वसा सामूहिकतेतून समृध्दीकडे

विवेक मराठी    30-Nov-2019
Total Views |

***प्रा.डॉ. नरेंद्र भागवत पाठक.***

सामूहिकतेतून समृध्दीकडे' हा वसाच्या कामाचा मंत्र आहे आणि त्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास आहे. त्यासाठी रात्रंदिवस झोकून देऊन कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटनात्मक रचनासुध्दा वसाने निर्माण केली आहे. सिध्दता झाल्यावर प्रारंभासाठी वाट बघायची नसते, त्यानुसार दि. 10, 1112 नोव्हेंबर 2019 रोजी नाशिक येथे वसाचा औपचारिक उद्धाटन सोहळा साजरा झाला.



एकीकडे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना
, आजही या भरतभूमीचा मूलनिवासी असलेला वनवासी (आदिवासी) समाज खेडयापाडयावर बेरोजगारीचे चटके सहन करतो आहे. हाताला काम नाही, राहायला झोपडी नाही, कसायला जमीन नाही अशी आजही त्याची स्थिती आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. जो मूळ निवासी आहे, खऱ्या अर्थाने वन-जंगलाचा स्वामी आहे, तोच आदिवासी आज शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे आणि एकूणच शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेमुळे त्याच्या हक्कांपासून वंचित राहिला आहे. याचबरोबर व्यसनाधीनता, स्थलांतर, अंधश्रध्दा या समस्या आजही आहेतच. आदिवासी समाज कष्टाळू, प्रामाणिक, काटक असून त्याच्याकडे वनसंपत्तीचं अचूक ज्ञान आहे. त्याच्याजवळ लौकिक शिक्षण नसलं, तरी आदिवासी जीवनाची, संस्कृतीची आणि वनसंवर्धनाची बौध्दिक संपदा त्याच्याकडे आहे. हे सगळं असूनही आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमच्या या निवासी बांधवांना समृध्द, स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानांचं जीवन जगता आलेलं नाही.

हा समाज मूलनिवासी असूनही बहुतांश कुटुंबांच्या नावावर जमिनीचा पट्टा नाही. एकीकडे आदिवासी म्हणून संबोधायचं आणि दुसरीकडे तो भूमिहीन कसा? हक्काच्या वनजमिनीपासून तो वंचित कसा?

कष्ट करायची मानसिकता आणि स्वाभिमानाने काम करायची इच्छा असूनही वनवासी बांधव बेरोजगार कसा? एकीकडे रोजगार हमी कायदा अस्तित्वात आहे, तर दुसरीकडे आदिवासींना कामासाठी वणवण भटकावं लागतंय, हा विरोधाभास कसा?

 

वन-जंगलातील उत्पादित वस्तूंना योग्य किंमत मिळत नाही. मोह फूल, गुग्गुळ, मध, डिंक, मोह बी, बहावा बी, वावडिंग अशा अनेक गौण वनउपजांना आधारभूत किंमत न मिळाल्याने शहरी व्यापारी किंवा आयात-निर्यातदार आजही आदिवासींची फसवणूक करतात.

वन धन केंद्रामध्ये गौण वनउपजांवर प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन शक्य असतं. मात्र वनवासी बांधवास त्यासाठी प्रशिक्षण, व्यवसायासाठी भांडवल आणि त्यासाठी आत्मविश्वास दिला, तर वनवासींच्या उत्पादन वस्तूंची बाजार-विपणन व्यवस्था सक्षम होऊ शकेल. यासाठी असलेल्या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

आदिवासी समाजाकडे बौध्दिक संपदा असूनही, वन धन योजना योजना, जीवविविधता याबाबत तो अनभिज्ञ आहे.

 

आपल्या वापराकरिता म्हणून ज्यांचा वापर केला जातो असे सर्व जीव-जंतू - उदा., बांबू, हिरडा, बेहडा, शतावरी, मासे, खेकडे, रानभाज्या इत्यादी, त्याचप्रमाणे ज्याचा वापर आपण थेट करत नाही, परंतु त्यांच्या असण्यामुळे आपल्याला व सृष्टीला अप्रत्यक्ष मोठा फायदा होतो अशा जीव-जंतू-वनस्पती उदा., जंगली झाडे, मोठी वृक्षसंपदा, दुर्मीळ जीव, वन्यजीव, पशू, पक्षी इत्यादी या सगळयाबाबत संवर्धनाचा आणि रक्षणाचा आग्राह / सक्ती आवश्यक आहे. भौतिक प्रगतीबरोबर जीवविविधतेचा ऱ्हास होणं हे मोठं संकट वनवासी क्षेत्रात आ वासून उभं आहे.

 

केवळ खड्डे खणणं, खडी फोडणं म्हणजे रोजगारनिर्मिती नव्हे, तर वनवासी महिला-पुरुषांच्या पारंपरिक ज्ञान-कौशल्यक्षमतांनुसार गुणात्मक काम, व्यवसाय निर्माण करून त्यांना आर्थिक विकासाच्या मुख्य प्रक्रियेत आणणं म्हणजे रोजगारनिर्मिती. अशा प्रकारच्या रोजगारनिर्मितीबाबत वनवासी बांधव अजूनही अनभिज्ञ व वंचित आहे.

 

प्राचीन आदिवासी संस्कृती, कला, नृत्य, वादन, खेळ, उत्सव, खाद्यसंस्कृती या सगळयाचा एकात्म विचार करून पर्यटन योजना राबविल्यास आर्थिक चलनवलनाबरोबरच वनवासींच्या संस्कृती परंपरेचंही संवर्धन होऊ शकतं. याबाबत शासकीय स्तरावर असलेली उदासीनता चिंताजनक आहे.

पंचायतविस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा) कायदा, वनहक्क कायदा, वनहक्क मान्यता अधिनियम 2006 वनअधिकार, अधिनियम 2012 वनसंवर्धन कायदा 1980 मनरेगा, नरेगा असे विविध कायदे, त्यांच्या योजना ज्यामुळे आदिवासी स्वावलंबी व स्वयंपूर्ण होऊ शकतो, मात्र शासकीय यंत्रणा, व्यवस्था, शासकीय परिपत्रकांची भाषा, त्यातील विविध फॉर्म इत्यादीबाबत आजही वनवासी बांधव अनभिज्ञ आहे. त्याला ज्याची आवश्यकता आहे, ते त्याच्यापर्यंत पोहोनत नाही आणि ज्याची आवश्यकता नाही ते त्याच्यावर लादलं जातं.

 

एकूणच वनवासी बांधवाना समृध्द, स्वयंपूर्ण करण्याची वाट खूप कठीण आणि खडतर आहे. हे आव्हान ओळखून 'वसा' या स्वयंसेवी संस्थेने सामूहिकतेतून समृध्दीकडे वाटचाल करायचं निश्चित केलं आहे. 'वसा' म्हणजे वनांचल समृध्दी अभियान. (Vananchal Samruddhi Abhiyan).

 

स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी क्रियान्वित केलेला अंत्योदयाचा विचार हा वसा संस्थेचा पाया आहे. सामूहिकतेतून समृध्दीकडे' हा वसाच्या कामाचा मंत्र आहे आणि त्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास आहे. त्यासाठी रात्रंदिवस झोकून देऊन कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटनात्मक रचनासुध्दा वसाने निर्माण केली आहे. सिध्दता झाल्यावर प्रारंभासाठी वाट बघायची नसते, त्यानुसार दि. 10, 11 12 नोव्हेंबर 2019 रोजी नाशिक येथे वसाचा औपचारिक उद्धाटन सोहळा साजरा झाला. उद्धाटनाबरोबरच तीन दिवसांची अभ्यासपूर्ण कार्यशाळा घेण्यात आली. रा.स्व. संघाचे क्षेत्रीय प्रचारक मा. सुनीलजी देशपांडे यांच्या शुभहस्ते वसाचं उद्धाटन झालं.

 

ग्रााम नगरी जी वसे संस्कृती, तीच नांदते वनांतरी,

प्रगत वनांचल येथे घडता जाईल कीर्ती दिगंतरी......

 

या प्रेरणादायक गीताने महाराष्ट्रातून आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांमधे उत्साह आणि जोश निर्माण झाला. या तीन दिवसांच्या कार्यशाळेत 'वनवासी जीवन' या विषयावर डॉ. गजानन डांगे यांचे, 'जीवविविधता' या विषयावर डॉ. राहुल मुंगीकर यांचे, 'सामूहिक वनहक्क' या विषयावर डॉ. मिलिंद थत्ते, 'मनरेगा' या विषयावर श्रीमती वर्षा परचुरे, 'वनवासातील राम' या विषयावर प्रा. प्रकाश पाठक यांची मार्गदर्शनपर व्याख्यानं आणि चर्चासत्र झाली. महेश काळे यांना बारीपाडा येथे प्रत्यक्ष संघर्षातून वनसंवर्धन करणारे मा. चैत्रराम पवार यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यामुळे वसाच्या उपस्थित कार्यकर्त्यांच्या कार्याची पायवाट खूपच सोपी झाली. रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक संजय कुलकर्णी यांनी तीन दिवसांच्या कार्यशाळेचा समारोप केला. या कार्यशाळेत संघाचे ज्येष्ठ प्रचारक गिरीशजी कुबेर उपस्थित होते. उद्धाटनप्रसंगी वसाचे संस्थापक संचालक पंकज पाठक यांनी वनांचल समृध्दी अभियानाची आवश्यकता, उद्दिष्टे आणि आव्हान कार्यकर्त्यांपुढे प्रास्तविकातून स्पष्ट करून सांगितली. या कार्यशाळेत प्रत्यक्ष खेडयापाडयांवर कार्य करणारे असे 70 कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित होते.

 

अनेक स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती सामाजिक बांधिलकीने आज वनवासी बांधवांसाठी ठीकठिकाणी कार्यरत आहेत. वनवासी कल्याण आश्रम ही संस्था तर अनेक वर्षांपासून देशभर कार्य करीत आहे. या सर्व संस्था, व्यक्ती आणि संघटनांनी वनवासी समाजातील अधंश्रध्दा, स्थलांतर, धर्मांतर, आरोग्य, शिक्षण, संस्कृती याबाबत भरपूर कामही केलेलं आहे. असं असलं, तरी लेखाच्या प्रारंभी विशद केलेले मुद्दे आणि आव्हानं यांचा विचार करता वनवासी समाजातच्या शेवटच्या घटकांपर्यत पोहोचण्याची आवश्यकता मोठया प्रमाणात आहे. वसाचं कार्य म्हणजे वनवासींचे वनहक्क, जीवविविधता, रोजगार, स्वयंपूर्णतेतून स्वायत्तता, सामूहिकतेतून समृध्दी, वनवासी पाडा आणि शासन व्यवस्था यातील सक्षम दुवा अशा विशिष्ट प्रकारचं कार्य आहे. खऱ्या अर्थाने वनवासी बांधव समृध्द व्हायचा असेल, वन- जंगल संपत्तीचं संवर्धन, संरक्षण करायचं असेल, वनवासींची बौध्दिक संपदा, त्यांची कौशल्यं यातून निर्मिती, विपणन या गोष्टी साध्य करायच्या असतील, तर पाडयापाडयावर ग्राामसभा मजबूत झाल्या पाहिजेत. आपल्या पाडयाची, आपल्या पाडयावरील वनवासींची विकासाची, समृध्दीची योजना ठरवण्याचा आणि अंमलात आणण्याचा अधिकार ग्राामसभेला असतो. त्यासाठी त्यांची जागृती करणं, त्यांना साक्षर करणं, त्यांना आत्मविश्वास देणं आणि शासकीय योजनांच्या लाभाची गंगा त्यांच्या पाडयापर्यंत आणणं हेच वसाचं उद्दिष्ट आहे. स्वयंमेव मृगेंद्रता असणारा मूळ वनवासी समाज पुन्हा एकदा समृध्द, वैभवशाली, स्वयंपूर्ण आणि आर्थिक सांस्कृतिकदृष्टया संपन्न करणं या ध्यासाने 'वसा'ने या क्षेत्रात खूप दमदार पाऊल टाकलं आहे आणि खूप कमी कालावधीत कामाचे दृश्य परिणामही दिसायला लागले आहेत. सामूहिकतेतून समृध्दीची पायवाट अशीच प्रशस्त होत राहो, हीच सदिच्छा.

9167406050