शांतता... योग्य वेळ येणार आहे

विवेक मराठी    20-Nov-2019
Total Views |

 अनावश्यक कोणाच्या तोंडी लागू नये. त्यामुळे त्याचे प्रस्थ वाढते आणि तो आहे त्यापेक्षा मोठा होत जातो. आपण शांत राहावे, योग्य वेळेची वाट बघत बसावे, उपरण्याच्या गाठीला बांधून ठेवण्याची परिस्थिती आपल्या गतीने लवकरच येईल. तोपर्यंत प्रतिक्षा करावी.

 
शिवसेना नेते श्री. संजय राऊत गेले अनेक दिवस युती आणि भाजपासंबंधी वाटेल ते बडबडत असतात. माझा मित्र मला म्हणाला, 'रमेश, संजय राऊत आणि उध्दव ठाकरे या दोघांना झोडणारा एक चांगला सणसणीत लेख लिही, त्याची गरज आहे.' मी त्याला म्हणालो, 'अरे ही राजकीय लढाई चालू आहे, उत्तरे द्यायची असतील तर, ती भाजपाने दिली पाहिजेत. हे काम मी माझ्या अंगावर घेणे बरोबर नाही.' त्याला माझे म्हणणे काही पटले नाही.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

याच विषयावर संवाद चालू असताना मी त्याला एक गोष्ट सांगितली - एक घोडा आणि एक गाढव यांच्यात पैज लागली की, दोघांत मोठा कोण? मी का तू? मोठेपणा ठरविण्यासाठी त्यांनी स्पर्धा सुरू केली. प्रथम धावण्याची स्पर्धा झाली. घोडयापुढे गाढव कसा टिकणार? तो हरला. नंतर शक्तीची परीक्षा झाली. एक घोडा टांगा खेचतो, गाढवाला एक गाडी देखील खेचता येत नाही. त्यातही तो हरला. अशा विविध कसोटयात हरूनही गाढवाने मी हरलो, असे म्हणण्याचे नाकारले. शेवटी ते एक उकिरडयावर गेले, वर पाय करून तो लोळू लागले. ते घोडयाला म्हणाले, 'बघ मी हे करतो आहे, तू करू शकतोस का?' घोडा म्हणाला, 'नाही बाबा, मी हरलो. तू जिंकलास.' संजय राऊतच्या तोंडी लागणं म्हणजे, घोडा आणि गाढवाची गोष्ट जगण्यासारखे आहे. भाजपाने ठरविले की आपल्याला काही उकिरडयावर लोळायचे नाही.

वल्गना करण्यालाही काही सीमा असते. आमच्याकडे 175 आमदार आहेत, आम्ही 25 वर्षे सत्तेवर राहणार आहोत, भाजपाच्या नाशाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, ही सर्व बडाईखोड भाषा झाली. अशा बाडाईखोर भाषणांबद्दल अब्राहम लिंकन काही गोष्टी सांगत असत. त्यातील पहिली गोष्ट अशी की - एका गावात कोतवालपदाची निवडणूक होती. दोघांतच जास्त चुरस होती. प्रत्येकाला विजयाचा विश्वास होता. एक उमेदवार आपल्या बायकोला म्हणाला, 'निवडणूक मीच जिंकणार! मीच कोतवाल होणार, माझ्याशी स्पर्धा करण्याची कोणाची ताकद नाही. मीच सर्वांत ताकदवान आहे, वगैरे.' निवडणुकीच्या आदल्या रात्री तो आपल्या बायकोला म्हणाला, 'बघ, उद्या तू कोतवालाच्या बिछान्यात झोपशील.' हे वाक्य त्याने अनेकवेळा उच्चारले.

दुसऱ्या दिवशी निवडणूक निकाल जाहीर झाला. हा बडाईखोर कोतवाल सणकून आपटला. संध्याकाळ झाली, बायकोने उत्तम कपडे केले आणि ती जाण्यास निघाली. कोतवालाने विचारले, 'तू कुठे चाललीस?' ती म्हणाली, 'कोतवालाच्या बिछान्यात झोपायला.' लिंकनला हे सांगायचे आहे की, आपली कुवत ओळखून बढाया माराव्यात, आणि काहीही वक्तव्ये केलीत तर या कोतवालासारखी अवस्था होते.

लिंकनने अशीच एक दुसरी गोष्ट सांगितली आहे. त्याच्या सेनापतीचे नाव होते, मॅक्लिकन. सैन्याची कवाईत घेण्यात तो पटाईत होता. रणांगणावर जाऊन लढायला त्याची हिंमत होत नसे. सैन्याला शिस्त लावणे आणि सदैव तयार ठेवणे हे काम तो चांगले करी. लढाई त्याला जिंकता येत नसे. त्याविषयी लिंकन म्हणाला - माझ्या गावी एकाने झुंज खेळणारे कोंबडे पाळले होते. त्यातला एक कोंबडा चांगला तगडा झाला होता. तेव्हा लोकांच्या करमणुकीसाठी प्राण्यांच्या झुंजी लावल्या जात. चित्रपटाचा जमाना सुरू व्हायचा होता.

एके दिवशी या शेतकऱ्याचा कोंबडा आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा कोंबडा यांच्यात झुंजीचा कार्यक्रम ठरला. दोघेही जण आपआपले कोंबडे घेऊन आले. रिंगणात दोन्ही कोंबडे अाले. दुसऱ्या शेतकऱ्याच्या कोंबडयाने पहिल्या कोंबडयावर हल्ला केला. तो जरी तगडा असला तरी त्यात लढाईची हिंमत नव्हती. तो बाजूला झाला आणि रिंगणातच पळू लागला. लोकं हसायला लागले. टाळया पिटू लागले. त्या कोंबडयाचा मालक शेतकरी दु:खी झाल आणि रागावला. त्याने आपल्या कोंबडयाला हातात घेतले आणि आकाशात भिरकावून दिले. तो म्हणाला, 'तू फक्त खुराडयातच शोभेचा कोंबडा आहे. तिथेच तू वटवट करीत रहा. रणमैदानात तुझा काही उपयोग नाही.' राजकारणाचा विषय केला तर, राजकारणाचे रणमैदान निवडणूक असते. मातोश्री ते कॅमेऱ्यात बढाया मारण्याचे कोणाचे काय जाते? रणांगणातच खरी परीक्षा होणार आहे.

जे फार वाचाळ असतात, जीभ सैल सोडून काहीही बोलत असतात, त्यांच्या नादी शहाण्या माणसाने लागू नये. त्यांना बोलू द्यावे. आपण ऐकण्याचे काम करावे. शब्द काही अंगाला येऊन चिकटत नाहीत. आणि मनाला ते लावून घ्यायचे नाही, असं ठरवलं तर त्या शब्दांचा काहीही उपयोग नसतो. भगवान गौतम बुध्दांकडे एक माणूस आला, बुध्दाच्या शिकवणुकीमुळे त्याचा लोकांना ठगवण्याचा धंदा बंद होत चालला होता. सामान्य माणसांना इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून भुलविता येते. धार्मिक विधी करण्यास त्यांना भाग पाडता येते. भगवान बौध्दांच्या शिकवणुकीमुळे हे सर्व बंद होत चालले होते.

तो गौतम बुध्दांना खूप शिव्या देऊ लागला. तुम्ही खोटारडे आहात, बिनकामाचे आहात, फसवणूक करता, शब्द पाळत नाहीत वगैरे वगैरे. याला शिव्यांची फोडणी त्याने दिली. भगवान बुध्दांनी सर्व शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते त्याला म्हणाले, 'तुझे बोलून झाले का? आता मी प्रश्न विचारू का?' तो म्हणाला, विचारा. भगवन म्हणाले, 'तुझ्या घरी पाहुणे येत असतील. ते आल्यानंतर त्यांना तू काही भेट देत असशील.' तो म्हणाला, 'हो, हे सर्व मी करतो, हे गृहस्थाश्रमाचे कर्तव्य आहे.' 'समज त्यातील काही जणांनी तुझी भेट स्वीकारली नाही, तर ती भेट कोणाकडे राहील?' असा प्रश्न भगवंतांनी विचारला. तो म्हणतो, 'अर्थात माझ्याकडेच राहील.' तेव्हा भगवन म्हणाले, 'तू मला जे अपशब्द वापरलेस ते मी स्वीकारलेले नाहीत, मग ते कोणाकडे राहाणार?' तो काय बोलणार, त्याची वाचाच बंद झाली.

म्हणून बेताल बडबड करणारे जे असतात त्यांना आपण बोलबच्चन म्हणतो. बोलत राहाण हेच त्यांचे काम आहे. तोच त्यांचा रोजीरोटीचा व्यवसाय पण आहे. म्हणून आपण शांत राहायलं पाहिजे. उत्तेजित होता कामा नये. उत्तेजित झाले असता, शिवीगाळ करणारा माणूस अधिक मोठा होतो. आपल्याला त्यांना मोठं करायचं नाही. एकदा भगवान श्रीकृष्ण, सात्यकी आणि बलराम प्रवासाला चालले होते. रात्र झाले एका झाडाखाली ते विश्रांतीसाठी थांबले. आळीपाळीने एकाने पहारा द्यावा, असे ठरले. प्रथम पाळी बलरामाची आली. थोडयावेळाने तेथे एक ब्रह्मराक्षस आला. तो म्हणाला, 'मी आता तुम्हाला खातो.' बलराम संतापला. त्यांचे भांडण सुरू झाले. आणि ब्रह्मराक्षस मोठा मोठा मोठा होत गेला. तो बलरामाच्या हाती काही लागला नाही. बलराम थकला, पहारा करण्याची त्याची वेळही संपली. त्याने सात्यकीला उठवले. नंतर ब्रह्मराक्षस सात्यकीपुढे आला, दोघांचे भांडण आणि मारामारी सुरू झाली. ब्रह्मराक्षस आकाराने वाढत वाढत गेला. सात्यकीही थकला, त्याने कृष्णाला उठवले.

कृष्ण त्या ब्रह्मराक्षसाला म्हणाला, 'तुझ्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी नंतर करू, प्रथम बस आपण गप्पा मारू.' असं म्हणत, त्याने त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. इकड-तिकडच्या गोष्टी सांगून त्याला हसविले. तस तसा तो लहान लहान होत गेला. शेवटी इतका लहान झाला की, कृष्णाने त्याला धरला आणि आपल्या उपरण्याला गाठ मारून बांधून ठेवला. पहाट झाली, सगळे उठले. दोघांनी कृष्णाला विचारले, त्या ब्रह्मराक्षसाचे तू काय केलेस? कृष्ण हसून म्हणाला, 'मी त्याला उपरण्याला बांधून ठेवले आहे.' प.पू. श्रीगुरुजी ही कथा सांगत असत. त्याचा अर्थ असा की, अनावश्यक कोणाच्या तोंडी लागू नये. त्यामुळे त्याचे प्रस्थ वाढते आणि तो आहे त्यापेक्षा मोठा होत जातो. आपण शांत राहावे, योग्य वेळेची वाट बघत बसावे, उपरण्याच्या गाठीला बांधून ठेवण्याची परिस्थिती आपल्या गतीने लवकरच येईल. तोपर्यंत प्रतिक्षा करावी.

- रमेश पतंगे

9869206101