विश्वास आणि श्रध्देचा विजय

विवेक मराठी    20-Nov-2019
Total Views |

अयोध्येतील जमीन ही प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असल्याची श्रध्दा आणि विश्वास अनंत काळापासून हिंदू धर्मीयांच्या मनामध्ये आहे, ह्यावर पाचही न्यायाधीशांनी एकमताने शिक्कामोर्तब केलं. सत्य जाणून घेण्याचा जो मार्ग प्रभू रामचंद्रांच्या श्रध्देतून जातो, तीच श्रध्दा 'किती सत्य' हे जाणून घेण्याचा मार्ग ह्या निकालाने उदाहरण (precedent) म्हणून घालून दिला आहे.


 

रामजन्मभूमी वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने नुकताच आपला निकाल दिला. त्याद्वारे विवादास्पद जागा ही प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असल्याची श्रध्दा आणि विश्वास अनंत काळापासून हिंदू धर्मीयांच्या मनामध्ये आहे, ह्यावर पाचही न्यायाधीशांनी एकमताने शिक्कामोर्तब केलं. ह्या निकालामध्ये ह्या वादबिंदूंसंदर्भात एक पुरवणी जोडून दाव्यामध्ये दाखल विविध तोंडी आणि लेखी पुरावे न्यायालयाने चर्चिले आहेत. हा वादबिंदू वेगवेगळया दाव्यांमध्ये वेगवेगळया प्रकारे तयार केला गेला होता. उदा., ही विवादास्पद जमीन प्रभू रामचंद्रांच्या मालकी हक्काची आहे का? त्यावर मंदिर होते का? मशीद बाबराने बांधली का? ती मंदिर पाडून बांधली गेली का? त्यामध्ये रामजन्मस्थान म्हणून अनादिकाळापासून हिंदूंकडून पूजा होत होती का? आणि जन्मस्थान असल्याचा विश्वास आणि श्रध्दा आहे का? अधिक श्रेयस्कर ताबा मालकी हक्क ठरविण्यासाठी ह्या सर्व वाद बिंदूंचा उपयोग होणार होता.

रामलल्ला विराजमान ह्या वादीच्या अर्थात हिंदूंच्या बाजूने, अयोध्येतील विवादास्पद जागा ही प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असून त्यावर राजा विक्रमादित्यने बाराव्या शतकात बांधलेले प्रसिध्द मंदिर होते. मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार 1528 साली बाबराच्या आदेशाने मीर बाकी ह्या त्याच्या सेनापतीने कोणतेही मंदिर उद्ध्वस्त न करता मशीद बांधली.

वरील सर्व वादाचे मुद्दे हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने इतर तोंडी व लेखी पुराव्यांव्यतिरिक्त सर्व धर्मांचे धार्मिक ग्रांथ, प्रवासवर्णने, गॅझेटियर्स, कविता आणि साहित्य ह्याचे पुरावे दाखल करून घेतले, तसेच ते मान्यही केले. निकालात असलेले महत्त्वाचे पुरावे काय आहेत, हे जाणून घेऊ या.

रामलल्ला विराजमानतर्फे के. परासरण ह्या वकिलांनी बाजू मांडताना आठव्या शतकात लिहिलेले स्कंदपुराण, वैश्नवखंड, रुद्रयमाला, अयोध्या माहात्म्य यावर आपली भिस्त ठेवली. ख्रिस्तपूर्व लिहिलेल्या वाल्मिकी रामायणातही अयोध्या हे जन्मस्थळ असल्याचे म्हटले आहे. तुलसीदासाने लिहिलेल्या 'रामचरितमानस'मध्येही तेच म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे जेव्हा एखाद्याचे मत ग्रााह्य असते तेव्हा ते ज्यावर आधारित आहे असे आधारही ग्रााह्य मानावे लागतात. त्यामुळे अनेक साक्षीदारांनी दिलेले तोंडी पुरावे मान्य करताना धार्मिक ग्रांथ, चरित्रे ह्यांचे पुरावे ग्रााह्य धरावे लागतात. राजपत्रे (गॅझेटियर्स) ही पुरावा म्हणून ह्याआधीच अनेक खटल्यांमध्ये मान्य केलेली कागदपत्रे आहेत. एखाद्या तथ्याची संभाव्यता जर सामान्य माणसालाही सहज वाटली, तर ते सिध्द झाले आहे असे म्हणता येते. त्याप्रमाणेच स्कंदपुराणातील अयोध्या माहात्म्यातील श्लोक हे जन्मस्थानाची भौगोलिक स्थिती दर्शवितात, ज्याची आजही कसोटी बघता येते.


 

येथे न्यायमूर्ती एआयआर 1954 एससी 282 ह्या वादामध्ये न्यायाधीशांनी केलेले निरीक्षण नोंदवतात. जस्टीस बी.के. मुखर्जी ह्यांनी ह्या निर्णयात म्हटले की, 'धर्म ही नक्कीच विश्वासाची आणि श्रध्देची गोष्ट आहे, केवळ ईश्वरवादी नाही. धर्म म्हणजे शिकवण, तत्त्वप्रणाली आणि विश्वास. धर्म फक्त नैतिक नियम सांगतो असे नाही तर तो विधी, उत्सव आणि पूजापाठाच्या पध्दतीही सांगतो, जो धर्माचा अविभाज्य भाग असतो. अशा पालन करण्याच्या गोष्टी ह्या अगदी खाणेपिणे आणि पेहरावापर्यंतही असू शकतात.'

ह्या निरीक्षणावर अवलंबून राहून न्यायाधीशांनी धार्मिक शास्त्रवचने ही हिंदू धर्माचा प्रमुख आधार आहे असे म्हटले आहे. वाल्मिकी रामायण हे प्रभू रामासंदर्भातील प्रमुख स्रोत आहे हे म्हटले. वादींनी सुवीरा जयस्वाल ह्या इतिहासकाराच्या तपासलेल्या साक्षीप्रमाणे वाल्मिकी रामायणाचा काल हा ख्रिस्तपूर्व 300 ते ख्रिस्तपूर्व 200 हा आहे.

वाल्मिकी रामायणातील बालकांड अध्यायातील 18व्या भागाप्रमाणे अयोध्येत कौसल्येने दिव्य अशा बालकास जन्म दिला.

बृहद्-धर्मोत्तर पुराणातील खालील श्लोकाप्रमध्ये अयोध्या हे सातपैकी एक पवित्र स्थळ असल्याचे म्हटले आहे -

अयोध्या मथुरा माया काशी क ाी अवन्तिका।

पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥

स्कंदपुराणातील अयोध्या माहात्म्यामधील 18 ते 25 श्लोक हे जन्माचे भौगोलिक स्थान दर्शविण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

तस्मात् स्थानत ऐशाने राम जन्म प्रवर्तते।

जन्मस्थानमिदं प्रोक्तं मोक्षादिफलसाधनम ॥18

विघ्नेश्वरात पूर्व भागे वासिष्ठादुत्तरे तथा

लौमशात् पश्चिमे भागे जन्मस्थानं तत: स्मृतम ॥19

या स्थानाच्या उत्तर-पूर्व दिशेला रामाचे जन्मस्थान आहे. हे पवित्र स्थान मोक्षप्राप्तीचे स्थान आहे. असे म्हटले जाते की हे जन्मस्थान विघ्नेश्वराच्या पूवर्ेला, वशिष्ठच्या उत्तरेला व लौमासाच्या पश्चिमेला आहे. पुढील श्लोकांमध्ये ह्या स्थानाचे दर्शन घेतल्यावर जन्मांचा फेरा टाळता येतो. त्यापासून मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो असे म्हटले आहे. 18वे आणि 19वे श्लोक असे स्थान दर्शवितात. त्याबरोबरच हे स्थान हे हिंदूंसाठी जन्मस्थान म्हणून अत्यंत पवित्र आणि तीर्थयात्रेचे स्थान होते, हेसुध्दा सिध्द होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस अगरवाल यांनीही आपल्या 2010च्या निकालपत्रात स्कंदपुराणाचा पुरावा ग्रााह्य धरला आहे. वादग्रास्त जागा हीच जन्मस्थान असल्याचे त्यांनी अतिशय स्पष्टपणे म्हटले आहे. महंत राम विलास दास वेदांती यांनी आपल्या साक्षीत म्हटले आहे की, 'स्कंदपुराणातील वैष्णव खंडातही अयोध्येची रामनवमीची यात्रा चैत्रातल्या तिसऱ्या नवरात्रीपासून सुरू होते, असे लिहिले आहे. रामजन्मभूमी ईशान्य कोपऱ्यात आहे. पश्चिमेला गणेशाची पूजा होते. जन्मभूमी वशिष्ठ कुंडाच्या उत्तरेला आहे, तर वशिष्ठ कुंड विघ्नेश्वरीच्या पूर्वेला आहे.' अयोध्या हे रामाचे जन्मस्थान असल्याचे वेद, उपनिषदे, स्मृती ह्याद्वारेही सिध्द आहे. अनेक महंत, आचार्य ह्यांनी आपल्या प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर केलेल्या वर्णनाच्या तोंडी पुराव्याच्या आधारे आणि ग्रांथांवर अवलंबून राहून हे स्पष्ट होत असल्याबाबत आणि प्रतींच्या सत्यतेबाबत न्यायालयात साक्ष दिली. 'स्वामी अविमुक्तस्वरानंद सरस्वती यांनी स्कंदपुराणात दिलेल्या पध्दतीप्रमाणे जन्मभूमीचे दर्शन घेतल्याचे, वादग्रास्त जमिनीवर पिंडारक, लोमश, रामजन्मभूमी, विघ्नेश, वाशिष्ठ कुंड आणि विघ्नेश्वरा अशासारखी जी बारा स्थाने आहेत, त्यापैकी काहींवर काही दगडी बोर्ड्स बघितले असल्याचे आणि त्याप्रमाणे जन्मभूमीचे भौगोलिक स्थान निश्चित होते असे सांगितले.

पी.व्ही. काणे ह्या इतिहासकारांनी आपले मत नोंदवले की, स्कंदपुरण हे सातव्या शतकाच्या पूर्वी आणि नवव्या शतकानंतर लिहिले गेलेले नाही. अर्थात 17-18व्या शतकातले काव्य असण्याची शक्यता नाही. न्यायालयाने कालावधी निश्चित करण्यासाठी इतरही ग्रांथांचा संदर्भ, तसेच इतिहासकारांच्या साक्षी नोंदवून घेतल्या आणि त्याप्रमाणे स्थान निश्चित केले.

हजारो तोंडी आणि लेखी पुराव्यांपैकी आणखी एक महत्त्वाचा पुरावा गुरू नानक देवजी यांचा होता. न्यायालयात अनेक शीख साक्षीदारांनी आपल्या साक्षी नोंदवल्या आहेत. तसेच शीख संप्रदायाचा इतिहास सांगणारे अनेक ग्रांथ पुरावा म्हणून सादर केले आहेत. जन्म साखी अर्थात गुरू नानक देवजी यांची काही चरित्रे उपलब्ध आहेत, ती त्यांनी न्यायालयात सादर केली आहेत. त्यापैकी पुरातन जनम साखी, पोथी जनम साखी, सचखंड पोथी - जनमसाखी श्री गुरू नानक देवजी यासारखे - ज्यांची यादीच अधर्े पान होईल असे अनेक शीख धर्मग्रांथ आणि चरित्रे हे सर्व न्यायालयाने ग्रााह्य धरले. ह्या सर्व ग्रांथांप्रमाणे गुरू नानक देवजींनी इ.स. 1510 ते 1511मध्ये अयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिराला भेट देऊन रामाचे दर्शन घेतले होते. न्यायाधीशांनी धर्मग्रांथातील हा पुरावा मान्य करून असे म्हटले की ग्रांथ जरी नेमके स्थान सांगू शकत नसतील, तरी 1510-11 साली तेथे पवित्र मंदिर होते, जन्मस्थान म्हणून श्रध्दा होती, भाविक यात्रा करत असत, नियमित दर्शन घेत असत हे सिध्द होते. त्यावरील हिंदूंचा विश्वास आणि श्रध्दाही सिध्द होते. न्यायालयाने पुढील काही निष्कर्ष काढले नसतील तरी हे म्हणायला वाव आहे की अकराव्या शतकात राजा विक्रमादित्यने बांधलेले मंदिर 1511पर्यंत इतक्या सुस्थितीत होते की तिथे भाविक दुरून दर्शनाला येत असत. मंदिर पाडून मशीद उभारली असा पुरावा नाही असे म्हणताना 1528मध्ये मंदिर पाडेपर्यंत मंदिर कालौघात किमान 1511पर्यंत तरी नष्ट झाले नाही. आणि पुढच्या 17 वर्षांतच ते काळाच्या ओघात पूर्णतः नामशेष होईल अशी शक्यताही नाही.

तुलसीदास रचित श्री रामचरितमानस इ.स. 1574-75 हा ग्रांथ, ज्यामध्ये अयोध्या हीच जन्मभूमी असल्याचे म्हटले, तो पुरावा म्हणून मानला गेला.

राजपत्रे (गॅझेटियर्स) आणि प्रवासवर्णने ही पुरावा म्हणून किती विश्वासार्ह मानायची, ह्यावर वाद झाला. ह्यासाठी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 57प्रमाणे न्यायालय इतिहास, साहित्य, विज्ञान, कला ह्या सर्व बाबींची दखल घेऊ शकते. सुखदेव सिंघ वि. महाराजा बहादूर ऑफ गीध्दौर एआयआर 1951 एससी 288 ह्या, तसेच इतरही अनेक निकालांत सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे राजपत्रे ही अनुभवी अधिकाऱ्यांनी अधिकृत नोंदींच्या आधारे तयार केलेली असल्यामुळे तो औपचारिक आणि तितकाच महत्त्वाचा पुरावा आहे आणि पुरावा म्हणून ग्रााह्य आहे. कलम 81प्रमाणेही सर्व राजपत्रे सत्य मानणे न्यायालयाला अनिवार्य आहे.

ह्याप्रमाणे ए इन इ अकबरी हे अबुल फझल अलामी ह्यांनी लिहिलेला ग्रांथ, ज्याचा तिसरा खंड जदुनाथ शंकर ह्यांनी भाषांतरित केलेला आहे, हा भाग हिंदू धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा ज्ञानकोश आहे. तसेच दुसरा भाग अकबराच्या कालावधीतल्या मुघल साम्राज्याची राजपत्रे आहेत. दोन्हीमध्ये अयोध्येबद्दल आणि रामचंद्रांच्या अवताराबद्दल, जन्माबद्दल तसेच हिंदूंच्या अयोध्येबद्दलच्या पवित्र श्रध्देबद्दल लेखन आहे. 1607 ते 1611 दरम्यान भारतात येऊन गेलेला प्रवासी विल्यम फ्लीन्च ह्याने 'Early Travels in India' हे प्रवासवर्णन लिहिले. त्यात रामचंद्रांच्या महालाचा आणि किल्ल्याच्या अवशेषांचा उल्लेख आहे. फादर जोसेफ टीफेन्थहालर ह्या प्रवाशाने 1766-1771मध्ये भारताला भेट दिल्यानंतर लिहिलेल्या वर्णनात म्हटले की, 'सीता रसोई ही टेकडीवरील जागा प्रसिध्द आहे, मात्र औरंगजेबाने रामकोट किल्ला उद्ध्वस्त करून तिथे तीन घुमटांचे मुस्लीम प्रार्थनास्थळ बांधले. काही म्हणतात की ते बाबराने बांधले.' त्याने कोरीव काम केलेले अनेक खांब बघितल्याचे त्यामध्ये नमूद आहे, तसेच वानरांचा राजा हनुमानाने आणल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने त्या ठिकाणी एक पाळणा बघितल्याचे म्हटले आहे. त्याचे कारण 'हिंदूंचा असा विश्वास आहे की भगवान विष्णूने तेथे रामाचा अवतार म्हणून जन्म घेतला.' त्याने पुढे म्हटले की 'औरंगजेबाने वा बाबराने ती जागा उद्ध्वस्त केली, तरीही जिथे प्रभू राम राहिले त्या जागेवर हिंदू तीन वेळा जातात आणि पालथे होतात. (नमस्कार घालतात.)'

ईस्ट इंडिया कंपनीच्या 1828, 1838 सालच्या राजपत्रात राम, लक्ष्मण, सीता मंदिरे, इतिहास ह्याचे उल्लेख आहेत. 1858 सालच्या राजपत्रात अयोध्येचे मोठे वर्णन आहे. 1856 साली मिर्झा जान ह्यांनी हदीथ ए सेहबा नावाच्या पुस्तकात रामजन्मभूमी, जी सीता की रसोईला लागून आहे, तिची पूजा होते असे म्हटले आहे. जिथे भव्य मंदिर होते, त्यावर बाबराने मशीद बांधली असे म्हटले आहे.

1858 ते 1949 ह्यादरम्यानची अनेक राजपत्रे, ए.एस.आय. अहवाल, पुस्तके, ग्रांथ, इतर कागदोपत्री पुरावे आणि तोंडी पुरावे न्यायालयात दाखल आहेत. 1 नोव्हेंबर 1858नंतर ब्रिटिश सरकारने काढलेल्या अनेक आदेशांमध्ये, पत्रव्यवहारांमध्ये आणि अधिकृत अहवालांमध्ये मशिदीचा उल्लेख 'जन्मस्थान मशीद' असाच झाला आहे. पी. कार्नेगी, जे अयोध्या आणि फैझाबादचे कमिशनर होते, त्यांनी अयोध्या हिंदूंना मक्केसारखी आहे असे मत त्यांच्या लिखाणात नोंदवले आहे. रामाच्या जन्मस्थानावर मशीद उभारली होती, त्यासाठी मोठा संघर्ष झाला होता असे म्हटले. ते पुढे नोंद करतात की जोपर्यंत ब्रिटिशांनी रेलिंग घालून भाग पाडले नाहीत, तोपर्यंत हिंदू आणि मुस्लीम मशीद मंदिरात पूजा करत असत. 1877च्या राजपत्रातही ह्याची पुनरावृत्ती लिहिली गेली आहे. 1889च्या ए.एस.आय.चा अहवाल नोंद करतो की, रामाचे जुने मंदिर अतिशय सुंदर असणार, कारण त्यातील बरेचसे खांब मशिदीसाठी वापरले गेले आहेत. सदर ए.एस.आय.चा अहवाल मंदिराच्या जागीच मशीद बांधली गेल्याचे म्हणणे बळकट करतो. 1921चे बाराबंकी राजपत्र, पूर्वीचे मंदिर, त्यावर मशीद, हिंदूंसाठी हे स्थळ पवित्र असल्याचे आणि त्यामुळे आता संघर्षजन्य असल्याचे नमूद करतो.

30 नोव्हेंबर 1858 रोजी मुस्लिमांनी केलेल्या तक्रार अर्जावरून हे सिध्द होते की मशिदीच्या आतमध्ये हिंदूंनी एक चबुतरा बांधला आहे, तेथे होम आणि पूजा चालू आहे, तसेच पूर्ण मशीदीवर 'राम राम' असे लिहिले आहे. चबुतरा हटवण्यासाठी हा अर्ज आहे. 12 फेब्रुवारी 1861 रोजी मोहम्मद असघर ह्यांनी मशिदीतला चबुतरा काढून टाकावा यासाठीचा असाच अर्ज केला आहे. इतरही अनेक तक्रारींवरून हे सिध्द होते की सदर जागेवर हिंदू निरंतर आणि अखंड पूजा करत असत. त्यानंतर महंत रघुवर दास ह्यांनी मशीद परिसरातील चबुतऱ्यावर मंदिर बांधायची परवानगी कमिशनरकडे मागितलेली दिसते. 1866 साली परिसरात मूर्ती ठेवल्याची मुसलमानांची तक्रार आहे. पुढे डेप्युटी कमिशनरांनी 1877 साली खेम दास महंत ह्यांना जन्मस्थान दर्शनासाठी स्वतंत्र रस्ता मिळण्यासाठी उत्तरेकडील भिंतीचे दरवाजे उघडण्याचा आदेश दिल्याचे दिसते. त्यावर सईद महम्मद असघर ह्यांनी अपील केल्याचे दिसते. सदर अपिलात परिसरात एक छोटा 'चुल्हा' असल्याचे नमूद आहे. 1934 साली झालेल्या हिंदू-मुस्लीम दंग्यांमध्ये मशिदीचे नुकसान झालेले दिसते.

महंत परमहंस रामचंद्रदास आपल्या तोंडी साक्षीत म्हणतात की, 'अयोध्येतील 7 जागांचे भाविक दर्शन घेताना मी कायम पाहत आलो आहे. त्या तसेच रामजन्मभूमी ह्या जागांचे स्थान दुसरीकडे बदलू शकत नाही.' इतर अनेक महंत, आचार्य, प्रवासी, भाविक ह्यांच्या न्यायालयातील तोंडी साक्षी ह्या जन्मस्थानावर भाविकांच्या भेटी, दर्शन, पूजा, परिक्रमा, परिक्रमा मार्ग, परिसराची निरीक्षणे नोंदवतात आणि स्मृतीपलीकडच्या काळापासून ही जागा रामजन्मभूमी आहे, तसेच मध्य घुमटाच्या खालचे क्षेत्र तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे पूजा केली जाते, हे सांगतात. महंत भास्कर दास हे आपल्या साक्षीत तेथे 1946 ते 1949पर्यंत - म्हणजे जागा अधिग्राहित होईपर्यंतही तेथे एकही मुस्लिमाने नमाज अदा केला नाही, उलट हिंदू फळे, फुले, पैसे वाहत असत असे म्हटले. अनेक साक्षीदारांनी मशिदीला जन्मस्थान म्हणत असल्याचेही न्यायालयात सांगितले. ह्याचा अर्थ 1857पर्यंत ब्रिटिशांनी लोखंडी जाळीची भिंत बांधून देईपर्यंत हिंदू सदर स्थानावर पूजा करत होते. त्यानंतर मात्र राम चबुतऱ्यावर जन्मभूमी म्हणून प्रतीकात्मक पूजा सुरू झाली. हिंदूंचा हा संपूर्ण संघर्ष, विरोध, चिकाटी, सातत्य आणि कृती ह्या त्यांच्या श्रध्देची आणि विश्वासाची ग्वाही देतात.

न्यायालयाने ह्या वादबिंदूंवर निष्कर्ष काढला की 'मशीद बांधण्यापूर्वी आणि नंतरही हिंदूंचा असा विश्वास आणि श्रध्दा होती की प्रभू रामाचे जन्मस्थान हे ज्यावर बाबरी मशीद उभारली आहे तेच आहे, आणि हा विश्वास आणि श्रध्दा ही लेखी आणि तोंडी पुराव्याच्या आधारे सिध्द झाली आहे.'

ह्या न्यायालयीन लढाईत ए.एस.आय.च्या उत्खननाच्या अहवालासारखे अत्यंत महत्त्वाचे इतरही पुरावे, दावे, प्रतिदावे आणि वादबिंदू आहेत. परंतु तो ह्या लेखाचा विषय नाही. वादबिंदूंच्या ह्या निष्कर्षामुळे हिंदूंचा 'अधिक श्रेयस्कर मालकी हक्क' (better possessory title) सिध्द होत आहे. हिंदूंचा पूजेसाठी आणि यात्रेसाठी हिंदूंचा सिध्द झालेला आणि मुस्लिमांनी सिध्द न केलेला अखंडित ताबा (unimpeded possession) हा निकालातील कलाटणी देणारा मुद्दा ठरला. त्यामुळे 6 डिसेंबर 1992ची घटना वगळताही न्यायालयीन लढाईद्वारे हिंदूंचा हा मालकी हक्क मान्य झाला असता, केला गेला असता. हे सर्व विस्तृतपणे लिहिण्याचा उद्देश म्हणजे निकालामध्ये मान्य केलेल्या पुराव्यांचे महत्त्व लक्षात यावे आणि त्यानिमित्ताने इतिहासातून कोणकोणते धडे घ्यायचे हेसुध्दा लक्षात यावे. हिंदू ही जीवनपध्दती असे आत्तापर्यंत न्यायमूर्तींसह अनेक जणांनी म्हटले आहे. ह्या लेखाच्या सुरुवातीसच न्यायमूर्ती बी.के. मुखर्जी हे 'धर्म खाण्यापिण्याच्या आणि पेहरावासहित अनेक बाबी नोंदवत असतो' असे म्हणतात, हे लिहिले आहे. अनेक प्रथा, परंपरा, दंतकथा, आरत्या, पुराणे, श्लोक, गीते, पोथ्या, धर्मग्रांथ, भाषा, तसेच गायन, नृत्य, चित्र, शिल्प, लोककला आदी कला, प्रथा-परंपरा, उत्सव, सण-समारंभ ह्यांनी भारतीय समाजाचा सांस्कृतिक पट विणलेला आहे. इतकेच नाही, तर रोजच्या जगण्यातील अनेक प्रथा, विधी ह्यामध्येही त्याचे धागे सापडतात. हजारो वर्षे जाऊनही, बदलत्या रूपात का असेना त्यातले तत्त्व अजून मूळ धरून आहे. त्यातल्या बदलांची संगती वेळ आली तर लावता येते. आणि 'मूळ' शोधण्यासाठी त्याचा परस्परसंबंध जोडता येतो. जागेच्या मालकी हक्कासाठी त्यांचा हा उपयोग ह्या निकालामध्ये झाला, मात्र भविष्यात कितीतरी गोष्टींसाठी त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. विश्वास आणि श्रध्दा ह्या अंध नाहीत, तर त्यांना ठोस असा प्राचीन आधार आहे, तो बुध्दीस अनुभवजन्य आहे. रामजन्मभूमी निकालामध्ये तर्काने आणि बुध्दीने हा आधार ग्रााह्य धरला गेला, सिध्द झाला हे ह्या निकालाचे उदाहरण (precedent)! ही सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखी आणि ह्यापुढे वापरता येण्यासारखी गोष्ट. त्याबरोबरच हा निकाल ह्या सर्व प्रथा-परंपरांचे पालन, धार्मिक ग्रांथांचे, प्रवासवर्णनांचे जतन, पोथ्या-पुराणांचे पठण, सण-समारंभ-उत्सवांचे साजरीकरण, कर्मकांडे आणि त्यांची उपयोगिता, अखंडित तीर्थयात्रा, वहिवाट (unimpeded use) अशा अनेक गोष्टींचे महत्त्व लक्षात आणून देतो. 'अंतिम सत्य' जाणून घेणे हे माणसाच्या आयुष्याचे ध्येय असते. ते जाणून घेण्याचा जो मार्ग प्रभू रामचंद्रांच्या श्रध्देतून जातो, तीच श्रध्दा 'किती सत्य' हे जाणून घेण्याचा मार्ग ह्या निकालाने उदाहरण (precedent) म्हणून घालून दिला आहे.