गरज आहे महाराष्ट्रमोदीची

विवेक मराठी    10-Dec-2019
Total Views |

मोदींची हवा तर राहणारच आहे. ती पुढच्या निवडणुकीतदेखील राहील. नरेंद्र मोदी आपल्या कर्तृत्वाने मोठे अाहेत. देशातील हिंदू भावना काय आहेत, हे त्यांना अतिशय उत्तम रितीने समजते. म्हणून हिंदू समाजाला ते फार मोठे आधार वाटतात. याला पूरक म्हणून महाराष्ट्रातदेखील 'महाराष्ट्रमोदी' उभा राहिला पाहिजे. या दोघांची मिळून जी शक्ती होईल, ती महाराष्ट्रात जे परिवर्तन घडवून आणेल, ते तीनशे वर्षांपूर्वींच्या छत्रपतींची आठवण करून देणारे असेल.

modi_1  H x W:

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका
2014 साली जेव्हा झाल्या, तेव्हा देशात मोदींची लाट होती. या लाटेमुळे शिवसेनेशी समझोता न करूनही भाजपाला 122 जागा मिळाल्या. 2019ला झालेल्या निवडणुकांत मोदी लाट पूर्वीपेक्षाही अधिक बलवान होती. या वेळी शिवसेनेशी युती केली गेली आणि भाजपाला फक्त 105 जागा मिळाल्या. युती केली नसती तर भाजपाचे बहुमताने सरकार आले असते. पण जर-तर याला राजकारणात काही अर्थ नसतो. भूतकाळ कोणालाच बदलता येत नाही. भविष्यकाळ मात्र घडविता येतो.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

म्हणून वर्तमानकाळाचा विचार करायचा तर महाराष्ट्रात भाजपाचा कुणी जननेता नाही, हे वाक्य काही जणांना खटकेल, काही जणांना आवडणार नाही, काही लोक नाक मुरडतील, पण वस्तुस्थिती मात्र बदलत नाही. अखिल भारतीय स्तरावर नरेंद्र मोदी जननेता आहेत. त्यांच्या नावाने आणि त्यांच्या कर्तृत्वाने मते मिळतात. भारताचे राजकारण असेच आहे. इंदिरा गांधी हयात असताना मतदान करण्याचा एकच मुद्दा असायचा - इंदिरा गांधी हव्यात की नकोत? मतदार इंदिरा गांधी हव्यात म्हणून मतदान करीत. त्यामुळे महाराष्ट्रासहित अनेक राज्यांत काँग्रेसची सत्ता येई. त्यापूर्वी पं. नेहरूंच्या बाबतीत हाच विषय होता आणि आता नरेंद्र मोदी यांच्या बाबतीतदेखील हाच विषय आहे.


ही स्थिती चांगली की वाईट
? हा वाद-चर्चेचा विषय होऊ शकतो. उत्तम स्थिती अशी की, महाराष्ट्राचे जननेतृत्व महाराष्ट्रातूनच उभे राहिले पाहिजे. आज भाजपाचे जे नेते आहेत, ते सर्व नेते संघटनेतून पुढे अालेले नेते आहेत. या नेत्यांच्या मागे व्यापक जनआंदोलनाची पृष्ठभूमी नाही. ते कर्तृत्ववान आहेत, चारित्र्याने शुध्द आहेत, संघटनकुशल आहेत, राज्य कसे चालवावे याचे भानदेखील त्यांना चांगले आहे. परंतु ते खऱ्या अर्थाने जननेते नाहीत.


भाजपा विचारधारेतून महाराष्ट्रात जननेता उभा राहिला. या जननेत्याचे नाव होते गोपिनाथराव मुंडे. त्यांचे नेतृत्व कसे उभे राहिले
? आणीबाणीत ते कारागृहात होते, संघटनेत महत्त्वाच्या पदावर होते, ते संघमान्य होते, या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी एवढया भांडवलावर कुणी जननेता होत नाही. जननेता होण्यासाठी जनतेत सतत मिसळावे लागते. जनभावना समजून घ्याव्या लागतात. लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागतो. वेगवेगळया वर्तमानपत्रांचे वाचन करणे हा जनभावना समजून घेण्याचा एक मार्ग असतो. अर्थात त्यातून जनभावना समजतीलच असे नाही. कारण वर्तमानपत्रांची विश्वासार्हता दिवसेंदिवस रसातळाला जात चालली आहे. म्हणून जनसंपर्क सतत असावा लागतो.

गोपिनाथरावांच्या काळी जीवघेणा प्रश्न निर्माण झाला तो दाऊद गँगच्या समांतर शासनाचा. अगदी स्वच्छ भाषेत सांगायचे तर हिंदू कमालीचा असुरक्षित झाला. गोपिनाथराव मुंडेंनी तो विषय आपल्या हाती घेतला. विधानसभा गाजवली आणि संघर्षयात्रा काढली. या संघर्षयात्रेने गोपिनाथराव जननेता झाले. कोणत्याही जातीचे नेते झाले नाहीत. पक्षाने दिलेले नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा तयार झाली नाही. हे नेतेपद त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळविले.


munde_1  H x W:

नेतेपद असे स्वकर्तृत्वाने प्राप्त करावे लागते. याबद्दलचे
, 'लिंकन ऑन लीडरशीप' या शीषर्काचे डोनाल्ड फिलिप्स यांचे पुस्तक आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे असे आहे. अब्राहम लिंकन अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते. 1860 साली राष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यापूर्वी ते सिनेटरदेखील नव्हते. कोणाच्याही मंत्रीमंडळात नव्हते. राज्यकारभाराचा अनुभव शून्य. तशात राष्ट्राध्यक्ष झाल्याबरोबर सात राज्ये अमेरिकेतून फुटून निघाली. फुटून निघालेल्या राज्यांनी आपला राज्यसंघ तयार केला. त्यांच्या प्रदेशातील सर्व किल्ले, शस्त्रास्त्रे, दारूगोळा आपल्या ताब्यात घेतला. राजधानी वॉशिंग्टनचे संरक्षण करण्याची शक्तीदेखील लिंकनपाशी राहिली नाही. केवळ सोळा हजार सैन्य होते आणि 75 वर्षांचा म्हातारा सैन्याचा सेनापती होता. अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. बेरोजगारी प्रचंड वाढली होती. अमेरिकेचे युरोपातील शत्रू जागे झाले होते.


अब्राहम लिंकन वकील होते. त्यांचे सहकारी त्यांना दुय्यम दर्जाचा वकील मानीत. त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी त्यांना कामचलाऊ अध्यक्ष मानीत. आपण या अध्यक्षाला कसेही नाचवू शकतो
, असे त्यांना वाटे. आज या सोळाव्या अध्यक्षाची प्रतिमा कशी आहे? अमेरिकेतील सर्वात महान राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचा दयाघन चेहरा, अमेरिका एक ठेवणारा महात्मा, महान वक्ता, इसापनंतर गोष्टी सांगणारा थोर पुरुष - विशेषणे लावावी तेवढी थोडी आहेत. असा एकेकाळी नगण्य असलेला हा माणूस एवढा महान कसा झाला? तेही राजकारणात राहून?


लिंकन आपल्या गुणसंपदेने महान झाला. व्हाइट हाउसमधल्या राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीवर तो फार कमी बसला. सतत लोकांत मिसळत राहिला. युध्दखात्यात त्याचा मुक्काम सर्वाधिक असे. सेनाधिकारी
, सामान्य सैनिक, यांच्याशी त्याचे सतत संवाद होत. त्यामुळे आघाडीवरील परिस्थिती काय आहे याचे त्याला उत्तम ज्ञान होई. आपल्या मंत्रीमंडळांच्या बैठका तो नेहमी व्हाइट हाउसमध्ये घेत नसे. कधी युध्दखात्यात तर कधी नेव्ही यार्डमध्ये, अन्य वेळी तो आपल्या सहकाऱ्यांना भेटत असे. त्यांच्याशी चर्चा करी. हे सहकारी त्याच्याविषयी गलिच्छ भाषेत बोलत. हे सर्व त्याला समजे. पण त्याने त्याचा राग कधी मनात ठेवला नाही. देशकार्यासाठी या माणसाकडे कोणती क्षमता आहे आणि तिचा कसा वापर करून घ्यायचा, याचे त्याला उत्तम ज्ञान असे.


राजकारणात ज्याला यशस्वी व्हायचे आहे
, पुढे जायचे आहे आणि अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त करायचे आहे, त्याला एकनिष्ठ सहकारी उभे करावे लागतात. विल्यम्स सीवार्ड आणि एडविन स्टॅन्टन हे त्याचे दोन अत्यंत विश्वासू सहकारी होते. एक अर्थमंत्री होता आणि दुसरा युध्दमंत्री होता. रणांगणावर त्याचा जवळचा सहकारी होता जनरल गँ्रड. जनरल गँ्रडने बंडखोर सैन्याचा अंतिम पराभव केला. युध्द जिंकले. अमेरिका अखंड राहिली. राजकारणात स्तुतिपाठक ढीगभर मिळतात. कारण ते लाचार असतात. त्या प्रत्येकाला आपल्या नेत्याकडून काही ना काही हवे असते. लिंकनने असले स्तुतिपाठक गोळा केले नाहीत. राजकारण म्हणजे सततचा संघर्ष असतो. निरंतर जागरूकता ठेवावी लागते. दहा जण येतात, वाकून नमस्कार करतात, अत्यंत नम्रपणे बसून असतात, साहेब साहेब करतात, पण यातील नऊ जणांच्या डोक्यात साहेबांचे पाय कसे खेचता येतील याच्या योजना चालू असतात. हे नऊ जण कोण आणि त्यातील आपला एक कोण हे ज्याला समजते, तो यशस्वी राजनेता होतो. आणि ज्यांना समजत नाही, तो कोण होतो...

 

जननेता होण्यासाठी प्रामाणिकपणा, सचोटी आणि प्रबळ नीतिमत्ता असावीच लागते. पं. नेहरू यांनी चीनकडून मार खाल्ला. पण लोकांनी त्यांना हाकलून लावले नाही, का? कारण पं. नेहरूंच्या प्रामाणिकपणावर, सचोटीवर, प्रबळ नीतिमत्तेवर लोकांचा अढळ विश्वास होता. लोकांना असे वाटले की चीन नालायक आहे, विश्वासघातकी आहे, दगाबाज आहे, त्याने एका प्रामाणिक माणसाला फसविले. प्रामाणिकपणा आणि सचोटीचे हे सामर्थ्य असते. लोकसभेत अटलबिहारींचे सरकार मायावतीच्या विश्वासघातामुळे एक मताने पडले. लोकांना अतीव दुःख झाले. सरकार पडण्याचे दुःख कमी, पण एका प्रामाणिक माणसाला फसविले गेले याचे दुःख झाले. लोकांनी अटलजींना पुन्हा निवडून देऊन आणि त्यांना पंतप्रधानपदी बसवून त्याचा वचपा काढला.

 

आज महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक नेते दुर्दैवाने आपल्या जन्मजातीच्या पलीकडे जात नाहीत. कुणाला वाटते की मी ओबीसींचा नेता आहे, तर कुणाला वाटते की मी धनगरांचा नेता आहे, तर काही जणांना वाटते की मी मराठा आणि कुणबी समाजाचा नेता आहे. तसेच काही जणांना वाटते की मी दलित लोकांचा नेता आहे. माफ करा, असा जातिगत विचार करणारे नेते पूर्ण महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व करू शकत नाहीत. महाराष्ट्र एकजातीय देश नाही, एकधर्मीय देश नाही, येथे अठरापगड जातीचे लोक राहतात. वेगवेगळया उपासनापंथांचे लोक राहतात. ते सगळे एका राजकीय रचनेत राहतात. या सर्वांना सामावून घेणारे नेतृत्व उभे राहिले पाहिजे.

 

लिंकनने या सगळया विषयाचा कसा विचार केला होता? जे फुटून निघाले, त्यांना कधी त्याने शत्रू मानले नाही. ते आपलेच देशबांधव आहेत. त्यांच्याशी वाईट व्यवहार त्याने कधी केला नाही. मानसिकदृष्टया विभागलेल्या लोकांमध्ये समानतेचे दुवे कोणते, हे त्याने शोधले. आपली राज्यघटना, लिबर्टीचा आपला आग्रह, समतेप्रती आपली वचनबध्दता, परमेश्वराच्या अस्तित्वावर प्रगाढ श्रध्दा अशा सर्व गोष्टी लोकांना एक करणाऱ्या आहेत, हे त्याने जाणले. लिंकनची गाजलेली चार भाषणे आहेत, या चारही भाषणात या ना त्या स्वरूपात हा सर्व आशय आलेला आहे. त्यांना केवळ गाजलेली भाषणे म्हणणे योग्य होणार नाही. कारण ही भाषणे म्हणजे अमेरिका आहे, इतके त्याचे अतूट नाते आहे.

 

महाराष्ट्राचा विचार करता आज महाराष्ट्राचे ज्वलंत विषय कोणते आहेत? शिवसेना विरुध्द भाजपा असा विचार केला तर शिवसेनेचे सरकार हा भाजपाच्या दृष्टीने ज्वलंत विषय असू शकतो. जनतेला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न वेगळे आहेतच. शंभर रुपये किलो कांदा हा आजचा ज्वलंत प्रश्न आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि फळबागांचे झालेले नुकसान हा दुसरा ज्वलंत प्रश्न. अर्थहीन शिक्षण हा तिसरा ज्वलंत प्रश्न आहे. या शिक्षणातून बाहेर पडणारी मुले व मुली यांच्या भवितव्याचा ज्वलंत प्रश्न आहे. स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न हा चौथा ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नाविषयी कोण बोलते? भाजपातील कोणता नेता हे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे? व्यक्तिगत दुःख आणि गाऱ्हाणी यांचे राग आळविण्यात अनेक जण मग्न आहेत. त्या सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, तुमच्या व्यक्तिगत-राजकीय सुखदुःखाशी सामान्य माणसाला काहीही पडलेले नाही. त्याला रस्त्यावर पडलेले खड्डे दिसतात. आकाशाला भिडलेले कांद्याचे भाव दिसतात. आवाक्याबाहेर चाललेले भाज्यांचे भाव दिसतात. घरातून आपली मुलगी, बहीण, पत्नी कामाला किंवा शिक्षणाला गेली असेल तर संध्याकाळी ती सुरक्षित घरी पोहोचेल का, याची काळजी त्याला असते.

 

महाराष्ट्राला जननेते हवे आहेत - जनतेच्या प्रश्नांशी भावनिकदृष्टया एक होणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी हितसंबंधितांचे शिव्याशाप खाणारे नेतृत्व पाहिजे आहे. लिंकनने जेव्हा लोकभावना आपल्या मानल्या, तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांनी आणि विरोधकांनी त्याला कधी माकड म्हटले, कधी गोरिला म्हटले, कधी महामूर्ख म्हटले, तर कधी अष्टावक्र म्हटले. लिंकनने हे सर्व शांतपणे ऐकून घेतले. कधीही कुणाचा प्रतिवाद केला नाही. कुणाला उत्तर देण्याच्या तो भानगडीत पडला नाही. आणि खऱ्या अर्थाने तो लोकांच्या हृदयात गेला. एका आईने त्याच्याविषयी काढलेले उद्धार असे आहेत - ''याला अत्यंत कुरुप असे लोक का म्हणतात, हे मला समजत नाही. कारण तो जगातील सर्वात सुंदर पुरुष आहे.'' लिंकनची ही सुंदरता त्याच्या प्रामाणिकपणात, सचोटीत आणि प्रबळ नीतिमत्तेत आहे.

 

मोदींची हवा तर राहणारच आहे. ती पुढच्या निवडणुकीतदेखील राहील. नरेंद्र मोदी आपल्या कर्तृत्वाने मोठे अाहेत. देशातील हिंदू भावना काय आहेत, हे त्यांना अतिशय उत्तम रितीने समजते. म्हणून हिंदू समाजाला ते फार मोठे आधार वाटतात. याला पूरक म्हणून महाराष्ट्रातदेखील 'महाराष्ट्रमोदी' उभा राहिला पाहिजे. या दोघांची मिळून जी शक्ती होईल, ती महाराष्ट्रात जे परिवर्तन घडवून आणेल, ते तीनशे वर्षांपूर्वींच्या छत्रपतींची आठवण करून देणारे असेल.


vivekedit@gmail.com