विदर्भाने भाजपाची प्रगती रोखली

विवेक मराठी    27-Oct-2019
Total Views |
 
मधल्या काळात भाजपाचे संघटन मजबूत झाले, तेव्हा हाच विदर्भ भाजपाचे बलस्थान झाला होता. मात्र मुळातून येथील मतदार काँग्रेसवाला आहे, हे विस्मरणात गेले आणि भाजपा संघटनेपेक्षाही हवा व भाषणावर जिंकू शकतो या मनोभूमिकेत आला. तेव्हा या मतदाराने कुणालाही सुगावाही न लागू देता काँग्रेसला मतदान केले.
 
 
महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाला 122 ही आपली पूर्वीची सदस्यसंख्या गाठता आली नाही. त्यांना 17 जागा कमी पडल्या असून भाजपाला 105 जागा मिळाल्या आहेत. या जागा कमी होण्याला विदर्भ प्रामुख्याने कारण आहे, असे नाइलाजाने म्हणावे लागते. 2014च्या निवडणुकीत भाजपाला विदर्भातील 62 जागांपैकी 44 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला 4 जागा मिळाल्या होत्या. 48 जागा युतीला होत्या. आता 2019मध्ये ती संख्या 34वर आली आहे.
आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला पुसदची अवघी 1 जागा होती, तर काँग्रेसकडे 10 जागा होत्या. इतरांना 3 जागा मिळाल्या होत्या. पण या वेळी निकाल वेगळा लागला. भाजपाची संख्या 44वरून 30वर उतरली आहे. तर सेनेला 4 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची संख्या 10वरून वाढून 15 झाली आहे, तर राष्ट्रवादीने आपली संख्या 3वर नेली आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला पूर्वी 1 जागा होती, आता मेळघाटमधील जागाही मिळाली आहे. इतरांची संख्या 8 झाली आहे.
विदर्भातील या पडझडीत लक्षात येते की, पूर्वी नागपूर जिल्ह्यातील 12 जागांपैकी 11 जागा भाजपाला होत्या. सावनेरची जागा काँग्रेसला मिळालेली एकमेव जागा होती. या वेळी नागपूर जिल्ह्यात भाजपाला सावनेरबरोबर उमरेड, रामटेक, काटोल व नागपूर शहरातील उत्तर नागपूर व पश्चिम नागपूर अशा 6 जागा गमवाव्या लागल्या आहेत. यापैकी काटोलची जागा राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी खेचून आणली आहे. काटोलचे वैशिष्ट्य असे होते की, अनिल देशमुख यांचे पुतणे डॉ. आशिष देशमुख हे भाजपाच्या तिकीटावर विजयी झाले होते, पण त्यांनी मध्येच पक्षत्याग केला व आमदारकी सोडली. या वेळी ते नागपूरच्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्र्यांविरुद्ध उभे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जवळजवळ 50 हजार मतांनी पराभूत केले.

 
नागपूरबरोबर भंडारा, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांनी पूर्णपणे भाजपाला पाठिंबा न देता अन्य - विशेषत: काँग्रेसी उमेदवारांना निवडून आणले आहे. या सर्व जिल्ह्यांनी भाजपाला तसे संकेत दिले होते, पण ते भाजपाला जाणता आले नाहीत. भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला व भंडार्‍यात पोटनिवडणूक झाली. त्यात नाना पटोले उमेदवार नव्हते, पण ती जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. पूर्वाश्रमीचे भाजपाचे मधू कुकडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झाले होते, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमध्ये भाजपाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभय्या अहिर पराभूत झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसला ती एकमेव जागा मिळाली होती. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले बाळू धानोरकर विजयी झाले होते, तर अमरावतीत सेनेचे माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांना पराभूत व्हावे लागले होते. हंसराजभय्यांच्या मतदारसंघात वणी वगैरे काही भाग यवतमाळ जिल्ह्यातील येतो. या तीन पराभवांतून भाजपाने काही संकेत घेतले असे दिसत नाही.
आपल्याला एक बाब नजरेआड करून चालणार नाही, ती म्हणजे एकेकाळी विदर्भ हा भाग काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. 1977 साली काँग्रेसच्या इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पराभूत झाल्या. याच विदर्भाने त्यांना नवसंजीवनी दिली होती, हे विसरून चालणार नाही. त्यानंतर 78 साली झालेल्या निवडणुकीत विदर्भाने इं.काँ.ला घवघवीत यश मिळून दिले होते. त्यामुळे वसंतदादा पाटील व नाशिकराव तिरपुडे यांचे सरकार सत्तेवर आले होते. बाळासाहेब तिरपुडे त्या वेळी उपमुख्यमंत्री झाले होते. ते सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन झाले होते. त्यानंतरही वेळोवेळी विदर्भाने आपले काँग्रेसप्रेम सिद्ध केले आहे. मधल्या काळात भाजपाचे संघटन मजबूत झाले, तेव्हा हाच विदर्भ भाजपाचे बलस्थान झाला होता. मात्र मुळातून येथील मतदार काँग्रेसवाला आहे, हे विस्मरणात गेले आणि भाजपा संघटनेपेक्षाही हवा व भाषणावर जिंकू शकतो या मनोभूमिकेत आला, तेव्हा या मतदाराने कुणाला सुगावाही न लागू देता काँग्रेसला मतदान केले.
यातील गमतीचा भाग हा आहे की, यापैकी काँग्रेसजवळ नाव घ्यावा असा एकही नेता नाही. लोकसभा निवडणुकीनंतर विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले, पण तेही मूळचे शिवसेनावाले आहेत. पूर्वी काँग्रेसजवळ प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात दिग्गज नेते होते. आता ते थकले वा राजकारणातून निवृत्त झाले. तरुण पिढीपैकी कुणीही हे काँग्रेसी नेतृत्व स्वीकारले नाही. तरीही नेतृत्वहीन काँग्रेसच्या मतदारांनी काँग्रेसला कौल देत 10वरून 14 जागांवर आणून ठेवले.
ऐन वेळेला झालेले पक्षांतरही विदर्भाने स्वीकारले नाही. गोंदिया येथील गोपाल अग्रवाल काँग्रेसमधून भाजपात आले. त्यांना भाजपाने गोंदियातून तिकीटही दिले, पण ते पराभूत झाले व भाजपाचे जुने कार्यकर्ते विनोद अग्रवाल अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.
भाजपाचे ते दिग्गज पराभूत झाले, त्यात डॉ. परिणय फुके (साकोली) विद्यमान मंत्री, राजकुमार बडोले, माजी मंत्री, चैनसुख संचेती (मलकापूर), विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा असणारे सुधाकराव देशमुख (पश्चिम नागपूर), माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख (अमरावती) यांचा समावेश आहे. कृषिमंत्री अनिल बोंडे हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघातून पराभूत झाले. वर्धा जिल्ह्यातील पुळगाव-देवळी मतदार संघातून रणजित कांबळे पाचव्यांदा विजयी झालेत. तर बच्चू कडू हे अपक्ष म्हणून चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

 
आतापर्यंत काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने खूप वेळा बघितले आहे. वसंतराव नाईक-सुधाकरराव नाईक, अविनाश नाईक हे विदर्भातील होते, तर या वेळी मामा-भाचे विधानसभेत दिसणार आहेत. मामा आहेत चैनसुख संचेती यांना हरविणारे काँग्रेसचे राजेश एकडे, तर भाचे आहेत आकाश फुंडकर. आकाश हे भाजपाचे उमेदवार म्हणून खामगावमधून दुसर्‍यांदा विजयी झाले आहेत. फुंडकर पिता-पुत्रही असेच गाजले होते. पांडुरंग फुंडकर हे विधान परिषदेत होते. ते कृषिमंत्री होते, त्याच वेळी आकाश हे खामगावचे भाजपा आमदार होते. परिषदेत व सभेत असेच एक पिता-पुत्र राहणार आहेत. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर अरुणभाऊ अडसड विधान परिषदेत निर्वाचित झाले. आता त्यांचे पुत्र प्रताप अडसड यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून वीरेंद्र जगताप (काँग्रेस) यांना पराभूत केले. पाचव्यांदा विजयी झालेले रणजित कांबळे हे कामगार खात्याचे आघाडी सरकारचे मंत्री होते.
जागा कमी होण्याच्या पर्वातही भाजपाने चिखली - श्वेता म्हस्के (पराभूत - राहुल बांद्रे, काँग्रेस), धामणगाव रेल्वे - प्रताप अडसड (पराभूत - विरेंद्र जगताप), आर्वी - दादाराव केचे (पराभूत - अमर काळे) या जागा ओढून आणल्या आहेत. तर आर्णीत भाजपाचे डॉ. संदीप धुर्वे हे शिवाजीराव मोघे (काँग्रेस) व विद्यमान भाजपा आमदार राजू तोडसाम यांना पराभूत करीत विजयी झाले आहेत. एकूण काय, तर काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात - परंपरागत बालेकिल्ल्यात दुसर्‍यांदा महायुतीचे सरकार येेते आहे. स्पष्ट बहुमताने येते आहे. ही वाईट कामगिरी निश्चितच नाही, पण समर्थकांच्या अपेक्षा गगनाला भिडल्यामुळे बहुमत मिळूनही हरण्याचे दु:ख होते आहे.
भाजपाने विजयातही पराभव अनुभवला. राष्ट्रवादीने पराभवातही विजय अनुभवला. त्यांच्या 13 जागा वाढून 54 झाल्यात. शिवसेनेच्याही 6 जागा कमी झाल्या, पण त्यांनी विजय अनुभवला. त्यांच्याही 100च्या वर जागा जातील असे सांगितले जात होते, पण उलट होत्या त्यापेक्षा 6 जागा कमी झाल्या आहेत. मात्र त्याला विदर्भ कारणीभूत नाही.