मालिकावीर कोण, विश्वचषक कुणाचा.

विवेक मराठी    26-Oct-2019
Total Views |

 
या निवडणुकीचे खरे ‘सामनावीर’ वा ‘मालिकावीर’ शरद पवारच आहेत, हे सर्वत्र वाचायला-ऐकायला मिळतंय.पण निवडणुकीच्या राजकारणात मात्र बहुमताचा चषकच महत्त्वाचा ठरतो आणि तो आज भाजपाप्रणीत युतीच्या हाती आहे. पण भाजपा-सेना युतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे येणार्‍या काळात आपल्या अपयशाबद्दल आत्मचिंतन नक्कीच करावे लागेल. 

‘सर्वच राजकीय पक्षांना अंतर्मुख करणारी निवडणूक’ असंच या विधानसभा निवडणुकीचं वर्णन करावं लागेल. जय आणि पराजय हेच निवडणुकीच्या यश-अपयशाचे निकष असतात. अलीकडे ‘नैतिक विजय’ नावाची संकल्पना स्वत:च्या पराभवाबाबत सारवासारव करण्यासाठी वापरली जाते. किंवा ‘आम्ही निवडणूक हरलो, पण आम्ही लोकांची मनं जिंकली’ अशीही बाष्कळ बडबड अनेक जण करतात. परंतु या सगळ्याला काही अर्थ नसतो. ज्याच्या हातात ससा तो पारधी, त्याप्रमाणे ‘ज्याच्या पारड्यात बहुमत, तो विजयी’ हा निवडणुकीचा अर्थ असतो. त्यामुळे स्पष्ट बहुमत संपादन करणार्‍या भारतीय जनता पक्ष-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचं सर्वप्रथम अभिनंदन.

अगदीच कालबाह्य ठरत चाललेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष या निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवू शकले आणि थोड्याफार अधिक जागाही जिंकू शकले, याबद्दल त्यांचंही अभिनंदन. लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्ष हवाच आणि आता या निवडणुकीनंतर तरी महाराष्ट्रात सरकारवर अंकुश ठेवणारा प्रबळ विरोधी पक्ष निर्माण होऊ शकेल, अशी आशा करता येईल. परंतु महायुतीला दोनशेहून अधिक जागा सहज मिळतील, असं बहुसंख्य राजकीय विश्लेषक, पत्रकार, अभ्यासक आदींना वाटत असताना महायुती 160च्या आसपास अडखळली. दुसरीकडे, आघाडीपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे वयाच्या 79व्या वर्षी प्रचारासाठी राज्यभर वणवण फिरले, खिळखिळ्या झालेल्या पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडलं. तरीही, हा पक्ष गेल्या वेळेपेक्षा जेमतेम 13 जागा अधिक जिंकू शकला. तर, काँग्रेस पक्ष या निवडणुकीत आहे की नाही, इथपासून शंका वाटत असताना काँग्रेसला या निवडणुकीत 44 जागांचा ‘जॅकपॉट’ लागला आणि गेल्या वेळेपेक्षा त्यांच्याही 3 जागा वाढल्या. वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वगैरे दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील पक्षदेखील एक-दोन जागांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. मतदारांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या पारड्यात पूर्ण वजन टाकलं नाही आणि विरोधी पक्षांना पूर्ण रिकामंही केलं नाही. म्हणूनच, मतदारराजाने कोण जेता आणि कोण पराभूत हे स्पष्टपणे सांगितलं असलं, तरीही ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांना अंतर्मुख व्हायला लावणारी निवडणूक ठरली आहे.
 


हेही वाचलंत का? जागं करणारा निकाल



 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची गेल्या पाच वर्षांत प्रत्येक निवडणुकीत झालेली ससेहोलपट पाहता, त्यांना आघाडी करण्याशिवाय गत्यंतर नाही हे स्पष्ट दिसत होतंच. परंतु 2014नंतर वाढलेली आणि वाढत चाललेली ताकद, 2014मध्ये तुटलेली युती आणि त्यानंतर पाच वर्षांत शिवसेनेबाबत आलेले अनुभव पाहता भाजपाने आता युती करू नये, पुन्हा एकदा स्वबळावर लढावं, अशी मागणी भाजपामधील कार्यकर्ते, समर्थक - हितचिंतकांच्या एका गटामधून मोठ्या प्रमाणात होत होती. परिस्थिती तशी होतीदेखील की जर भाजपाने सर्वाच्या सर्व जागा स्वबळावर लढवल्या, तर भाजपा एकट्याने स्पष्ट बहुमत घेऊन सत्तेत येईल. या निकालात युती करून कमी जागा लढवूनही भाजपाने टिकवलेला ‘स्ट्राइक रेट’ हेच सांगतो. लढवलेल्या जागा आणि त्यात जिंकलेल्या जागा यांच्या टक्केवारीचं प्रमाण पाहिलं, तर आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनुक्रमे 31 टक्के आणि 38 टक्के जागांवर विजय मिळवला. युतीमध्ये शिवसेनेने 45 टक्के जागांवर आणि भाजपाने 65 टक्के जागांवर विजय मिळवला. भाजपाने स्वबळावर 288 जागा लढवल्या असत्या, तर याच सरसरीने भाजपा 187-188 जागांवर विजय मिळवू शकला असता. हे प्रमाण कमी करून अगदी 50 टक्के जरी केलं, तरीही भाजपा 144-145 जागा म्हणजे स्पष्ट बहुमत मिळवत होता. तरीही भाजपाने युती करण्याचा निर्णय घेतला. लोकसभेला युती होईल ही सर्वांची अटकळ होतीच. परंतु विधानसभेबाबत बरीच शंका होती. कारण अर्थातच शिवसेना. परंतु या वेळी शिवसेनेने कोणताही आततायीपणा न करता आपलं हित ओळखून थोड्या कमी जागा पदरात पडूनही युतीद्वारेच निवडणूक लढवली. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळातील दुसरं स्थान कायम राहू शकलं आणि आज शिवसेनेच्या भूमिकेला अचानक महत्त्व आल्याचं चित्र आहे.

 
काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार हे निश्चित असल्यामुळे भाजपातील आणि शिवसेनेतील संभाव्य मतविभाजन आणि त्याचा विरोधकांना होऊ शकणारा फायदा ओळखून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला. परंतु या वेळी बंडखोर उमेदवारांमुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका महायुतीला बसलाच. काही ठिकाणी हे बंडखोर उमेदवार निवडूनही आले आहेत. त्यातील बहुतांश जण येत्या काळात आपआपल्या पक्षांत परततीलदेखील. थोडक्यात, गेल्या वेळी युती न केल्यामुळे मतविभाजन झालं आणि या वेळी युती केल्यामुळे मतविभाजन झालं. यंदा प्रमाण थोडं कमी होतं, इतकाच काय तो फरक. तथापि हा निकाल पाहता भाजपा आणि सेना नेतृत्वाने घेतलेला युतीचा निर्णय योग्य होता, हे मान्य करावं लागेल.

 ---------------------------------------------------------


आघाडीतर्फे या निवडणुकीत केवळ आणि केवळ शरद पवार यांनीच खिंड लढवली. अगदी राष्ट्रवादीमधील अन्य दिग्गज नेतेही आपआपल्या मतदारसंघातच अडकून पडल्यासारखे वाटत होते. काँग्रेसमध्ये तर आनंदीआनंदच होता. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांना झेपतील तेवढे कष्ट उपसण्याचा प्रयत्न केला. परंतु नगर जिल्ह्यांतील एकदोन तालुक्यांच्या पलीकडे प्रभाव नसलेल्या नेत्याने प्रदेशाध्यक्ष म्हणून किती जरी कष्ट उपसले, तरी त्याचा उपयोग तो काय? राहुल गांधी मध्यंतरी येऊन गेले, परंतु तेच आता ‘सत्तर वर्षांत काहीच घडलं नाही’ वगैरे बडबडू लागल्याने काँग्रेसवाल्यांची पंचाईत झाली. सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणास्तव आल्या नाहीत आणि प्रियंका गांधी कुठे होत्या हे कुणालाच ठाऊक नव्हतं. बाकी तसं काँग्रेसकडे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय नेतृत्व कोण आहे, हाही प्रश्नच. काँग्रेसने वेगळी प्रचारशैली राबवली, आमचे नेते आपआपल्या जिल्ह्यांत लक्ष केंद्रित करून होते, मोठ्या सभा वगैरे आम्ही मुद्दाम टाळलं इ. स्पष्टीकरण काँग्रेस नेत्यांकडून आता दिलं जातं आहे. परंतु, हे नेते जर जिल्ह्याजिल्ह्यांत लक्ष केंद्रित करून होते, तर ते कुठल्याच जिल्ह्यात लोकांच्या लक्षात का आले नाहीत, हे कोडंच आहे. तरीही, काँग्रेसने पूर्वीइतक्याच जागा टिकवल्या आणि दोन वाढवल्या. काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या, यावरून फेसबुक-ट्विटर वगैरे समाजमाध्यमांत विनोदांची जोरदार आतशबाजी सुरू आहे. परंतु यातून अर्थ हा निघतो की काँग्रेस अजूनही शाबूत आहे. काँग्रेसचे नेते शाबूत नसले तरी! राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसला मानणारा परंपरागत मतदार आजही कायम आहे. तो गेल्या पाच-सात वर्षांत सातत्याने घटत असला तरीही उमेदवार निवडून आणण्याइतपत त्यांचं महत्त्व अबाधित आहे. हा मतदार काँग्रेसी सरंजामदार नेत्यांनी निर्माण केलेला नाही. त्यामुळेच यंदा काँग्रेसला 15.87 टक्के मतं मिळू शकली आहेत. केवळ भाजपासमर्थकच नव्हे, तर कित्येक पत्रकार, अभ्यासकांचाही हाच अंदाज होता की काँग्रेस जेमतेम 20-25 जागा जिंकू शकेल. काही जण तर काँग्रेसला दहा जागा देण्यासही तयार नव्हते. परंतु काँग्रेसकडे अजूनही शिल्लक असलेल्या पूर्वपुण्याईने काँग्रेसला तगवलं आणि दोन जागांनी वाढवलंसुद्धा. विशेषतः विदर्भासारख्या प्रदेशात काँग्रेसने चांगलीच मजल मारली आहे. या गोष्टीचा काँग्रेसने आगामी पक्षवाढीच्या दृष्टीने आतातरी विचार करायला हवा. शिवाय भाजपानेही याचा विचार करायला हवा आणि एव्हाना त्यांनी तो सुरू केलेला असेलच.

 
या निवडणुकीचे खरे ‘सामनावीर’ वा ‘मालिकावीर’ शरद पवारच आहेत, हे वाक्य निकाल लागल्यापासून हरएक ठिकाणी वाचायला-ऐकायला मिळतंय. हे वाक्य वाचलं की 2003 साली झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा झालेल्या या अंतिम सामन्यांनंतर ‘मॅन ऑफ द सिरीज’चा पुरस्कार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मिळाला खरा, परंतु संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या शिस्त आणि नियोजनबद्ध, कट्टर व्यावसायिक संघाने अंतिम सामना जिंकत विश्वचषक जिंकला. मालिकावीर पुरस्कार महत्त्वाचा वाटतो की हाती उंचावलेला विश्वचषक, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. निवडणुकीच्या राजकारणात मात्र बहुमताचा चषकच महत्त्वाचा ठरतो आणि तो आज भाजपाप्रणीत युतीच्या हाती आहे. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर झालेल्या ईडी चौकशी प्रकरणाच्या निमित्ताने शरद पवारांनी ज्या प्रकारे राजकरणाचे फासे टाकले आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या एवढ्या मोठ्या घोटाळ्याच्या आरोपाबाबत कुठेही काहीही न बोलता केवळ सहानुभूतीची लाट आपल्या बाजूने निर्माण केली, ते सर्व केवळ थक्क करणारं होतं. पन्नास वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव असलेले आणि केंद्रीय कृषिमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यासह अनेक पदांवर, जबाबदार्‍यांवर काम केलेले शरद पवार या वेळी निकराची लढाई लढले. मतदानापूर्वी पावसात भिजत केलेलं भाषण या सर्व खेळीतील परमोच्च बिंदू. या वेळी राष्ट्रवादीने प्रथमच इतक्या चांगल्या प्रकारे समाजमाध्यमांचा वापर केला असेल. त्याचा त्यांना फायदाही झालाच. ‘तेल लावलेला पैलवान’ तसाच ‘पावसात भिजलेला पैलवान’ असंही शरद पवारांचं कौतुक झालं. राजकारणात येऊ इच्छिणार्‍या युवा पिढीसाठी, तसंच पत्रकार, राजकीय अभ्यासकांसाठीही शरद पवारांचे या निवडणुकीतील डावपेच हे एक अभ्यासाचा विषय ठरणार आहेत, यात काही शंका नाही. परंतु एकेकाळी देशाचा पंतप्रधान होण्याची स्वप्नं पाहणारा (त्यांचे कार्यकर्ते तशी स्वप्नं आजही पाहतात म्हणे), एवढा ज्येष्ठ धुरंधर नेता राज्य विधानसभेच्या निवडणुकीत उतरून, राज्यभरात वणवण फिरून, इतक्या वर्षांच्या आपल्या प्रतिमेचा विचार न करता मुख्यमंत्र्यांवर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका करूनही राष्ट्रवादीला सत्तेत काही आणू शकला नाही, हेही वास्तव आहे. गेल्या वेळच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या जेमतेम 13 जागाच वाढल्या आणि मतं न वाढता अर्ध्या टक्क्याने कमीच झाली. राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करू पाहणार्‍या पवारांनी स्वतःचा पक्ष काढला, परंतु या पक्षाला खुद्द महाराष्ट्रात आजवर कधीही स्वबळावर सत्ता आणता आली नाही, इतकंच काय, 100 जागांचा आकडाही गाठता आला नाही. भाजपाने तो सलग दोन वेळा गाठून दाखवला, तोही शरद पवारांसाठी ‘ज्युनिअर’, तिसर्‍या फळीतील वगैरे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे पवार-राष्ट्रवादी समर्थकांनी 13 जागा वाढल्याचा आनंद व्यक्त करावाच, परंतु वर उल्लेखलेल्या साध्यासोप्या गोष्टी, घटना, आकडेही लक्षात ठेवावेत. किमान ‘हा राष्ट्रवादीने भाजपाला दिलेला जबरदस्त तडाखा आहे’ वगैरे म्हणून स्वतःशीच खोटं बोलू नये.

 
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राने या निवडणुकीतून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. परंतु भाजपा 120 ते 130 जागा गाठेल असा अंदाज असताना भाजपाची गाडी 105वर आल्यामुळे पुढची पाच वर्षं युतीतील सरकार चालवताना थोडीफार कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. अर्थात, गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चांगलाच अनुभव घेतला आहे आणि समोर उभे राहिलेले सर्व प्रश्न त्यांनी चाणाक्षपणे निकालातही काढले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा उभा राहू शकण्याची शक्यता असलेला शिवसेना नामक प्रश्न फडणवीस योग्य प्रकारे हाताळतील, यात काही शंका नाही. परंतु याचसोबत जनतेपुढे मांडलेल्या योजना, प्रकल्प योग्य कालावधीत पूर्ण करण्याचं आव्हानही या सरकारपुढे असणार आहे. समृद्धी महामार्ग, इतर अनेक महामार्गांची दुरुस्ती-रुंदीकरणाची कामं, जेएनपीटी-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक - कोस्टल रोडसारखे भव्य प्रकल्प, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, इंदू मिल येतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, ग्रामीण भागात कृषिमाल व अन्नप्रक्रिया उद्योगांची उभारणी, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती अशी अनेक वचनं आता पूर्णत्वास नेण्याची वेळ आली आहे. शिवाय, राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत भीषण म्हणावी अशी आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार्‍या भाजपाने आता नव्या सरकारच्या माध्यमातून विकासाचे वाहक असलेल्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत. आगामी मंत्रीमंडळ आणि त्यांचं खातेवाटप येत्या काही दिवसांत होईलच. या मंत्रीमंडळात विनोद तावडे, पंकजा मुंडे, राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, डॉ. अनिल बोंडे, बाळा भेगडे इ. मंडळी असतील का? हा एक औत्सुक्याचा विषय असेल. परंतु यापैकी पंकजा, प्रा. शिंदे, हर्षवर्धन पाटील, डॉ. बोंडे आदी मंडळींचा पराभव धक्कादायक ठरला आहे. दुसरीकडे, यंदा निवडून आलेली युवाशक्तीही जोरदार चर्चेत आहे. परंतु यातील आदित्य ठाकरे, रोहित पवार व अन्य नवनिर्वाचित आमदार हे कोणत्या ना कोणत्या घराण्याचं प्रतिनिधित्व करतात. यामध्ये सर्वांत लक्षवेधी आणि आनंददायक ठरला तो सोलापूरमधील माळशिरसचा निकाल. राम सातपुते या भाजपाच्या युवा कार्यकर्ता उमेदवाराने माळशिरसमधून बाजी मारली. एका ऊसतोडणी कामगाराच्या कुटुंबात जन्मलेला, सामान्य संघ स्वयंसेवक आणि अभाविपचा कार्यकर्ता आज आमदार झाला. कोणत्याही घराण्याची पार्श्वभूमी नसताना, आर्थिक पाठबळ नसताना आपण राजकारणात उतरून निवडणूक जिंकू शकतो, हा विश्वास सर्वसामान्य जनतेमध्ये या निकालामुळे कायम राहिला आहे. यासाठी राम सातपुते यांचं आणि भाजपाचं अभिनंदन करायलाच हवं.
अखेर निवडणूक पार पडली. आता काही दिवस या निवडणुकीचं कवित्व सुरू राहील. आकडेवार्‍या येतील, विश्लेषणं होतील. महिन्या-दोन महिन्यात आपण हेही विसरून जाऊ. परंतु या निवडणुकीचा निकाल पाहून मतदार काय सांगू पाहतो आहे, हे राजकीय पक्ष समजून घेतील आणि येत्या पाच वर्षांत राज्याला एक कणखर, स्थिर, पारदर्शक सरकार व तितकाच कणखर, प्रबळ, जागरूक विरोधी पक्ष लाभेल, अशी अपेक्षा करू या.