'त्या' तिघी

विवेक मराठी    08-Jan-2019
Total Views |

खरं तर तीन वेगवेगळया सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीतल्या या स्त्रिया, पण त्यांचा परिस्थितीचा समंजस स्वीकार त्यांच्या वेदनांसकट समोर उलगडला जात असतानाच वाचक म्हणून आपल्याला अंतर्मुख करत जातो. आपल्या जाणिवांचा भाग गडद करतो. म्हणूनच मैत्रेयीचा सगळया परिस्थितीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला अधिक समृध्द करतो, तर सोयराचे चोखोबांप्रती असणारे नितांत प्रेम आणि त्यातून फुललेली तिची विठ्ठलाप्रतीची भक्ती आणि गाणं वेगळं म्हणून चटकन आपल्याला आकर्षित करतं; तर अमानवीय उर्वशीला मानवीय पुरुरव्याचं वाटणारं आकर्षणही आपल्याला मनोमन भावतं.


उर्वशी, मैत्रेयी आणि सोयरा!!! हो, ही पात्रं आहेत अरुणा ढेरे यांच्या कादंबऱ्यांमधली. आपल्या गतवैभवातल्या या मानुषी. आपल्याला वरवर माहीत असलेल्या. उर्वशी, मैत्रेयी आणि 'महाद्वार'मधली प्रकर्षाने उठून दिसणारी ती चोखोबांची सोयरा!

अरुणाताईंनी, त्यांना 'जशा दिसल्या तशा', या स्त्रिया मांडल्याचे सूतोवाच या कादंबऱ्यांच्या मनोगतात केलेले आहेच, पण या स्त्रिया माणूस म्हणून ठळकपणे वाचकांच्या मनात घर करून राहणाऱ्या आहेत. त्या तिघींच्याही ठायी दिसतंय ते फक्त 'प्रेम'. प्रेमाचा शाश्वत, चिरतरुण आनंदानुभव. 'प्रेम' ही या तिघींचीही अंगीभूत जीवनप्रेरणा आहे. या जीवनप्रेरणेतून त्या निश्चित हेतूने जगण्याच्या आकलनाकडे प्रगल्भतेने प्रवास करतात. तोच प्रवास या कादंबऱ्यांच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रवासातला एक थांबा म्हणजे या तिघींनी उभारलेले स्वत:चे संसार!!! आपल्या साथीदाराची निवड या तिन्ही स्त्रिया स्वत: करतात. त्यामागे असलेली त्यांची जीवनदृष्टी एकूणच स्त्री-पुरुष/पती-पत्नी नात्याकडे बघण्याची एक नवी, समन्वयवादी दृष्टी देते आणि अर्थातच स्त्रीवादाच्या मूलभूत तत्त्वाला हात घालते.

 बौध्दिकता

साथीदार निवडीचं त्यांचं स्वातंत्र्य त्या ज्या ताकदीने पेलतात, त्याच ताकदीने त्या सहजीवनाचा अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवतात. ते सहजीवन आणि त्या सहजीवनातला समन्वय याने या कादंबऱ्या अधिक गडद, अधिक प्रेरणादायक झाल्या आहेत. त्यांच्या सहजीवनातला समन्वय उत्तरोत्तर प्रगल्भ होत जातो, याचं प्रत्यंतर उर्वशीने पुरुरव्याला सर्वस्व देण्यातून जसा प्रतीत होतो, तसाच तो सोयराच्या चोखोबांच्या विठ्ठलभक्तीला प्रेरणा देण्यातूनही उमजत जातो. मैत्रेयी आणि याज्ञवल्क्य यांच्या समजुतीची पातळी त्यांच्यातल्या गाढ प्रेमाची साक्ष देते. बौध्दिकता हे या तिन्ही कादंबऱ्यांच्या स्त्रीपात्रांमधील एक समान सूत्र आहे. त्यांच्या या बौध्दिक समजुतीमुळेच एक सुंदरसं भावनाटय या कादंबऱ्यांचा आत्मा अधिक फुलवतो.

आपल्या अस्मितेला जपत, आपल्याला समृध्द करतानाच आपल्या साथीदाराला सोबत घेण्याची आणि त्यांना आपल्या अंतरात्म्याचा साथीदार करण्याची किमया या कादंबऱ्यांमध्ये बेमालूमपणे गुंफली आहे.

खरं तर तीन वेगवेगळया सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीतल्या या स्त्रिया, पण त्यांचा परिस्थितीचा समंजस स्वीकार त्यांच्या वेदनांसकट समोर उलगडला जात असतानाच वाचक म्हणून आपल्याला अंतर्मुख करत जातो. आपल्या जाणिवांचा भाग गडद करतो. म्हणूनच मैत्रेयीचा सगळया परिस्थितीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला अधिक समृध्द करतो, तर सोयराचं चोखोबांप्रती असणारं नितांत प्रेम आणि त्यातून फुललेली तिची विठ्ठलाप्रतीची भक्ती आणि गाणं वेगळं म्हणून चटकन आपल्याला आकर्षित करतं; तर अमानवीय उर्वशीला मानवीय पुरुरव्याचं वाटणारं आकर्षणही आपल्याला मनोमन भावतं.

अनासक्ती

ऐहिकभोवतालाची अनासक्ती हा या तिघींच्याही स्वभावाचा एक सामाईक विशेष असलेला दिसतो. म्हणूनच नैमित्तिक संसारात येणाऱ्या अडचणींना या कादंबऱ्यांमध्ये स्थान मिळालेलं दिसत नाही. 'महाद्वार'मधल्या सोयराला या ऐहिक विवंचना आहेत, पण त्या विवंचनांना तिने आपल्या एकंदर आयुष्यातून बादच केलेलं दिसतं. आत्मिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती ही तिने श्रेष्ठ मानल्यामुळेच की काय, तिने कायम चोखोबांच्या 'आध्यात्मिक' व्यक्तिमत्त्वावर अधिक प्रेम केलं, त्याच्या भक्तीला, श्रध्देला आपल्या अंतरंगात जपलं. एवढंच नाही, तर ती भक्ती, ती श्रध्दा आपल्या उन्नतीचा आधार मानल्या.

त्रिसूत्री

या तिघी उदात्त, उदार जगल्या. आपल्या संसाराच्या केंद्रस्थानी राहिल्या. आपल्या साथीदाराच्या आधाराने जगण्याऐवजी त्यांच्या आधार झाल्या. स्वत:चा विकास करत असतानाच त्यांना समृध्द करत गेल्या. याज्ञवल्क्याचं समृध्दपण मैत्रेयीच्या असण्याचा भाग आहे, हे या कादंबरीत ठिकठिकाणी अधोरेखित झालेलं आहे. तेच पुरुरव्याच्या बाबतीत घडतंय आणि तेच चोखोबांच्या बाबतीतही.

प्रेम, आपुलकी आणि समन्वय या त्रिसूत्रीवर या कादंबऱ्या उभ्या राहतानाच त्यातल्या निरनिराळया छटा प्रसंगोपात उलगडून दाखवतात. त्यासाठी येणारा भोवतालही आपल्याला वाचक म्हणून मंत्रमुग्ध करतो आणि त्या भवतालातून निर्माण होणारी वातावरणनिर्मिती त्या त्या काळात त्या त्या पात्रांबरोबर विहार करायला भाग पाडतात. प्रसंगोपात आलेली वर्णनं आणि त्या वर्णनात रमताना भाषेने आपल्या मनावर केलेला संस्कारही हृद्य आहे.

 

 

सोयराने आत्मिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती ही श्रेष्ठ मानल्यामुळेच की काय, तिने कायम चोखोबांच्या 'आध्यात्मिक' व्यक्तिमत्त्वावर अधिक प्रेम केलं, त्याच्या भक्तीला, श्रध्देला आपल्या अंतरंगात जपलं. एवढंच नाही, तर ती भक्ती, ती श्रध्दा आपल्या उन्नतीचा आधार मानल्या.

'भगिनीभाव' मूल्य

अरुणाताईंच्या या कादंबऱ्यांना जी स्त्रीवादी साहित्यिक मूल्यं आहेत, ती अधिक गहिरी आहेत. म्हणूनच जागतिक स्त्रीवादी तत्त्वातील 'भगिनीभाव' हे मूल्य या कादंबऱ्यांच्या मूलभूत जाणिवांमध्ये घट्ट रुजलेलं दिसतं. यात येणाऱ्या सवती-सवती (काळाचा विचार करता सवत असणे हा स्वीकाराचा भाग आहे. ती आहे म्हणून त्यातलं स्त्रीतत्त्व नष्ट होत नाही किंवा आक्रस्ताळा स्त्रीवादही उपयोगी ठरत नाही.) उर्वशी-औशीनरी, मैत्रेयी-कात्यायनी यांच्यात तो द्वेषभाव दिसत नाही. तसंच नणंद-भावजय असणाऱ्या निर्मळा-सोयरा याही अधिक उठावदार दिसतात. यांसारख्या नात्यांना आपल्याकडे नेहमीच एक सामाजिक, सांस्कृतिक वलय असतं. आपल्याला ते नाकारताही येत नाही आणि जागतिक स्त्रीवादी तत्त्वांचा विचार करता स्वीकारताही येत नाही. आपल्याकडच्या नात्यांमधील तिढयाकडे बघतही, आपल्याकडील स्त्रियांची उदात्तता दाखवणाऱ्या तरीही सांस्कृतिक मर्म जपत, सामाजिक सौहार्द सांभाळत, आपल्या स्त्रीकडे पाहण्याची अस्सल भारतीय स्त्रीवादी जाणीव अरुणाताईंच्या या पात्रांमध्ये पाहायला मिळते. भारतीय स्त्रियांचा सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात विचार करून मांडली जाणारी भारतीय स्त्रीवादी तत्त्वं अरुणाताईंनी उभ्या केलेल्या या स्त्रीपात्रांमध्ये निश्चितच आहेत. या स्त्रीवादी जाणिवाही सकारात्मक बाजू मांडणाऱ्या आहेत. समाज-संस्कृती समन्वयाच्या भानातूनच केलेल्या या स्त्रीपात्रांची निर्मिती कालातीत आहे.

स्त्रीवादाची सगळी तत्त्वं जपत जगणाऱ्या या कादंबऱ्यांमधली स्त्रीपात्रं वाचकांच्या अधिक जवळ जाणारी आहेत. प्रेम हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे आणि त्यातूनच मानवाची घडण होत असते. या प्रेमाच्या आत दडलेलं असतं ते निखळ माणूसपण. त्याच माणूसपणाचं सोज्ज्वळ दर्शन या कादंबऱ्यांत घडतं. चोखोबांना येणारा शूद्रत्वाचा अनुभव आणि त्याच वेळी मिळणारी माणूसपणाची वागणूक यांचा सुंदर मिलाप म्हणूनच अधिक अर्थपूर्ण वाटतो.

समंजसपणा व निष्ठा

मानवी जीवनाच्या कक्षा विस्तारणारा अनुभव या तिघी आपल्याला देतात. दु:खाचा संयत स्वीकार करण्याची त्यांची मानसिक तयारीही स्पर्शून जाणारी आहे. पुरुरव्याला सोडून जाताना उर्वशीने संयतपणे केलेला दु:खाचा स्वीकार मुळातून वाचताना आपलीही चलबिचल होते, त्या एका क्षणापाशी आपणही रेंगाळतो आणि त्या दु:खाचे आपणही समान वाटेकरी होतो. त्याक्षणी उर्वशीबद्दल जे प्रेम वाचकांच्या मनात निर्माण होतं, त्यात सहवेदनेचाही प्रत्यय येतो; तर मैत्रेयीने कात्यायनीचा स्वीकार ज्या आपलेपणातून केलेला आहे आणि त्या वेळचा 'मी नेहमीच स्वत:ला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघते आणि त्यांचं दु:ख अनुभवते' हा विचार आपल्याला अधिक विचारप्रवृत्त करणारा ठरतो. 'महाद्वार' ही चोखोबांची कथा असली, तरी अधिक भावते ती सोयरा. तिचा समंजस भाव आणि तिची आपल्या नवऱ्यावरची गाढ निष्ठा.

संघर्ष

'संघर्ष' हा मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असला, तरी तो संघर्ष या कादंबऱ्या मांडत नाहीत. अर्थात कथानकाला त्याची आवश्यकता नाही, हेही तितकंच खरं आहे. त्या संघर्षापलीकडचं सौहार्द अधिक विलोभनीय आहे, म्हणूनच पुरुरव्याला सोडून जाण्याचा काळ जवळ आला, तरी त्या सोडून जाण्यातली मनोवेदना उर्वशीच्या वागण्यात दिसत नाही. उद्वेग आहेच, पण त्याहीपेक्षा त्यातली अपरिहार्यता अधिक गडद, अधिक अधोरेखित आहे, त्याचा तिने केलेला समंजस स्वीकारही तितकाच बोलका आहे. महाद्वारमधली जनाईसुध्दा चोखोबांच्या जाण्यानंतर शांतपणे हा समंजस स्वीकार करते आणि अधिक ठाम, अधिक समंजस होते.

या तिघीही स्त्रिया आपल्या अनुभवांत, ज्ञानात सतत भर घालतात, तो अनुभव अधिक समृध्द करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात, अधिकची करण्याचा ध्यास ठेवतात आणि त्याच वेळी त्यांचा स्वत:चा स्वतंत्र जीवनप्रवास रेखाटतात. पण हा स्वतंत्र जीवनप्रवास करताना होणारी मानसिक, आंतरिक तळमळ त्यांना अधिक उंचावणारी ठरते. त्यांच्या या जीवनप्रवासात रमताना वाचक म्हणून आपणही समृध्द होत जातो. वाचक म्हणून भरूनही अपूर्ण राहण्याचा आणि त्याच वेळी आपलं अंतरंग शांतवण्याचा एक सुरेख, अद्भुत अनुभव आपण घेतो.

मैत्रेयी - 1987 - पृ.सं. 86

उर्वशी - 1989 - पृ.सं. 76

महाद्वार - 1990 - पृ.सं. 88

छोटा प्राण असणाऱ्या, पण व्यापक दर्शन घडवणाऱ्या या कादंबऱ्या या अरुणाताईच्या 'लेखक' म्हणून असणाऱ्या आणि तरीही वाचक म्हणून आपल्याला दिसणाऱ्या तरल अनुभूतीची एक यथार्थ मांडणी आहे. प्रेम, आपुलकी आणि समन्वय हाच अद्भुताविष्कार देणाऱ्या या कादंबऱ्या वाचताना अरुणाताईंचा तोच समंजस, प्रेमादरयुक्त आवाजही कानात गुंजारव करतो आणि लेखक आणि माणूस म्हणून त्यांचं नितळपण अनुभवायला येतं. माणूसपणाचं मर्म असं अलगद, अलवारपणे समोर उलगडत जात असतानाच माणूस म्हणून या पात्रांची घडण आपल्याला उत्कट भावानुभवाची अनुभूती देतात.

प्रवाही निवेदन आणि छोटया अवकाशात (पृष्ठसंख्येत) मावणाऱ्या या स्त्रिया असल्या, तरी त्यांचं 'माणूसपणाचं कर्तृत्व' वाचायला हाती घेतलं की ते वाचून पूर्ण होईस्तोवर खाली ठेवलं जात नाही, याचे श्रेय अर्थातच लेखक म्हणून अरुणाताईंच्या प्रातिभ आविष्काराला आहे.

मानवतेचा संदेश देणाऱ्या, समूहमनाला जाणणाऱ्या आणि आपल्यातल्या सकारात्मकतेला जागृत ठेवणाऱ्या या कादंबऱ्या सौहार्दपूर्ण समाजमन घडवण्यात मोलाचा हातभार लावणाऱ्या आहेत.