जे होते, ते चांगल्यासाठी

विवेक मराठी    27-Nov-2019
Total Views |

 वाईट झाले हे खरे. पण वाईटातही चांगले असते. ते चांगले धरून अधिक चांगले करण्यासाठी वाटचाल करणे यातच पुरुषार्थ आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत
, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन! अखेरशेवटी मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा सफल झाली. महत्त्वाकांक्षेशिवाय राजकारण नाही आणि राजकारणाशिवाय राजकीय महत्त्वाकांक्षेला काही अर्थ नाही. समाजात कोणाही येऱ्यागबाळयाला वाटत असते की आपणही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, परंतु राजकारणाचा त्याला काही गंध नसतो, तसे उध्दव ठाकरे यांचे नाही.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा ही फार मोठी आकांक्षा आहे. जेवढी मोठी महत्त्वाकांक्षा, तेवढी मोठी त्याची किंमत द्यावी लागते. उध्दवजींनी ती दिली आहे. कुणीतरी मला म्हटले की, ''मातोश्रीची रया गेली, वाघाची मावशी झाली। हिंदुत्वाची झूल गेली, सेक्युलॅरिझमची माळ आली।'' मुख्यमंत्रिपदासाठी दिलेली ही किंमत लहान-सहान नाही. लक्ष्यच एवढे मोठे आहे की, ते प्राप्त करण्यासाठी तशीच किंमत द्यावी लागते. कुसुमाग्राजांची क्षमा मागून असे म्हणता येईल की, 'गाभारा सलामत तो मूर्ती पचास'. मुख्यमंत्रिपदाचा गाभारा महत्त्वाचा, बाकी सर्व गोष्टी वारा फिरेल तशा पाठ फिरवून मिळविता येतील.

मी लोककथांचे वाचन भरपूर करतो. मला त्या खूप आवडतात. कारण त्या अशा काही व्यवहारिक शहाणपण शिकवितात, जे कुठल्याही ग्रंथात किंवा तत्त्वज्ञानात मिळत नाहीत. हॅन्स ख्रिश्चन ऍन्डरसन हे लोककथांचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक होते. लोककथांच्या संग्रहाची त्यांची पुस्तके फार प्रसिध्द आहेत. त्यातील ही एक कथा. कथेचे इंग्लिश शीर्षक आहे, 'एम्परर्स न्यू क्लोद्स' म्हणजे सम्राटाचा नवीन शाही पोशाख.

एक राजा होता. रोज नवीन कपडे घालण्याचा त्याला भारी षोक होता. वेगवेगळया नवनवीन आकारांचे कपडे तो घालत असे, त्याचे त्याला वेडच होते, असे म्हणा ना! माझ्यासारखाच मीच! हे त्याला सदोदित दाखवून द्यायचे असे. एके दिवशी त्याच्या राज्यात दोन ठग आले. ते राजाला भेटले. राजाला ते म्हणाले, ''आम्ही विणकर आहोत. आम्ही वस्त्रे तयार करतो. ती इतकी तलम असतातत की, सामान्यांच्या डोळयांनी ती दिसत नाहीत. त्यांचे रंग, त्यांचे आकार याची तुलना करता येतील, अशी वस्त्रे सापडणार नाहीत. या वस्त्रांचा एक गुणधर्म असा आहे की, जो अत्यंत प्रामाणिक आहे, सत्यवादी आहे, पाप करत नाही, त्यालाच ही वस्त्रे दिसतात. हे गुण नसतील, त्यांना ही वस्त्रे दिसत नाहीत.''

 

राजाने विचार केला की, हा चांगला उपाय आहे. या वस्त्रांमुळे माझे कोण अधिकारी भ्रष्ट आहेत, पापी आहेत, हे मला समजेल. म्हणून त्याने त्या दोन ठग विणकरांना वस्त्रे बनविण्यासाठी खूप सोने दिले आणि खूप रेशीम दिले. त्यांचे काम नीट होण्यासाठी त्यांना सरकारी जागा दिली. या जागेवर हे दोन विणकर माग घेऊन दिवसभर काम करत बसत. म्हणजे नुसताच माग चालवत बसत. वस्त्रासाठी धागा वगैरे काही बनत नसे. लोक उत्सुकतेने त्यांचे काम बघायला येत. त्यांना एवढेच दिसे की, माग चालू आहे, परंतु धाग्याचा किंवा वस्त्राचा मागमूसही कुठे नाही. इथे काहीच होत नाही, असे ते म्हणू शकत नव्हते. असे म्हटले तर आपण अप्रामाणिक, राजाशी एकनिष्ठ नाही, पापी आहोत, असा त्याचा अर्थ होईल. म्हणून ते म्हणत, ''व्वा, छान काम चालू आहे.''

 

एक महिना झाल्यानंतर राजाने आपल्या मंत्र्यांना काम किती झाले आहे, हे बघायला पाठविले. शून्य काम झालेले असल्यामुळे त्यांना ना वस्त्र दिसले, ना धागे दिसले. परंतु 'इथे काहीच नाही' हे म्हणण्याची कुणाची हिम्मत नव्हती. आपण पापी ठरण्याची भीती होती.

 

काही दिवसांनंतर विणकरांनी राजाला निरोप पाठविला. ''आपण राजपोशाख घालण्यासाठी या.'' राजा तेथे गेला, त्यालाही वस्त्रे दिसली नाहीत. तोदेखील कसे म्हणणार मला दिसत नाही. मी असे म्हटले तर सर्व प्रजेसमोर मी अप्रामाणिक ठरेन. विणकर त्याला म्हणाले, ''आपली वस्त्रे काढा आणि ही नवीन वस्त्रे घाला.'' राजाने प्रथम मुकुट काढला, वरचा झगा काढला, अंतर्वस्त्रे काढली आणि शेवटी आपल्या नैसर्गिक स्थितीत विणकरांसमोर उभे राहिला. विणकरांनी त्याला न विणलेली वस्त्रे घालण्याचा आभास निर्माण केला. वस्त्राची अपार स्तुती केली. वस्त्रात किती रंग गुंफलेले आहेत, हे सांगितले. शेवटी राजाची त्याच अवस्थेत शाही मिरवणूक निघाली. लोक जयजयकार करत होते. न घातलेल्या वस्त्रांची स्तुती करत होते. तेव्हा एक सात-आठ वर्षांचा मुलगा आपल्या आईला म्हणाला, ''आई! पण राजाच्या अंगावर एकही वस्त्र नाही. राजा नागडा आहे.'' हळूहळू सर्व समुदायात ही कुजबुज सुरू झाली. कथा येथे संपते. ज्या कुणाला या कथेचा जो काही अर्थ काढायचा आहे, तो त्याने काढावा. मुख्यमंत्रिपदासाठी कोणती कोणती वस्त्रे काढून ठेवावी लागली, याची गिनती माझ्यापेक्षा सुज्ञ वाचकच अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.

 

आता दुसऱ्या मुद्दयाकडे वळू या. आज ज्या कुणी युतीसाठी मतदान केले, ते मनातून खूपच अस्वस्थ झालेले आहेत. आपण कोणता जनादेश दिला आणि त्याचे परिणाम काय झाले आहेत, हे बघून तो मनातूनच खूप हादरला आहे. त्याचा एक प्रतिध्वनी सांगायचा तर एकाने मला व्हॉटस् ऍपवर संदेश पाठविला की, 'निवडणूक आयोगाला विनंती करू या, बोटाला शाई लावण्याऐवजी चुना लावा.' त्याला हे म्हणायचे आहे की, आमच्या भावनांना चुना लावला गेला. आपली फसवणूक झाली, अशी त्याची भावना झाली आहे.

 


भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत, ते एका क्षणी उत्साहात होते आणि दुसऱ्या क्षणी त्यांचा उत्साह मावळला आणि ते खूप हिरमुसले झाले. हे काय घडले? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. यश मिळाला की उत्साह येणार आणि अपयश पदरी आले की निरुत्साह निर्माण होणार, हे स्वाभाविक आहे. अशा वेळी असे झाले असते तर, तसे केले नसते तर, अजित पवारांवर विश्वास कशासाठी ठेवला, शिवसेनेशी जुळवून का नाही घेतले, वगैरे प्रश्नांची चर्चा सुरू होते. परंतु हा सर्व भूतकाळ झालेला आहे. भूतकाळाची चर्चा वर्तमानकाळात करून भविष्य घडविता येत नाही. भविष्य घडविण्यासाठी वर्तमानकाळात प्रयत्नांची पराकाष्ठा करून श्रम करावे लागतात. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्यकाळ घडविण्यासाठी कुणालाही रोखता येत नाही. म्हणून जे झाले ते झाले, त्याचा शोक करण्यात कसलेही शहाणपण नाही. आणि अशा वेळी, 'जे होते ते चांगल्यासाठीच' हा सनातन विचार मनात ठेवून वाटचाल करायची असते.

 

 भाजपाचे दोन कट्टर विरोधक आणि भाजपाला घरात राहून विरोध करणारा तिसरा पक्ष असे तिघे एकत्र आलेले आहेत. संसदीय राजकारणाच्या भाषेत सांगायचे तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची सर्व जागा - स्पेस - भाजपाला न मागताच मिळालेली आहे. संसदीय राजकारणात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोघेही आपआपल्या पध्दतीने सरकार चालवीत असतात. सत्ताधारी पक्ष निर्णय घेतो आणि विरोधी पक्ष हा निर्णय जनहिताचा आहे की नाही, यावर करडी नजर ठेवून असतो. हे सर्व काम आता एकटया भाजपाला करावे लागणार आहे. नियतीने दिलेली ही महासंधी आहे. यातून नवनेतृत्व निर्माण होते. संघर्षशील नेतृत्तव निर्माण होते आणि त्यातूनच जननेता उदयाला येत असतो. म्हणून या तिन्ही पक्षांचे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आभार मानले पाहिजेत. 


भाजपाची स्वतंत्र ओळख भाजपाच्या विचारधारेत आहे. ही विचारधारा हिंदूपणाची विचारधारा आहे. महाराष्ट्रात आता तिला कुणीही प्रतिस्पर्धी उरला नाही. राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांत हिंदूपणाची स्पेस भाजपाने व्यापली आहे. तिथे कुणी भागीदार नाही. ही भागीदारी आता संपली. जे होते ते चांगल्यासाठी, ते अशा अर्थाने.

 

सत्तेच्या राजकाणातील आणि सत्तासुखाच्या राजकारणातील शिवसेनेचे दोन्ही साथीदार कसलेले पहिलवान आहेत. त्यांच्या राजवटींचे अनुभव महाराष्ट्राने भोगलेले आहेत. पुन्हा ते भोग महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत. अशा वेळी आपली वेगळी प्रतिमा आणि वेगळी ओळख अधिक तेजस्वी करण्याचे काम नियतीने आपल्यावर टाकलेले आहे. या वेळी प्रत्येक जनप्रतिनिधीने जनतेशी जिवंत संपर्क ठेवला पाहिजे. जो जनप्रतिनिधी घरी बसला, त्याचा मतदारसंघ झोपला. जो जनप्रतिनिधी जनतेत रमला, तोचि भला, हे मानले पाहिजे. जे होते, ते भल्यासाठीच, ते अशा अर्थाने आहे.
  

एका लोककथेत हा आशय फार सुंदररीत्या सांगितला आहे. एक राजा होता. तो तलवार युध्दाचा सराव करीत होता. त्याला घाव लागून त्याची करंगळी कापली गेली. समोरच सेनापती होता. तो म्हणाला, ''महाराज, जे होते, ते भल्यासाठी होते.'' राजाला दुःख झाले होते, जखमेतून रक्त येत होते आणि सेनापती म्हणतो की, जे होते, ते भल्यासाठी होते. राजाने शिपायांना आज्ञा केली. सेनापतीला कैद केले आणि तुरुंगात पाठवून दिले.

असेच काही महिने गेले. राजा शिकारीला गेला. जंगलात वाट चुकला. त्याला रानटी माणसांनी पकडले. त्याला देवीसमोर बळी देण्याचा निर्णय घेतला. त्या जमातीच्या पुजाऱ्याने सांगितले की, ज्याचा बळी द्यायचा आहे, तो अव्यंग आहे हे बघून घ्या. त्याचे सर्व अवयव शाबूत असले पाहिजेत. एक जरी अवयव नसेल तरी बळी देता येणार नाही. लोकांच्या लक्षात आले की, राजाला करंगळी नाही. पुजारी म्हणाला की, असा बळी चालणार नाही. राजाला सोडून देण्यात आले. तो आपल्या महाली आला. सेनापतीला कारागृहातून मुक्त केले. त्याची क्षमा मागितली आणि सांगितले की, ''तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरे झाले. करंगळी गेल्यामुळे माझे प्राण वाचले. पण माझ्या हे लक्षात आले नाही की, तुम्हाला कैदेत ठेवल्यामुळे तुमचे कसे भले झाले?''

सेनापती म्हणाला, ''महाराज, मी सेनापती असल्यामुळे मी तुमच्याबरोबर शिकारीला आलो असतो. तुमच्याबरोबर मलाही लोकांनी पकडले असते. मी अव्यंग असल्यामुळे, तुमच्याऐवजी त्यांनी माझा बळी दिला असता. म्हणून जे होते, ते भल्यासाठी.''

 

वाईट झाले हे खरे. पण वाईटातही चांगले असते. ते चांगले धरून अधिक चांगले करण्यासाठी वाटचाल करणे यातच पुरुषार्थ आहे.

 

vivekedit@gmail.com