तव स्मरण सतत प्रेरणादायी...

विवेक मराठी    09-Nov-2019
Total Views |



रामजन्मभूमी लढयाचा प्रश्न हा केवळ मंदिर निर्माणापुरता कधीच नव्हता. अयोध्या ही रामजन्मभूमी नसून या सगळया कपोलकल्पित गोष्टी आहेत; असा कांगावा याच देशात केला गेला. प्रभू रामचंद्र केवळ उपासनेची देवता नसून तो आपला राष्ट्रपुरुष आहे हा विश्वास ज्या रामजन्मभूमी आंदोलनाने देशात जागृत केला. त्या आंदोलनाला मोरोपंत पिंगळेंसारख्या कुशल संघटकाची आणि कोठारी बंधूंच्या धैर्याची सोनारी किनार आहे. दंगेखोर म्हणून हिणविले गेलेल्या या दोन्ही बंधूंच्या बलिदानामुळेच आजचा हा दिवस आपल्याला पहायला मिळाला.

रामजन्मभूमीचा लढा उभारणारा हा योध्दा-प्रचारक संपूर्ण जीवन रामजन्मभूमी आंदोलनासाठी झुंजला. मीनाक्षीपुरमच्या धर्मांतरणानंतर धक्का बसलेल्या हिंदू समाजाला सामूहिक संघटित रुपाचे कार्यक्रम द्यावे लागतील याची मोरोपंतांना पूर्ण जाण होती. रामजन्मभूमी हा केवळ मंदिर निर्माणाचा विषय नसून रामाचे अस्तित्वच नाकारणाऱ्यांविरोधात हिंदूनी एकत्र येणे गरजेचे होते. आपली जात- उपासना पध्दती बाजूला ठेवून जर का हिंदू समाज एकात्म करायचा असेल तर त्यासाठी तितक्याच प्रभावशाली उपक्रमांची जोड द्यावी लागणार होती. मोरोपंतांनी हे शिवधनुष्य उचलले. स्वातंत्र्योतर काळामध्ये इतके मोठे आंदोलन आकारास आले नव्हते. समाजात नक्की काय चालले आहे याचा पूर्ण अदंाज घेऊन आंदोलने आखावी लागतात. मोरोपंतानी हिंदू समाजासमोर हा अस्मिता जागविणारा कार्यक्रम ठेवला. एकात्मता यात्रा हादेखील मोरोपंताच्या संघटनकुशलतेचा आविष्कारच होता. देशभरात अशा काही यात्रा निघाल्या की, त्याचे वर्णन करता करता प्रसारमाध्यमेही अवाक झाली होती. यात्रा चालत होत्या. भिन्न भिन्न प्रदेशात जात होत्या. हजारो लोक या यात्रांच्या दर्शनासाठी येत होते. एका वेगळयाच संस्कृतिजागरणाची ही सुरूवात होती. या संपूर्ण आंदोलनाचा तपशीलवार आराखडा मोरोपंतांनी केला होता. या यात्रांमधून आलेले गंगाजल अपवित्र आणि दूषित आहे, असा कांगावा त्यावेळी डाव्यांनी केला. पण ज्या ज्या ठिकाणी या यात्रा गेल्या त्या त्या ठिकाणी लोकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून यात्रांचे दर्शन घेतले.

--------------------------
आमच्या फेसबुक पेजला like करासा. विवेक 
               -----------------------------------------

85 साली ज्यावेळी रामलल्लाची मूर्ती अयोध्येत कुलूपबंद स्थितीत पूजली जात होती,त्याचवेळी प्रत्यक्ष रामजन्मभूमी आंदोलनाची घोषणा करण्यात आली. आज रथयात्रा ही संकल्पना सर्वमान्य झाली असली तरी ही संकल्पना सर्वप्रथम मोरोपंतानी अखिल भारतीय स्तरावर यशस्वीरीत्या राबवून दाखविली. या जनआंदोलनाचा रेटा म्हणून हळूहळू अशी परिस्थिती आली की, रामजन्मभूमीवर पूजेसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्या लहानशा मंदिराच्या जागी प्रभू श्री रामचंद्राच्या भव्य मंदिराचे निर्माण करण्याचा संकल्प हिंदू समाजाने सोडला. एकात्मता यात्रेच्या निमित्ताने जागृत झालेला हिंदू समाज आपल्या सांस्कृतिक मानचिन्हाच्या भव्य निर्माणासाठी कटिबध्द झाला. मी अयोध्येत जाऊन राममंदिर बनवू शकणार नसलो तरी माझ्या गावात राममंदिराच्या विटा घडविल्या जातील आणि त्यात माझाही सहभाग असेल; हा भाव हिंदू समाजाच्या ह्रदयात मोरोपंताच्या संघटनकौशल्यामुळे जागविला गेला. प्रत्येक गावामध्ये शिला घडविल्या गेल्या आणि साडेतीन लाख गावांमधून रामशिला अयोध्येत येऊन दाखल झाल्या. या आंदोलनाची भावनिक हाक इतकी जबरदस्त होती की; चीन, अमेरिकेसारख्या देशात वास्तव्याला असणाऱ्या हिंदूंनीसुध्दा आपल्या देशातून रामशिला पाठविल्या. हिंदुत्वाची इतकी मोठी लाट देशात यापूर्वी कधीच आली नव्हती. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हे आंदोलन हृदयस्थ झाले होते. पुढे कारसेवकांनी जे काम केले ती या देशातील सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक घटना घडली. कारसेवेसाठी निघालेल्या कारसेवकांना रोखण्यासाठी मुलायमसिंग सरकारने अयोध्येच्या सर्व वाटा बंद केल्या होत्या. रेल्वे, बसेस, खाजगी मोटारींवरही बंदी घातली होती. तरीही सहस्त्रावधी कार्यकर्ते अयोध्येत पोहोचले. याचे सर्व श्रेय मोरोपंतांची कल्पकता, संघटनकौशल्य आणि अथक परिश्रमांना आहे. शिलापूजनातून या आंदोलनाशी मनापासून जोडल्या गेलेल्या ग्रामीण जनतेने कारसेवकांना सर्वतोपरी मदत केली.

मोरोपंतांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे हे यश होते. अतिसामान्य लोकांकडून असामान्य कर्तृत्व घडवून घेणारे मोरोपंत राष्ट्रजागरणाच्या कामात आपले बहुआयामी व्यक्तिमत्त्व सदैव पणाला लावीत आले.

मोरोपंताचे वैशिष्टय हे की त्यांनी आपल्या हृदयात खदखदणारा ज्वालामुखी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्यकर्त्यांच्या मनात प्रज्वलित केला. कार्यकर्त्यांनी तो जनमानसात पोहोचविला आणि त्यातून जन्मभूमीचे विशाल आंदोलन उभे राहिले. 'यहाँ परिंदाभी पर नही मार सकता', अशी दर्पोक्ती करणाऱ्या मुख्यमंत्री मुलायमसिंहाना कारसेवकांनी चांगलाच धडा शिकविला. नि:शस्त्र कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला. रामकुमार कोठारी आणि त्यांचे धाकटे बंधू शरद कोठारी यांचीही गोळया घालून हत्या करण्यात आली. स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन हुतात्मे झालेले हे दोन बंधू लाखो हिंदूंसाठी प्रेरणा बनले. त्यांच्या अतुलनीय धैर्यामुळेच रामजन्मभूमीचा लढा निर्णायक वळणावर येऊन पोहोचला.

देशाच्या प्रत्येक मानबिंदूवर हल्ला करण्याच्या, त्यांना उद्ध्वस्त करण्याच्या  मनोवृत्तीला मोरोपंतानी सुसूत्र आणि रचनात्मक कार्यक्रमाने सडेतोड उत्तर दिले होते. अयोध्येतील शिलान्यासाच्या कार्यक्रमाच्या छायाचित्रात मोरोपंत कुठेही दिसत नाहीत. पण या घटनेमध्ये त्यांचे नेतृत्व प्रकर्षाने प्रतिबिबिंत झाले. ही आत्मविलोपी वृत्ती केवळ आणि केवळ संघ प्रचारकाच्या ठायीच असू शकते.