पालकत्व म्हणजे आव्हानच

विवेक मराठी    12-Nov-2019
Total Views |

***मनीषा अतुल***

नवी पिढी म्हणजे शेवटी कोण? तर आपल्याच घरातील मुले ना! मुले घडवलीत कशी घडतात हे मान्य, परंतु आजच्या परिस्थितीत हवे तसे घडविण्यासाठी पालकांना पूर्वीपेक्षा कैक पट प्रयत्न करावे लागतील. एवढेही करून त्यांच्या हाती कितपत यश लिहिलेले आहे ते काळच ठरवेल. हे याकरिता की केवळ घरातले संस्कार मुलांना किती काळ कवच प्रदान करतील हे सांगणे कठीण आहे. बाहेरच्या जगाचा त्यांच्यावरील प्रभाव आपण टाळू शकत नसलो, तरीदेखील त्यांच्या मनावरील घरातल्या संस्कारांचे लगाम त्यांना निदान चुकीच्या मार्गावर जाताना क्षणभर तरी विचारप्रवृत्त करायला कारणीभूत ठरू शकतील.


काळ झपाटयाने बदलतो आहे. परिवर्तन हा निसर्ग, मानवी जीवन, समाज, कुटुंब या सगळयांचाच अपरिहार्य भाग असला आणि ते अनादिकालापासून होतच आले असले, तरीही आजवर ते अचानक झालेले नाही. त्याची गती हळूहळू लय पकडत वाढत आलेली आहे. या परिवर्तनातून जाणाऱ्या पिढया थोडयाफार हादरत असल्या, तरीही लवकरच स्थिर होत या परिवर्तनाला आत्मसात करीत गेल्या. दोन पिढयांमध्ये जनरेशन गॅप होतीच, पण इतकीही नव्हती की पुढली पिढी परग्राहावरची वाटावी. प्रत्येक मधली पिढी दोन पावले मागे असलेल्या जुन्या पिढीचे व दोन पावले पुढे असलेल्या नव्या पिढीचे अंतर मध्ये उभे राहून भरून काढीत असे.

गेल्या पंचवीस वर्षांत मात्र झपाटयाने झालेल्या बदलाने पुढल्या पिढीला शेकडो पावले पुढे नेऊन ठेवले आहे. जुनी पिढी आहे तिथेच उभी राहण्याचा अट्टाहास करते आहे किंवा अगतिक आहे. मधली पिढी प्रचंड कसरत करते आहे जुन्याला धरून ठेवायचे व नव्याचा वारू हातातून सुटू द्यायचा नाही याची. त्यांना नव्यांच्या प्रकाशवेगाने धावणे अशक्य आहे, पण धापा टाकीत निदान धावता येईल तितके धावण्याचे प्रयत्न चालले आहेत. या सगळयात समाज व परिवार मात्र भरकटलेला, छिन्न-भिन्न होताना दिसतो आहे, स्थिरता गमावत चाललेला दिसतो आहे. इथे प्रत्येक जण गोंधळलेला, बावरलेला आहे. कोणीच कोणाला आपल्या पातळीचे वाटेनासे झाले आहे. प्रत्येकाला वाटते, मला समजून घेणारेच कोणी नाही. हे सगळे का झाले? हा समाजशास्त्राचा फार व्यापक विषय आहे, त्यावर वेगळे लिहावे लागेल. तूर्तास या घडामोडींमुळे व बदलत्या सामाजिक तांत्रिक परिवेशामुळे गोंधळलेल्या, एकाकी पडलेल्या नव्या पिढीला समजून घेत, समजावून सांगत त्यांना त्या बदलांची सांगड घालायला शिकवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करू या.

नवी पिढी म्हणजे शेवटी कोण? तर आपल्याच घरातील मुले ना! मुले घडवलीत कशी घडतात हे मान्य, परंतु आजच्या परिस्थितीत हवे तसे घडविण्यासाठी पालकांना पूर्वीपेक्षा कैक पट प्रयत्न करावे लागतील. एवढेही करून त्यांच्या हाती कितपत यश लिहिलेले आहे ते काळच ठरवेल. हे याकरिता की केवळ घरातले संस्कार मुलांना किती काळ कवच प्रदान करतील हे सांगणे कठीण आहे. मुले दिवसातला बराच वेळ घराबाहेर किंवा घरातून, पण बाहेरच्या संपर्कात घालवतात. त्यांनी बाहेर जास्त संपर्क ठेवू नये यासाठी पूर्वीसारखे नीतिनियम घालणे पुरेसे नाही. पालकत्व हे आजचे फार मोठे आव्हान झाले आहे. यात पालक कुठे कमी पडत आहेत का, हेही एकदा तपासून बघितले पाहिजे. कारण पाल्यांची पिढी जशी तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांची शिकार झालेली आहे, तशी पालकांची पिढीही काही प्रमाणात झालेली आहे का? आधुनिकतेची कास धरण्याच्या नादात आपण स्वतः त्याच्या किती आहारी गेलेलो आहोत, हेही तपासून बघणे गरजेचे आहे. श्याम घडविण्याकरिता श्यामची आई व्हावे लागते. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी' असे म्हणत. आता, जिच्या तिच्या हाती मोबाइल असताना, त्यातील गोष्टींचे फक्त सकारात्मक परिणाम मुलांपर्यंत आपोआप पोहोचावेत हा कल्पनाविलासच म्हणायचा.

मुले मोठयांचे अनुकरण करीत शिकतात. त्यामुळे ते निदान जेवढा वेळ पालकांच्या संपर्कात घरात असतील, तोवर पालकांनी आपल्या स्वतःच्या वागण्याने, शिस्तीने त्यांना आदर्शपाठ घालून देता येईल. मुलांचा बराचसा वेळ घराबाहेर जातो. शाळा, टयूशन क्लासेस, इतर क्लासेस यामुळे अनेक तास ते बाहेरच असतात. अशा वेळी बाहेरच्या जगाचा त्यांच्यावरील प्रभाव आपण टाळू शकत नसलो, तरीदेखील त्यांच्या मनावरील घरातल्या संस्कारांचे लगाम त्यांना निदान चुकीच्या मार्गावर जाताना क्षणभर तरी विचारप्रवृत्त करायला कारणीभूत ठरू शकतील.

प्रश्न काय आहेत हे समजून घेतल्याशिवाय उत्तरे शोधता येणार नाहीत. अगोदर आपल्याला नव्या पिढीच्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे. ही पिढी ज्या गोष्टींना, घटनांना, परिस्थितीला सामोरे जाते आहे, ते डोळे उघडे ठेवून बघणे आवश्यक आहे. माझ्या घरातील मुले अशी नाहीत, त्यामुळे त्यांना या समस्यांचा सामना करावाच लागणार नाही, असे म्हणून स्वतःला भ्रमात ठेवणे व कुठल्याही परिस्थितीकडे कानाडोळा करणे घातक ठरेल. सदा चौकस राहून समाजातल्या सर्व घडामोडींचा अंदाज घ्यावा लागेल. सर्व संभाव्य संकटे हेरावी लागतील. सध्या घरोघरी मुलांमध्ये आढळणाऱ्या सर्वसाधारण समस्या तीन वर्गांत विभागता येतील - घरातील, शाळेतील व समाजातील.

घरातील समस्यांमध्ये दिवसभर फोनवर किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळणे, मित्र-मैत्रिणींशी सतत चॅटिंग करणे, इंटरनेटवर तासन-तास व रात्री उशिरापर्यंत सर्फिंग करणे (यात पॉर्न साइट्स, व्हिडिओ चॅटिंग इत्यादी), रात्री उशिरा झोपणे, पहाटे खूप उशिरा उठणे, अभ्यासाबद्दल उदासीनता, शिक्षकांबद्दल अनादर, घरातील व्यक्तीशी अत्यंत कमी झालेला किंवा अगदी गरजेपुरता उरलेला संवाद, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेला आमूलाग्रा बदल, फास्ट फूडची, जंक फूडची अवास्तव आवड, एकूणच सकस घरगुती आहाराची कमतरता अथवा उदासीनता व त्यामुळे आलेला अशक्तपणा, एकतर खूप कृश शरीरयष्टी अथवा वाढलेल्या मेदामुळे वजनाची समस्या (दोन्हीला कुपोषित म्हणता येईल), खेळ-व्यायाम यांचा अभाव, संवादक्षमतेचा अभाव, घरातील सणवार-लग्नकार्यांत व एकूण घडामोडींमध्ये मुलांची उदासीन व नगण्य भूमिका, घरातील स्वतःच्या कामांची, जबाबदाऱ्यांची व कर्तव्यांची शून्य जाणीव, लहान-लहान घरगुती कौशल्यात परावलंबित्व - उदा., आई आजारी असेल तर स्वतःचा चहा-नाश्ता बनवून न घेता येणे किंवा आजारी व्यक्तीला खाऊपिऊ घालायला असमर्थता, त्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल अज्ञान व उदासीनता.. या झाल्या घरातील सर्वपरिचित समस्या.

शाळेतील समस्यांमध्ये, मुले शाळेच्या परिसरातच मात्र शाळाबाह्य गोष्टींमध्ये अधिक गुंतलेली दिसतात. शाळेच्या भिंतीशी, मैदानाच्या कोपऱ्यात, टॉयलेटमध्ये, रिकाम्या वर्गखोल्यांमध्ये धूम्रपान करताना आढळतात. तसेच या ठिकाणी व शाळा बसेसमध्ये मुला-मुलींमध्ये पॉर्न व्हिडिओजची देवाणघेवाण चालते. सेक्शुअल गेम्स चालतात, ज्यात कोणालातरी एखादे टार्गेट देऊन ते पूर्ण करायला भाग पाडले जाते. हे सारे बहुतेक वेळा थ्रिल म्हणून केले जाते. मात्र कधी जबरदस्तीने, तर कधी आपण इतरांपेक्षा मागासलेले नाही हे दाखविण्याकरिता केले जाते. यात बहुतांश वेळा अनैतिक कृत्ये सररास होत असतात. शिक्षणसंस्था व होस्टेल हे व्यसन, नशा यांचेही प्राथमिक ठिकाण ठराव्यात यासारखे दुर्दैव दुसरे नाही. शाळेतील विद्यार्थी मादक द्रव्यांच्या विळख्यात सापडलेली आहेत, आणि त्यांच्या विक्रीमध्येही गुंतलेली आहेत हे वास्तव आहे. हजारोंनी फी घेऊन मोठया शिक्षण संस्था चालवणारे कितीही दावे करीत असले, तरीही या आव्हानांचा त्यांना सामना करावाच लागतो आहे. म्हणून तर शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची वेळ आलेली आहे. शाळा परिसरात विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढल्या आहेत. शिक्षण संस्थांमधील विश्वासाचे वातावरण हरवले आहे. शाळेतील मोठया वर्गातील मुले पूर्वीसारखी आज्ञाधारक राहिलेली नाहीत. लहान मुलांकडून एकमेकांना हानी पोहोचविण्याच्या घटना, एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना वाढीस लागलेल्या आढळतात. बदलत्या समाजातील जाती-धर्मद्वेषाचे, तिरस्काराचे वारेही शाळांमध्ये जाणवू लागले आहे. शिक्षकांबद्दलचा भक्तिभावाचा, आदराचा दृष्टीकोन लोप पावत चाललेला आहे. अर्थात शाळेच्या शिस्तीच्या वातावरणात या बाबी सहज समोर येत नसल्या, तरी एखाददुसरी मोठी घटना पडद्याआडच्या या बदलांना उजागर करतेच.

यासाठी शिक्षक-पालक यांनी मुलांना हाताळण्यासाठी सहकार्याने, समन्वयाने व परस्पर विश्वासाने काम केले पाहिजे. पालक-शिक्षक मीटिंगमध्ये केवळ प्रगतिपुस्तकातील गुणांवर चर्चा न करता मुलांच्या सर्वांगीण विकासाबद्दल, आरोग्याबद्दल, त्यांच्या घरच्या-दारच्या बदलत्या सवयींबद्दल, बदलत्या आवडीनिवडीबद्दल, मित्रमंडळाबद्दल माहितीची देवाणघेवाण करायला हवी, ज्याने त्यांच्यातील बारीकसे बदलही एकमेकांना अवगत होतील. आपल्या मुलांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्यांची नावे काय, त्यांचे फोन नंबर, पत्ते, त्यांच्या पालकांचे फोन नंबर इत्यादी माहिती पालकांनी ठेवायलाच हवी. मुलांना संपूर्ण स्वातंत्र्य न देता व त्यांच्यावर आंधळा विश्वास न टाकता त्यांच्या मित्रमंडळींच्या पालकांना अधूनमधून फोन करून पडताळणी करून घेत जावी, म्हणजे मुलांना बनवाबनवीची सवय लागत नाही. आपले पालक केव्हाही या गोष्टींची पडताळणी करू शकतात हा धाक राहतो. मात्र हे करीत असताना मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी नाही म्हणणे, सतत संशय घेणे, इतरांशी तुलना करणे टाळावे. शिक्षक-पालक मीटिंगमध्ये शिक्षकांसमोर त्यांचे उणेदुणे काढणे, त्यांच्यातील कमतरतांची उघड चर्चा करणे, शिक्षकांना आपल्या पाल्यांना मारण्यासाठी प्रोत्साहन देणे असले अपमानास्पद प्रकार करू नयेत. मुलांचा विश्वास संपादन करावा, जेणेकरून त्यांना प्रत्येक गोष्ट पालकांना सांगावीशी वाटली पाहिजे, म्हणजे संभाव्य धोक्यापासून वेळेवर त्यांचा बचाव करता येईल. शिक्षकांनीसुध्दा हेच तत्त्व पाळावयाचे आहे.

सामाजिक ठिकाणांवरील समस्यांमध्ये मुख्यत्वे व्यसनाधीनता व लैंगिक समस्या आहेत. बगिच्यात एकांतस्थळी वा सार्वजनिक ठिकाणी अगदी शाळकरी मुलांपासून तरुणांपर्यंत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बिलगलेले सररास आढळतात. शाळकरी विद्यार्थी गाडी पार्किंगमध्ये चोरून भेटताना जास्त दिसतात. मादक द्रव्यांच्या भयावह विळख्यात ही पिढी सापडलेली आहे. त्यांच्या पैशांच्या गरजा वाढलेल्या आहेत. व्यसनांकरिता लागणारा पैसा, मित्रमैत्रिणींच्या गरजा भागवण्याकरिता लागणार पैसा, मॉल-सिनेमॅक्स इत्यादी ठिकाणी खर्चासाठी लागणारा पैसा आणि त्या पैशासाठी इतर नको ती कामे, चोऱ्या, लबाडया, खोटे बोलणे व वेळ पडल्यास गुन्हे ही मालिका भयंकरच!

मुलांच्या समस्या फक्त त्यांच्याच आहेत का? त्यांना तिथवर नेणारे कोण आहेत? मादक द्रव्यांचा पुरवठा करणारे, घरात, बाहेर, शाळेत, बसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी बालकांचे लैंगिक शोषण करणारे कोण आहेत? पॉर्न फिल्म बनविणारे कोण आहेत? तर ते सारे आपल्या पिढीचे आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. मुले शिकार आहेत. मुलांना या सगळयांपासून दूर ठेवायचे असेल, एक चांगली आदर्श व्यक्ती, आदर्श नागरिक बनवायचे असेल तर पालक-शिक्षक यांना सहयोगाने काम करावे लागेल. वेळ पडल्यास पालकांसाठी व शिक्षकांसाठी शिबिरे आयोजित करायला हरकत नाही, जेणेकरून त्यांना या समस्या, त्यावरील उपाय, निरोगी वातावरणनिर्मिती, मानवी व्यवहार, मुलांची मानसिकता यांचे ज्ञान व योग्य मार्गदर्शन देता येईल.

असे वातावरण निर्माण होण्याकरिता प्रथम कुटुंबाकुटुंबातील व समाजातील एकोपा, समरसता वाढायला हवी. मी आणि माझे कुटुंब म्हणून समाजापासून प्रायव्हसीच्या नावाने मिळविलेली अलिप्तता आपल्या मुलांना सहज मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षेपासून दूर ठेवते आहे, हे लक्षात घ्यायला हवे. पूर्वी आईवडिलांच्या अनुपस्थितीत मुलांना काही करायचे धाडस होत नसे, कारण शेजारपाजारची कुणीही मोठी मंडळी हक्काने कान पिळायला होती. त्यांना तसे अधिकारही असायचे. कुणीही कुठल्याही मुलांना वयाच्या अधिकाराने टोकू शकत व पालकांना ताबडतोब सजग करीत. घरातही संयुक्त कुटुंबपध्दतीमुळे मुलांवर लक्ष ठेवायला कुणी ना कुणी सतत असेच. कौटुंबिक व सामाजिक बंधन हे परिवर्तनावरील सर्वात मोठे अंकुश असते, हे लक्षात घ्यावे. एकमेकांना धरून ठेवणे केव्हाही हिताचे ठरते.

घरातील मोठयांचे मुलांसमोरील व्यवहार संयमी असावे. आपल्या वर्तनाने मुलांना आदर्श घालून द्यायला हवा. मुलांचे लाड करताना एका मर्यादेपलीकडे ते होऊ नयेत. मला नाही मिळाले म्हणून ते सगळे मी त्यांना मिळवून देईल असे म्हणत त्यांच्या हाती महागडी गॅजेट्स देताना, गाडया देताना, पॉकेटमनी देताना आपणच त्यांना भरकटण्याची साधने देतो आहोत व वाममार्गाचे दरवाजे उघडण्याची किल्ली देतो आहोत, ते लक्षात असू द्यावे. योग्य वयात योग्य गरजेच्या वस्तू देणे, त्याची कदर करायला शिकवणे, त्यांच्या वापरावर लक्ष ठेवणे, मर्यादा आखून देणे हे निदान पालकांच्या हाती असावे. मुलांना कुटुंबातील त्यांच्या जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव करून द्यावी. घरात त्यांचेही महत्त्वाचे स्थान आहे हे पटवून द्यावे. छोटया छोटया घरगुती कामांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यावे, म्हणजे कामाची सवयही लागेल व कौशल्यही प्राप्त होईल. पूर्वी फोन, इंटरनेट, गाडया, मनोरंजनाची आधुनिक साधने नव्हती म्हणून त्या गरजांकरिता मुले-मुली एकत्रित वेळ घालवीत, एकमेकांकडून बऱ्याच गोष्टी व कौशल्ये आत्मसात करीत. आताही त्यांना एकमेकांसोबत प्रत्यक्ष वेळ घालवायला सांगता येईल. तशी स्नेहमिलने आयोजित करता येतील. आपला मुलगा सगळयाच बाबतीत अव्वल असावा, सर्वगुणसंपन्न असावा म्हणून स्पर्धेचा दृष्टीकोन ठेवून त्याला विविध वर्गांसाठी पाठवून शर्यतीचा घोडा बनवण्यापेक्षा व त्याच्यावर अपेक्षांचे ओझे लादण्यापेक्षा त्याच्यातील कौशल्ये ओळखून त्याकरिता प्रोत्साहन देऊन तेवढेच प्रशिक्षण देणे पुरेसे आहे. त्याला सतत कशात तरी व्यग्र ठेवण्यापेक्षा थोडे रिकामे राहू देऊन स्वतःला शोधायला शिकवले पाहिजे. स्वतःशी बोलायला शिकवले पाहिजे. तांत्रिक जगापेक्षाही त्याच्या आत केवढे विस्मयकारक विश्व आहे व गूगलपेक्षाही त्याची शरीर यंत्रणा केवढी गुंतागुतीची आहे, जादूची आहे याची प्रचिती त्याला येऊ द्यायला हवी. प्रश्नांची उत्तरे क्षणात आयती मिळत असतील तर उत्तरे मिळविण्यापर्यंतचा अनुभवाचा प्रवास आणि त्या प्रवासात अनवधानाने प्राप्त केलेली कौशल्ये, त्यानंतर मेहनतीने अर्जित केलेले ज्ञान याची सर बटन दाबून मिळविलेल्या उत्तरात कशी असणार?

 

मुख्य म्हणजे आपले मूल जसे आहे तसे आधी आपण स्वीकारायचे आहे. माझे मूल हा माझा 'प्रेस्टीज इश्यू' असता कामा नये, त्याच्या खूप कोणी विशेष असण्याने माझे स्टेटस खास वाटता कामा नये. प्रत्येक मूल हे निसर्गाची विशिष्ट निर्मिती आहे. प्रत्येक जण खास (युनिक) आहे हे लक्षात आले की त्याच्या वाढीचा प्रत्येक टप्पा आनंद देईल. त्याच्यातील योग्यता-अयोग्यता सहज टिपता येतील व त्याकरिता योग्य उपाययोजनाही करता येतील. मुला-मुलांमध्ये स्पर्धा करून न्यूनगंड असणारी मुले व न्यूनगंड असणारे पालक बनण्यापेक्षा आनंदाने मुलांसोबत यांची वाढ अनुभवणारे ('एन्जॉय' करणारे) पालक बनावे. कधी त्यांची वेगळी मते समजून घेत, त्यांच्याकडून नव्या गोष्टी हसत-खेळत शिकून घेत, त्यांनाही आपल्या अनुभवाने चांगल्या-वाईटाचे भान आणून दिले पाहिजे. वेळ पडल्यास पालक म्हणून अधिकाराने, धाकाने त्यांना परावृत्त करता आले पाहिजे. याकरिता पालकांनीही स्वयंशिस्त घालून घेतली पाहिजे. पाल्यांना पालकांच्या सहवासात आनंदी व सुरक्षित वाटायला हवे. प्रत्येक दोन पिढयांमधील अंतर संपवता येत नसले, तरी हातात हात घट्ट धरून जोडता नक्कीच येईल. प्रयत्न करायला काय हरकत आहे?