वैद्यकीय क्षेत्रातील अज्ञात शिलेदार

विवेक मराठी    12-Nov-2019
Total Views |

***आनंद फाटक****

अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्र हे नोबेल क्षेत्र मानून सेवा देणारे डॉक्टर फारच कमी दिसतात. कोणत्याही भौतिक लाभाच्या किंवा प्रसिध्दीच्या मोहात न पडता आपले आयुष्य वैद्यकीय सेवेसाठी खर्च करणारे डॉ. संजीव वेळंबे हे अशांपैकीच एक. नाशिक, मालेगाव, नामपूर, डांग अशा परिसरात ते कार्यरत होते. डॉ. बेळंबे यांची प्राथमिक आरोग्य केंद्रे नाशिक जिल्ह्यात कायम पहिल्या पाचमध्ये राहिली. 1987 ते 2007 या काळात त्यांनी 16000 कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या. या सर्व कठीण प्रवासात रेखावहिनी सर्वार्थांनी त्यांच्या सोबत राहिल्या.


अनेक सरकारी विभाग हे कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे, कामाच्या व्यापकतेमुळे व अगडबंब आकारामुळे प्रसिध्द असतात. सार्वजनिक आरोग्य हा विभाग त्यातीलच एक. दुर्दैवाने अनेकदा या खात्याविषयी काही विशिष्ट संकटांमुळे जशी टीका होते, तशी या खात्यात छान काम करणाऱ्यांचे कौतुक फारसे होताना दिसत नाही. दृष्ट लागेल असे काम करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी जवळपास सर्व जिल्ह्यांत, तालुक्यांत काही प्रमाणात असतातच. यातील एकाचा हा परिचय.


बारावीला खूप छान गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक पटकावून औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. ते साल होते
1979. (त्या काळी CET किंवा NEET नसे.) घर लातूरला. तीन भाऊ व सर्वात लहान बहीण, हा मधला भाऊ. वडील वकील, पण त्यांनी शेतीच सांभाळली. त्या काळी ते जनसंघाचे काम करत. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर. एम.बी.बी.एस.च्या द्वितीय वर्षात काश्मीर सहल ठरली पूर्ण वर्गाची. वडलांच्या खूप मागे लागून त्या काळी पूर्ण सहलीचा खर्च म्हणून लागणारी रक्कम त्याने हट्टाने मागून घेतली. वडिलांनी थोडे उशिरा का होईना, पण पैसे पाठवले. सहल छान झाली.

वर्षे पुढे सरकली. एम.बी.बी.एस. पूर्ण झाले. हवे होते ते पुढचे शिक्षण घेणे शक्य नाही असे लक्षात आले. हेही समजले पुढे कधीतरी कळले की वडिलांनी सहलीसाठी पाठवलेले पैसे खूप कष्टपूर्वक व कदाचित उसनवार करून पाठवले होते.


निश्चय झाला. सार्वजनिक आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करण्याचा.

पण जायचे कुठे? कोणत्या जिल्ह्यात?


वडील लातूर जिल्ह्यात जनसंघाचे जुने कार्यकर्ते म्हणून प्रसिध्द होते. त्यामुळे लातूर जिल्हा नको असे ठरवले. सहज वडील बोलता बोलता म्हणाले की
''नाशिक जिल्ह्यात जा, तेथे वातावरण थंड व छान असते.''


- आणि डॉ. संजीव बलवंतराव बेळंबे आवश्यक त्या दोन बॅगा भरून नाशिकला निघाला.

 

त्याआधी खूप मेहनत करून खास मित्रांच्या कंपूबरोबर नांदेड सिव्हिल हॉस्पिटलला इंटर्नशिप झाली होती. खूप शिकायला मिळाले. ते सहा महिने फक्त आंघोळ करणे व झोपणे या दोन कारणांसाठीच त्याने सिव्हिल हॉस्पिटल सोडले असेल. दिवसरात्र विविध विभागामध्ये खूप काम करून अनुभव गाठीशी बांधून घेतला.

काही जाणते अनुभवी डॉक्टर्स, 'रुग्ण हे आपले गुरू असतात' असे नवख्या डॉक्टरांना उगाच सांगत नाहीत.

नाशिकला सार्वजनिक आरोग्य खात्यात नोकरीसाठी अर्ज केला व लगेच सांगून टाकले की मला नाशिक जिल्ह्यात कुठेही पाठवा. वरिष्ठांनी जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले एक प्राथमिक आरोग्य केंद्र देऊ केले, तर ते याने नाकारले. खरे तर सख्खे काका मुंबईला सार्वजनिक आरोग्य खात्यात अत्यंत वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांच्या मदतीने हवे ते सोयीचे ठिकाण मिळवणे सहज शक्य होते. पण लहानपणापासून घरी येणाऱ्या, निवास करणाऱ्या अनेक संघ प्रचारकांच्या सहवासामुळे असे करणे योग्य वाटले नाही. त्यामुळे कधीही स्वत:होऊन या नात्याचा फायदा घेतला नाही.


शेवटी मालेगाव तालुक्यातील सोनज प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉ. संजीव बेळंबे रुजू झाले. ती तारीख होती
13 जुलै 1985. दवाखान्याला स्वतंत्र इमारत नव्हती.

 दवाखाना ग्राामपंचायत ऑफिसमध्येच चाले. रुग्णांना भरती करणे शक्य नव्हते. जागाच नव्हती. पहिले 3 दिवस रात्री तेथेच मुक्काम करावा लागला. चौथ्या दिवशी गावात एक खोली मिळाली राहण्यासाठी. या सव्वादोन वर्षांत उघडयावरच शौचाला जावे लागे. सकाळी व संध्याकाळी ग्राामपंचायतीत रुग्ण तपासले जात. घरी जाऊन खूप रुग्ण तपासावे लागत. पहिला पगार हाती पडला, ती रक्कम होती 2134 रुपये. स्वयंपाक येत नसल्याने गावातच लोक प्रेमाने जेवू घालत. अशा प्रेमाच्या व्यवहारात पैसा कुठे येत नसतो.


3 नोव्हेंबर 1987ला मालेगाव तालुक्यातीलच दाभाडी येथे बदली झाली. येथे छान मोठे बांधलेले प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) होते. येथे असतानाच डॉ. संजीव यांनी स्त्रियांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याची सुरुवात केली. आधी त्याचे पुरेसे प्रशिक्षण घेतले. आता जणू त्यांच्या कर्तृत्वाला बहर येऊ लागला. रोजची ओपीडी साधारण 150 रुग्ण, महिन्याला 50-60 बाळंतपणे व महिन्याला 70-80 कुटुंबनियोजन महिला शस्त्रक्रिया होऊ लागल्या. याचा पुढचा टप्पा महत्त्वाचा होता.

 

26 जून 1989. सटाणा तालुक्यातील नामपूर या प्राथमिक आरोग्य केंद्राला बदली झाली. बऱ्याच प्रा.आ.केंद्रांवर सरकारी डॉक्टर्स स्वत:ची प्रॅक्टिस करत व पैसे मिळवत. यासाठी त्यांना काहीच करावे लागत नसे. पाहिलेल्या रुग्णांकडून पैसे घेणे व ते डॉक्टरला पोहोचवणे हे काम कोणीतरी आरोग्य कर्मचारीच करत असे. असे करणे योग्य नाही हे चक्र डोक्यात सुरू असताना, एक दिवस रुग्ण म्हणून आलेल्या एका सैनिकाच्या पत्नीने प्रश्न विचारला, ''हे पैसे आम्हाला का द्यावे लागतात?''


प्रश्न योग्य होता व तो अचूक जागी जाऊन रुतला. डॉ. संजीव बेळंबे यांनी नामपूरच्या इतिहासात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेबल प्रॅक्टिस बंद केली. येथे मोठया संख्येने सर्पदंशाचे व विषबाधेचे रुग्ण येत.


प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करताना काही अडचणीही येत. कागद
, वीज, औषधे कमी असत. पुरवलेल्या पैशांतून तेवढा खर्च भागत नसे. विशेषत: भरपूर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही अडचण जाणवतेच. याला पर्याय म्हणून नामपूर आरोग्य केंद्रात एक दानपेटी ठेवण्यात आली. गावातील आरोग्य समितीच्या सदस्यांनी सह्या करून ती बंद (सील) करण्यात आली. दर 3-4 महिन्यांनी ती उघडून पैसे मोजून आवश्यक तो खर्च करणे सुरू झाले. दवाखाना छान झाला. दवाखान्यात प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांना याच दानपेटीतील पैशातून टीव्हीसुध्दा बघता येऊ लागला.

 

येथेही महिन्याला 35-40 बाळंतपणे व 50-60 कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया होत. रोज जवळपास 150 रुग्ण दाखवण्यासाठी येत. येथे सर्वांना समान न्याय असे. पुढारी- पत्रकार सर्वांना रांगेने केस पेपर काढून यावे लागे. आतापर्यंत असे कधी झाले नव्हते. पण सामान्य लोकांच्या प्रेमापुढे हे सर्व काटेकोरपणे सुरळीत सुरू राहिले.


1996मध्ये स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई गाठली. 8 महिने काम केल्यानंतर कामाचा ताण, वाढते वय याचा विचार करून परत नाशिक जिल्ह्यात यायचे ठरवले.


1997 ते 2003 हा काळ सटाणा तालुक्यातीलच डांग सौदाणे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेला. हा सगळा दुर्गम आदिवासी भाग. येथे सर्पदंशाचे खूप रुग्ण बघावे लागले. अनेकांना जीवदान देता आले. मळगाव, भवाडे, पिसोरे या अत्यंत दुर्गम गावांना पायी चालत जाऊन भेट देणारे ते पहिलेच वैद्यकीय अधिकारी. सकाळी घरून पोहे, बिस्किटे घेऊनच बाहेर पडावे लागे. बरोबर सर्व कर्मचारी एकत्र हेच खात.

 

डॉ. बेळंबे यांची प्राथमिक आरोग्य केंद्रे नाशिक जिल्ह्यात कायम पहिल्या पाचमध्ये राहिली. 1989मध्ये लग्न झाले. नांदगावला. केवळ एकच अपत्य होऊ द्यायचे हे आधीच ठरवले होते. या सर्व कठीण प्रवासात रेखावहिनी सर्वार्थांनी त्यांच्या सोबत राहिल्या. वास्तविक भुसावळसारख्या शहरात बालपण गेल्याने इतक्या लहान गावात राहणे खूप कठीण गेले असणार. एम.बी.बी.एस. झाल्यानंतर इंटर्नशिप करण्यासाठी येणाऱ्या किंवा त्यानंतर बाँड पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या मुलामुलींना या बेळंबे दांपत्याने जणू प्रेमाने बांधून ठेवले. अनेक वर्षांनंतरही त्यांची येणारी पत्रे हे बंध किती मऊ पण मजबूत आहेत-होते, हे दर्शवतात. कामाच्या ध्यासामुळे व व्यापामुळे गेल्या 30 वर्षांत इतर डॉक्टर कुटुंबासारखे कुठे सहल वा फिरण्यासाठी हे दांपत्य कधीच बाहेर पडले नाही. मुलगा व सून सध्या न्यूझीलंडमध्ये Food Industryमध्ये मोठया पदावर काम करतात. सरकारने त्यांना 1993मध्ये दोन व 2004मध्ये दोन असे एकूण चार वाढीव वेतन देऊन त्यांच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले. 2003 ते 2007 वडनेर भैरव व पुढे चांदवड 2007 ते 2012 जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून काम केले. 2012-2013 पेठचे तालुका आरोग्य अधिकारी 2013 ते 2017 पिंपरगाव बसवंत या राष्ट्रीय महामार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असे काम केले.

 

1987 ते 2007 या काळात या गृहस्थाने 16000 कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या. 18 जून 2016पासून डॉक्टर संजीव नगर येथे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतात व 23 ग्राामीण रुग्णालयांचा व 2 उपजिल्हा रुग्णालयांचा कारभार त्यांच्याकडे आहे.


त्यांच्या आयुष्यात अविस्मरणीय काय वाटते
?

 

तसे तर खूप. पण नामपूरला एका कोटयधीश महिलेने प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वत:ची शस्त्रक्रिया डॉ. बेळंबे यांच्याकडून करून घेतली. स्वत:ची मच्छरदाणी लावून 7 दिवस तेथेच राहिली. नामपूर-डांग सटाणा येथे 24 # 7 राहिल्याने स्वत:च्या नातेवाइकांच्या सुखदु:खाच्या अनेक प्रसंगात सहभागी होता आले नाही.

 

निवृत्तीचे वय जवळ आले असताना त्यांना काय वाटते?


सरकारी नोकरीत राहूनही ग्राामीण आदिवासी लोकांची सेवा करण्याची संधी मिळू शकते. सरकारी योजना उत्तम असतात
, त्यांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी डॉक्टर्सनी सेनापतीप्रमाणे लढले पाहिजे. निराश होऊ नये. माता बालआरोग्याचे काम उत्साहवर्धक आहे. लसीकरण छान सुरू आहे. कुटुंबनियोजन साधने व्यवस्थित उपलब्ध आहेत.

 

सार्वजनिक आरोग्य खात्याच्या यंत्रणेला स्फुरण व प्रोत्साहन देण्याचे काम डॉक्टरांनी केले पाहिजे. नुसत्या इमारती बांधून नव्हे, तर माणूस 'निर्माण' करून छान चित्र निर्माण करता येईल. डॉ. बेळंबे यांच्या सहवासात राहून असेच काम करणारे काही वैद्यकीय अधिकारी निर्माण झाले, हे त्यांचे मोठेच समाधान आहे.

अत्यंत साधा, निगर्वी, वस्तुस्थिती नीट समजून घेऊन सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या, तरीही ठरवलेल्या तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या अशा माणसाला भेटणे म्हणजे मोठा आनंदच आहे!