कृतार्थ सेवाव्रती गंगाराम जानू आवारी

विवेक मराठी    28-Nov-2019
Total Views |

**लक्ष्मण ढवळू टोपले***

वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रांताचे माजी अध्यक्ष (सन 2001 ते 2004) दिवंगत गंगाराम जानू आवारी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त वनबांधवांसाठी त्यांनी केलेल्या सेवा कार्याचा वेध घेणारा लेख.


 

ती रम्य, शुभ, दि. 24 डिसेंबर 2001ची सकाळची वेळ, मी माझ्या प्रशालेच्या कार्यालयात बसलो होतो. निवांतपणे, आलेल्या पत्रांचे वाचन करून, पत्रांच्या कोऱ्या बाजूला आवश्यक ती टिपणे, मुद्दे, सूचना लिहीत आणि जाणाऱ्या पत्रांचे वाचन करून स्वाक्षऱ्या करीत, मी या कामात गढलो होतो. इतक्यात 'येऊ का आत?'च्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांताचे तत्कालीन संघटन मंत्री भाई उपाले सुहास्य मुद्रेने कक्षात प्रवेश करते झाले. त्यांच्याबरोबर, अंगात स्वच्छ पांढरा सदरा आणि त्यावर आखूड काळे जाकीट घातलेल्या, धोतर नेसलेल्या आणि डोक्यावर किंचित तिरकी अशी पांढरी टोपी घातलेल्या, तांबूस काळसर वर्णाच्या वयोवृध्द व्यक्तीने प्रवेश केला. मी त्यांना बसण्याची विनंती केली. बसता बसताच भाईंनी त्या व्यक्तीची ओळख करून दिली. ''हे आवारी गुरुजी, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आहेत.'' आणि माझ्याकडे वळून त्यांनी माझी ओळख करून दिली. ''हे प्राचार्य लक्ष्मण टोपले.'' आम्ही एकमेकांना अभिवादन केले.

माझ्यासमोर बसलेल्या आवारी गुरुजींमध्ये मला साध्या, सरळ, नीटनेटक्या, निष्पाप, सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडत होते. त्यांनी टेबलावरचे वर्तमानपत्र उचलले, चाळले आणि ते वाचायला लागले. मला वाटले डोळयांना चश्मा लावून अन् अगदी डोळयांजवळ पेपर घेऊन वाचतील. पण तसे न करता ते सर्वसामान्य नेहमीच्या अंतरावरून वाचालया लागल्यावर मला आश्चर्य वाटले. मी त्यांना विचारले, ''आपण आपल्या डोळयांना 'कॉन्टॅक्ट लेन्स' बसविले आहेत का?'' ते म्हणाले, ''नाही, माझे डोळे आणि माझी नजर आजही चांगली शाबूत आहे. मी आतापर्यंत चश्मा वापरला नाही अन् पुढेही वापरण्याची गरज लागणार नाही.'' मला स्वत:ला चश्म्याशिवाय लिहा-वाचायला जमत नाही. चश्म्याशिवाय वाचन करीत असलेल्या श्रीगुरुजींचा मला क्षणभर हेवाच वाटला. ''गुरुजी वनौषधींचा उपयोग करतात. वनौषधींची त्यांना चांगली माहिती आहे'' असे भाईंनी सांगितले. भाई म्हणाले, ''आजमितीला गुरुजींचे वय एेंशीच्या घरात आहे. पण त्यांच्या प्रकृतीची तक्रार आजपर्यंत नाही. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांचे दात मजबूत आहेत. डोळे-नजर शाबूत आहे आणि कानही सक्षम आहेत. गुरुजी सतत वाचत असतात. माहिती गोळा करीत असतात'' असेही ते म्हणाले. भाईंच्या बोलण्याचा प्रत्यय लगेचच आला. गुरुजी म्हणाले, ''1901पासूनची भारताच्या लोकसंख्येची आकडेवारी मी देऊ काय?'' असे म्हणून दशवर्षीय लोकसंख्येचा आतापर्यंतचा तक्ताच त्यांनी मला आखीव, रेखीव सुवाच्य हस्ताक्षरात लिहून दिला.

ही केवळ सदिच्छा भेट होती. या भेटीत भाई उपाले यांच्यामुळे आवारी गुरुजींशी परिचय झाला आणि त्यांचा देदीप्यमान पैलूही समजला.

जनजाती समाजाच्या संस्कृतीच्या आणि परंपरेच्या दृष्टीने वैदिक परंपरेशी त्यांचा थेट संबंध असताना, तसेच त्यांच्या देवदेवता, सणवार, नाचगाणी, रितीरिवाज वगैरे गोष्टींतून हिंदू संस्कृतीचेच दर्शन घडत असताना हा आदिवासी समाज म्हणजेच अनुसूचित जनजाती या हिंदू नाहीत, अशा प्रकारचा विषारी, खोडसाळ प्रचार करून त्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरापासून तोडण्याचा कुटील डाव काही अराष्ट्रीय यंत्रणा खेळत असतात. त्यांच्या अपप्रचाराच्या आहारी जाऊन तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने परिपत्रक (क्रमांक एस.टी.सी. 1099/प्र.कृ. 31/का-10 दि. 12 जानेवारी 2000) काढून आदिवासींना/अनुसूचित जमातींच्या व्यक्तींना 'हिंदू' शब्द वगळून जातीचे दाखले देण्यात यावेत असा आदेश काढला. अर्थातच, हा अध्यादेश धोकादायक अन् धक्कादायक होता. चीड आणणारा होता. हा अध्यादेश मागे घेण्यात यावा म्हणून काही आदिवासी संघटनांनी ठिकठिकाणी चळवळी केल्या. पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. 'शासनाचा हा आदेश कसा चुकीचा आहे' हे ठिकठिकाणी ठासून सांगण्यात आले. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांतानेही या आदेशाविरुध्द चळवळी केल्या. जिल्ह्याजिल्ह्यातून निदर्शने केली. प्रस्ताव पाठविले. त्याचे अध्वर्यू आवारी गुरुजी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शासनाला भेटले. त्यांच्या समवेत माजी मंत्री भाई गिरकर, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांत महिला सहप्रमुख माताई पवार, हितरक्षा प्रमुख मेहरसिंग पावरा, प्रांत संघटन मंत्री भाई उपाले, सहसंघटन मंत्री रामदास गावीत, तसेच कोपुर्लीचे रामदास वाघेरे, पेठचे छबिलदास पोरटे, कर्जतचे श्रीराम शेडगे प्रभृती सहभागी झाले होते. या शिष्टमंडळाने 'हा आदेश कसा चुकीचा आहे' हे शासनाच्या निदर्शनास आणून देऊन/आदेश मागे घेण्याची विनंती केली. शेवटी जनमताच्या रेटयाने शासनाने दि. 23 मे 2000 रोजी काढलेल्या परिपत्रकान्वये हा आदेश मागे घेतला आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना त्यांच्या जातीपुढे 'हिंदू' हा शब्द लावून दाखले निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू केली. या यशाचे मानकरी आवारी गुरुजी आमच्यासमोर बसले होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच अनुसूचित जनजातीवरील अन्याय दूर झाला होता.

 

आवारी गुरुजींचे नाव ऐकून होतो, पण त्यांच्या सहवासात राहण्याचे, त्यांचे कार्य पाहण्याचे, त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य मात्र मला मिळाले नव्हते. ते दूरस्थ होते. विशेष परिचयही नव्हता. या भेटीने तो परिचय दृढ झाला.

भारतीय जनजाती संस्कृती रक्षा मंचातर्फे दि. 89 फेब्रुवारी 2003 या दोन दिवसांत नंदुरबार येथे हिंदू आदिवासी अस्मिता संमेलन संपन्न झाले. या संमेलनाला 'अध्यक्ष' म्हणून जाण्याचा मला सुयोग आला.

दीपप्रज्वलन करून आवारी गुरुजींच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. त्या उद्घाटनप्रसंगी भाषण करताना ते म्हणाले, ''आदिवासींचा प्रमुख देव बडा देव, महादेव, भगवान श्री शंकर आहे. महादेवाची अर्धांगिनी पार्वती माता ही जगाची माता आहे. अशी आदिवासींची श्रध्दा आहे, भक्ती आहे. सर्वत्र महादेव-पार्वतीची आराधना करतात. त्यांना पूजतात. हिंदूंचा हाच प्रमुख देव आहे. असे असताना 'आदिवासी हिंदू नाहीत' हे कोणत्या आधारावर सांगितले जात आहे? विदेशी शक्तींच्या आहारी जाऊन काही संघटना असा अपप्रचार करीत असतात. त्यांचा हा अराष्ट्रीय बेत उधळून लावला पाहिजे.'' असे परखड विचार त्या वेळी त्यांनी प्रतिपादित केले. शांत, संयत पण ठामपणे त्यांनी आपले विचार व्यक्त केले होते.

संमेलनाच्या सांगता समारंभानंतर नाशिक व ठाणे जिल्ह्यातील प्रतिनिधी नियोजित वाहनातून एकाच मार्गाने परतीच्या प्रवासाला लागले. या प्रतिनिधींसह मी आणि गुरुजी होते. नंदुरबारहून नाशिकला जाताजाता रात्रीच्या जेवणाची वेळ टळून जाईल म्हणून रस्त्यावरच्या एका धाब्यावर आम्ही साऱ्यांनी रात्रीचे जेवण घेतले. मला त्या वेळी या सहभोजनाचा आणि सहवासाचा लाभ झाला.

गंगाराम जानू आवारी गुरुजींचा जन्म दि. 5 जुलै 1919 रोजी पेठ तालुक्यातील (जि. नाशिक) बोरवट गावी झाला. घरात अठराविशे दारिद्रय होते. पण कुटुंब भक्तिमार्गी. रोज रात्री घरात 'रामविजय कथासार' वाचला जात असे. तो ऐकल्याशिवाय त्यांचे वडील आणि घरातील मंडळी रात्रीचे जेवण घेत नसत. पण पोथी वाचणारे सद्गृहस्थ म्हातारे झाले होते. पोथी वाचायला त्यामुळे मर्यादा पडत होत्या. आपण स्वत: आणि गावकरी लवकरच पोथीला अंतरणार हे ओळखून त्यांच्या वडिलांनी गंगारामचे नाव शाळेत घातले आणि 3 वर्षांनंतर तो रामविजय, भक्तिविजय, हरिविजय, पांडवप्रताप यासारखी कथासारांची पुस्तके वाचू लागला. वाचनाची अडचण दूर झाली. त्या भागात कथा श्रवण करण्याचा लाभ गावकऱ्यांना झाला.

गुरुजींचे तिसरीपर्यंतचे शिक्षण गावीच बोरवट येथे झाले. पेठ येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डोंगरी मुलांच्या वसतिगृहात राहून त्यांनी पुढील शिक्षण घेतले. तिथे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन 1936मध्ये ते व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या भागात पुढील शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे एक वर्ष गावठी शाळेत आणि नंतर 1936-1942 या काळात स्कूल बोर्डाच्या माळेगाव, शिरसगाव, बोरवट, जातेगाव या शाळांत शिक्षक म्हणून काम केले.

 

त्या वेळी म. गांधीजींच्या प्रेरणेने ब्रिटिश राजवटीविरुध्द काँग्रोसची चळवळ जोरात चालू होती. शिक्षक म्हणून कार्य करीत असताना ते बागलाण तालुक्यातील थोर समाजसेवक दादासाहेब बीडकर आणि दैनिक गावकरीचे संस्थापक आणि संपादक दादासाहेब पोतनीस, तसेच देशभक्त अमृता पाटील यांच्या संपर्कात आले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असूनही त्यांनी आपल्या मास्तरकीचा राजीनामा दिला. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून ते काँग्रोसच्या चळवळीत सहभागी झाले आणि पेठ तालुका काँग्रेस कमिटीचा सेक्रेटरी आणि डांग सेवा मंडळाचा कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिका गुरुजी करू लागले.

1942च्या 'चलेजाव' चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी प.पू. ठक्करबाप्पांचा सल्ला घेतला. याच काळात पेठ तालुक्यात फार मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा ठक्करबाप्पा त्यांना म्हणाले, ''चळवळीत जाणे वाईट नाही, पण हे दुष्काळी कामही राष्ट्रीय चळवळी इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या समाजाची जर आपणाकडून सेवा घडते, तर ते ठीक होईल.'' प.पू. बाप्पांच्या प्रेरणेने दुष्काळ निवारण कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. सामाजिक व राजकीय अशा दोन्ही प्रकारचा 'कार्यकर्ता' म्हणून त्यांनी काम केले. 1950पर्यंत ते पेठ तालुका काँग्रोस कमिटीचे सेक्रेटरी होते.

 

आदिवासी मुलांना शिक्षण घेऊन त्यांना सुजाण करणे, आदिवासींच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करणे, त्यांच्यावरील होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचे निवारण करावे यासाठी ठक्करबाप्पांच्या प्रेरणेने 23 जून 1937 रोजी डांग सेवा मंडळाची स्थापना झाली होती. या मंडळाच्या कार्यात गुरुजी सहभागी झाले.

मंडळाने 1944-46 या काळात पेठ तालुक्यातील गावे व पाडे मिळून 350 वस्त्यांची पाहणी केली. तेव्हा संपूर्ण तालुक्यात फक्त 19 शाळा असल्याचे दिसून आले. मंडळाने पेठ तालुक्यात 45 व्हालंटरी शाळा काढल्या. शाळांचे सुपरवायझर (पर्यवेक्षक) म्हणून मंडळाने गुरुजींवर काम सोपविले. पायी फिरून त्यांना हे काम करावे लागे. त्यामुळे त्यांना सर्व तालुक्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. ते लोकांच्या दैनंदिन जीवनाची माहिती मिळवू लागले.

 

आदिवासी परिसरात सामाजिक कार्यासाठी दीर्घकाळ राहिल्यामुळे गुरुजींना आणि त्यांचे सहकारी गोपालसिंग परदेशी यांना जनजातींच्या सामाजिक, धार्मिक चालीरिती, वृक्ष-वनस्पतींचे प्रकार, त्यांच्या पारंपरिक औषधोपचार पध्दती, त्यांच्या श्रध्दा आणि समजुती, लोककला, लोकगीते यांचा अभ्यास करण्याची मोठी संधी मिळाली. गुरुजींचा एक विद्यार्थी रामा सापटे याने त्यांना जंगलांतील वनस्पती व त्यांचे विविध रोगांवर उपयोग याची माहिती दिली. शिष्यच गुरूंचा गुरू झाला. गुरु-शिष्याची अशी ही आगळीवेगळी जोडी जमली होती! नंतर गुरुजींनी स्वत:च जंगलात हिंडून वेगवेगळया वनस्पतींची माहिती गोळा केली. आजारी आदिवासींवर त्यांचा उपयोग केला. अशा रितीने त्यांच्या सेवा यज्ञाला सुरुवात झाली.

त्यांनी केलेल्या परिसर अभ्यासातून सर्वोदय योजनेच्या सहकार्याने 1957मध्ये 'आदिवासींची लोकगीते' आणि 1985 साली 'आदिवासींचे परंपरागत उपचार' ही दोन पुस्तके प्रसिध्द झाली. वनौषधींच्या साहाय्याने उपचार पध्दती परंपरागत असली, तरी आपल्याला माहीत असलेले ज्ञान स्वत:च्या मुलालाही न देण्याची कंजुषी आदिवासी जाणकारात-भगतात असल्यामुळे गुरुजींनी त्यांचा विश्वास संपादन करून मोठया कौशल्याने ज्ञान मिळविले, हे विशेष उल्लेखनीय आहे. 'औषधे रानावनातली' हे त्यांचे दुसरे पुस्तक नाशिक आयुर्वेद सेवा संघाच्या सहयोगाने 2002मध्ये प्रसिध्द झाले. या पुस्तकात सुमारे 650 वनौषधींच्या उपयोगाची सखोल माहिती दिलेली आहे. गुरुजींनी पेठ, सुरगणा, धरमपूर भागातील कोकणा, कातकरी, वारली, महादेव कोळी जनजातीतील प्रचलित असलेल्या 3000 शब्दांचा कोश तयार केला. सेवानिवृत्त प्राचार्य भा.व्यं. गिरिधारी सरांनी त्यांचे संपादन केले असून हा कोकणा जनजाती शब्दकोश प्रसिध्द झाला आहे.

कशेळे, ता. कर्जत येथे वनौषधी संबंधाने पाठशाळा निघाली. या संस्थेचे ते आजीव सल्लागार होते. शिवाय भारतात आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या सेवाभावी संस्था आहेत, त्यातील लोकस्वास्थ्य परंपरा संवर्धन समिती कोइमतूरने (तामिळनाडू) संस्थेचा 'पहिला अध्यक्ष' म्हणून पद देऊन त्यांचा सन्मान केला.

संस्थनांच्या विलीनीकरणापूर्वी धरमपूर संस्थानात डांग सेवा मंडळाने 35 शाळा चालविल्या होत्या. त्या शाळांचेही गुरुजी पर्यवेक्षक होते. या निमित्ताने त्यांना या संस्थानातील घनदाट अरण्यातील वाघांचे, जुलमी नोकरशाहीचे, पारशी शेठ-सावकारांचे साम्राज्य पाहावयास मिळाले. तेथे डांग सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि आवारी गुरुजींना राजा आणि नोकरशाही विरुध्द असंतोष निर्मितीचे कार्य करावे लागले. प्रजा निरक्षर होती. त्यामुळे 10 जून 1948 रोजी संस्थान विलिनीकरण मोहिमेत हे राज्य भारतीय संघराज्यात कसे, केव्हा व का विलीन झाले याचा आदिवासी प्रजेला पत्तादेखील लागला नाही. संस्थान विलीनीकरणानंतर 2-4 वर्षांतच पारशी लोकांचे साम्राज्यही लयाला गेले. पारशी लोक आणि सरकारी नोकरवर्ग विरुध्द आवारी गुरुजी असे समीकरण या काळात तयार झालेले होते. तरीसुध्दा प्रजेला चिथावून देऊन अनुचित प्रकार घडू नयेत याची खबरदारी आवारी गुरुजींसह अन्य कार्यकर्त्यांनी घेतलेली होती.

 

1960 ते 1966पर्यंत पेठ तालुक्यात सर्वोदय योजना राबविण्याची संधी गुरुजींना मिळाली. सर्वोदय योजनेच्या कामाद्वारे जनतेच्या सर्वांगीण सुधारणांचा एक आराखडाच त्यांनी आखला. 100 इंच पाऊस पडणाऱ्या प्रदेशात शेतीच्या बांध-बंदिस्तीचे प्रयोग, बांध टिकवण्याची शाश्वती नव्हती म्हणून लागू नव्हते. म्हणून गुरुजींनी सर्वोदय योजनेद्वारे ही कामे प्रात्यक्षिक स्वरूपात यशस्वी करून दाखविल्यानंतर या भागालाही बांधबंदिस्ती योजना शासनाने मान्य केली. या बरोबरच ओहोळ बांधणी, साकव (पायपूल) जपानी पध्दतीची भातशेती, सहकारी संस्था, जंगल कामगार सहकारी संस्था, कर्ज सोसायटया, खरेदी-विक्री संघ, सहकारी बँका, पाटबंधारे इ. सहकारी योजनाही या भागात मान्य झाल्या. अशा रितीने आवारी गुरुजींच्या कामातून पेठ तालुक्यात विकासाचा पाया घातला गेला.

गुरुजींचे हे कार्य शासनाच्या लक्षात आल्यावर सर्वार्थाने उपेक्षित भागातील आणि अगदी सामान्य व अल्पशिक्षित असलेल्या गुरुजींना 1974मध्ये 'दलित मित्र', 1986मध्ये 'आदिवासी सेवक' हे पुरस्कार देऊन, तसेच 1988मध्ये 'स्वातंत्र्यसैनिक' म्हणून मान्यता देऊन त्यांचा गौरव केला.

 

त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. 1984पासून वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांताच्या कार्यात सहभागी झाले. 6 वर्षे ते महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष होते. 2001पासून महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष म्हणून अखेरपर्यंत सेवारत होते.

सामाजिक कार्यकर्त्याला सरकार आणि जनता यामधला दुवा म्हणून आपले कार्य करावयाचे असते. या वेळी संघर्ष, विरोध टाळायचा असतो. मतपरिवर्तनाचे काम करणे आवश्यक असते. आवारी गुरुजींनी आपले स्वत्व न ढळू देता समाजप्रवृत्ती आणि प्रकृती बिघडू न देता, प्रसंगी उठाव करून पण उठावाला अनिष्ट वळण न देता, झाले गेले विसरून समाजात बंधुभाव प्रस्थापित करण्याचे मोलाचे कार्य केले.

 

गुरुजींचे व्यक्तिमत्त्व चारचौघांसारखेच असले, तरी ते अष्टपैलू होते. वाढत्या वयाची चिन्हे शरीरावर उमटू लागली होती. पण त्यांच्या कामाचा उत्साह वयाच्या ब्याएेंशीव्या वर्षीदेखील दांडगा होता. त्यांचे निरपेक्ष सेवा कार्य वाखाणण्यासारखे होते. कुठल्याही आर्थिक वा मानापमानाची अपेक्षा न ठेवता त्यांनी आपले सेवा कार्य अविरत चालू ठेवले. त्यांचा सेवायज्ञ पाच दशकांपासून चालू होता. त्या वयातही ते पेठ, सुरगणा, हरसूल भागात सतत हिंडत असत.

कामानिमित्त आदिवासी भागातून हिंडत असताना त्यांच्या लक्षात आले की, काही परधर्मीय गट आदिवासींच्या गरिबीचा, त्यांच्या भोळेपणाचा, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतर करायला, तसेच राष्ट्रद्रोही कारवाया करण्यास प्रोत्साहन देत आहेत. हे पाहून त्यांचा राष्ट्रप्रेमी आत्मा खवळून उठला होता. त्या वेळी कल्याण आश्रमाने श्रध्दाजागृती समितीची स्थापना करून गुरुजींना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले (1997-98). त्यांनी धर्मांतरविरोधी मोहीम हाती घेऊन नेटाने चालविली आणि धर्मविरोधी प्रवृत्तींना आळा घातला.

 

गुरुजींच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. 1971मध्ये पु.भा. भावे हा पुरस्कार, तसेच नंदिनी, जीवनव्रती, दै. देशदूतचा गुणवंत पुरस्कार, तसेच वनवासी कल्याण आश्रमाने 26 जून 2001मध्ये वनयोगी पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. रा.स्व. संघ डॉ. हेडगेवार सेवा समितीतर्फे दि. 22 जून 2003 रोजी नंदुरबार येथे 'डॉ. हेडगेवार सेवा पुरस्कार' देऊन त्यांना त्यांच्या सेवेची पावतीच दिली.

दि. 8 जुलै 2003 रोजी सायंकाळी दूरध्वनी खणखणला. मी रिसीव्हर कानाला लावला. ''हॅलो!'' केले. फोन नाशिकहून कृषीनगर वनवासी कल्याण आश्रम प्रांत कार्यालयातून आला होता. बोलणाऱ्या व्यक्तीच्या आवाजात कंप जाणवत होता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कुणीतरी पलीकडून सांगत होते. ''वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष मा. गंगाराम जानू आवारी गुरुजी यांचे आज दुपारी 1.40 वाजता नाशिक येथील त्यांच्या मुलाच्या घरी निधन झाले.'' मी सुन्न झालो. गुरुजी गेलेऽऽ!

गेल्या कित्येक दिवसांपासून ते घशाच्या कॅन्सरने आजारी असल्याचे मला कळले होते. त्यांनी टाटा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचे नाकारले होते. ऍलोपॅथीपेक्षा त्यांचा आयुर्वेदावर गाढा विश्वास होता. पारंपरिक वनौषधीने उपचार करण्याचे त्यांनी ठरविले होते. आयुष्याची अखेर वेदनारहित जावी अशी त्यांची इच्छा होती. स्वोपचाराने बरे होऊन यापुढेही ते आपल्यात राहतील, त्यांच्या नेतृत्वाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला मिळत राहील अशी वेडी आशा वाटत होती. त्यांच्या आयुष्याची दोरी एवढया लवकर तुटेल असे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. पण आज मा. गुरुजींनी त्यांच्या नश्वर शरीराचा त्याग केला होता. ते अनंतात विलीन झाले. शके 1925, आषाढ शु. 9 रोजी कृतार्थपणे त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांना विनम्र आदरांजली.