सीमोल्लंघन भारतीय विद्येचे, संस्कृतीचे

विवेक मराठी    09-Oct-2019
Total Views |


 

भारताच्या, पर्शियाच्या, चीनच्या, अगदी युरोपीय देशांच्या सीमासुध्दा दुसऱ्या महायुध्दानंतर निश्चित झाल्या. या लेखातून आपण जे भारतीय संस्कृतीने केलेले सीमोल्लंघन पाहणार आहोत, ते प्राचीन काळातले असल्याने, भारताची सीमा नक्की कोणती धरायची? हा एक प्रश्नच आहे. जिथे भारतीय भाषा बोलल्या जायच्या, किंवा जिथे भारतीय संस्कृती होती त्या प्रांतांना भारतच म्हणायचे का? अगदी दोन-चारशे वर्षांपूर्वीपर्यंत, भारत आणि पर्शिया (इराण) सख्खे शेजारी होते. या दोन्ही देशांच्यामध्ये असेलेले अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश तसे नवीन आहेत. तर, आता अफगाणिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये भारतीय संस्कृतीचे दुवे मिळाले, तर त्याला 'सीमोल्लंघन' म्हणता येत नाही.

 

या लेखासाठी, उत्तरेला हिमालयाने आणि दक्षिणेला समुद्राने वेढलेल्या भौगोलिक भागाला भारत म्हणू. विष्णुपुराणात भारताची भौगोलिक व्याख्या अशीच सांगितली आहे -

उत्तरं यत्समुद्रस्य: हिमाद्रेश्चैव दक्षिणम्

वर्षं तद् भारतं नाम: भारती यत्र संतति:

- विष्णुपुराण 2.3.1

हिमालयापासून महासागरापर्यंत पसरलेल्या भूभागाला 'भारतवर्ष' असे नाव आहे आणि इथे जे राहतात, ते सर्व भारताचे संतान आहेत!

प्राचीन काळापासून साधारण 12व्या शतकापर्यंत भारतीय माणसाने आणि ज्ञानाने हिमालयाच्या आणि समुद्राच्या सीमा ओलांडून अनेक देशांत प्रवास केला. अनेक विद्वान पंडित, बौध्द भिक्षू, राजे, राजपुत्र, व्यापारी, कारागीर, कामगार अशा सर्व स्तरांतील लोक भारताबाहेर गेले. त्यांच्याबरोबर भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, न्याय, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती यांचे ज्ञान युरोपपासून व्हिएतनामपर्यंत पोहोचले होते. मध्ययुगात इस्लामी व युरोपीय आक्रमणाच्या काळात भारतीयांचे बाहेर जाणे बंद झाले. महाराष्ट्रात तर समुद्रापार जाणाऱ्याने प्रायश्चित्त घ्यावे असे सांगितले गेले. इतर देशांशी असलेले आपले संबंध संपुष्टात आले आणि सावकाश या उज्ज्वल स्मृतीसुध्दा विरून गेल्या. फ्रेंच व डच जेव्हा आग्नेय आशियात आले, तेव्हा तेथील भारतीय संस्कृती पाहून या संपूर्ण प्रांताला 'बृहत्तर भारत' किंवा 'Greater India' म्हटले. म्हणजेच त्या वेळी भारताची सीमा अफगाणिस्तानपासून व्हिएतनामपर्यंत होती!

धर्म, देव

भारतातून बौध्द धर्म मध्य आशिया, चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलियामध्ये पोहोचला. आग्नेय आशियातील देशांत आधी हिंदू धर्म व नंतर बौध्द धर्म पोहोचला. येथे पोहोचलेल्या बौध्द धर्मात अनेक हिंदू देवतासुध्दा होत्या. या सर्व भागात शिव, विष्णू, गणपती, बुध्द, सरस्वती हे देव पूजले जातात. आपल्याकडे शिव-विष्णूच्या हरिहर मूर्तीसारखी शिव-बुध्द मूर्ती इथे दिसते. ब्रह्मा-विष्णू-महेशसारखी ब्रह्मा-विष्णू-महेश-बुध्द अशी चतुर्मुख मूर्ती दिसते. हा दोन विचारांचा संगम झालेला इथे पाहायला मिळतो.

या देशांमध्ये अनेक बौध्द पंथ, उपपंथ तयार झाले. अनेक बौध्द ग्रंथांचे तिथल्या भाषांमध्ये भाषांतर झाले. आज संस्कृतमध्ये नाहीत इतके बौध्द ग्रंथ चिनी, जपानी, तिबेटी व मंगोलियन भाषेत आहेत.

भाषा

भारतीय भाषा - अर्थात संस्कृत आणि प्राकृत या भाषा आजच्या भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिझिस्तान, उघीर (शिनझियांग) या प्रांतात बोलल्या जात असत. भारतीय, पर्शियन (इराणी) आणि युरोपीय भाषांमध्ये विलक्षण साम्य आढळते. ते साम्य कशामुळे आहे, याच्या स्पष्टीकरणार्थ PIE Proto Indo-European नावाची एक अतिप्राचीन भाषा होती, ज्यामधून संस्कृत, अवेस्तान, लॅटिन व आजच्या युरोपीय व भारतीय भाषांचा उगम झाला असे सांगितले जाते. काही अभ्यासकांच्या मते - संस्कृतमध्ये एकाच शब्दाला अनेक प्रतिशब्द आहेत, तसेच ती so called PIEच्या सर्वात जवळची भाषा आहे. त्यामुळे प्राचीन संस्कृतचा भारतातून बाहेर प्रचार झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. ही विविध भाषांतील काही उदाहरणे -


 

पूर्वेलासुध्दा संस्कृतचा प्रभाव दिसतो. इंडोनेशियाच्या भाषेचे नावच 'बहासा' आहे. कम्बोडियामध्ये हजारो संस्कृत शिलालेख मिळाले आहेत. चिनी भाषेतसुध्दा काही संस्कृत शब्द मिळतात (loan words).

लिपी

भाषेबरोबर आणि भारतीय ग्रंथांबरोबर भारतीय लिपी अनेक देशांनी शिकली व त्यानुसार आपल्या लिप्या तयार केल्या. तिबेटची लिपी भारतीय गुप्त काळातील लिपीवर तयार केली गेली. जपानमधील काना व काताकाना या भारतीय लिपीवर आधारित आहेत. जावामधील लिपीसुध्दा पल्लव ब्राह्मीवर आधारित होती.

साहित्य

भारताचे साहित्य - रामायण, महाभारत, भागवत पुराण, पंचतंत्र आणि बुध्दचरित हे सर्वदूर पोहोचले होते. चीन, मंगोलिया, तिबेट या भागांमध्ये रामायण आहे. आग्नेय देशात रामायणाचे ग्रंथ आहेत. रामायणावर आधारित नृत्यनाटिका, छायानृत्य असे कलाप्रकार इंडोनेशियामध्ये पाहायला मिळतात. या देशांमध्ये तिथल्या भाषेत महाभारत लिहिले आहे. रामायण, महाभारत व भागवत पुराणातील प्रसंगांची चित्रे मंदिरा-मंदिरातून कोरली आहेत, तर चीनमधील बौध्द गुंफांमधून बुध्दाच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित काढलेली चित्रे पाहायला मिळतात.

संस्कृतमधले पंचतंत्र 5व्या शतकात पर्शियन भाषेत भाषांतरित झाले. त्या कथा इतक्या लोकप्रिय होत्या की त्या अरेबियन, लॅटिन व इतर युरोपीय भाषांत भाषांतरित झाल्या. या कथा जशा भारतातील लहान मुलांनी ऐकल्या आहेत, तशाच युरोपमधील लहान मुलांनीसुध्दा ऐकल्या आहेत. जर्मनीमध्ये प्रिंटिंग प्रेस आल्यावर पहिले पुस्तक छापले गेले बायबल आणि दुसरे पंचतंत्र! यावरून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल.

काश्मीरच्या अश्वघोषाचे बुध्दचरित्र मध्य आशियात व पर्शियामध्ये लोकप्रिय होते. यातील कथांची पर्शिया, अरेबिया व रोमन जगात अनेक भाषांतरे झाली. बुध्दाच्याच कथा (वेगळया नावांनी) Gesta Romanorum या रोमन पुस्तकात घेतल्या होत्या. त्या पुस्तकातील कथांवरून शेक्सपियरने काही कथा आपल्या नाटकांमध्ये लिहिलेल्या दिसतात!

आणखी काही पुस्तकांनी 17व्या शतकात सीमोल्लंघन केले, ते म्हणजे उपनिषदांनी! दारा सुखो या शहाजहानच्या मोठया मुलाने 51 उपनिषदांचे पर्शियन भाषांतर केले होते. पुढे त्याची लॅटिन, फ्रेंच व जर्मन भाषांतरे झाली. जर्मनीमध्ये उपनिषदांचा, संस्कृतचा अभ्यास सुरू झाला तो या भाषांतरातून!

अंकगणित

भारतात फार पूर्वीपासून 'शून्य'च्या संकल्पनेचा जन्म झाला. शून्य आणि दशमान पध्दत (place value system) हा भारताचा सर्वात मोठा शोध म्हटल्यास हरकत नाही! आज जगात सर्वत्र ही दशमान पध्दत वापरली जाते. वेळ, ताप, अंतर, वजन, गती, उंची, पाण्याची पातळी, पावसाचे प्रमाण, लोकसंख्या काहीही मोजायला ही दशमान पध्दत वापरली जाते. दशमान पध्दतीसारखी binary system संगणकीय कारभारासाठी वापरली जाते. भारतात तयार झालेली दशमान पध्दत पर्शियामध्ये, तिथून अरेबियामध्ये आणि तिथून भूमध्य समुद्राच्या दक्षिण भागात पसरली. त्या काळात, म्हणजे साधारण 13व्या शतकात युरोपमध्ये रोमन आकडे वापरले जात होते.

रोमन पध्दतीत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, व्याज, चक्रवाढ व्याज, वर्ग, वर्गमूळ यांची आकडेमोड अतिशय क्लिष्ट होती. त्यापुढे जाऊन exponent, arithmetic / geometric sequences, sine-cosines, logs, derivatives, integration हे रोमन अंकांत - अमिताभच्या शब्दात सांगायचे तर - मुश्कीलही नही, नामुमकीन था!

भारतात विकास पावलेली शून्य व दशमान अंकांची पध्दत पर्शियामधून अरबांकडे पोहोचली होती. 13व्या शतकाच्या सुरुवातीला फिबोनाकी नावाचा इटलीचा गणितज्ञ इजिप्त आणि अरेबियामध्ये फिरत होता. तिथे तो अरेबियन लोकांकडून भारतीय दशमान पध्दत शिकला. ही पध्दत पाहून तो आनंदाने वेडा झाला! भेटेल त्याच्याकडून तो अंकगणित शिकला! त्याने Modus Indorum म्हणजे Indian Methodवर एक Latin पुस्तक लिहिले - Liber Abaci (Book of Calculation). भारतीय अंक समजवण्यासाठी उदाहरण म्हणून, भारतीय गणितज्ज्ञांना 6व्या शतकात सांगितलेली एक series त्याने या पुस्तकात दिली - 1, 1, 2, 3, 5, 8,13, 21.. ही series आज आपण Fibonacci Series म्हणून शिकतो.

भारतातून अंकांनी 13व्या शतकात सीमोल्लंघन केले, पण त्यांच्या नावांनी फार पूर्वी सीमोल्लंघन केले असावे. असे वाटण्याचे कारण त्यांचे संस्कृत नावांशी असलेले साधर्म्य -

भूमिती

वैदिक काळापासून भारतात भूमितीचा अभ्यास केला गेला. शुल्भ सूत्रांमध्ये यज्ञकुंड रचनेसाठी लागणारी भूमितीची जाण दिसते. वर्तुळाच्या क्षेत्रफळाइतके क्षेत्रफळ असलेला चौरस रेखणे, चौरसाच्या क्षेत्रफळाइतके क्षेत्रफळ असलेले वर्तुळ रेखणे, पायथागोरसचा सिध्दान्त आदी गोष्टींची मांडणी पाहायला मिळते. महत्त्वाचे असे की भूमितीशी निगडित असलेले शब्द इतर भाषांमध्ये गेलेले दिसतात -

इतर

अगदी ढोबळमानाने आपण महत्त्वाची सीमोल्लंघने इथे पहिली. पण यांच्याशिवाय अनेक भारतीय गोष्टींनी सीमोल्लंघन केले आहे. उदाहरणार्थ, भारतात तयार झालेले कालमापन अचूक व शुध्द होते. भारतातील कॅलेंडरपैकी एक - शालिवाहन शक हे आग्नेय आशियामध्ये वापरले गेले. या देशांतील शिलालेखांवरील तारखा शालिवाहन शतकातल्या आहेत. या देशात भारतीय सणसुध्दा साजरे केलेले दिसतात. मुख्यतः मकरसंक्रांत.

भारतातून आणखी एक तंत्र बाहेर गेले ते नाकाच्या सर्जरीचे. सुश्रुतपासून सुरू असलेली ही परंपरा जवळजवळ 19व्या शतकापर्यंत चालू होती. 18व्या-19व्या शतकातील कैक युरोपीय मासिकांतून त्याविषयी लिहिलेले दिसते. भारतातून औषधांनी, मसाल्यांनी आणि सुती कापडानेसुध्दा सीमोल्लंघन केले. अगदी इतक्यात आपल्या पाहण्यात आलेले सीमोल्लंघन आहे 'हळद' या औषधाचे. तसेच योगासने व प्राणायाम यांनी केलेलं सीमोल्लन पाहिले आहे.

या सीमोल्लंघनात एक विशेष आठवण आहे बोधी वृक्षाची. बुध्दाला ज्या वृक्षाखाली बसून बोधी प्राप्त झाली, त्या झाडाच्या फांदी सम्राट अशोकाच्या मुलांनी श्रीलंकेत नेली होती. तो बोधी वृक्ष आज श्रीलंकेत फोफावला आहे! हजारो लोक या बोधी वृक्षाच्या दर्शनासाठी दूरदुरून श्रीलंकेत येतात आणि या लहानशा देशाला कित्येक वषर्े त्यामधून पर्यटन संधी मिळाली आहे!

आज जगात प्रत्येक गोष्टीवर - patents, rights, copyrights, intellectual property, royalty आणि त्यामधून उद्भवणाऱ्या 'ज्ञानाच्या' चोऱ्या, कोर्ट केसेस आणि कोटयवधी डॉलर्सचे दावे दिसतात. एका बहुराष्ट्रीय कंपनीने पेटंट केलेले बटाटे त्यांच्या परवानगीशिवाय पिकवले, म्हणून गुजरातमधील शेतकऱ्यांवर त्यांनी केलेला दावा आपण पाहिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ॠषिमुनी, भिक्षू, कवी, लेखक, गणितज्ञ, शास्त्रज्ञ, भाषातज्ज्ञ, वैद्य, लिपिकार, सामाजशास्त्रज्ञ, नाविक, व्यापारी यांनी आणि इतर अनेकांनी जे काही निर्माण केले, त्याचे जराही श्रेय घेतले नाही याचे किती कौतुक करावे! कोणत्याही औषधावर ते शोधणाऱ्याचे नाव नाही. कित्येक काव्यांवर कवीचे नाव नाही. आर्यभटासारखा महान खगोलशास्त्रज्ञ असो, कालिदासासारखा महाकवी असो, आपल्या पुस्तकात ते फक्त स्वत:चे नाव सांगतात! इतर काहीही माहिती सांगत नाही! त्या पुस्तकाची किंमत लिहीत नाहीत! कॉपीराइट लिहीत नाहीत. याचे नाटयप्रयोग केले / किंवा यावर आधारित ग्रहणाची वेळ सांगितली तर मला किंवा माझ्या वंशजांना अमुक इतकी royalty द्या, असे लिहिले नाही. कोणतेही कर्तेपण न घेता भारतीयांनी ज्ञानाची कोठारे भरली आणि ज्ञान नुसते साठवले नाही, तर ते दोन्ही हातांनी भरभरून वाटले! मुक्तहस्ताने, कसलीही अपेक्षा न ठेवता ज्ञानदान केले. निष्काम कर्माचे धडे भारताने नुसते दिले नाहीत, तर ते जगून दाखवले.

दसऱ्याला सोने वाटायची प्रथा आहे, आज त्यानिमित्त भारतीयांनी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, शास्त्र, गणित, काव्य आणि कथांचे सोने वाटले, त्या गोष्टीची आठवण! आज आपल्याला संस्कृत वाचता येत नाही, त्यातील ज्ञान मिळवता येत नाही. पण जर्मनीमध्ये त्याचा भरपूर अभ्यास चालू आहे. ही तफावत भरून काढायला हवीये. तसेच आज आपण जे ज्ञान निर्माण करतो, ते इंग्लिश भाषेत करत आहोत. दुर्दैव असे की आपण आपल्या संख्यांची नावे इंग्लिशप्रमाणे करून मराठीच बदलायला लागलो आहोत!

असा दिवस यावा की आपण नवीन निर्मिती आपल्या भाषेत करत आहोत आणि ते वाचण्यासाठी, शिकण्यासाठी बाहेरच्यांना आपल्या भाषा शिकायला लागाव्यात. आपली देवनागरी लिपी शिकायला लागावी. असा दिवस यावा की फ्रान्समध्ये 'सावरकर मराठी भवन' किंवा जर्मनीमध्ये 'टिळक मराठी विद्यापीठ' अशा नावाच्या संस्थांमध्ये युरोपीय मुलामुलींनी मराठी शिकायला गर्दी करावी! मराठी शिक्षकांना, मराठी साहित्याला आणि मराठीत तयार झालेल्या विज्ञानाला असे सोन्याचे दिवस येवोत!