संपर्क क्रांतीचा राजकीय प्रवास

विवेक मराठी    04-Nov-2019
Total Views |


संपर्क क्रांतीचं महत्त्व बरीच वर्षं भारतीय समाजाला जाणवलंच नाही. आणि मग जेव्हा जाणवलं तेव्हा त्यांनी अवास्तवपणे या माध्यमाला डोक्यावर घेण्याची सुरुवात केली. यातून एका गटाद्वारे सोशल माध्यमं, तंत्रज्ञान याचा बागुलबुवा तरी तयार केला जाऊ लागला किंवा त्याचं महत्त्व अवास्तवपणे चुकीच्या दिशेने वाढवण्यात तरी आलं. सोशल मीडिया हा अगदी गल्लीतल्या नगरसेवकाच्या, पण प्रचारतंत्राचा कारण नसताना महत्त्वाचा भाग झाला. पेजेस, ऑफिशियल अकाउंट, ब्लू टिक, लाईक्स, शेयर यावरून राजकारणातलं, समाजकारणातलं महत्त्व ज्यांनी अपरिमित वाढवायला सुरुवात केली, त्यांनी हळूहळू समाजकारणाचा बबल तयार करायला सुरुवात केली. 

 
संपर्क क्रांतीच्या राजकीय प्रवासाचं पहिलं पर्व केम्ब्रिज ऍनॅलिटिकाच्या फियास्कोबरोबरच संपलं. गेल्या एक वर्षात सोशल मीडिया फार बदललाय. जास्त प्रोऍक्टिव्ह आणि जबाबदारी घेणारा झाला आहे. समाजसुध्दा या माध्यमाकडे कधी नव्हे ते गांभीर्याने बघू लागला आहे. पण एवढंच पुरेसं नाही.

2010 ते 2020 या कालखंडात एवढया मोठया प्रमाणावर जनसंख्या इंटरनेटशी जोडली गेलेली आहे, जेवढी याआधी कधीच जोडली गेली नव्हती. त्यातला एक मोठा वर्ग इंटरनेट म्हणजे फक्त आणि फक्त सोशल मीडियापुरता सीमित आहे. फ्री आणि ओपन फॉर ऑल या इंटरनेटच्या संकल्पनेला पडलेली ही मोठी भेग आहे. यातून संपर्क क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांचं भवितव्य काही थोडया कंपन्यांच्या हातात बंदिस्त असण्याचा धोका संभवतो. आणि ते झालं तर त्यातून जे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटतील, ते फार काही सुखकारक नसतील.

साधारण 2008 ते 2011च्या मधला काळ. सोशल मीडियाची पहिली लाट (अर्थात ऑर्कुट, मायस्पेस इ.) ओसरूनही दोन-तीन वर्षे झाली होती. सोशल मीडियाची दुसरी लाट - अर्थात फेसबुक आणि टि्वटर यांचा तो सुवर्णकाळ होता. भारतातल्या लोकसंख्येचा क्रिटिकल मास जरी अजून इंटरनेट आणि सोशल मीडिया यापासून दूर असला, तरी भारताच्या मध्यम आणि छोटया शहरांमध्ये मोबाइल क्रांती अतिशय वेगाने पसरत होती. इंटरनेट प्लॅन्स स्वस्त होत होते आणि ऍंड्रॉइडमुळे भारतीय मध्यमवर्गात एकाएकी स्मार्ट फोन्सची क्रेझ निर्माण झाली होती. मी सांगतोय त्या काळात सॅमसंग ही कंपनी चायनीज समजून (तशी नसली तरी) बाद ठरवली जायची. चायनीज फोन म्हणजे हलक्या दर्जाचा आणि वाईट माल हे ठरलेलं गृहीतक होतं. आयफोन नुकताच आला असला, तरी मध्यमवर्गाच्या हाताबाहेरची गोष्ट होती. पहिल्या नंबरवर अजूनही नोकिया असला, तरी स्मार्ट फोनच्या शर्यतीत तो हळूहळू मागे पडू लागला होता आणि मोटोरोला, सोनी आणि सॅमसंग यासारख्या कंपन्या ऍंड्रॉइड या नवीनच आलेल्या कुठल्यातरी ऑपरेटिंग सिस्टिमच्या जोरावर बाजारात मुसंडी मारायच्या तयारीत होत्या. गावांमध्ये अजूनतरी स्मार्ट फोन आणि इंटरनेट ही चैन आलेली नव्हती. एसेमेस हा प्रकार OTP सोडून बाकी गोष्टींसाठीदेखील वापरता येतो, हे साधारणपणे सर्वमान्य होतं. एसेमेस पॅक टाकला की एकदमच जगाशी जोडल्याचा फील यायचा. व्हॉट्स ऍप फॉरवर्ड्स हे तेव्हा एसेमेस फॉरवर्ड्स नावाने फिरायचे. 140 शब्दांच्या मर्यादेतसुध्दा लोकांना भयंकर सर्जनशीलतेचे अटॅक यायचे. एसेमेस शायरीज हा भारतातल्या गूगल ट्रेंड्समध्ये टॉपवर असणारा कीवर्ड होता.

याच काळात सोशल मीडिया हे मुख्यतः जगभर तरुणांच्या टाईमपासचे माध्यम होते. एकूणच संपर्क क्रांतीतला प्रत्येक टप्पा - मग ते कॉम्प्युटर असो, इंटरनेट असो, मोबाइल फोन्स असो, हा टप्पा त्या त्या काळच्या तरुण पिढीच्या हातातलं आयुध म्हणूनच विकसित झालेला आहे. सोशल मीडियादेखील त्याला अपवाद नाही. सुरुवातीला कॉलेजमधल्या मित्रांशी संपर्क ठेवायचं साधन म्हणून विकसित झालेलं फेसबुक याच काळात मोठया सोशल मीडियाच्या रूपात जगभर फैलावत होतं. ब्लॉगिंग विश्वात सक्रिय असणाऱ्या तरुणांना आधी ऑर्कुट आणि मग फेसबुकच्या माध्यमातून अचानक आपले ब्लॉग आपली मतं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम साधन गवसलं आणि ऍक्टिव्हिजम आणि लेखन यासारख्या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्यांना सोन्याची खाण सापडल्यासारखं वाटू लागलं.

समाजमाध्यमं आणि राजकीय क्रांती

याच काळात मध्य आशियातल्या काही देशांमध्ये राजकीय उलथापालथी सुरू झाल्या होत्या. मध्य आशियातले बरेचसे देश शीतयुध्दाच्या काळापासून कुठल्या न कुठल्या हुकूमशाहीच्या राज्यात जगत होते. या हुकूमशाहीला शीतयुध्दातील डावपेचांमुळे रशिया किंवा अमेरिकेचा वरदहस्त प्राप्त होता. मात्र शीतयुध्द संपलं, सोव्हिएत रशियाची शकलं झाली, रशिया आपल्याच देशांतर्गत अनागोंदीत गुंतला आणि अमेरिकेचा या भागातला रस एकाएकी कमी होऊ लागला. जे देश भौगोलिकदृष्टया महत्त्वाचे होते किंवा आर्थिकदृष्टया (उदाहरणार्थ तेल) महत्त्वाचे होते, त्यांच्याबरोबर साम-दाम-दंड-भेद वापरण्याचं धोरण सुरू होतंच, पण रशियाची अचानक तात्पुरती एक्झिट झाल्यामुळे या भागातील राजकीय संतुलन एकदम बिघडलं, शीतयुध्दावर पोसलेल्या कित्येक देशांची अर्थव्यवस्था कोसळू लागली, नोकऱ्या-धंदे कमी झाले, तरुणांच्या हाती भरपूर ऊर्जा आणि करायला काम नाही अशा अवस्थेत या देशांमध्ये इतकी वर्षं असणारा हुकूमशाहीविरुध्दचा राग या निमित्ताने भरून आला. सोशल मीडिया आणि इंटरनेटपूर्वीचा काळ असता, तर बहुधा हे लोण एवढया दूरवर पसरलं नसतं. काही डझन मृत्यू, काही शे लोक जखमी, आणि हजारो दंतकथा आणि अफवा एवढयावर बहुधा यातल्या कित्येक क्रांत्या विसर्जित झाल्या असत्या. किंवा बहुधा असंही झालं असतं की क्रांती घडून गेली असती आणि त्याबाद्दल फारशी चर्चाही झाली नसती.

पण या वेळपर्यंत फेसबुक आणि टि्वटर या द्वयीने जगभरातल्या तरुणांचं क्रिटिकल मास आपल्याकडे ओढलेलं होतं. इंटरनेटची एक गंमत आहे. एकदा इंटरनेटवर असलात की तुमच्यातला गरिबी-श्रीमंती हा भेद संपतो. माणूस श्रीमंत आहे की गरीब यावरून त्याला इंटरनेट स्पीड काय मिळेल हे (अजून तरी) ठरत नाही. श्रीमंत माणसाला फेसबुकचा वेगळा इंटरफेस आणि गरीब माणसाला वेगळा, असं घडत नाही. माहिती मिळवायला, संपर्क साधायला वेगळा पैसे मोजावा लागत नाही, तुम्ही शहरात राहता का गावात यावरून तुम्ही काय म्हणताय याचं महत्त्व कमी-जास्त होत नाही आणि म्हणून इंटरनेट हे एका प्रकारे 'ग्रोट इक्वलायझर' आहे. नाहीतर कोण कुठला मोहंमद बोझुझी नावाचा सिद्दी बौझिद नावाच्या जगाला माहीत नसलेल्या एका शहरातला फळविक्रेता, तो सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या त्रासाला कंटाळून स्वतःला आग काय लावून घेतो, त्याच्या शहरातील तरुण मंडळी याला फेसबुकवर वाचा काय फोडतात आणि बघता बघता संपूर्ण अरब जग क्रांतीच्या मशालीने पेटून काय उठतं. टयुनिशियातल्या एका गावातल्या फळविक्रेत्याबरोबर झालेल्या अन्यायाच्या कथेने स्नोबॉल इफेक्टसारखं टयुनिशिया, लिबिया, इजिप्त, येमेन, सीरिया, बहारिन, अल्जीरिया, लेबनॉन, जॉर्डन, कुवैत, ओमान, सुदान इतक्या देशांमध्ये क्रांतीची, राजकीय उलथापालथीची बीजं रोवली, ह्याचा आपण विचार तरी करू शकतो का? हो, करू शकतो, याचं कारण गेल्या 30 वर्षांत घडलेली संपर्क क्रांती. या संपर्क क्रांतीशिवाय राजकीय उलथापालथी झाल्याच नसत्या अशातला भाग नाही. क्रांत्या या आधीही होतच होत्या. संपूर्ण लॅटिन अमेरिका आणि काही प्रमाणात आफ्रिका यांचं उदाहरण आपल्या समोर आहे. इतकंच कशाला, भारतात आणीबाणी लादली गेली तेव्हा इंटरनेट काय, लोकांकडे साधा टेलीफोनसुध्दा नव्हता. पण राजकीय आंदोलन घडवायला त्याची अनुपस्थिती जाणवली नाही. त्याहूनही मागे जायचं म्हटलं, तर युरोपियन वसाहतवादाच्या विरुध्द लढणारी संपूर्ण कुमक - मग ती भारतातली असो, अमेरिकेतली का आफ्रिकेतली - त्यांना संपर्क क्रांतीची गरज जाणवली नाही, त्याशिवायही त्यांनी जगाला राजकीय, सामाजिक कलाटणी दिलीच. मग सोशल मीडिया, इंटरनेट, मोबाइल क्रांती इत्यादींनी नेमका काय बदल घडवून आणला? संपर्क क्रांतीने हा प्रक्षोभाचा ट्रिगर तुमच्या-माझ्यासारख्या अतिशय अराजकीय व्यक्तीच्या हातात आणून ठेवला. याआधीच्या चळवळींना एक चे गव्हेरा लागायचा, एक महात्मा गांधी लागायचा, एक जेपी लागायचा, एखादा मंडेला लागायचा. तंत्रज्ञान हाच यापुढे होणाऱ्या क्रांतींचा, राजकीय सामाजिक उलथापालथीचा चेहरा असेल, हा बदल या संपर्क क्रांतीने केला.

संपर्क क्रांतीचा भारतातील प्रभाव

इतक्यात भारतात झालेल्या काही राजकीय निदर्शनांचं उदाहरण घेऊ. गेल्या 5 वर्षांत भारतात पटेल आंदोलन, जाट आंदोलन, मराठा आंदोलन ही काही मोठी आंदोलनं झाली. पटेल आंदोलनाच्या वेळेस हार्दिक पटेलचं चित्रण काही प्रमाणात सोडलं, तर कुठल्याही आंदोलनाला नेत्याचा चेहरा नव्हता. चेहरा होता तो तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा, व्हॉट्स ऍप फॉर्वर्ड्सचा, 'एक मराठा लाख मराठा'सारख्या फेसबुक ग्राूप्सचा, असंख्य खऱ्याखोटया फॉर्वर्ड्सचा, टि्वटर ट्रेंडचा. चेहरा होता तो संपर्क क्रांतीचा.

या संपर्क क्रांतीचं महत्त्व बरीच वर्षं भारतीय समाजाला जाणवलंच नाही. आणि मग जेव्हा जाणवलं तेव्हा त्यांनी अवास्तवपणे या माध्यमाला डोक्यावर घेण्याची सुरुवात केली. यातून एका गटाद्वारे सोशल माध्यमं, तंत्रज्ञान याचा बागुलबुवा तरी तयार केला जाऊ लागला किंवा त्याचं महत्त्व अवास्तवपणे चुकीच्या दिशेने वाढवण्यात तरी आलं. सोशल मीडिया हा अगदी गल्लीतल्या नगरसेवकाच्या, पण प्रचारतंत्राचा कारण नसताना महत्त्वाचा भाग झाला. पेजेस, ऑफिशियल अकाउंट, ब्लू टिक, लाईक्स, शेयर यावरून राजकारणातलं, समाजकारणातलं महत्त्व ज्यांनी अपरिमित वाढवायला सुरुवात केली, त्यांनी हळूहळू समाजकारणाचा बबल तयार करायला सुरुवात केली. हा बुडबुडा म्हणजे आपण विविध विषयांवर रोज दहा दहा पोस्टी पाडतोय, म्हणजे आपण समाजासाठी काहीतरी फार महत्त्वाचं काम करतोय हा फाजिल आत्मविश्वास. हा फाजिल आत्मविश्वास फक्त कॉलेजवयीन तरुण-तरुणींना किंवा रिटायर होण्याच्या मार्गावरच्या काका-काकूंनाच नसतो, तर बऱ्याच राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनीसुध्दा हा बुडबुडा वाढवण्यात हातभार लावला आणि अजूनही लावत आहेत.



 याच्याशिवाय दुसरा एक पक्ष आहे, तो तंत्रज्ञान संपर्काची नवी साधनं, सोशल मीडिया, नवीन ऍप्स हे कसे आपल्या आयुष्यातले व्हिलन आहेत हे पदोपदी पटवून द्यायचा प्रयत्न करतो. यांच्या मते कुठलाही देश, राज्यसंस्था स्वतःसाठी या क्रांतीचा वापर करून घेऊन लोकांना आपलं नकळत दास बनवतेय. प्रत्येक ऍप, सॉफ्टवेअर, वेबसाइट, सोशल माध्यमं आपला सगळं डेटा गोळा करून त्याचा गैरवापर करण्यास सज्ज आहेत. आधारसारखी यंत्रणा याच दिशेने टाकलेलं पाऊल आहे, असं या गटाचं सामान्यतः अगदी ठाम मत असतं. फेसबुक आणि मार्क झुकेरबर्ग हे डायरेक्ट सैतानासाठी काम करतात अशी यांची जवळजवळ खात्रीच असते. व्हॉट्स ऍपने संपूर्ण मानव संस्कृती एका क्षणात नष्ट करून टाकली आहे हे तर ते तुम्हाला अगदी पटवूनच देऊ शकतात. आणि ही सगळी मतं, ते संपर्काची तीच सगळी साधनं वापरून, सोशल माध्यमांवरूनच प्रसारित करत असतात हा त्यातला उपरोध बहुतांश लोकांना दिसत नाही.

सत्य हे अर्थातच नेहमीप्रमाणे या दोन्ही ध्रुवांच्या साधारणपणे मध्ये कुठे तरी आहे.

भारतात संपर्क क्रांती आणि त्याचं बिझनेस पोटेन्शियल ओळखणाऱ्या काही थोडक्या लोकांमध्ये एक मोठं नाव होतं ते मुकेश अंबानींचं. अर्थात संचार क्रांती, टेलिफोन, कॉम्प्युटर, इंटरनेट आणि मग मोबाइल फोन ह्यांचा बोलबाला भारतात सुरू तो नव्वदच्या दशकातच. पण ही चर्चा आणि हाइप एका विशिष्ट समूहापर्यंत, एका आर्थिक समूहापुरतं मर्यादित होतं. मुकेश अंबानींच्या आणि त्या अनुषंगाने रिलायन्सच्या हे सर्वप्रथम लक्षात आलं की जनसामान्यापर्यंत जर ही क्रांती घेऊन जाता आली, तर त्यातून किती मोठा बिझनेस उभा राहू शकतो. यातून जन्म झाला 2000च्या दशकातल्या रिलायन्सच्या CDMA मोबाइल फोन्सचा. मोबाईलवर, अगदी ब्लॅक ऍंड व्हाइट स्क्रीनवाल्या मोबाइलवर इंटरनेटची सुविधा देणं, इंटरनेटवरून विविध व्हिडियो-ऑडियो कन्टेन्ट पोहोचवणं याची सुरुवात केली ती रिलायन्सने. 2G, 3G म्हणजे काय हे जेव्हा माहीतही नव्हतं, तेव्हा रिलायन्सने थ्री जीच्या स्पीडवर डेटा सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली. 'करलो दुनिया मुठ्ठी में' ही फक्त जाहिरात नव्हती, तर मुकेश अंबानींचं भारतातल्या संपर्क क्रांतीबद्दलचं स्वप्न होतं. पण त्यात धीरूभाई अंबानींचं निधन झालं, भावांमध्ये भांडणं झाली, रिलायन्सचे दोन तुकडे झाले आणि मुकेश अंबानींना परमप्रिय असणारी रिलायन्सची टेलीकम्युनिकेशन डिव्हिजन अनिल अंबानींच्या हातात गेली. भारतातल्या दूरसंचार क्षेत्राला नवीन कलाटणी देण्याचं मुकेश अंबानींचं स्वप्न किमान 15 वर्षं पुढे फेकलं गेलं. मुकेश अंबानी या क्षेत्रात परत जोरदार मुसंडी मारणार होते, भारतातलं फक्त मोबाइलच नाही, तर संपूर्ण संचार क्षेत्रच हलवून टाकणार होते. पण त्याला अजून वेळ होता. Jioचा जन्म व्हायला आणखी काही काळ जाणार होता.

 

त्याचदरम्यान इंटरनेट बबल फुटून तीन-चार वर्षं होऊन गेली होती. इंटरनेटचं दुसरं पर्व नवीन घोडदौड करायला सज्ज होतं. स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये परत जोरात इन्व्हेस्टमेंट होत होती आणि त्यातून इनोव्हेशनची नवीन लाट पसरायला सुरुवात झाली होती. त्यातून उभ्या राहिल्या सोशल मीडियाच्या कंपन्या. यात फेसबुक आणि टि्वटर यासारखे पुढे महाकाय झालेले स्टार्टअप्स तर होतेच, तसंच गूगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या प्रथितयश कंपनीजनाही या क्षेत्रात उतरायचा मोह आवरला नाही. सोशल मीडियाचा वापर जरी शहरी तरुणांद्वारे लोकप्रिय झाला असला, तरी साधारण तीन-चार वर्षात साधारणतः सगळेच वयोगट हळूहळू सोशल माध्यमांवर दिसू लागले. त्या काळी सोशल मीडियावर एक विनोद फार चालायचा, तो म्हणजे 'इफ युअर पेरेंट्स आर ऑन सोशल मीडिया, देन द डेथ ऑफ सोशल मीडिया इज नियर.' पण खरं तर तो सोशल मीडियाचा सुवर्णकाळ सुरू व्हायची नांदी होती. पुढे थोडयाच काळात अरब स्प्रिंग घडलं आणि सोशल मीडियाची जनमानसावरची पकड पहिल्यांदा जगाला जाणवली. अरब स्प्रिंगच्या संपूर्ण क्रांतीला फर्स्ट सोशल मीडिया रिव्होल्यूशन असं बऱ्याच पत्रकारांनी म्हटलं, त्यामागचं कारणही हेच होतं.

भारतात हे लोण पसरलं साधारण 2012नंतर. सोशल मीडियाचं घराघरात खऱ्या अर्थाने झालेलं पहिलं आगमन म्हणजे व्हॉट्स ऍप. व्हॉट्स ऍपच्या अगदी सोप्या आणि सध्या इंटरफेसने भारतीय समाजाची पुरेपूर पकड घेतली. यातून जोक्स आणि फॉर्वर्ड्सने सुरू झालेला प्रवास हळूहळू चर्चा, वादविवाद, राजकीय ग्राूप्स, भांडाभांडी इथपर्यंत पोहोचला. यातच मग जोडीला फेसबुक आणि टि्वटर होतेच. सोशल मीडियाचं हे रूप जगाला नवीन होतं.

 

ट्रोलिंगचा चिखल

आतापर्यंत सोशल मीडियाचं मोनेटायझेशन नेमकं कसं करायचं, याबाबत बऱ्याच कंपन्या चाचपडत होत्या. ह्या नवीन रूपाने या कंपन्यांना एकदमच नवीन संधी उपलब्ध करून दिल्या. एकाएकी गल्लोगल्ली सोशल मीडिया मॅनेजर्स तयार होऊ लागले. अगदी किराणा मालाच्या दुकानदारालाही आपल्या दुकानाचं फेसबुक पेज असावं असं वाटू लागलं. याचबरोबर विविध स्तरांवरच्या राजकीय नेत्यांना अशा प्रकारे सामाजिक माध्यमांवर असलेल्या लोकांना आपल्याकडे खेचण्याचे वेध लागले. जे हुशार होते, त्यांच्या लक्षात आलं की फक्त आपले समर्थक गोळा करत बसण्यातून सोशल मीडियाचा आपण पुरेपूर वापर करत नाहीए. सोशल मीडियाचा खरा वापर करायचा असेल, तर तो आपल्याला पाहिजे ते नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी केला पाहिजे. मग हा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी वेगवेगळया क्लृप्त्या वापरल्या गेल्या. हे आधी होत नव्हतं अशातला भाग नाही. उलट आधी हे जास्त लपून छपून होत होतं. आपला नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी राजकारणी या आधीही वर्तमानपत्रं, न्यूज चॅनल्स, सरकारी यंत्रणा याचा वापर करत होतेच. पण तो वन वे ट्रॅफिक होता. सोशल मीडियामुळे एकाएकी ऐकणाऱ्याला आणि ऐकवणाऱ्याला दोघांनाही स्वतःचा आवाज मिळाला. भाषणाचं रूपांतरण चर्चेत होऊ लागलं. आजपर्यंत फक्त टीव्हीवर बघत असणाऱ्या पत्रकाराला आधी फक्त मनात शिव्या देता यायच्या. आता सरळ कॉमेंट्स आणि ट्वीट्समधून त्या शिव्या देता येऊ लागल्या. याला गोपनीयतेची आणखी एक किनार होती. सोशल मीडियाने सामान्य माणसाला आवाज तर पुरवला, पण त्याचा चेहरा लपवून. त्यामुळे कित्येकांच्या सभ्यतेचा मुखवटा गळून पडला. एखाद्या व्यक्तीशी समोरासमोर बोलायचं असेल तर सामान्यतः काही प्रमाणात का होईना, सभ्यतेचे निकष पाळले जातात. पण इथे समोरासमोर भेटायची गरज नव्हती. त्यामुळे शब्दांना धार चढू लागली, समोरच्याचा पोच न ठेवता टीकाटिप्पणी केली जाऊ लागली. आणि ही वागणूक कुठल्याही एका विचारधारेपुरती किंवा वयोगटापुरती किंवा भाषा-प्रांत-धर्म-शिक्षण-आर्थिक स्थिती कशाचपुरती सीमित नव्हती. कित्येक मोठे विचारवंत, पत्रकार, लेखक, समाजसेवक, अभिजन, बहुजन, आंदोलनकारी या चिखलात उतरायचा मोह टाळू शकले नाहीत. या गोपनीयतेने ट्रोलिंगलासुध्दा खुलं मैदान दिलं. आणि या खुल्या मैदानात सगळेच राजकीय पक्ष मनसोक्त बागडले. काही लोकांनी राजकीय पक्षांवर संघटित ट्रोलिंगचा आरोप वेळोवेळी केला, पण त्यात काहीही तथ्यांश नाहीये. हे एवढं सोपं असतं तर एकवेळ बरं होतं. पण ट्रोलिंग हे एखाद्या माणसाला पक्षाला किंवा विचारधारेला नियंत्रित करता येण्यातली गोष्ट नाहीये. ट्रोलिंगचं मूळच अनागोंदीत आहे.


 

2G, 3G म्हणजे काय हे जेव्हा माहीतही नव्हतंतेव्हा रिलायन्सने थ्री जीच्या स्पीडवर डेटा सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली. 'करलो दुनिया मुठ्ठी मेंही फक्त जाहिरात नव्हतीतर मुकेश अंबानींचं भारतातल्या संपर्क क्रांतीबद्दलचं स्वप्न होतं.


एकीकडे सोशल मीडियाची ही बाजू आकार घेत होती, तेव्हाच दुसरीकडे केम्ब्रिज ऍनॅलिटीका सारखी कंपनी सोशल मीडियावर या ओसंडून वाहत असलेल्या ऊर्जेला आपल्या फायद्यासाठी वापरायची योजना आखत होती. लोकांना एक अगदी साधी प्रश्नावली पाठवायची, त्यातल्या राजकीय प्रश्नांना तुम्ही दिलेल्या उत्तरांवरून तुमची राजकीय मतं पृथकृत करायची आणि मग ही मत कशी आणखीनच टोकदार होत जातील याची काळजी घ्यायची. हा असा अतिशय वैज्ञानिक, तार्किक आणि त्याचबरोबर अतिशय अनैतिक प्रकार केम्ब्रिज ऍनॅलिटिका अमेरिकेत फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मच्या वरदहस्ताने राजरोस करत होती. विकिलीक्सने जर केम्ब्रिज अनॅलिटिकाचे हे गुपित फोडले नसते, तर 2019च्या निवडणुकीत भारतात काँग्रोससाठी अमलात आणायला हाच प्रकार केम्ब्रिज ऍनॅलिटिका अगदी सज्ज होती. पण त्याआधीच केम्ब्रिज ऍनॅलिटिकाचं गुपित फुटलं आणि एकाएकी युरोप, अमेरिका इत्यादी देशांमध्ये या विरोधात आवाज उभा राहायला सुरुवात झाली. यातून एक अतिशय घातक राजकीय प्रघात पडण्याआधीच जवळजवळ नष्ट झाला. सोशल मीडिया कंपन्या जास्त सावध झाल्या. त्यांनी यापुढे अशा प्रकारच्या कुठल्याही डेटा चौर्याचं आणि प्रायव्हसीचं उल्लंघन न होण्याची हमी दिली. व्हॉट्स ऍप, फेसबुक इत्यादींनी स्वतःहोऊन पुढाकार घेत फेक न्यूज इत्यादीविरुध्द कंबर कसायला सुरुवात केली. फॅक्ट चेकिंग पॉलिसीज तयार होऊ लागल्या.

 

पण हे पुरेसं नाहीये. मानवी समाजाला गरज आहे ती तंत्रज्ञानाच्या अंगभूत शिक्षणाची. सोशल मीडिया हा आपल्यातल्या प्रत्येकालाच कारण नसताना अतिशय हट्टी, एक दिशेने बघणारा, आपल्या सोयीच्या गोष्टींकडे लक्ष देणारा समाज बनवतोय, ह्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे. फेक न्यूज, अफवा ह्या गोष्टी तंत्रज्ञानाचे देणं नाहीये. तंत्रज्ञान फक्त यांचा प्रभाव कितीतरी पटींनी वाढवतोय हा फरक आहे.

संपर्क क्रांतीच्या राजकीय प्रवासाचं पहिलं पर्व केम्ब्रिज ऍनॅलिटिकाच्या फियास्कोबरोबरच संपलं. गेल्या एक वर्षात सोशल मीडिया फार बदललाय. जास्त प्रोऍक्टिव्ह आणि जबाबदारी घेणारा झाला आहे. समाजसुध्दा या माध्यमाकडे कधी नव्हे ते गांभीर्याने बघू लागला आहे. पण एवढंच पुरेसं नाही.

इंटरनेटची सगळयात खास गोष्ट होती ती त्या तंत्रज्ञाची मालकी. इंटरनेटची मालकी तसं म्हणलं तर आपणा सगळयांकडे आहे, आणि म्हणलं तर कोणाकडेच नाहीये. इंटरनेटची कल्पना ही खऱ्या दृष्टीने वितरित अवस्थेतील सूचनांचं आणि ज्ञानाचं आंतरजाल अशी होती. सुरुवातीचा बराच काळ ती कल्पना तशी टिकूनही होती. सोशल माध्यमांच्या आगमनानंतर मात्र पहिल्यांदाच या संकल्पनेला भगदाड पडलं. सोशल मीडिया हे पहिल्यांदा फॉर प्रॉफिट असणाऱ्या संस्थांच्या मालकीचं प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आलं आणि हळूहळू इंटरनेटला पर्याय बनून उभं राहिलं. 2010 ते 2020 या कालखंडात एवढया मोठया प्रमाणावर जनसंख्या इंटरनेटशी जोडली गेलेली आहे, जेवढी याआधी कधीच जोडली गेली नव्हती. त्यातला एक मोठा वर्ग इंटरनेट म्हणजे फक्त आणि फक्त सोशल मीडियापुरता - उदाहरणार्थ, फेसबुक आणि व्हॉट्स ऍप यासारख्या प्लॅटफर्ॉम्सपुरता सीमित आहे. फ्री आणि ओपन फॉर ऑल या इंटरनेटच्या संकल्पनेला पडलेली ही मोठी भेग आहे. यातून संपर्क क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांचं भवितव्य काही थोडया कंपन्यांच्या हातात बंदिस्त असण्याचा धोका संभवतो. आणि ते झालं तर त्यातून जे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटतील, ते फार काही सुखकारक असतील असं मला वाटत नाही.

इंद्रनील पोळ

(लेखक जर्मनीमध्ये वास्तव्यास असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आणि इंटरनेट ऑफ थिंग्जच्या प्रकल्पांवर काम करतात.)