भाजपाचा प्रचंड विजय निश्चित!आ. अतुल भातखळकर

विवेक मराठी    01-Oct-2019
Total Views |

प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा)

 

प्रचंड मोठया मेहनतीच्या आधारावर आम्ही विकासाचा हा वटवृक्ष 5 वर्षांत उभा केला आहे. आमचं आणि जनतेचं नातं हे 'विकास आणि विश्वास' यावर आधारलेलं आहे. आमचा मुख्यमंत्री हा गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी, महिलांसाठी आहे, हा विश्वास आम्ही जनतेत निर्माण केला. आम्ही जनतेची प्रामाणिकपणे सेवा करू इच्छितो, हा विश्वास जनतेत निर्माण झाला. त्यामुळे या विश्वास आणि विकासाच्या मुद्दयावर 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचंड असा मोठा विजय होणार आहे. असा विश्वास प्रदेश भाजपा सरचिटणीस आ.अतुल भातखळकर यांनी सा. विवेकला दिलेल्या मुलाखती दरम्यान व्यक्त केला.

मी 1992पासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो आहे. या कालखंडात 1995मध्ये शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आली. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. मी भाजपाचं काम करायला लागल्यानंतरची ही पहिली निवडणूक. या निवडणुकीपूर्वी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कार्यपध्दतीविरोधात 'संघर्षयात्रा' काढली. याचं परिवर्तन सत्तेत झालं आणि राज्यात युतीचं सरकार आलं. दरम्यान, 1996मध्ये आणि 1998मध्ये लोकासभा निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकांत भाजपा केंद्रातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. 1998मध्ये अटलजी पंतप्रधान झाले. राष्ट्रवादी विचारांनी भारलेला आणि मंतरलेला असा हा काळ होता. रामजन्मभूमी आंदोलन त्या वेळी सुरू होतं, जम्मू-कश्मीरचा मुद्दा त्या वेळी ऐरणीवर आलेला होता. या कालखंडात संघटना आणि पक्ष म्हणून भाजपा मोठया प्रमाणात वाढत होता. त्या वेळी संसाधनं, भौतिक साधनं कमी होती पण कार्यकर्त्यांचं 'स्पिरीट' जसं आज आहे, तसंच होतं. राष्ट्रवादी विचारांचा झेंडा हाती होता आणि सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याची तळमळ हृदयात होती. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्या वेळीही याच विचाराने वाटचाल करत होते आणि आज 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आलेली असतानाही भाजप कार्यकर्ते हाच विचार उराशी बाळगून पुढे वाटचाल करत आहेत.

 

 

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आज पूर्ण विकसित स्वरूपात दिसतो आहे, त्यामागे अनेक नेत्यांचं मोठं योगदान आहे. लक्षावधी कार्यकर्त्यांचा त्याग त्यामागे आहे. सगळयांचीच नावं इथे घेता येणार नाहीत, पण आवर्जून उल्लेख करावाच लागेल तो म्हणजे वसंतराव भागवत यांचा. भाजपाचे संघटन मंत्री म्हणून राज्यात पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. माझ्या दुर्दैवाने मला त्यांना कधी पाहता, भेटता आलं नाही, कारण मी ज्या वेळी पक्षात आलो, त्याधीच त्यांचं निधन झालं होतं. परंतु एक आदर्श कार्यकर्ता, संघटन मंत्री कसा असतो, हे वसंतराव भागवतांच्या रूपाने भाजपाने आणि महाराष्ट्राने पाहिलं. स्व. प्रमोद महाजन हे भाजपाचे नेते होते. अमोघ वक्तृत्व, कुशल संघटन, पक्षाकरिता वाट्टेल तितके कष्ट उपासण्याची वृत्ती, महाराष्ट्र राज्याची खडानखडा माहिती ही प्रमोदजींची वैशिष्टयं होती. त्यांचं भाषण - मग ते शिवाजी पार्कात लाखोंच्या गर्दीसामोर आसेल किंवा आयएमसीत बुध्दिवंतांसमोर असेल किंवा संघटनेच्या बैठकीत असेल, ते अप्रतिमच करणं हे प्रमोदजींचं वैशिष्टय होतं. त्यांच्या वक्तृत्वाने हजारो कार्यकर्ते प्रेरित होत असत. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपाला खऱ्या अर्थाने 'रयतेचा पक्ष' असा चेहरा मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्तरांत पक्ष पसरला. सर्व प्रश्नांची अचूक जाण आणि जनसामान्यांची नस अचूक पकडणं, हे गोपीनाथ मुंडे यांचं सर्वांत मोठं वैशिष्टय होतं आणि त्याला अपार कष्टांची जोड लाभली होती. नितीन गडकरी यांनी विकासाचं राजकारण कसं करता येऊ शकतं आणि विकासाच्या माध्यमातून जनमत आपल्या दिशेने कसं वळवता येऊ शकतं, याचा एक आदर्श प्रस्थापित केला. युती सरकारमध्ये बांधकाम मंत्री असताना त्यांनी मुंबई शहरात रस्त्याचं, उड्डाणपुलाचं जाळं, ग्राामीण भागांत रस्ते, वांद्रे-वरळी सीलिंक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आदींच्या माध्यमातून विकास काय असू शकतो, हे दाखवून दिलं. त्याच वेळी संघटनेत काम करताना बेधडकपणे काम करणं, समोरच्याला अंगावर घेणं ही गडकरींची वैशिष्टय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांत अत्यंत तळमळीने महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील पाच वर्षांत राज्यातील विकास कळसाला पोहोचलेला असेल, असा मला विश्वास वाटतो.


 

विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळी आता सुरू होईल. भाजपाचे कार्यकर्तेही या निवडणुकीसाठी उत्साहात कामाला लागले आहेत. जाहीर सभा, सोशल मीडिया, कार्यकर्त्यांच्या घरोघरी संपर्क अशा विविध माध्यमांतून भाजपा आपली भूमिका, सरकारची पाच वर्षांतील कामगिरी जनतेपुढे मांडेल. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज्यव्यापी महाजनादेश यात्रा केली. आता जनता आम्हाला निवडून देणारच आहे, मग तरीही महाजनादेश यात्रा आम्ही का काढतो आहोत? कारण जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत आणि आम्ही पाच वर्षांत काय काम केलं हे जनतेसमोर मांडतो आहोत, पाच वर्षांचा हिशोब मांडतो आहोत. गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात नेत्रदीपक काम केलं आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात राज्याने मोठी आघाडी घेतली आहे. जलयुक्त शिवारसारखी एक क्रांतिकारक योजना लोकसहभागातून राबवण्यात आली. या सरकारचं सर्वांत मोठं वैशिष्टय मी असं मानतो की ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर या देशाची राजकीय संस्कृती बदलली, तेच काम राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात 'दलालांचं राज्य' अशी महाराष्ट्राची प्रतिमा बनली होती, ती बदलून हे सेवा करणाऱ्या लोकांचं राज्य आहे, अशी राज्याची प्रतिमा निर्माण झाली. म्हणूनच आनंद महिंद्रांसारख्या एवढया मोठया, प्रामाणिक आणि प्रसिध्द उद्योगपतीनेही नुकतंच हे जाहीरपणे सांगितलं की, महाराष्ट्रात एवढं प्रामाणिक सरकार माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहतो आहे! त्यामुळे एक प्रामाणिक आणि काम करणारं सरकार अशी राज्य सरकारची प्रतिमा जनसामान्यांत निर्माण झाली आहे.

 

 

'ईझ ऑफ डुइंग बिझनेस'च्या माध्यमातून राज्यात उद्योगधंदे वाढवण्यासाठी उचलली गेलेली पावलं, एमआयडीसीची सुटसुटीत धोरणं, एमआयडीसींची वाढवलेली संख्या, उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची सुलभ केलेली प्रक्रिया यामुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर परकीय गुंतवणूक येऊ शकली. गेल्या पाच वर्षांत या देशात जेवढी परकीय गुंतवणूक आली, त्यातील 50 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक एकटया महाराष्ट्रात आली आहे. उद्योगांच्या माध्यमातून राज्यात मोठया प्रमाणात रोजगारनिर्मिती होते आहे. देशात सर्वाधिक रोजगारनिर्मिती महाराष्ट्रात होते आहे, हे केंद्र सरकारचे अहवाल सांगतात. पायाभूत सुविधा, शेतीकरता शाश्वत सिंचन, कृषी क्षेत्राचं सक्षमीकरण, सुधारणा हे या सरकारने प्राधान्याने केलं. कृषिउत्पन्न बाजार समित्यांचं वर्चस्व सरकारने कमी केलं, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल थेट बाजारात आणण्याची संधी उपलब्ध झाली. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाचं काम सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांना त्यांचा माल जागतिक बाजारपेठेत आठ-दहा तासांत पोहोचवता येण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईचा विमानतळदेखील उभा राहत आहे. शेती, सिंचन, उद्योगधंदे, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती यासोबतच कायदा-सुव्यवस्था सक्षम करण्यासाठीही सरकारने मोठं काम केलं आहे. महाराष्ट्र हे सीसीटीव्ही नेटवर्कची उभारणी करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. सागरी ठाण्यांची उभारणी सरकारने पूर्ण केली. पोलिसांतील भरतीवरील बंदी उठवून ती चालू केली. पोलिसांच्या बदल्यांत पारदर्शकता, प्रामाणिकता आणली. पाच वर्षांच्या काळात राज्यात एकही दंगल, बाँबस्फोट झाला नाही. मुंबईसारख्या शहरात केवळ महिलांच्या तक्रारींसाठी प्रत्येक पोलिस स्थानकात स्वतंत्र दल आणि गाडी तैनात करण्याची योजना या सरकारच्या कालखंडात राबवण्यात आली. त्यामुळे अशा सर्वच आघाडयांवर या सरकारने उत्तम कामगिरी केली आहे.

 

भाजपाच्या आजवरच्या वाटचालीत 2019ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 2014मध्ये महाराष्ट्रात प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री झाला. त्याचबरोबर भाजपाने 2014मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे आणखी एक मोठा विक्रम केला, तो म्हणजे 1990 सालापासून महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला 100हून अधिक जागा मिळाल्या नव्हत्या. त्या 100हून अधिक जागा मिळवण्याचा विक्रम 1990नंतर प्रथमच केला तो 2014मध्ये भाजपाने. या प्रचंड मोठया पराक्रमाच्या आधारावर आम्ही विकासाचा हा वटवृक्ष 5 वर्षांत उभा केला आहे. आमचं आणि जनतेचं नातं हे 'विकास आणि विश्वास' यावर आधारलेलं आहे. आमचा मुख्यमंत्री हा गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी, महिलांसाठी आहे, हा विश्वास आम्ही जनतेत निर्माण केला. आम्ही जनतेची प्रामाणिकपणे सेवा करू इच्छितो, हा विश्वास जनतेत निर्माण झाला. त्यामुळे या विश्वास आणि विकासाच्या मुद्दयावर 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचंड असा मोठा विजय होणार आहे.

 

 

हे विकास आणि विश्वासाचं नातं निर्माण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. राजकरणापलीकडे जाऊन विचार केला, तर देवेंद्र फडणवीस हे एक अत्यंत सज्जन असं व्यक्तिमत्त्व आहे. मला त्यांच्यातील भावलेला गुण म्हणजे त्यांची सकारात्मकता. कोणत्याही प्रश्नाकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहतात आणि त्याप्रमाणे ते पुढील विचार करत असतात. या राज्यावर अनेक संकटं आली, किंबहुना काहींनी ती आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, नीती आणि नियत साफ असल्यामुळे, सकारात्मकता असल्यामुळे या सर्व संकटांवर मुख्यमंत्र्यांनी मात केली. त्यामुळे राज्यात गेल्या पाच वर्षांत सामाजिक सलोखा आणि सौहार्द मोठया प्रमाणात कायम राहिलं. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलो, धनगर समाजाच्या आरक्षणाची केवळ शिफारस करून आम्ही थांबलो नाही, तर आदिवासी समाजाला ज्या सवलती मिळतात, त्या सर्व सवलती आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही दिल्या. त्याचबरोबर आम्ही वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागांची संख्या वाढवली. यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही, हे आम्ही पाहिलं. सकारात्मकता या गुणासोबतच देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक गुण म्हणजे ते अपरंपार कष्ट घेतात. म्हणूनच, शाहरुख खानसारखा भाजपाच्या वैचारिकदृष्टया विरोधात असलेल्या अभिनेत्यानेही हे जाहीरपणे सांगितलं की, 'देवेंद्र फडणवीस इज माय मिडनाइट फ्रेंड! कारण रात्री दोन वाजता जरी एसएमएस केला, तरी त्यावर ताबडतोब उत्तर देणारे, मदत करणारे मुख्यमंत्री मी प्रथमच पाहतो आहे.' त्यामुळे अत्यंत कार्यक्षम, गोरगरीब जनतेची तळमळ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला लाभले आहेत. म्हणून मी असं म्हणेन की, 'स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला मिळालेला सर्वांत प्रामाणिक, कार्यक्षम, सुसंस्कृत आणि चारित्र्यवान मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस होय.'

 

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांतदादा यांची नियुक्ती झाली आहे. चंद्रकांतदादा हे संघटनेचंच प्रॉडक्ट आहेत. संघटना वाढीला, संघटना अधिक मजबूत करायला, संघटनेला अधिकाधिक दर्जेदार बनवायला चंद्रकांतदादांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीचा 110 टक्के फायदा होईल. चंद्रकांतदादा पाटील यांचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन की, चंद्रकांतदादा हे असे कार्यकर्ते आहेत जे बिनपत्त्याचं पाकीट आहेत. संघटनेने केवळ पाकिटावर पत्ता लिहायचा आणि कार्यकर्त्याने तिथे जाऊन काम करायचं या मनःस्थितीत कायम राहणारे कार्यकर्ते म्हणजे चंद्रकांतदादा पाटील आहेत. उभं आयुष्य संघटनेला अर्पण केलेलं हे नेतृत्व आहे, त्यामुळे भाजपा येणाऱ्या कालखंडात अधिक मजबूत, सक्षम आणि दर्जेदार बनेल, यात काही शंका नाही. भाजपा सरकारची गेल्या पाच वर्षांतील एकूण कामगिरी पाहता या निवडणुकीचा निकाल हा 'रायटिंग ऑन द वॉल' असाच आहे. लोकांनी हे ठरवलेलंच आहे की, मतदान कुणाला करायचं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचं सरकार पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून येणार, ही केवळ एक औपचारिकता उरली आहे. 220 जागांच्या वर आणखी किती जागा मिळणार, एवढाच माझ्या दृष्टीने औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. युती होणार की नाही, वगैरे बऱ्याच चर्चा माध्यमांतून सुरू आहेत. परंतु आमची युती 100 टक्के होणार असून महाराष्ट्रात पुन्हा युतीचं सरकार येणार, हे निश्चित आहे.

 

(शब्दांकन : पूनम पवार / निमेश वहाळकर)