गंगेच्या पलीकडच्या भागात आजच्या म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम यांचा समावेश होतो. तसेच सुमात्रा, जावा, बोर्निओ या विशाल बेटांचादेखील समावेश होतो. गंगेच्या कठाने वसलेला हा जणू दुसरा भारतच आहे की काय असा प्रश्न पडावा अशी चिन्हे या प्रवासात द

विवेक मराठी    01-Oct-2019
Total Views |

गंगेच्या पलीकडच्या भागात आजच्या म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम यांचा समावेश होतो. तसेच सुमात्रा, जावा, बोर्निओ या विशाल बेटांचादेखील समावेश होतो. गंगेच्या कठाने वसलेला हा जणू दुसरा भारतच आहे की काय असा प्रश्न पडावा अशी चिन्हे या प्रवासात दिसतील!

 

कंबोडिया, थायलंड व लाओस हे तिन्ही देश मिळून पूर्वीचा कंबोडिया देश होता. त्या पलीकडचा चंपा म्हणजे आजचा व्हिएतनाम. या चारही देशातून मेकोंग नावाची नदी वाहते. ही नदी तिबेटच्या पठारावर उगम पावते व चीनमधून दक्षिणेला वाहत South China Seaला मिळते. जवळजवळ 5 हजार किलोमीटर लांब असलेली मेकोंग आशियातील सर्वात मोठया नद्यांपैकी एक आहे. ही नदी तिरावरील अनेक गावांनाच नाही, तर देशांना पोसते. थाई भाषेत या नदीचे नाव आहे - Mae Nam Khong. Mae म्हणजे माई / माता, Nam म्हणजे पाणी आणि Khong हा 'गंगा' या शब्दाचा अपभ्रंश आहे. सरळ सरळच सांगायचे, तर या चार देशातून वाहणारी 'मेकोंग' ही 'गंगामैया' आहे! भारतीयांप्रमाणेच इथला समाज गंगेवर प्रेम करणारा होता. 'गंगामैया' या भारतीय संस्कृतीच्या अत्युच्च चिन्हाने आग्नेय देशांचा प्रवास सुरू होतो. गंगेच्या कठाने वसलेला हा जणू दुसरा भारतच आहे की काय असा प्रश्न पडावा अशी चिन्हे या प्रवासात दिसतील!

मध्य जावा येथील Tuk Masमध्ये 7व्या शतकातील एक संस्कृत शिलालेख मिळाला आहे. हा लेख एका झऱ्याजवळ कोरला असून त्यामध्ये झऱ्याचे वर्णन केले आहे - गंगा नदीप्रमाणे पवित्र व शुध्द पाणी देणारा हा थंड पाण्याचा झरा आहे! सातव्या शतकातलाच आणखी एक लेख चंपाच्या गंगाराज या राजाने लिहिला आहे. तो सांगतो की आयुष्याचा शेवट गंगेच्या काठी व्हावा, म्हणून संन्यास घेत आहे. त्याने पुढे राज्यत्याग केला व तो भारतात आला. आयुष्याचे शेवटचे दिवस त्याने प्रयाग येथ घालवले.

केवळ गंगेलाच नाही, तर भारतातील आणखीही नद्यांना या लोकांनी आपलेसे केले. जावामध्ये 6व्या शतकाच्या सुमारास तारुमच्या राजाने एक कालवा खणला होता. या कालव्याला त्याने नाव दिले - 'चंद्रभागा'. तसेच पूर्णवर्मा नावाच्या राजाने कालवा खणला होता, त्याला दिलेले नाव होते - 'गोमती'! सुमात्रामध्ये 'इंद्रगिरी' नावाची एक नदी आहे. तशीच म्यानमारमधील इरावडी (Irrawaddy) नदी. पंजाबच्या रावी नदीचे प्राचीन नाव 'इरावती' होते त्यावरून किंवा इंद्राचे वाहन ऐरावतवरून तिला 'ऐरावती' हे नाव मिळाले असावे. हाँगकाँगमध्ये तर चक्क झेलम, बियास आणि चेनाब नावाच्या नद्या आहेत! (हाँगकाँगच्या नद्यांची नावे कदाचित अलीकडची असावीत.)

गंगामैया ही जशी भारताची जननी आहे, तशीच ती या देशांचीही जननी होती असे म्हणण्यास हरकत नाही. हे फक्त आग्नेय आशियातील जनतेने म्हटले असे नाही, तर प्राचीन काळातील ग्रीकांनीसुध्दा म्हटले. आणि 19व्या शतकातील पोर्तुगीज, डच आदी युरोपीयांनीसुध्दा म्हटले. टोलेमी (Ptolemy) या दुसऱ्या शतकातील ग्रीक Geographerपासून 19व्या शतकातील युरोपमधील व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनी पश्चिम भागाला 'गंगेच्या अलीकडचा भारत' (India Intra Gangem) आणि पूर्व भागाला 'गंगेच्या पलीकडचा भारत' (India Extra Gangem) असे म्हटले. गंगेच्या पलीकडच्या भागात आजच्या म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम यांचा समावेश होतो. तसेच सुमात्रा, जावा, बोर्निओ या विशाल बेटांचादेखील समावेश होतो.

1720मधील ख्रिस्तोफर विगेल याने काढलेला भारताचा नकाशा. 'India Intra Gangem', गंगा नदी, दक्षिणेला 'Gangeticus Sinvs' (अर्थात गंगा सागर) आणि पलीकडे 'India Extra Gangem'.

अफगाणिस्तानपासून व्हिएतनामपर्यंतचा भाग 'ईस्ट इंडिया' म्हणून ओळखला जात होता. जुन्या नाकाशांमधून हे पाहण्यासाठी आपल्याला 15व्या शतकात जायला हवे. 1453मध्ये तुर्कस्तानमधील कॉन्स्तन्तीनोपोलचा पडाव झाल्यावर तेथील चिंचोळया मार्गाने चालणाऱ्या भारत व युरोप दरम्यानच्या व्यापारावर बंधने आली. तेव्हापासून युरोपमधील व्यापारी भारताकडे जाणारा समुद्रमार्ग शोधू लागले. 1499मध्ये पोर्तुगालच्या वास्को-द-गामाने आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतापर्यंत पोहोचणारा समुद्रमार्ग मिळवला. भारताशी व्यापार करण्यासाठी ते देश उत्सुक होतेच. 17व्या व 18व्या शतकात ब्रिटन, फ्रान्स, सेदरलँड्स, स्पेन, स्वीडन, पोर्तुगाल, डेन्मार्क, ऑॅस्ट्रिया या विविध देशांनी आपापली 'ईस्ट इंडिया कंपनी' स्थापन केली. व्यापाराचे निमित्त करून आलेल्या या कंपन्यांनी भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यांच्या वसाहतींची नावे होती - ब्रिटिश इंडिया, पोर्तुगीज इंडिया, फ्रेंच इंडिया (इंडो-चायना), डच इंडिया, स्पॅनिश इंडिया! या सर्व 'इंडिया'चा पसारा नकाशात पाहा.

पंधराव्या शतकातील आणखी एक मोठा शोध होता - पश्चिम भारताचा! त्या वेळी असा समज होता की भारताच्या पलीकडचा समुद्र आणि युरोपच्या पश्चिमेचा समुद्र एकाच आहे. अर्थात युरोपमधून पश्चिमेला प्रवास करत गेले की जहाज थेट भारताच्या पूर्व किनाऱ्याला लागणार. म्हणजे पॅसिफिकमधील फिलिपीन्सजवळच्या लहान लहान बेटांवर पोहोचणार. 1492मध्ये ख्रिस्तोफर कोलंबसने पश्चिमेच्या समुद्रातून भारतात पोहोचायचा मार्ग शोधण्याचा विडा उचलला. पण भारतात पोहोचायच्या नादात तो मध्य अमेरिकेत पोहोचला आणि आजवर माहीत नसलेल्या अमेरिका खंडाचा शोध लागला. हा देश भारत नाही, हे जरी नंतर लक्षात आले तरीही या बेटाचे नाव 'पश्चिम भारत' अर्थात 'वेस्ट इंडीज (West Indies) असेच ठेवले गेले. पुढच्या काळात अमेरिकेतील स्थानिक जमातींचे नावसुध्दा 'रेड इंडियन्स' (Red Indians) असेच ठेवले गेले. त्याही नंतरच्या काळात अमेरिकेतील पाषाणयुगीन जमातीचे नामकरण Paleo-Indians असे केले गेले. यावरून पूर्वेला असलेला अतिविशाल India युरोपीय लोकांच्या मनात किती घट्ट रुतला होता आणि त्याविषयी किती आकर्षण होते, याची कल्पना येते.

संदर्भ -

Community Based Water Management and Social Capital - Kiyoshi Kobayashi, Ismu Rini Dwi Ari, Isabel C. Escobar, Andrea Schaefer

Outlines of the Globe: The view of India extra Gangem, China, and Japan By Thomas Pennant

A Geographical Dictionary, Representing the Present and Ancient Names of All the Countries, Provinces, Remarkable Cities ...: And Rivers of the Whole World: Their Distances, Longitudes and Latitudes By Edmund Bohun (1688)

The other India as seen from Ishanapura - Dr. Sachchidanand Sahai.