सुरीली कटयार

विवेक मराठी    11-Nov-2019
Total Views |

***राजेंद्र मणेरीकर***

कटयार काळजात घुसली हे नाटक 1967च्या डिसेंबर महिन्यात आले. ह्या नाटकातील गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका आल्या आणि त्या रेडिओवर वाजू लागल्या. ती सर्वच गाणी इतकी सुंदर होती की त्यांनी संगीत नाटकांच्या प्रेक्षकांना अक्षरशः खेचून आणले. त्या नाटकाचा नायक होता सदाशिव, पण हिरो झाले वसंतराव! मराठी संगीत नाटकांच्या शंभर वर्षांच्या देदीप्यमान कालावधीकडे आज नजर टाकली, तर कळते की किर्लोस्करांच्या रामराज्यवियोगाने त्या युगाची नांदी झाली आणि कटयारने भरतवाक्य म्हटले. नियतीने त्यांना आधी खूप छळले, परंतु इतका मानही त्यांच्या नावे लिहिला. आमच्यासारखे जे वसंतरावांचे चाहते आहेत, त्यांना म्हणूनच नियतीचा एकाच वेळी खूप राग येतो आणि त्याच वेळी कृतज्ञतादेखील वाटते. तिने कटयारसारखे सुंदर नाटक त्यांना दिले आणि त्या माध्यमातून वसंतराव घराघरांत पोहोचले. संगीत रसिकांना गायकीची एक नवी झलक पाहायला मिळाली आणि अभ्यासकांना एक आगळावेगळा गवई गुरुतुल्य झाला. अशा चतुरस्र कलाकाराची यंदा जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त ही शब्दरूपी सुमनांजली.


डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांच्याबद्दल लिहिण्याची संधी मला विवेकच्या संपादकांनी दिली, हे माझे मोठे भाग्य आहे. मी एक रागसंगीताचा अभ्यासक आहे. गाणे नवे शिकू लागलो तेव्हा अनेकांच्या गाण्याचे वेड लागले. अनेक गवई आवडायचे. पुढे गायनाचे शिक्षण वाढले, आकलन वाढू लागले, तशा वेड लागण्याच्या जागा बदलू लागल्या. काही गवई आधी आवडत, ते मागे पडले आणि त्यांची जागा दुसऱ्या कुणी कुणी घेतली. कुणी आवडत नसणारे आवडते होऊ लागले. काही काळ गेला आणि गवयांकडे पाहायची दृष्टी हा गाणारा आपल्याला काही शिकवत आहे अशी झाली. वेडाला मर्यादा आली. आवडनिवड हा विषय राहिला नाही. प्रवास मनाकडून बुध्दीकडे होऊ लागला. असा प्रवास चालू असताना वसंतराव अचानक ह्या जगातून निघूनच गेले!

जी मंडळी आमच्यापेक्षा उशीरा जन्माला आली वा ज्यांनी त्यांच्या दुर्दैवाने वसंतरावांना प्रत्यक्ष ऐकलेच नाही, त्यांना तो दिवस आठवणारच नाही. परंतु, मी इतके नक्की सांगू शकतो की ज्यांनी ज्यांनी वसंतरावांना ऐकले पाहिले होते, ते त्या काळात वसंतरावांच्या अतिशय प्रेमात होते आणि ते प्रेमप्रकरण चालू असताना मृत्यूही त्यांच्या प्रेमात पडला! मराठी संगीतप्रेमींसाठी तो फारच मोठा धक्का झाला.

ते गेले, तेव्हा त्यांचे वय त्रेसष्ट वर्षांचे होते. अकाली म्हणण्याइतके मनुष्य म्हणून ते तरुण नव्हते आणि वयामुळे गेले असे म्हणण्याइतके वृध्दही नव्हते. कटयारचे प्रयोग चालू होते आणि मैफलीही. नाटयसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते नुकतेच गाजले होते आणि हुबळीला झालेल्या ललितकलादर्शच्या षष्टयब्दीच्या कार्यक्रमाचे नायक म्हणूनही तेच उभे होते. थोडक्यात सांगायचे, तर प्रसिध्दीच्या शिखरावर असतानाच त्यांना मृत्यूने वरच्यावर उचलले होते.

वसंतरावांचे शारीरिक वय त्रेसष्ट असले, तरी प्रसिध्दीकडून पाहिले तर ते पंधरा सोळा वर्षांचेच होते. अन्य सर्व गवयांप्रमाणेच ते लहान असतानाच त्यांचे गायनाचे शिक्षण सुरू झाले. नागपूरला ग्वाल्हेर घराण्याचे सप्रे गुरुजी म्हणून होते. त्यांच्याकडे वसंतरावांची पहिली तालीम झाली. पुढे भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खाँसाहेब, असद अली खाँसाहेब, किराणा घराण्याचे पं. सुरेशबाबू माने ह्यांच्याकडे त्यांची महत्त्वाची आणि गायकी घडवणारी तालीम झाली. दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर मा. दीनानाथ मंगेशकर ह्यांचा मोठा परिणाम झाला. ह्या सर्वांतून वसंतरावांची म्हणून एक शैली तयार झाली. एक गवई आकाराला आला. तो इतका तयार झाला की त्यावर त्याने आपले जीवन बेतावे, गायन हाच त्याचा उत्पन्नाचाही व्यवसाय व्हावा.

त्या गवयात कमी काहीही नव्हते. भरपूर रागसंग्राह झाला होता, बंदिशीचा खजिना हाती आला होता, ख्याल, ठुमरीच नव्हे तर गझलादी गानप्रकारदेखील गळयावर चढले होते, केवळ चपळ गळाच लाभला होता असे नव्हे, तर तालही इतका अनुकूल झाला होता की कुणीही तय्यार तबलजी साथीला असो, वसंतरावांची सम जराही हलू नये! केवळ दैवी देणगीने प्राप्त होणाऱ्या ह्या गोष्टी नव्हेत. गुरुकृपा आणि साधना ह्यांची जोड असल्याशिवाय घडणारे हे नव्हे. शिष्य उत्तम असल्याशिवाय गुरुकृपा होत नाही आणि शिष्याने जीव मारल्याखेरीज साधना होत नाही. शिकण्याचा कालावधी कमी/जास्त, खंडित/अखंडित कसाही असू शकतो, परंतु साधनेत व्यत्यय येऊन चालत नाही. जे जे उच्चपदाला पोहोचले, त्या त्या सर्वांनी आपली कोणतीही अवस्था असो, साधनेत खंड पडू दिला नाही. आपल्या गुरुजींनी आपल्याला दुर्लभ विद्या दिली, तिचे आपण प्राणपणाने रक्षण करू अशी प्रतिज्ञाच जणू प्रत्येक कलाकाराने केलेली दिसेल. किंबहुना अशी प्रतिज्ञा करण्याची ज्याची क्षमताच नाही, त्याला गुरू कधी विद्या देत नाहीत आणि एखादा गुरू जर सुधारणेच्या आशेने विद्या देऊ करेल, तर ती विद्या शिष्यापर्यंत पोहोचत नाही. वसंतराव शिष्य म्हणून उत्तमांतले होते. ग्राहणशक्ती विलक्षण होती, बुध्दी कुशाग्रा होती आणि स्मरणशक्ती जबरदस्त होती. पाठांतराची गरज नव्हती आणि एकदा ऐकलेले नंतर आठवून आठवून गावे लागत नव्हते. रंगभूमीवर त्याकाळी चालणारी सगळीच नाटके त्यांना नुसती पाठ नव्हती, तर त्यातले प्रत्येक पद त्यांना गाता येत होते. त्या नाटकाचा इतिहासदेखील त्यांना माहीत होता आणि त्या नाटकांतील पदे आधीच्या कोणत्या पदावरून वा बंदिशीवरून बांधलेली आहेत, ह्याचीही पक्की खात्री त्यांच्याकडे होती.


वास्तविक असा गवई प्रसिध्दीला सहज सापडणे अवघड. पण तिचे काय आणि केव्हा बिनसले कुणास ठाऊक, ती आपली वरमाला वसंतरावांच्या गळयात काही केल्या घाले ना! गंमत अशी की वसंतरावांना संधीच मिळाली नाही असे झाले नाही. संधी मिळत होती, वसंतराव गातही होते. तब्बल दोन-एकशे चित्रपटांसाठी वसंतरावांनी पार्श्वगायन केलेले आहे, हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. त्याशिवाय अनेक जुन्या नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. बाबूजी-माडगूळकरांच्या गीत रामायणात ते गायले होते. कुठे कुठे मैफली होत होत्या, संगीत क्षेत्रातील सर्वांना वसंतराव माहीत होते. पण इतके असूनही जेव्हा विद्याधर गोखल्यांच्या मेघमल्हार नाटकासाठी पं. राम मराठे ह्यांनी आपल्यासह काम करण्यासाठी वसंतराव देशपांडयांना पुण्याहून बोलवा असे म्हटले, तेव्हा मुंबईत अनेकांनी हे कोण वसंतराव असे विचारले! ही गोष्ट 1967 सालातली आहे, हे लक्षात घेतल्यास वसंतरावांनी काय भोगले असेल ते कळेल.

 

ह्या सर्व प्रकाराचा वसंतरावांना मुख्य त्रास काय झाला असेल, तर तो असा की त्यांना हा सर्व काळ कारकुनी करत बसावी लागली. अक्षरशः एका खोलीत संसार करावा लागला. नोकरी आणि संगीत साधना, नोकरी आणि वर उल्लेखल्याप्रमाणे गायनाचे कार्यक्रम, नाटके, ध्वनिमुद्रणे आदी उद्योग करावे लागले. वसंतरावांचे वास्तव्य पुण्यात आणि नाटक-गायनाचे मुख्य केंद्र मुंबईत. अशी मोठी कोंडी होती. कटयार काळजात घुसली हे नाटक 1967च्या डिसेंबर महिन्यात आले, म्हणजे म्हणू या की 68 सालापासून ती कोंडी फुटायला सुरुवात झाली.


मेघमल्हारचे मुंबईला शुभारंभाचे सात प्रयोग सलग लावले होते. ते लगेच हाऊसफुल्ल झाले होते. त्यामागोमाग चारपाचच महिन्यात आलेल्या कटयारला मात्र जरा वाट पाहावी लागली. पंचवीस प्रयोग झाले
, तरी अपेक्षित गर्दी होत नव्हती. तितक्यात ह्या नाटकातील गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका आल्या आणि त्या रेडिओवर वाजू लागल्या. ती सर्वच गाणी इतकी सुंदर होती की त्यांनी संगीत नाटकांच्या प्रेक्षकांना अक्षरशः खेचून आणले. त्या नाटकाचा नायक होता सदाशिव, पण हिरो झाले वसंतराव! त्यातील खाँसाहेबांची भूमिका वसंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाशी इतकी मिळतीजुळती झाली की त्या भूमिकेने वसंतरावांना त्यांच्या भौतिक यशाचे शिखर दाखवले, इतकेच नव्हे, तर मराठी इतिहासातील संगीत नाटक नावाच्या एका विशेष युगाच्या शिरपेचात शेवटचा तुराही खोचला.


मराठी संगीत नाटकांच्या शंभर वर्षांच्या देदीप्यमान कालावधीकडे आज नजर टाकली
, तर कळते की किर्लोस्करांच्या रामराज्यवियोगाने त्या युगाची नांदी झाली आणि कटयारने भरतवाक्य म्हटले. नियतीने त्यांना आधी खूप छळले, परंतु इतका मानही त्यांच्या नावे लिहिला. आमच्यासारखे जे वसंतरावांचे चाहते आहेत, त्यांना म्हणूनच नियतीचा एकाच वेळी खूप राग येतो आणि त्याच वेळी कृतज्ञतादेखील वाटते. तिने कटयारसारखे सुंदर नाटक त्यांना दिले आणि त्या माध्यमातून वसंतराव घराघरांत पोहोचले. संगीत रसिकांना गायकीची एक नवी झलक पाहायला मिळाली आणि अभ्यासकांना एक आगळावेगळा गवई गुरुतुल्य झाला.


वसंतरावांना महाराष्ट्रात नावलौकिक मिळण्याआधी ग्वाल्हेर
, जयपूर, आग्राा आणि किराणा ही चार घराणी मोठे नाव कमावून होती. भास्करबुवांचा प्रभाव असा झाला होता की किराण्याचे असूनही सवाई गंधर्वांचे गाणे त्यातून मुक्त नव्हते. भेंडीबाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर हयात होत्या, पण त्यांनी कधीच गाणे सोडले होते. अमीर खाँसाहेब नाव कमावून असले, तरी मराठी माणूस त्यांच्यापासून जरा लांब होता. वसंतरावांची मुख्य तालीम तिकडे झालेली आणि त्यावर दीनानाथांच्या प्रभाव. वसंतराव जसे गात होते, तसे गाणारा दुसरा मराठी माणूस नव्हता आणि वसंत देशपांडे हे नाव अस्सल मराठी असले, तरी गाणे ऐकून हा गाणारा मराठी मुळीच वाटत नव्हता. उत्तर हिंदुस्तानी, पंजाबी ढंगाचे गाणे मराठी कानांना म्हणून वेगळे आणि काहीसे चमत्कारिक वाटत होते. अस्सल मराठी माणसाच्या प्रतिक्रिया कशा असत आणि वसंतराव ह्याबद्दलच्या दोन गमती सांगण्यासारख्या आहेत.


माझे गुरुजी पं. रामभाऊ मराठे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यांनी मला ही हकीकत सांगितलेली आहे. सौभद्र नाटकात वसंतराव एकदा नारदाच्या भूमिकेत होते. नारदाचे काम सुरुवातीस आणि गाणी सुंदर. राधाधर मधुमिलिंद
, लग्नाला जातो मी आणि पावना वामना. ह्यापैकी पावना वामना वसंतरावांचे रेडिओवर अनेकदा लागत असे. ते गाऊन वसंतराव विंगेत आले, तर तिथे पं. विनायकबुवा पटवर्धन! त्यांना वसंतरावांनी नारदाचे मराठीपण सोडलेले काही फारसे रुचले नाही. त्यांनी वसंतरावांना लगेच विचारले, ''आज नारद पंजाबात कसा रे गेला?'' 


वसंतरावांचे गाणे प्रथमदर्शनी चंचल वाटू शकते, परंतु तो गुण त्यांच्या गळयाचा, सांगीतिक स्वभावाचा नाही. वसंतरावांचा गळा चपळ होता, पण तो स्वीकारून वसंतरावांनी त्याचे एक अप्रतिम गानचित्र उभे केले, हे सामान्य नव्हे. चंचलता आणि गांभीर्य एकाच वेळी कसे नांदू शकतात, ह्याचे उदाहरणच वसंतरावांनी घालून दिले असेच उलट दिसते.

 
विनायक बुवा ज्येष्ठ, श्रेष्ठ! त्यांना टाळता येणार नव्हते. पण रामभाऊंच्या शब्दांत सांगायचे तर ''आमच्या वसंतरावांनी तत्क्षणी उत्तर दिले, बुवा, नारद त्रिखंडात ना फिरतो? आज तो पंजाबात गेला होता हो!''

 

वसंतराव असे हजरजबाबी होते. दुसरी हकीकत सर्वांना माहीत आहे, तरी ती सांगण्याचा मोह आवरत नाही. वसंतरावांना एकदा विचारले गेले, ''का हो? तुमचे घराणे कोणते?'' विचारणारा खरे तर कुत्सितपणाने विचारत होता. त्याला म्हणायचे होते, ''वसंतराव, तुमचे गाणे घराणेदार नाही!''

 

वास्तविक घराणे ह्या नावाखाली त्या वेळी जे काही समजले जात होते, ते सर्व आयात प्रकरणच होते. पं. बाळकृष्णबुवा यांनी पहिले महाराष्ट्रात आणले ते 'ग्वाल्हेर' घराणे. जयपूर, आग्राा, किराणा ही सर्व घराणी मागाहून आली. त्या त्या गावांतली ती खरोखरच गाणारी 'घराणी' होती. काहींनी तिकडे जाऊन ती ती गायकी इकडे आणली आणि पुढे मुंबईची सांगीतिक बाजारपेठ पाहून तिकडचे गवईच मुंबई प्रांतात स्थलांतरित झाले. वसंतरावांनी आपली गायकी आधी उत्तरेत जाऊन कमावली, हे पाहता असे करणाऱ्या गवयांत गणना करायला हवी. असे करणारे वसंतराव हे शेवटचे समर्थ गवई होत, ही बाब तेव्हाच नव्हे तर आजही फारशी कुणाच्या लक्षात आलेली नाही.


तुमचे घराणे कोणते असे विचारण्यामागे त्या व्यक्तीचा हेतू हे सांगण्याचा होता की तुम्ही काही घराणेदार गवई नाही आहात! घराणेदार नाही आहात (घराणेदार म्हणजे काय ते आम्हाला कळते) कारण तुम्हाला चांगल्या (म्हणजे आमच्या माहितीच्या वा पसंतीच्या) गुरूची तालीम नाही आहे
, असलीच तर ती पुरेशी नाही आहे! महाराष्ट्राने अल्लादियाँ खाँसाहेबांनी केसरबाईंना सलग दहा वर्षे दिलेली तालीम आणि त्यातून घडलेली केसरबाई नावाची असाधारण गायिका नुकतीच पाहिली होती. जी अनेक वर्षे आणि सलग चालते ती तालीम असा बोध मग त्यातून काहींनी घेतला. तो बरोबर नव्हता. केसरबाईंची तालीम सुरू झाली, तेव्हा त्यांच्या गुरुजींनी साठी पार केलेली होती, पण सुदैवाने त्यांना दीर्घायुष्य आणि सोबत उत्तम आयुष्यही लाभले. केसरबाईंची आर्थिक क्षमतादेखील भरपूर होती. बाईंची जिद्द, मेहनती स्वभाव आणि बुध्दी ह्या गुणांना अशा भौतिक बाबींनीही साथ दिली, म्हणून त्यांच्या तालमीची 'कथा' झाली. ती ऐकून अशी तालीम ज्याला नसेल तो कच्चाच, अशी खुळचट समजूत संगीतक्षेत्रात रुजली. अजूनही अनेक जण ह्या चुकीच्या समजुतीचे बळी आहेत!

 

अशा समजुतीचा बळी असल्याने विचारलेल्या प्रश्नाला मग वसंतरावांनी ते अजरामर उत्तर दिले. ते म्हणाले, ''हमारा घराना हमारेसे ही शुरू हुआ है!''


वसंतरावांची गायकी चंचल आहे
, तीत पुरेसे गांभीर्य नाही असा आक्षेप वसंतरावांवर घेणारे बरेच होते. ही मंडळीच पुरेसे आणि पुरेशा गांभीर्याने ऐकत नसली पाहिजेत. कुणाच्याही बाह्य रूपावरून जशी त्याच्या स्वभावाची परीक्षा करू नये, तसेच आपल्याला प्रथम दिसणाऱ्या गवयाच्या गुणावगुणांवरून त्याचे सांगीतिक परीक्षण करू नये. वसंतरावांचे गाणे प्रथमदर्शनी चंचल वाटू शकते, परंतु तो गुण त्यांच्या गळयाचा, सांगीतिक स्वभावाचा नाही. वसंतरावांचा गळा चपळ होता, पण तो स्वीकारून वसंतरावांनी त्याचे एक अप्रतिम गानचित्र उभे केले, हे सामान्य नव्हे. चंचलता आणि गांभीर्य एकाच वेळी कसे नांदू शकतात, ह्याचे उदाहरणच वसंतरावांनी घालून दिले असेच उलट दिसते.


ह्या चंचलता नामक गुणाचा - वा काही लोक म्हणतात तशा अवगुणाचा - वसंतरावांनी केवळ वापरच करून घेतला असे नव्हे
, तर त्याला आपल्या ताब्यातदेखील आणला. आता अनेक ध्वनिमुद्रणे उपलब्ध होत आहेत. ती ह्या दृष्टीने रसिकांनी जरूर ऐकावीत. मी एक चंद्रकंस असा ऐकला होता की हेच का ते वसंतराव? असा प्रश्न पूर्वग्राहदूषित बुध्दीला पडावा, इतकी शांत आलापी त्यात वसंतरावांनी केली होती. तो आता मला आपल्याला इथे ऐका असे सांगून तुम्हाला ऐकविता येणार नाही. परंतु नमुन्यादाखल यूटयूबवर त्यांचे 'दे हाता या शरणागता' हे मानापमानातले पद आहे, ते अवश्य ऐका असे मी सुचवीन.

 

किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ ते पद जसे गात, त्या ढंगाने वसंतराव ह्या पदात गायले आहेत. वसंतरावांबरोबर 'संशयकल्लोळ' नाटकात काम केलेल्या नामवंत व ज्येष्ठ अभिनेत्री गायिका निर्मलाबाई गोगटे सांगतात की त्या नाटकातील प्रत्येक पद ते वेगवेगळया पध्दतीने मांडत. सर्व पदे एकाच रितीने मांडत नसत. 'कर हा करी' गाणारे वसंतराव 'मानिली आपुली' मध्ये नसत आणि 'मृगनयना' आणखीनच वेगळया प्रकारे गात. हे 'दे हाता' मैफलीत गायलेले आहे. गुरुवर्य रामभाऊ म्हणत की नाटकातले पद मैफलीत गाताना वेगळा विचार करावा लागतो. तो कसा व बैठकीचे नाटयसंगीत कसे गावे, ह्याचा हे पद आदर्श आहे.


वसंतरावांबद्दल आणखी एक समज प्रचारात होता. कुणी तो निंदेसाठी वापरत काही त्याचे फारच कौतुक करीत असत. तो असा की वसंतराव उस्फूर्त गात! म्हणजे काय
, तर प्रत्येक वेळी वेगळे, आयत्या वेळी सुचेल तसे. ह्या संबंधी आमच्या गुरुजींनीच एकदा खुलासा काय केला ते सांगितले पाहिजे. एकदा बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, ''गायकाला आपले गाणे छान बांधता आले पाहिजे आणि त्याने बांधलेलेच गायला पाहिजे. एखादी जागा मनात आली आणि मी ती रंगभूमीवर लगेच केली असे कधी झाले नाही. ती जागा केव्हा कुठे आली की छान दिसेल ह्याचा निर्णय झाल्याखेरीज मी ती कधी घेतली नाही.''


ह्यावर मी हळूच विचारले
, ''वसंतरावसुध्दा बांधूनच गातात का?'' तेव्हा किंचित आवाज चढवून आणि अधिक ठाशीव सुरात ते म्हणाले, ''होय, वसंतरावसुध्दा बांधूनच गातात, त्याशिवाय चांगला गवई तयार होतच नाही!'' वर ज्या पदाचे उदाहरण दिले, ते बांधेसूद, क्रमाने, शोभेशोभेसे विस्तार करीत कसे गावे ह्याचा नमुनाच आहे. कुमार गंधर्वांच्या गाण्यात लोकसंगीताचा उच्चार जाणवतो, किशोरीताईंच्या गाण्यात भावगीतांचा उच्चार दिसतो वगैरे गोष्टी बाह्यांग दाखविणारी आहेत. ह्या सर्वांचे वैशिष्टय हेच की कुमारजींनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ती मंडळी काय गायचे, कसे गायचे ह्याचा विचार आधी करतात आणि तो नंतर आपल्यासमोर सादर करतात. आयत्या वेळी काही करत नाहीत. कधी केल्यास तो अपवादच. नियम नाही. वसंतराव ह्या नियमाला अपवाद करीत नव्हते. मात्र वसंतरावांची कला अशी होती की ते फारच सहज गात आहेत असे वाटावे. बोलल्यासारखे गाऊन ते श्रोत्यांना अक्षरश: नाचवून ठेवत.

 

ख्यालगायन आणि नाटयसंगीत ह्यांशिवाय अन्य गानप्रकारांवरही वसंतरावांचा मोठा अधिकार होता. ठुमरी, कजरी, गझल आदी उत्तर हिंदुस्थानी प्रकार ते त्या ढंगात गाऊ शकत असत. ठुमरीसम्राज्ञी म्हणून प्रचंड नावलौकिक असणाऱ्या बेगम अख्तर किंवा अख्तरीबाई वसंतरावांसमोर शिष्या म्हणून बसत, हे म्हटले की पुरे. मराठी चित्रपटांसाठी केलेल्या पार्श्वगायनाचा उल्लेख आधी आला आहे. व्ही. शांताराम ह्यांचा 'इये मराठीचीये नगरी' हा चित्रपट यू टयूबवर आहे. वसंत देसाईंचे त्याला संगीत आहे. त्यात वसंतराव बहारीने गायले आहेत.

श्रीनिवास खळे आणि यशवंत देव ह्यांच्याकडे त्यांनी गायलेली भावगीते - उदा., बगळयांची माळ फुले किंवा कुणी जाल का - आजही भावगीतांच्या कार्यक्रमात भाव खाऊन असतात. दाटून कंठ येतो, प्रथम तुला वंदितो अशी काही गाणी तर त्यांच्या शेवटच्या काळातली असूनही पहिल्या रांगेत राहून सर्वत्र उत्सवांत वाजत असतात. अभिषेकीबुवांनी चाल दिलेले सुरत पिया की किंवा घेई छंद गायल्याशिवाय नव्या गायकांना आपण गवई झाल्यासारखेच वाटत नाही!

अशा चतुरस्र कलाकाराची यंदा जन्मशताब्दी आहे. आमची पिढी भाग्यवान, कारण असे गवई ऐकायला पाहायला मिळाले. त्यांचे वेड लागले. मला व्यक्तिशः आनंद ह्याचा वाटतो की गाणे शिकून बुध्दी जड झाली खरी, पण वसंतरावांचे जे वेड लागले होते ते ती उतरवू शकली नाही. हे गवईऋण फेडणे शक्य नाही.

वसंतरावांबद्दल अनेकांनी खूप लिहिले आहे. त्यात ही चार शब्दांची भर घालण्याची संधी मला मिळाली, ह्याचा खूप आनंद वाटतो. गुरुवर्य रामभाऊ मराठे ह्यांनी वसंतरावांसंबंधी काढलेल्या उद्गारांनी लेखाचा शेवट करतो.

31 जुलै 1983ला वसंतराव गेले. त्यानंतर बरोबर एक वर्षाने, म्हणजे 31 जुलै 1984 रोजी पं. राम मराठे ह्यांची डॉ. वसंतराव देशपांडे ह्या विषयावर मुंबईत शिवाजी मंदिर येथे मुलाखत आयोजित करण्यात आली होती. मुलाखतकार होते कटयारचे लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर. त्यांनी रामभाऊंना प्रश्न केला, ''कटयारमधील वसंतरावांनी केलेल्या खाँसाहेबांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटते?''

रामभाऊ उत्तरले, ''आज इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत. सर्वांना वाटते - ह्यांच्यानंतर कोण? पण मी खात्रीने सांगतो की उद्या प्रसंग आलाच तर नवा पंतप्रधान क्षणात मिळेल, पण कटयारसाठी वसंतरावांच्या जागी दुसरा खांसाहेब कधीही मिळायचा नाही!''

रामभाऊंच्या तोंडून नियतीच बोलली होती. ते हे बोलले, तेव्हा इंदिराबाई सर्वशक्तिमान अशा एकमेव होत्या आणि त्यांची जागा घेईल असे कुणी दिसत नव्हते. दुर्दैवाने बरोबर तीन महिन्यांनी 31 ऑक्टोबरला बाईंची हत्या झाली, पण राजीव गांधी क्षणात त्या पदी बसविले गेले....

कटयार मात्र अजून खाँसाहेबांच्या शोधात आहे!