा हा की, या खेपेला निवडणुकीच्या रिंगणात खालिदा झियांना उतरायला बंदी होती, पण त्यांचा पक्ष रिंगणात होता. शेख हसिना यांनी 1981पासून अवामी लीगचे नेतृत्व केले आहे. शेख हसिना या बांगला देशाचे जनक शेख मुजिबूर रहमान यांच्या कन्या आहेत. शेख मुजिब आणि त्यांचे आख्खे कुटुंब 15 ऑॅगस्ट 1995 रोजी ढाक्यात मारले गेले आणि लष्कराने उठाव केला, तेव्हा शेख हसिना आणि त्यांची बहीण शेख रेहाना बांगला देशात नव्हत्या म्हणूनच वाचल्या. शेख रेहाना या आजही ढाका विद्यापीठात प्राध्यापक आहेत. शेख हसिना यांनी बांगला देशाला 'सोनार बांगला' बनवायचे स्वप्न पाहिले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी जनतेला आणि आपल्या सर्व विरोधकांना सर्व रागलोभ विसरून त्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले आहे. (1905मध्ये तेव्हाचा व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली, तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी त्या फाळणीविरोधात 'आमार सोनार बांगला' या काव्याची रचना केली होती. हे महाकाव्य बांगला देशाचे राष्ट्रगीत आहे.) शेख हसिना यांचे मन इतके मोठे आहे की, त्यांनी म्यानमारमध्ये निर्वासित म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि तिथल्या प्रशासनाकडून तसेच सामान्य नागरिकांकडून झालेल्या अत्याचारांना सतत सामोरे जावे लागलेल्या 10 लाख रोहिंग्यांना आपल्या देशात सामावून घेतले आहे. हे रोहिंगे मोठया प्रमाणात मुस्लीम असले, तरी त्यात असंख्य हिंदू आणि अन्य धर्मीयही आहेत.

  शेख हसिना यांचे वडील बंगबंधू आणि बांगला देशाचे जनक तसेच पहिले अध्यक्ष आणि नंतरचे पंतप्रधान शेख मुजिबूर रहमान. त्यांच्याविरोधात झालेल्या उठावात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार करण्यात आले आणि त्यानंतर जे सरकार अस्तित्वात आले, त्याची रक्तहीन उठावात उचलबांगडी करण्यात येऊन झियाउर रहमान सत्तेत आले. ते लोकप्रिय बनले. ते दक्षिण आशियाई सहकार्य परिषदेचे (सार्कचे) जनक बनले. ही कल्पना त्यांचीच. त्यांना गोळया घालून त्यांचा खून करण्यात आला आणि त्यांच्यानंतर त्यांच्या या पत्नी बेगम खालिदा झिया राजकारणात आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर त्या दोघी एकमेकींवर आरोप करतात आणि जनतेला संभ्रमात ठेवतात. अशा या स्थितीत बांगला देशात निखळ लोकशाही टिकली नाही, तर मात्र तो देशही पाकिस्तानच्याच वाटेने जायचा धोका आहे. त्याने तसे जाणे त्या देशाच्या आणि भारताच्याही हिताचे नाही.

9822553076