लक्ष्मीकांत बेर्डे एक चतुरस्र अभिनेता

विवेक मराठी    14-Dec-2019
Total Views |

***अनुप कुलकर्णी ****

मराठी चित्रपटाच्या भवितव्याविषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशा वेळी तो एखाद्या राजासारखा दमदार पावलं टाकत आला. नुसता आलाच नाही, तर तब्बल दीड दशक त्याने स्वतःच्या मजबूत खांद्यावर मराठी चित्रपटसृष्टी पेलली व मराठी चित्रपटाला गतवैभव प्राप्त करून दिलं. तोच तो लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ रसिकांचा लाडका लक्ष्या!

brerde_1  H x W

लहानपणी रविवारची हक्काची सुट्टी म्हणजे मनसोक्त खेळण्याचा दिवस. आमच्या या खेळण्याला कुणी कितीही ओरडलं तरी आम्ही बधायचो नाही. मात्र हा खेळ बंद करण्याची परवानगी फक्त एकाच व्यक्तीला होतीलक्ष्मीकांत बेर्डे! बरोबर चार वाजता आमच्यापैकी एक जण जाऊन दूरदर्शनवर कुठला चित्रपट लागला आहे तो बघून यायचा. लक्ष्याचा चित्रपट असेल तर ओरडत यायचा, "लक्ष्या आहे रे!" बस्ससगळा खेळ वगैरे तिथेच टाकून आम्ही टीव्हीसमोर ठाण मांडून बसायचो. लक्ष्या म्हणजे आठवड्याभराच्या अभ्यासाच्या ताणावर असलेला आमचा रिलीफ होता.


आज मराठी चित्रपटसृष्टी हा मोठा उद्योग आहे. एका चित्रपटावर अनेकांचं घर चालतं. सध्याच्या घडीला मराठी सिनेमा तांत्रिकदृष्ट्या विकसित होतोय आणि बॉलिवूडची स्पर्धा करतोय. आज असंख्य अभिनेत्यांची मांदियाळी मराठी सिनेमात कार्यरत आहे आणि उत्तम कथा, पटकथा, संगीत, दिग्दर्शन या गोष्टीसुद्धा अधिकाधिक दर्जेदार बनल्या आहेत. मात्र, एकेकाळी मराठी सिनेसृष्टीत या सर्व गोष्टींचा प्रचंड अभाव होता. आशयप्रधान चित्रपट तयार होणं जवळपास बंद झालं होतं आणि एका ठरावीक साच्यात मराठी चित्रपट अडकला होता. परिस्थिती एवढी बिकट होती की मराठी चित्रपटाच्या भवितव्याविषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशा वेळी तो एखाद्या राजासारखा दमदार पावलं टाकत आला. नुसता आलाच नाही, तर तब्बल दीड दशक त्याने स्वतःच्या मजबूत खांद्यावर मराठी चित्रपटसृष्टी पेलली व मराठी चित्रपटाला गतवैभव प्राप्त करून दिलं. तोच तो लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ रसिकांचा लाडका लक्ष्या!


लक्ष्याचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे लक्ष्याने शाळेपासूनच आपले अभिनयगुण दाखवायला सुरुवात केली. गणेश उत्सवात छोट्या छोट्या नाटिका तो सादर करू लागला. असं म्हणू या की आपल्यात एक मोठा अभिनेता दडला आहे याची जाणीव त्याला फार पूर्वीच झाली होती. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्याने पुरस्कारांचा अक्षरशः ढीग लावला. मग ही आवड आणखी पुढे नेण्यासाठी लक्ष्याने मुंबई मराठी साहित्य संघात नोकरी पत्करली. अभिनयक्षेत्राच्या जास्तीत जास्त जवळ राहता यावं हाच हेतू त्यामागे होता. काही नाटकं केल्यानंतर त्याला एक अशी संधी मिळाली की त्याने परत मागे वळून पाहिलं नाहीती संधी म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांचं जबरदस्त यशस्वी नाटक 'टूरटूर'. ज्याला आपण खास 'लक्ष्या स्टाईल' म्हणतो ती शैली टूरटूरमधून विकसित झाली. नंतर त्याने 'बिघडले स्वर्गाचे दार' आणि 'शांतेचं कार्ट चालू आहे' या नाटकात काम करून प्रेक्षकांना खळखळून हसवलं.


१९८५ साली 'लेक चालली सासरला' मधून लक्ष्याचं मराठी चित्रपटात वाजतगाजत पदार्पण झालं. त्याने अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्या साथीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देऊन रसिकांच्या मनात अढळपद मिळवलं. लक्ष्या म्हणजे हास्यस्फोटाची गॅरंटी असा त्याचा लौकिक झाला. फक्त लक्ष्या आणि अशोक सराफ आहेत म्हणून लोक घरातून थिएटरकडे खेचले जाऊ लागले. लक्ष्याचं फार मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे चित्रपट क्लासेसपासून मासेसपर्यंत सर्वांना आवडतात. एकटंदुकटं सिनेमा पाहण्यापेक्षा सहकुटुंब सिनेमा पाहण्याचा शिरस्ता लक्ष्याने पाडला असं म्हणायला हरकत नसावी. कुठेही अश्लील किंवा द्व्यर्थी संवाद नाहीत, भडक हिंसाचाराचं चित्रण नाही, अलंकारिक भाषा नाही किंवा लोकांना भावनिक करून रडवण्याचा अट्टाहास नाहीहोतं फक्त निखळ निर्व्याज हसू! याच हास्याच्या जोरावर अवघं कुटुंब, लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्व जण एकत्र बसून लक्ष्याच्या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकतात, रटाळ आयुष्यातील चार क्षण आनंदाने उपभोगू शकतात ही लक्ष्याने मराठी रसिकांना दिलेली देणगीच म्हणावी लागेल.

लक्ष्याच्या चित्रपटांच्या यादीवर एक नजर टाकली तर हा माणूस काय अफाट काम करून गेलाय याची कल्पना येईल. माझा छकुला, शेजारी शेजारी, शेम टू शेम, धडाकेबाज, हमाल दे धमाल, दे दणादण, धूमधडाका, झपाटलेला, आयत्या घरात घरोबा, एक गाडी बाकी अनाडी हे काही विशेष उल्लेखनीय चित्रपट. आणि अर्थातच, स्त्री पात्र साकारून जबरदस्त धमाल उडवून देणाऱ्या 'अशी ही बनवाबनवी' मधला 'हा माझा बायको पार्वती' विसरणं सर्वथा अशक्य आहे! बनवाबनवी हा मराठीतील एक मैलाचा दगड समजला जातो. आजही हा चित्रपट जेव्हा टीव्हीवर लागतो, तेव्हा इतर वाहिन्यांचे टीआरपी घसरतात. आज इतक्या वर्षांनंतरही लक्ष्याचा अभिनय फ्रेश वाटतो आणि त्याची जादू अद्यापही कायम आहे. हे भाग्य सहसा इतर कलाकारांच्या वाट्याला येत नाही, म्हणूनच लक्ष्या वेगळा आहे!

अशा या गुणी कलाकाराकडे हिंदी सिनेसृष्टीचं लक्ष गेलं नसतं तरच नवल! 'मैने प्यार किया'मधून लक्ष्याने मराठीचा झेंडा हिंदीतही रोवला. एकाच वेळी त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. हिंदीमध्ये त्याला दुय्यम भूमिका मिळाल्या हे खरं असलं, तरी त्याने त्यातही आपली छाप उमटवली आहे. साजन, बेटा, हम आपके है कौन, १०० डेज वगैरे चित्रपटांत तो रूढार्थाने हिरो नसला, तरी त्याच्या भूमिकांचं महत्त्व हिरोच्या खालोखाल होतं. कथा पुढे घेऊन जाण्यात त्याचा मोलाचा वाटा असायचा. खोटं वाटेल, पण लक्ष्याने तब्बल ८१ हिंदी चित्रपटांत काम केलं आहे! जिथे एखाद्या अभिनेत्याची कारकिर्द पन्नास चित्रपटांच्या आत-बाहेर संपते, तिथे एकटा लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा चतुरस्र अभिनेता ८१ हिंदी चित्रपट, १२ मराठी नाटकं, १००पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि १ मराठी मालिका आपल्या खात्यात बाळगून आहे.

कॉमेडी किंग किंवा कॉमेडीचा सुपरस्टार अशी बिरुदं लक्ष्याला जोडली जात असली, तरी त्याने विनोदातून बाहेर येऊन गंभीर भूमिका करण्याचाही प्रयत्न केला होता. त्याचा महत्त्वाकांक्षी चित्रपट 'एक होता विदूषक'मधून त्याने अभिनयाचा वेगळा पैलू दाखवला. पण दुर्दैवाने प्रेक्षकांना हे रूपांतर तितकंसं आवडलं नाही. असं म्हणतात की, एक होता विदूषक फ्लॉप झाल्याने लक्ष्या मनातून बराच खचला होता. त्याच्या शेवटच्या 'पछाडलेला' चित्रपटात झालेलं त्याचं दर्शन मनाला चटका लावून गेलं. त्यात त्याचं शेवटच्या काळातील आजारपण स्पष्ट दिसत होतं. नेहमी पडद्यावर उत्फुल्ल वावर असणारा आणि धांगडधिंगा करणारा करणारा हा उत्साही माणूस अगदी शांत संयमी बोलताना पाहून रसिकांच्या मनाला घरं पडली. पाठोपाठ काही दिवसातच ती नको असणारी वाईट बातमी आली आणि अवघी चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिक शोकाकुल झाले

१६ डिसेंबर २००४! आजच्याच दिवशी किडनीच्या आजाराने या उमद्या माणसाचा घात केला! त्या दिवशी अनेकांच्या घशाखाली जेवण उतरलं नाही. आपला लाडका लक्ष्या आता या जगात नाही हे कटू सत्य स्वीकारताच येणार नव्हतं. हे काय वय असतं जायचं? आयुष्याच्या इंटर्व्हलनंतर सेकंड हाफमध्ये आणखी चांगल्या भूमिका अपेक्षित असताना ही अनपेक्षित एक्झिट घेऊन लक्ष्याने चित्रपटच संपवला आणि मनाला कायमची रुखरुख लावून ठेवली. पण मी आणि माझ्यासारख्या अनेक चाहत्यांनी लक्ष्याला आमच्या मनात कायम जिवंत ठेवलं आहे हे मात्र नक्की!