'Scientist - Field Marshal-Activist' सर!

विवेक मराठी    21-Nov-2019
Total Views |

@मिलिंद करमरकर

आपल्या व्यक्तिमत्त्वातून आणि भाषणांतून तरुण वर्गामध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव जागवणारे, माजी संघप्रचारक प्रा. मोहन आपटे यांचे मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा लेख.




आणीबाणीचा काळ होता. श्रीमती इंदिरा गांधींनी संपूर्ण देश एक बंदिशाळा बनविला होता. व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाली होती. दोन सामान्य माणसे एकमेकांशी राजकारणावर बोलायला घाबरत होती. अशा वेळी संघस्वयंसेवक असलेल्या पार्ल्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रायगडावर सहल गेली होती
, त्या सहलीत मी सहभागी झालो होतो.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक 


रायगडावरील शिवछत्रपतींच्या स्मृतीने भारलेल्या वातावरणात रात्रीच्या वेळेस एका भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या प्राध्यापकांचे बौध्दिक सुरू झाले. खणखणीत आवाज
, ठसठशीत वाक्यरचना. जसजसे बौध्दिक पुढे जाऊ लागले, तसा तत्कालीन परिस्थितीबद्दलचा राग प्रकट होऊ लागला. खणखणीत आवाज घणाघाती झाला. शब्द प्रकट झाले -


क्रांती होत असताना जिवंत असणे म्हणजे भाग्य!

त्यातही तरुण असणे अहोऽभाग्य!

क्रांतीत सक्रिय सहभागी असणे महाभाग्य!


त्या सहलीला गेलेल्या आम्हा तरुणांच्या मनावर वरील वाक्ये कायमची कोरली गेली. पुढे आणीबाणीविरोधी सत्याग्राहांची आखणी झाली आणि वरील सहलीला गेलेल्या बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सत्याग्राह केला. त्या प्राध्यापकांचे शब्द खरे ठरले. आजही माझ्यासारख्या त्या वेळच्या अनेक सत्याग्राहींना हे पटते की आम्ही आणीबाणीविरोधी लढयात सहभागी झालो. पुढे झालेल्या
1977च्या लोकसभा निवडणुकीत हुकूमशहा इंदिरा गांधींचा पराभव झाला. लोकशाहीची पुनःप्रतिष्ठापना झाली. या क्रांतीत आम्ही सहभागी झालो हे आमचे महाभाग्य! संघाचा कार्यकर्ता असल्यामुळे आणीबाणी चुकीची आहे, हा अन्याय आहे हे सर्व समजत होतेच, पण प्रत्यक्ष झोकून देऊन त्या लढयात आम्ही उतरलो ते 'त्या' प्राध्यापकांच्या बौध्दिकाने. ते प्राध्यापक होते प्रा. मोहन हरी आपटे.


आज हे सर्व आठवतेय
, कारण तरुणांना वेड लावणारे, देशभक्तीचे धडे देणारे, देशासाठी प्रत्यक्ष कृती करणारे, activist बना असे सांगणारे हे 'मोहनराव' मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे 2 वाजता इहलोकीची यात्रा संपवून परलोकात निघून गेले. मृत्युसमयी ते 81 वर्षांचे होते.

 

गेले वर्ष दीड वर्ष मोहनराव आजारी होते. तरी त्या काळातही भेटायला येणाऱ्याशी विज्ञान, राजकारण, इतिहास अशा विषयांवर ते भरपूर बोलत असत. एवढा काळ सोडल्यास मोहनराव जीवनभर त्यांच्याच शब्दात सांगायचे तर 'activist' राहिले.


ते प्रखर बुध्दिवान होते. पदार्थविज्ञानासारखा विषय त्यांनी लीलया आत्मसात केला होतो. त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि तो विषय सोपा करून शिकविण्याचे कौशल्यही होते. खगोलशास्त्रातही सर पारंगत होते. त्यांचे वाचन प्रचंड होते. विज्ञानातील अगदी या क्षणापर्यंतच्या घडामोडींचा बारीक तपशीलही मोहनरावांजवळ असे. अशा
Scientistने स्वत:ला एका प्रयोगशाळेत कोंडून घेतले असते, तर त्यात काही वावगे वाटले नसते. परंतु मोहनरावांचे अद्वितीयपण इथेच सुरू होते. एक वैज्ञानिक असूनही 'सर' एक धडाडीचा, तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता होते.


हे सर्व करताना त्यामध्येही एक लष्करी शिस्त असे. वेळ पाळण्याबद्दल ते काटेकोर असत. कार्यक्रम असो वा बैठक - वेळेत सुरू व वेळेत संपली पाहिजे. कार्यक्रमाचे आयोजन करताना मिनिट् टू मिनिट आखणी
, सूचना-माहिती देतानाही कडक बुलंद आवाज. बेशिस्तीचा, अघळपघळ वागण्याचा, पाल्हाळ लावून बोलण्याचा त्यांना टोकाचा तिटकारा. एखादा कार्यकर्ता चुकल्यास त्याला 'लेफ्ट राइट' घेण्यात सर जराही कमतरता ठेवत नसत. सरांमध्ये असा एक फील्डमार्शलही कायमचा वास्तव्याला होता. त्यांचे वडील लष्करात होते. मोहनराव स्वत: लष्करात गेले नाहीत, पण लष्कर त्यांच्या रोमरोमात होते.


प्रा. मोहन हरी आपटे यांचा जन्म
5 डिसेंबर 1938 रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील कुवेशी नामक छोटया खेडयात झाला. वडील सैन्यामध्ये होते, त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत असत. तरीही सरांच्या बोलण्यात त्यांचे बालपण साताऱ्यात गेल्याचे व साताऱ्याच्या बालपणीच्या आठवणींचे अनेकदा संदर्भ येत. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी सर पुण्यात आले. बालवयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जोडली गेली ती अखेरपर्यंत. पुढे अक्कलकोट येथे विस्तारक व 1965-66च्या काळात जळगाव येथे संघ प्रचारक म्हणून त्यांनी काम केले. देशसेवा हे व्रत आचरून सर आजीवन अविवाहित राहिले. संपूर्ण राष्ट्राला त्यांनी आपले कुटुंब मानले.


त्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्या काळात शीव येथे काही काळ हॉस्टेलमध्येही सर राहिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेत कार्यरत झाले. या संघटनेत मुंबईचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. या काळात विद्यार्थी परिषदेत कार्यरत कार्यकर्त्यांची एक मोठी फळी होती
, ज्यांनी विद्यार्थी परिषदेला एक उंची दिली, संघटना नावारूपाला आणली. त्यामुळेच नंतर आलेल्या आणीबाणीविरुध्दच्या लढयात अभाविप अग्रोसर राहिली.


सन
1972मध्ये सर विलेपार्ले येथे राहावयास आले आणि अर्थात अखेरपर्यंत ते पार्ल्यात राहिले. पार्ल्याचे सामाजिक सांस्कृतिक जीवन सरांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वामुळे पावन झाले.


लोकमान्य सेवा संघ
, उत्कर्ष मंडळ यासारख्या संस्थांतून सरांनी सामाजिक कार्य केले. पिढया-पिढयांना विज्ञानाभिमुख, समाजाभिमुख केले. इतिहास परंपरेची डोळस ओळख करून दिली. केवळ तिरावर उभे राहून नुसत्या समाजकार्याच्या गप्पा न करता प्रत्यक्ष त्यात गाडून घेऊन एक activist म्हणून समाजकार्य करण्यास शिकविले.


पुढे
1988 साली सरांनी 'जनसेवा समिती, विलेपार्ले' नामक संस्था स्थापन केली. तिच्या माध्यमातूनही वेगवेगळया उपक्रमांतून तरुण विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र, इतिहास याचे धडे दिले. रक्तगट सूची बनविली, स्वा. वीर सावरकरांवर चित्रपट काढणाऱ्या गानतपस्वी सुधीर फडके यांच्या चित्रपटाला साहाय्य म्हणून बाबूजींचे स्वत:चे गायन, बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान व अनुप जलोट यांचे भजन असा कार्यक्रम पार्ल्यात यशस्वी केला. सरांनी जनसेवा समितीच्या माध्यमातून बाबूजींना सर्वतोपरी साहाय्य केले. पुढे याच जनसेवा समितीची रजत जयंती व सरांच्या वयाची पंचाहत्तरी असा मणिकांचन योग 2013 साली आला, तेव्हा विविध जनसेवा समितीने उपक्रम-कार्यक्रमांचे आयोजन केले व सरांची 'पुस्तक तुला' करून त्यांच्या ऋणातून अंशत: उतराई होण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला.


''31 डिसेंबरला तरुण चुकीच्या मार्गाने नववर्ष साजरे करतात, त्यांनी 'हे करू नये, ते करू नये' असे सांगण्यापेक्षा आपण त्यांच्यासमोर सकारात्मक पर्याय ठेवू या. आपल्या नववर्षाला गुढीपाडव्याला भव्य यात्रेचे आयेजन करू या. त्यामध्ये तरुणाईला सामावून घेऊ या'' असे केवळ सांगून सर थांबत नाहीत, तर ती यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात, मठ-मंदिरे पालथी घालतात. सोसायटयांमध्ये जाऊन आवाहन करतात. लहान-मोठया सांस्कृतिक संस्थांना भेटतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे, तर प्रचंड 'Leg work' करतात. त्यातूनच पार्ल्याची गुढीपाडवा यात्रा भव्यदिव्य होऊ लागली. सन 2017मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यात्रेला भेट दिली. त्यांच्या हस्ते सरांचा सत्कारही करण्यात आला. 'चिरपुरातन नित्यनूतन संस्कृती पार्ल्याने जपली आहे ते प्रा. मोहनरावांच्या मार्गदर्शनामुळेच!' असे गौरवोद्गागार मुख्यमंत्र्यांनी काढले.


मोहनराव चौपाटी येथील भारतीय विद्याभवनाच्या महाविद्यालयामधून पदार्थविज्ञान विषयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. विद्यार्थिप्रिय परंतु एक दरारा असलेले प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती. मोहनराव कडक शिस्तीचे भोक्ते होते. आधी पदार्थविज्ञान विषय गहन
, त्यातही अणुविज्ञान अधिक गहन. परंतु असा विषय सोपा करुन शिकविण्याची त्यांची विशिष्ट शैली होती.


मोहनरावांचे आणखी एक वैशिष्टय
, जे कोणालाही अचंबित करुन सोडत असे, ते म्हणजे फळयावर दोन्ही हातांनी एकाच वेळेस लिहिण्याची त्यांची अगाध कला! सर डाव्या व उजव्या हातात खडू घ्यायचे व एकाच वेळेस डाव्या हाताने फळयाच्या एका टोकापासून मध्यापर्यंत व उजव्या हाताने फळयाच्या मध्यापासून शेवटापर्यंत लिहिण्यास प्रारंभ करून पूर्ण फळाभर लिहीत जायचे.


मोहनरावांची
75 मराठी-इंग्लिश पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय मराठी-इंग्लिश वर्तमानपत्रे, मासिके यातूनही त्यांनी भरपूर लेखन केले आहे. क्लिष्ट गहन विज्ञान सोपे करून सांगण्याची सरांची हातोटी होती. छोटया मुलांना, 'टीन एजर्सना' समजेल उमजेल, विज्ञानाची गोडी लागेल असे त्यांचे विज्ञान लेखन आहे. उदाहरणार्थ काही शीर्षके पाहू - शालेय खगोलशास्त्र, गणिताच्या पाऊलखुणा, Space Shuttle, हा खेळ सावल्यांचा, नक्षत्रवेध, भरती ओहोटी, 'मला उत्तर हवंय' ही 11 पुस्तकांची मालिका विज्ञानाशी निगडित 1350 प्रश्न व त्यांची उत्तरे खूप लोकप्रिय झाली आहे.


विषय सोपाच नाही
, तर रोचक, रंजक करून सांगण्याची सरांची हातोटी विलक्षणच म्हणावी लागेल. एकच उदाहरण घेऊ. संस्कृत भाषा संगणकयोग्य आहे, हे वाक्य अनेकांनी अनेकदा सांगितले. पण माझ्यासारख्या सामान्यांना 'हे म्हणजे नक्की काय?' हे कळले नव्हते. एका प्रमुख मराठी वर्तमानपत्रात सरांचा या विषयीचा लेख प्रसिध्द झाला होता. त्या लेखात सर लिहितात - संस्कृतमध्ये मार्जार: मूषकम् खादति। हे वाक्य घ्या. आता गंमत पाहा - संस्कृतमध्ये या वाक्यातील तीन शब्द कोणत्याही क्रमाने लिहा, अर्थ तोच राहतो, बदलत नाही. मात्र इंग्लिशमध्ये बघा काय होते ते - Cat eats Mouse - जागा बदलल्यानंतर Mouse eats Cat होते, म्हणजे मांजर उंदराला खाते म्हणता म्हणता उंदीरच मांजराला खाऊ लागला. शिवाय या लेखाबरोबर सुंदर चित्र! उंदीर मोठ्ठा होऊन मांजराला खायला पाहतो आहे व मांजर प्रश्नार्थक चेहऱ्याने 'बाप रे, हे कसे घडले? अशा आविर्भावात. हे सर्व वाचल्यावर व 'ते' चित्र पाहिल्यावर माझ्यासारख्या सामान्याला संस्कृत भाषा, तिचे विभक्ती प्रत्यय, कर्ता-कर्म-क्रियापद वगैरे गोष्टी, ज्यामुळे ती संगणकाला योग्य आहे या वाक्याचा अर्थ समजला.


शतक शोधांचे हे सरांचे
700 पानी पुस्तक. या पुस्तकात विसाव्या शतकातील वैज्ञानिक घटनांचा माहितीपूर्ण लेखाजोखा आहे. वैज्ञानिक आकृत्या, (ग्रााफिक्स) चित्र, दुर्मीळ फोटोग्रााफ यांच्या साहाय्याने एकेका शोधाबद्दल सखोल माहिती दिली आहे. हा संदर्भग्रांथ म्हणजे मायमराठीच्या गळयातील एक मोठा दागिना आहे. एखाद्या विषयाचा तज्ज्ञ जाणकार असे सांगताना आपण अनेकदा ऐकले आहे की, अमुक अमुक पुस्तक या विषयातील उत्कृष्ट इंग्लिश पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद व्हायला हवा! त्याने मराठी भाषा समृध्द होईल! मित्रांनो, शतक शोधांचे या पुस्तकाबद्दल नेमके उलटे आहे. हे पुस्तक वाचून विज्ञान विषयाचा अभ्यासक म्हणतो, ''वा! अरे काय पुस्तक आहे! याचा इंग्लिश अनुवाद व्हायला हवा. त्याने इंग्लिश भाषा समृध्द होईल!'' इतके अप्रतिम पुस्तक एक Scientistच लिहू शकतो.


सरांची बहुतांशी सर्व पुस्तके राजहंस प्रकाशन व अश्वमेध प्रकाशन या प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत. त्या अभिषेक टाइपसेटर्स ऍंड पब्लिशर्स (अश्वमेधचेच दुसरे नाव)चे मंगेश वाडेकर सांगतात
, ''सरांचे पुस्तक करणे अगदी सोपे! आमचे कर्मचारी 'मला सरांचे काम द्या' म्हणून एकमेकांत भांडतात, कारण सरांचे हस्तलिखित अत्यंत शुध्द, सुवाच्य, सुंदर, कुठेही खाडाखोड नाही. 'सुरुवात', 'शेवट', परिच्छेद यांच्या जागा स्वच्छ-सहज समजतील अशा! सोबत चित्रे, रेखाचित्रे, फोटोग्रााफ असतील तर तेसुध्दा व्यवस्थित हस्तालिखितात योग्य जागी टाचणीने टोचून दिलेले. त्यांच्याही जागा सुनियोजित व सुयोग्य! अक्षर ही ठसठशीत! कुठेही चूक होण्यास मुळीच वाव नाही. हे हस्तलिखितच स्वत:च्या जागी एक कलाकृती असे!'' खरेच, पुस्तकाचे हस्तलिखित असो वा फिजिक्सच्या नोटस् असो, त्यात ही शिस्त अशी सुस्पष्ट ठासून भरलेली असे की जणू एखाद्या फर्ील्ड मार्शलने एखाद्या मोहिमेसाठी केलेली आपल्या सैन्याची व्यूहरचनाच!


मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात डॉ. अब्दुल कलाम (नंतरचे मा. राष्ट्रपती) यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने केलेल्या अणुचाचण्यांमुळे सरांचा ऊर अभिमानाने भरून आलेला सर्वांनी अनुभवला आहे. त्यानंतर
'कणाद से कलाम तक' अशा शीर्षकाचे त्यांचे व्याख्यान आख्ख्या महाराष्ट्रात गाजले. संघाच्या शिबिरांपासून शाळांच्या व्याख्यानमाला, महाविद्यालयांची विज्ञान प्रदर्शने, गावोगावच्या वाचनालयांचे वर्धापन दिन ते अगदी गणेशोत्सवापर्यंत सरांचे हे व्याख्यान अक्षरश: गावोगावी गाजले. भारतातील प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगती सांगणारे व अर्वाचित अण्वस्त्रसज्ज भारताची महती सांगणारे हे व्याख्यान सरांच्या 'डोळस' विज्ञानप्रेमाची व देशप्रेमाची साक्ष देणारे असे.

 

कधीकधी प्रश्न पडतो - मोहनरावांच्या व्यक्तिमत्त्वातील विज्ञानाचा उपासक, Scientist मोठा की कडक शिस्तीचा, आपल्या सैन्याला 'पुढे राहून' 'लीड' करणारा Field Marshal मोठा की राष्ट्राला परम वैभवाप्रत नेणारा तळमळीचा activist मोठा?

अशा Scientist-Field Marshal-activist सरांना आम्हा विद्यार्थ्यांचा साष्टांग दंडवत!

 


मिलिंद करमरकर

 

9867271323