तीन पायांची शर्यत

विवेक मराठी    29-Nov-2019
Total Views |

 या प्रयोगात परस्परांचे पाय खेचले जाण्याची, एकमेकांची राजकीय कोंडी करून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले, तरीही महाराष्ट्राच्या हितासाठी सुरू झालेल्या या तीन पायांच्या शर्यतीला मनापासून शुभेच्छा द्यायला हव्यात.

 

गेला महिनाभर चाललेला गोंधळ एकदाचा संपला आणि उध्दव ठाकरेेंच्या रूपाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला. महाराष्ट्र राज्याच्या या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा! महाराष्ट्रातील जनतेला भविष्यात सुशासन आणि गतिमान सरकार लाभो
, ही अपेक्षा व्यक्त करत असताना काही प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण महाराष्ट्रात तीन पायांची राजकीय शर्यत सुरू झाली असून या शर्यतीचे नेतृत्व करणाऱ्या उध्दव ठाकरे यांना प्रशासकीय अनुभव शून्य आहे, तर समोरच्या बाकावर बसणारे प्रशासन कसे चालवावे यांचा आदर्श निर्माण करून गेले आहेत. त्यामुळे ही तीन पायांची शर्यत पुढील काळात किती मोठी मजल मारते, हे पाहणे मोठया कुतूहलाची गोष्ट असणार आहे.

24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्याच दिवसापासून या शर्यतीची जुळवाजुळव सुरू झाली होती आणि शेवटी विचार, संस्कार आणि ध्येय यांना तिलांजली देत केवळ भाजपाला सत्तेबाहेर ठेवायचे या उद्देशाने आपल्या हाती सत्तेची सूत्रे घेतली. या एकाच किमान समान कार्यक्रमासाठी परस्परविरोधी विचार असणारे हे तीन पक्ष एकत्र आले आणि सत्ता समीकरण जुळवण्यात यशस्वी झाले. या जुळवाजुळवीची फलश्रुती म्हणून कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेली आणि कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाली आहे. या सर्व जुळवाजुळवीच्या केंद्रस्थानी शरद पवारांसारखा धूर्त माणूस होता. त्यांचे डावपेच आणि राजकीय गणिते भल्याभल्यांना चक्रावून टाकणारी असली, तरी आज शरद पवार यांनी फिरवलेल्या जादूच्या कांडीमुळेच हे सरकार अस्तित्वात आले आहे. भाजपा नको या एका गोष्टीसाठी शरद पवारांनी ही आपली मूल्ये(?) आणि राजकीय भूमिका यांना मुरड घालत दोन पावले मागे घेतली आहेत. सत्ताप्राप्तीपुढे तत्त्वे, मूल्ये, भूमिका यांना काहीही किंमत नसते हे या आधी अनेक वेळा सिध्द करणाऱ्या शरद पवारांनी पुन्हा सत्तेसाठी नवी मोट बांधण्याचा प्रयोग केला आहे आणि तूर्तास तरी त्यात यश आल्याचे दिसत आहे. मूलभूत विचार आणि कार्यपध्दती एकमेकांहून सर्वस्वी भिन्न असणाऱ्या तीन पक्षांचे सरकार स्थापन करणारे शिल्पकार म्हणून पुढील काळात शरद पवार यांची नोंद घेतली जाईल.

तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्तेसाठी आपल्या विचारधारांचा त्याग करून एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि सत्ता स्थापन केली. असे असले, तरी त्या त्या पक्षांचे सर्वसामान्य कार्यकर्ते हे एकत्रीकरण कशा प्रकारे स्वीकारतील आणि स्थानिक पातळीवर कशा पध्दतीने एकत्र राहतील, हे आज तरी सांगणे शक्य नाही. कारण हे एकत्रीकरण सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार नसून वरिष्ठ नेत्यांच्या सत्ता अभिलाषेतून झालेले आहे. उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व स्वीकारताना हिंदुत्वाची कवच-कुंडले उतरवून ठेवली आहेत आणि धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला आहे. हा बुरखा शाखेशाखेतील शिवसैनिकांना रुचेल का? की वर्षानुवर्षे रक्तात खेळणारे हिंदुत्व संधी मिळताच हा बुरखा फाडण्यासाठी पुढाकार घेईल, ही कार्यकर्त्यांची मानसिकता पुढच्या काळात सत्ता चालवताना कळीचा मुद्दा असणार आहे. 

या पार्श्वभूमीवर सरकार चालवण्याची सर्व जबाबदारी ठाकरे यांच्या खांद्यावर आलेली आहे. आणि ती त्यांनी स्वयंप्रेरणेने पार पाडावी अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे. ज्या क्षणी उध्दव ठाकरे यांच्या मागून दुसरे कोणीतरी सरकारची सूत्रे हलवण्याचा प्रयत्न करेल, त्या क्षणी ही तीन पायांची शर्यत, शर्यत न राहता परस्परांना खाली खेचण्याची स्पर्धा सुरू होईल. तीन भिन्न विचारसरणींच्या, तीन दिशांनी प्रवास करणाऱ्या तीन पक्षांच्या आमदारांना आणि पक्षांच्या नेत्यांना आपल्या सोबत घेऊन त्यांना पुढचा प्रवास करायचा आहे. त्यांचा हा प्रवास सुखकर आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी होवो, या शुभेच्छा.

या टप्प्यावर काही प्रश् जनतेच्या मनात आहेत. मागील पाच वर्षांत शहरी आणि ग्राामीण भागात काही प्रमाणात विकासकामांना सुरुवात झाली होती. आता या कामांचे पुढे काय होणार? ही कामे बंद होणार की पुन्हा या कामांसाठी नव्याने टेंडर काढली जाणार? की आधीच्या सरकारने सुरू केलेले सर्वच प्रकल्प बासनात बांधून ठेवणार? विद्यमान मुख्यमंत्र्यांनी या विषयावर आपली भूमिका तातडीने स्पष्ट करून आणि त्यानुसार लवकरात लवकर पावले उचलून मतदारांच्या मनातील संभ्रम दूर करायला हवा.

सत्तेच्या लोभाने नाही, तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आलो आहोत हे खरं करून दाखवण्याची संधी या सरकारला मिळाली असून, ती सत्यात आणणे केवळ कामातूनच शक्य होणार आहे. ते त्यांनी करून दाखववावे ही माफक अपेक्षा. 

पुढील 5 वर्षांसाठी सत्तासूत्र उध्दव ठाकरे यांच्या हाती, मात्र यामुळे आनंदाचे भरते सुप्रियाताईंना आलेले या राज्यातल्या सर्वसामान्यांनी वृत्तचित्रवाहिन्यांच्या कृपेने गेल्या काही दिवसांत अनेक वेळा पाहिले आहे. जे पक्ष आत्ताच झालेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात झुंजले, एकमेकांची जाहीर उणीदुणी काढली, ते पक्ष निकालानंतर निव्वळ स्वार्थापोटी एकत्र आल्यानंतर दुसऱ्याच्या आनंदाने हर्षवायू झाल्यागत वागू शकतात? यात काही काळेबेरे असू शकत नाही? विद्यमान मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावे. 'अखंड सावधचित्त असावे' हे वचन त्यांना सर्वात आधी सहयोगी पक्षांबाबतच उपयोगात आणावे लागणार आहे. इथे एक अननुभवी आणि दोन मुरलेले असे तीन नेते एकत्र आहेत. पहिल्याचा गैरफायदा घेण्याच्या संधीवर दोघे जण नजर ठेवून राहणारच आहेत. त्यामुळे यांच्याबरोबर वावरताना मुख्यमंत्र्यांसाठी केवळ रात्रीच नव्हेत, तर प्रत्येक दिवस कसोटीचा असणार आहे. पक्षीय राजकारण वेगळे आणि सत्ताकारण वेगळे हे कळण्यासाठी स्वपक्षाच्या अस्तित्वाची आहुती द्यावी लागत नाही ना, याचे भान ठेवत राज्यकारभार करावा लागणार आहे. 

या प्रयोगात परस्परांचे पाय खेचले जाण्याची, एकमेकांची राजकीय कोंडी करून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले, तरीही महाराष्ट्राच्या हितासाठी सुरू झालेल्या या तीन पायांच्या शर्यतीला मनापासून शुभेच्छा द्यायला हव्यात. कारण कोणत्याही पक्षाचे असले तरी हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे आणि ते जास्त महत्त्वाचे आहे.