समजुतीच्या कक्षा वाढवणाऱ्या कथा

विवेक मराठी    11-Nov-2019
Total Views |



रविवारचा दिवस उगवतो आणि अर्ध्यावर येतो. हातातली कामं संपवून आपण पुस्तक हातात घेतो आणि कधी नव्हे ते सगळे योग जुळून येतात आणि काहीही अडथळा न येता अगदी अडीच तासांत कथासंग्राह वाचूनही होतो. एकूण आठच कथा, त्यातही पहिल्या सहा लघू आणि लघुतम, शेवटच्या दोन मात्र दीर्घ... त्यातल्या अनुभवासारख्या. आपण परत एकदा पुस्तकाकडे बघतो, त्यावरचं नाव वाचतो मनातल्या मनात, जानसाब नें बुलाया है! आणि त्याच्या मुखपृष्ठाकडे पाहत राहून एक उसासा सोडतो. थोडं उदास होऊन त्यातल्या पात्रांचा विचार करू लागतो. त्यातच रेंगाळत पुढच्या कामांना लागतो. यांत्रिकपणे काम करतो. रात्र होत आली, तरी त्यातली 'पात्रं' आपला पिच्छा सोडत नाहीत. आपल्या आजूबाजूला घुटमळून काही तरी सांगू पाहतात आणि आपण अस्वस्थ होत राहतो. घराबाहेर दाटलेला अंधार आणि सुचरिताच्या कथासंग्राहातील ती आणि कुणी कुणी कथेतील नायिका आपल्या शेजारी उभी राहते आणि म्हणते 'अंधाराची भीती वाटतेय गं!' मला तिचं हे वाक्य आपल्याला तिच्या मनातल्या अंधाराकडे सहानुभावाने बघायला लावतं. रात्रीच्या मिट्ट अंधारात स्वतःच्या वडिलांनी केलेले स्पर्श आणि तिचं अंधाराशी निर्माण झालेलं वैर आपल्याला मुळापासून हलवून टाकतं. तिच्या मनातला हा 'असा' अंधार आपल्याला फार सजग करून जातो. तिची ही हतबलता जशी तिच्या देहाला नसणाऱ्या उभारांमुळे आलेली आहे, तशीच हतबलता जानसाब ने बुलाया है कथेतील अभिज्ञाला रूपामुळे आलेली आहे. या कथांमधलं अस्वस्थपण दाटून आलेलं असतानाच. या संग्राहातल्या सगळयाच स्त्रिया कशा ना कशाने हतबल झालेल्या लक्षात येत राहतात आणि प्रत्येक कथेतली ती स्त्री फार आत आत रुतत जाते. आजच्या एकविसाव्या शतकातही स्त्रीकडे शरीर म्हणूनच पाहिलं जातं, ही जाणीव होत असतानाच स्त्रीचं वस्तुरूप असणं अधोरेखित होत असतानाच यात एक विलक्षण कॉम्प्लेक्स असलेला जाणवतो आणि त्या बायांच्या वाटयाला आलेल्या कारुण्याने अस्वस्थ होत राहतो. पण या स्त्रिया हतबल झाल्या, तरी परिस्थितीला शरण न जाता आपल्या शारीर भावना ठळकपणे मांडतात आणि त्याच शारीर भावनेमुळे तिचं उद्ध्वस्त होण्यातलं समाजवास्तव पुढे पुढे आणतात. त्याच वेळी वाचक म्हणून या स्त्रियांबद्दलची सहानुभूती आपल्या मनात निर्माण करतात.

ओघवती भाषा आणि त्यातलं मार्दव यांचा मिलाफ यांमुळे या कथा फार बोलक्या, संवादी झाल्या आहेत. म्हणूनच 104 पृष्ठसंख्या असणारं हे पुस्तक फार वेगाने वाचून होतं. आशयाला समृध्द करणार निवेदन ही या संग्राहाची जमेची बाजू आहे. अनेक ठिकाणी पात्रांऐवजी निवेदक भारंभार बोलताना आढळते आणि तिथे अगदी काही क्षण कथा थांबते.


स्त्री
, तिच्या वाटयाला आलेले नानाविध अनुभव, त्यातून तिने आपले मार्ग शोधणं आणि आपला अस्सल अनुभव परिणामांची पर्वा न करता घेणं, या कथासूत्रांभोवती या कथा फिरत राहतात आणि वाचकांना अंतर्मुख करतात. स्त्रीकडे बघण्याची आपली भूमिका तपासून घ्यायला भाग पाडतात. संवाद लेखन, वातावरणनिर्मिती, पात्रचित्रण, भाषाशैली आपल्या मनात घर करून राहते. लोकव्रत प्रकाशनचा 2018 सालातला हा कथासंग्राह 2019मध्येही बेस्टसेलर ठरेल याबाबत शंका नाही. चंद्रमोहन यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ आणि त्यावरील पुरुषाच्या हातातील स्त्रीचे लगाम खूप बोलके आहेत. त्याच्या तालावर नाचायला लावणारी त्याची वृत्ती या मुखपृष्ठातून कथांसह ढळढळीतपणे समोर आणली आहे.

 

रात्रभर आपल्या सोबत राहून त्यांची कहाणी आपल्याला सांगत बसलेल्या आणि तरी अमाप काही शिल्लक राहिलेल्या कथानायिका सकाळीही आपल्याभोवती रुंजी घालतात, तेव्हा या कथानुभवाची ताकद आपल्या लक्षात येते आणि त्या मुळातून वाचण्यात एक जिवंत अनुभव असल्याचा प्रत्यय येत राहतो. खूप काही सांगूनही खूप काही शिल्लक आहे, हे कथासंग्राहाचं शेवटचं पान परत उघडून त्यातलं,

पुढचं पुढे...

गोष्ट काल संपली होती. आज सुरू होतेय. किंवा काहीही... हे वाक्य वाचलं की लक्षात येतं - स्त्रीचं आयुष्य असंच मागच्या पानावरून पुढे चालत आलेलं आहे. ते कदाचित असंच चालू राहील किंवा जान साब ने बुलाया है या कथेतल्या रेश्मासारखं तिच्या मर्जीने निराळं होईल. माणसांच्या गोतावळयात राहताना आपल्याला फार सुख मिळतं, पण अनेकांना ते मिळत नाही, अनेकांमध्ये राहूनही आपण एकटे असल्याचा शोक या कथांमधून मुळातून वाचला तर आपल्या आयुष्याला समांतर जाणारी अनेक आयुष्य आपल्या डोळयासमोर येतील, त्याचंच प्रत्ययकारी चित्रण सुचरिताने नेमकेपणाने केलेलं आहे. कटू अनुभवातली सहजता मांडण्याची तिची पध्दत सुजाण वाचकांना अंतर्मुख करणारी आहे आणि तिने निर्माण केलेली पात्रं आपला अनुभव प्रगल्भ करणारी आहेत. आपला दुसरा दिवसही भारून टाकणाऱ्या आपल्या या सख्यांना लेखिकेने काव्यात्म न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या सोसण्याला तोड नाही, पण वाचक म्हणून आपल्या समजुतीच्या कक्षा वाढण्यास हातभार लावणाऱ्या या कथा आहेत. हातात पडल्या पडल्या सलगपणे वाचून संपवला जाणारा हा संग्राह अजून कथा हव्या होत्या अशी अपेक्षा निर्माण करतो. नवीन कथासंग्राह देऊन लेखिका ती अपेक्षा पूर्ण करेल, अशी खात्रीही वाचक म्हणून वाटते आहे.

 

जान साब ने बुलाया है

लेखिका- सुचरिता

 

प्रकाशन - लोकव्रत

पृष्ठे - 104