जागं करणारा निकाल

विवेक मराठी    25-Oct-2019
Total Views |

कार्यकर्ते म्हणजे सर्वसामान्य नागरिक आणि उच्चपदस्थ राजकीय नेते यामधला महत्त्वाचा दुवा असतात. पक्षप्रमुख सांगतील तो आदेश पाळतानाच कामाच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यात त्यांचं योगदान असतं. पक्षप्रमुखांनी त्या योगदानाची कदर करायला हवी. पक्षातील योग्य व्यक्तीस उमेदवारी देणं आणि निष्ठावंतांच्या मतांचा मान राखणं या दोन गोष्टी न झाल्याचा फटका या निवडणुकीने दिला.

नुकत्याच
जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने, युतीच्या पारड्यात स्पष्ट बहुमताचं दान टाकल्याने, पंचविशीचा टप्पा ओलांडणारी भाजपा-सेना युती सलग दुसर्यांदा राज्यकारभाराची सूत्रं हाती घेत आहे. ही घटना ऐतिहासिक आहे, त्यामुळे तिचं मोल विशेष आहे. युतीच्या दुसर्या कार्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा देतानाच या निवडणूक निकालातील गर्भित इशार्यांची जाणीव करून देणंही गरजेचं आहे.

 

या निवडणूक निकालांनी सर्वच राजकीय पक्षांनी बांधलेले अंदाज चुकीचे ठरवले आहेत. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर, तसंच दैनिकांमधून येत असलेल्या एग्झिट पोलची विश्वासार्हता धोक्यात यावी, असे हे निकाल आहेत. ‘देवाच्या काठीचा आवाज होत नसतो’, त्याचप्रमाणे, मतदारांच्या कौलाचा अंदाज येत नसतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हे मतदान म्हणजे मतदारांचं प्रगल्भतेच्या दिशेने पडलेलं पुढचं पाऊल आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील मतदारांत येत असलेली ही प्रगल्भता निश्चितच स्वागतार्ह आहे. मथितार्थ असा की, यापुढील काळात राज्यातल्या मतदारांना गृहीत धरून निवडणुकीची तयारी करणं हे राजकीय पक्षांसाठी धोकादायक ठरू शकतं

युती सरकारने त्याच्या पहिल्या कार्यकाळात निश्चितच अनेक कौतुकास्पद कामं केली आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक धाडसी निर्णय घेत त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही केली आहे. अनेक कसोटीच्या प्रसंगांत शीर्षस्थ नेतृत्वाने कणखरपणे राज्यशकट हाकला आहे. आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देत पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण केला आहे. असं जरी असलं, तरी दर वेळेची निवडणूक ही नवी अग्निपरीक्षा असते. आणि ती द्यावीच लागते. तिला सामोरं जाण्याआधीच विजय मिळाल्याची भावना पक्षावर स्वार झाली तर धोका निर्माण होतो - जसा तो 2004 साली केंद्रातल्या स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निर्माण झाला होता. ‘इंडिया शायनिंगचा निवडणूक प्रचारात करण्यात आलेला धूमधडाका त्या आघाडीला वस्तुस्थितीपासून अनेक योजने दूर घेऊन गेला. जेव्हा प्रचाराची भूल मतदारांना पडण्याआधी संबंधित राजकीय पक्षालाच पडते, तेव्हा वस्तुस्थिती समजून घेण्याची क्षमता दुबळी होते. ‘विजय मिळालेलाच आहे, निवडणूक हा केवळ एक उपचार आहेअशा विचाराने काम करणार्यांना मतदानाच्या माध्यमातून जागं करतानाच मतदाराने, लोकहितासाठी त्यांनी केलेल्या कामाचं स्मरण ठेवत त्यांच्याच हाती पुन्हा सत्तेच्या चाव्याही दिल्या आहेत.

लोकसभेत विक्रमी बहुमत मिळवत केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन केली असली, तरी मतदार मत देताना निकषांची सरमिसळ करत नाहीत. लोकसभेसाठी निवडून देताना राष्ट्रीय हिताच्या विषयांना सर्वोच्च प्राधान्य देणारे मतदार त्याच निकषांवर विधानसभेला मत देतील याची खात्री नसते. तिथे राज्य म्हणून केलेल्या कामांची यादीच महत्त्वाची ठरते. युती सरकारने गेल्या कार्यकाळात जनहिताची कामं नक्की केलेली आहेत, मात्र ती सगळी आत्ता दृश्य स्वरूपात दिसताहेत असं नाही. ही पहिली पाच वर्षं ही मूलभूत गुंतवणुकीची वर्षं होती. ही गुंतवणूक आर्थिक होती, तशी नवविचारांचीही होती. पण सर्वसामान्य मतदाराला तेवढंच पुरेसं नसतं. त्याला दृश्य स्वरूपात परिणाम दिसावे लागतात. काही विषयांत ते दिसायला काळ जावा लागेल. अशा वेळी मतदारांच्या मनात आपल्या कारभाराबद्दल विश्वास निर्माण व्हावा, तो दीर्घकाळ टिकावा म्हणून अन्य मार्ग अनुसरावे लागतात. त्यांच्याशी थेट संवाद करावा लागतो. तो या खेपेस कमी पडला का, हे तपासावे लागेल.


विरोधकांना कमी लेखणं वा त्यांचं अस्तित्व अमान्य करणं ही बाबदेखील टाळायला हवी. सक्षम आणि लोकहितासाठी सदैव जागरूक असलेला विरोधी पक्ष अस्तित्वात असणं हे सुदृढ लोकशाहीचं प्रमुख लक्षण आहे. तेव्हा विरोधी पक्ष पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची मनीषा बाळगण्यापेक्षा आणि त्यात शक्ती व्यर्थ घालवण्यापेक्षा आपल्या जनहिताच्या कामांची गती आणि दर्जा यावर लक्ष देणं हे केव्हाही श्रेयस्कर. त्यातूनच दुसर्या पक्षाचे पारंपरिक मतदार आपल्या पक्षाकडे वळू शकतात आणि त्यामुळे जनसामान्यांमध्ये झालेलं मतपरिवर्तन दीर्घकाळ टिकणारं असतं.


जे राजकीय पक्ष दीर्घकाळ कार्यरत आहेत, त्यांचे पारंपरिक मतदार असतात, एकाच पक्षाला पिढ्यान्पिढ्या डोळे झाकून मत देणारी घरं असतात. उदाहरणच द्यायचं, तर या निवडणुकीत काँग्रेसने प्रचाराचं जराही मनावर घेताही या पक्षाला 50हून अधिक जागा मिळण्यात या निष्ठावंत मतदारांचं योगदान खूप मोठं आहे. काँग्रेस पक्षाची मुळं गावपातळीवर किती खोलवर रुजली आहेत, त्याचं आणि मतदार आपल्या पक्षाशी किती एकनिष्ठ असतात, त्याचं ही गोष्ट निदर्शक आहे. हे पारंपरिक मतदार जसे निष्ठावान असतात, तसे ते आपल्या पक्षाकडून विशिष्ट वर्तनाची स्वाभाविक अपेक्षा ठेवातात. अशा मतदारांवर पक्षाच्या मूल्यचौकटीच्या बाहेरची व्यक्ती त्यांचा उमेदवार म्हणून लादली गेली तर ते तिला साफ झिडकारतात. याचं प्रत्यंतर या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना आलं आहे. पक्षांतराची सर्वपक्षीय शर्यत लागल्याचं जे चित्र या निवडणुकीत दिसलं, त्या संदर्भात मोजके अपवाद वगळता मतदारांनी मतपत्रिकेतून तीव्र नाराजी व्यक्त केली. तिचाही गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.

 

जी गोष्ट मतदारांच्या बाबतीत, तीच पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची. हे कार्यकर्ते म्हणजे सर्वसामान्य नागरिक आणि उच्चपदस्थ राजकीय नेते यामधला महत्त्वाचा दुवा असतात. पक्षप्रमुख सांगतील तो आदेश पाळतानाच कामाच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यात त्यांचं योगदान असतं. पक्षप्रमुखांनी त्या योगदानाची कदर करायला हवी. पक्षातील योग्य व्यक्तीस उमेदवारी देणं आणि निष्ठावंतांच्या मतांचा मान राखणं या दोन गोष्टी झाल्याचा फटका या निवडणुकीने दिला. या भरतीमुळेच ओहोटी लागल्याची चर्चा सुरू झाली.
 

या बाबी जितक्या लवकर दुरुस्त होतील, तितकं ते पक्षहिताचं ठरेल.