वस्तुनिष्ठतावाद - आयन रँड

विवेक मराठी    11-Nov-2019
Total Views |

***रमा दत्तात्रय गर्गे**

 

तत्वज्ञ, स्वतंत्र विचारांच्या लेखिका आयन रँड यांनी आपल्या लिखाणातून निखळ बुध्दिवाद आणि व्यक्तिनिष्ठ मूल्यविचार मांडला. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा एक भाग म्हणजे वस्तुनिष्ठतावाद. या तात्विक विचारप्रणालीची ओळख करून देणारा हा लेख.


 

एक तरुण मुलगी स्वातंत्र्याची आकांक्षा घेऊन रशियातून अमेरिकेमध्ये येते. साम्यवादाने संकुचित केलेले स्वत्व मिळवण्यासाठी ती मातृभूमी सोडते. काही काळानंतर येथे - अमेरिकेतही तिला जाणवू लागते की, ज्या कारणासाठी आपण आपला देश सोडला, त्याच गोष्टी येथे हळूहळू रुजू पाहत आहेत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

जो साम्यवाद, समाजवाद माणसाच्या स्वातंत्र्याचा संकोच करू पाहतो, तोच चोरपावलांनी या स्वातंत्र्याची भूमी असणाऱ्या अमेरिकेमध्ये येऊ घातलाय. आणि मग सहानुभूतीचा बुरखा पांघरलेल्या या लाल लाटेला थोपवण्यासाठी ही रशियन-अमेरिकन लेखिका सर्वस्व पणाला लावून उभी राहते आणि त्यातूनच आकाराला येतो,'ऑब्जेक्टिव्हिजम म्हणजेच वस्तुनिष्ठतावाद!'

हॉलीवूडच्या पटकथालेखनाचा अभ्यास करणारी आणि अभिनेता फ्रँक ओ'केनर याची पत्नी असणारी आयन रँड लेखणी हातात घेते निखळ बुध्दिवाद आणि व्यक्तिनिष्ठ मूल्यविचार मांडण्यासाठी!!

 

पण हे इतके सहज साधे असत नाही. तिने लिहिलेल्या कादंबऱ्या प्रकाशकांकडून सातत्याने नाकारल्या जातात. तरीही आपल्या आत्म्याला साक्षी ठेवून अत्यंत धैर्याने ती लिहीत राहते. मग 1943 साली 'द फाउंटन हेड' ही कादंबरी प्रकाशित होते आणि इतिहास घडतो!! केवळ एकाने दुसऱ्याला सांगून, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगून ही कादंबरी गाजते. बेस्टसेलर ठरते! आणि आश्चर्य म्हणजे, बेस्टसेलर ठरलेल्या या कादंबरीची वाटचाल आजदेखील थांबलेली नाही. कादंबरीच्या सातत्याने आवृत्त्यांवर आवृत्त्या, विविध भाषांत अनुवाद होत असतात. या एका कादंबरीने आयन रँडला आणि तिच्या तत्त्वज्ञानाला ओळख दिली.

त्यानंतर तिची सर्वात जास्त गाजलेली 'ऍटलास श्रग्ड' ही कादंबरी 1957मध्ये प्रकाशित झाली. ऍटलास हे स्वतःच्या खांद्यावर पृथ्वी तोलून धरणारे ग्राीक पुराणकथेतील पात्र. या कादंबरीत जग तोलून धरणाऱ्या आदर्शवत मानवांची अशीच कल्पना केली आहे. त्यांनी एखाद्या क्षणी जर ही जबाबदारी नाकारली आणि खांद्यावरील ओझे झटकले तर काय.. मात्र हे आदर्श पूर्णपणे वस्तुनिष्ठतावादाला धरून आहेत. हे काही पारंपरिक नैतिक कसोटीवरचे सामाजिक धार्मिक आदर्श नव्हेत! स्वार्थ, आत्मकेंद्रित असणे म्हणजे पाप नाही हे यात ठासून सांगितले आहे.

या दोन्ही कादंबऱ्यांवर हॉलिवूडमध्ये चित्रपट निघाले. यानंतर मात्र आयन रँडने 'ऑब्जेक्टिव्हिझम' या तत्त्वज्ञानाची सुसंगत मांडणी करण्यासाठी उर्वरित आयुष्य घालवले. याच विषयावर तिने नंतर पुस्तके लिहिली, मुलाखती दिल्या, लेख लिहिले.

आयन रँडचा जन्म 1905 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. तिचे मूळ नाव एलिसा झिनोव्येव्ना रोझेनबाऊम. आयन रँड हे तिने लेखनासाठी घेतलेले टोपण नाव! तो कालखंड साम्यवादी क्रांतीचा कालखंड होता. या क्रांतीची झळ आयन रँडलाही बसली. बोल्शेव्हिक क्रांतीमुळे तिचे कुटुंब काही काळ देशाबाहेर होते. नंतर ते परत रशियात आले. सेंट पीटर्सबर्गचे आता पेट्रोग्रााड असे नामकरण झाले होते. एलिसाचे महाविद्यालयीन शिक्षण तेथेच झाले. ती इतिहास, साहित्य आणि तत्त्वज्ञान या विषयांची चाहती होती. स्वतंत्र विचारांच्या या तरुणीला समूहवाद आणि त्यामुळे होणारा व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच याचा त्रास होऊ लागला. शेवटी स्वातंत्र्याच्या शोधात आयन रँड अमेरिकेत आली. हॉलिवूडमध्ये तिला लेखनविषयक कामे मिळू लागली. फ्रँक ओ'कॅनर या अभिनेत्याशी तिने विवाह केला. जेव्हा अमेरिकेत साम्यवादाला छुपा पाठिंबा मिळू लागला, तेव्हा मात्र औद्योगिक भांडवलशाहीला योग्य ठरवून आपल्या लेखनातून आयन रँड वस्तुनिष्ठतावाद मांडू लागली. तिच्या कादंबरीतील पात्रे तिचे तत्त्वज्ञान आणि विरोधी जग यांची चर्चा करू लागले.

आयन रँडच्या वस्तुनिष्ठतावादाची मूलतत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.

तिच्या मते धर्म आणि समूहवाद हे दोन्ही मार्ग मानवाच्या जीवनावर, अस्तिवात नसलेल्या नैतिक विचारांचा पगडा बसवतात. मानवाला त्याच्या आयुष्यातील अत्यंत स्वाभाविक अशा अहंकार, स्वार्थ, स्वसन्मान या मूल्यांपासून दूर नेतात. देवासाठी किंवा समाजासाठी मानवाने नि:स्वार्थीपणे जगले पाहिजे असे त्याला सांगत राहणे हा मानवी जीवनधारेच्या विरोधातील विचार आहे, असे हे तत्त्वज्ञान मानते.

माणूस स्वाभाविकपणे स्वतःसाठी जगू इच्छित असतो आणि त्यासाठी मूल्यनिष्ठा मिळवू पाहत असतो. मात्र धर्मश्रध्दा आणि समूहनिष्ठ मार्ग त्याला या मार्गाकडे वळू देत नाहीत. समूहनिष्ठ मार्ग - साम्यवाद, समाजवाद, फॅसिझम हे देवाच्या जागी समाजाला ठेवतात आणि माणसाकडून त्यागाची अपेक्षा करतात!

ऐहिकाचा स्पर्श म्हणजे जणू काही अपवित्र गोष्ट आहे आणि सर्व पवित्र जग हे त्या पलीकडेच आहे, असे हे धार्मिक आणि समूहवादी विचार मानतात. हे विचार मानवाच्या आतल्या स्फुल्लिंगाला विझवून टाकतात. मानवाच्या जीवनात वाईट पध्दतीने ढवळाढवळ करतात. जगात काहीतरी उदात्त आहे आणि नि:स्वार्थ सेवावाद हे मानवाचे ध्येय आहे, असे त्याच्यावर ठसवले जाते.

मात्र मानवाची सहज प्रवृत्ती ही आतून या मूल्यांच्या विरोधात असते. अशा वेळी जगातील या महान गोष्टी आपल्याला जमत नाहीत. आपल्या आवाक्यात नाहीत हे कळल्याने तो हताश होऊ लागतो. त्याचा आत्मा हळूहळू तुटू लागतो. माणूस स्वतःचे शुध्द आंतरिक व्यक्तित्व विसरून स्वतःला या उदात्त साच्यात बसवून घेण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यभर एका विचित्र विरोधाभासात जगत राहतो.

त्याला आपले आंतरिक जीवन आणि सामाजिक-धार्मिक जीवन यातील विरोधाभासाला तोंड देताना वेगवेगळे मुखवटे चढवावे लागतात. जीवनाचे मूळ उद्दिष्ट आनंद असावयास हवे, ते बाजूला पडून तो भलत्याच सामाजिक आणि धार्मिक आग्राहांचा बळी ठरतो.

कधीकधी तर आपण हा संघर्ष करीत आहोत हेही काही लोकांच्या लक्षात येत नाही. काही जणांच्या हे लक्षात येते, परंतु तरीही सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ते समाजाला हवे तसे वागत राहतात. किंवा अनेकदा या शृंखला तोडण्याचे धैर्य त्याच्यात नसते, म्हणून ते खोटे जगच खरे मानून जगू लागतात.

तिसऱ्या कोटीतील लोक द फाउंटनहेड आणि ऍटलास श्रग्ड मधील नायकांसारखे असतात. ही स्वप्रज्ञेने जगणारी माणसे आहेत. त्यांना आपले यश समाजाच्या कसोटीवर मोजण्याची इच्छा नाही. आत्मसन्मान, स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता यांच्या कसोटीवरच त्यांना जगायचे आहे.

आयन रँड म्हणते - हे मोजकेच लोक अखेर जग चालवतात आणि जीवनाला अर्थ देतात. सर्वोत्तमाचा शोध घेतात. परिपूर्णतेचा ध्यास घेतात. मूल्यविचाराने जगतात. स्वतःच्या आत्म्याशी सुसंगत वागतात. अंत:प्रेरणेला भ्रष्ट होऊ देत नाहीत. प्रत्येक ठिकाणी विवेकाची कसोटी लावतात. गूढवादाला बळी पडत नाहीत. या मोजक्या लोकांना उद्देशूनच मी बोलत असते.

द फाउंटनहेडचे कथानक आणि वस्तुनिष्ठतावाद याविषयी अधिक जाणून घेऊ दुसऱ्या भागात.