डोळसपण की हेतुपुरस्सर बुध्दिभेद?

विवेक मराठी    21-Dec-2019
Total Views |

 

*** पार्थ बावस्कर***

'बलात्कार आणि बॅरिस्टर' अशा शीर्षकाचा एक लेख अलीकडेच एका दैनिकात प्रसिध्द झाला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकारितेकडे आपण पाहतो, त्या पत्रकारितेची झूल अंगावर घेणाऱ्यांनी, स्वा. सावरकरांविषयी लिहिलेल्या लेखाला बलात्कार आणि बॅरिस्टर असे शीर्षक द्यावे हे पाहून आश्चर्य वाटले, त्यांच्या आकलनक्षमतेची कीव करावीशी वाटली. एकमेकांशी अजिबात संबंध नसलेल्या गोष्टी या विद्वानाने(?) एकत्र आणल्या, त्याही चुकीचे संदर्भ देत, खोडसाळपणे. त्यांच्या त्या तर्कहीन मांडणीला तर्कशुध्द उत्तर देण्यासाठी ही तीन भागांची लेखमाला.
 

Life story of Veer Savark

 


आपल्या देशात आजकाल कुठल्याही महापुरुषावर टीका करण्याची
, त्यांच्यावर चिखलफेक करण्याची फॅशन आलेली आहे. महापुरुषांना बरेवाईट बोलले, त्यांना नावे ठेवली की लगेच प्रसिध्दी मिळते, उलटसुलट चर्चांना ऊत येतो. हल्ली अशा सवंग प्रसिध्दीसाठी लोक हपापलेलेच असतात. कालपरवा राहुल गांधी प्रदीर्घ काळानंतर पुन्हा मायदेशी (?) (की मायदेशातून?) परतले! इतक्या दिवसानंतर भारतात आल्यानंतर, जाहीर प्रचारसभेत बलात्काराच्या घटनांवर बोलताना, हा देश स्त्रियांसाठी असुरक्षित झाली आहे याची जाणीव झाली, आणि त्यावरून ते बेताल बडबडत सुटले. या बेताल वक्तव्यावर माफीची मागणी जोर धरू लागताच, त्यांनी 'मी सावरकर नाही, गांधी आहे' असं वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं. राहुल गांधी यांच्या बौध्दिक कुवतीचा अंदाज आताशा देशातल्या सुजाण जनतेला आलेला आहे. तरीही त्यांच्या बेलगाम टीकेचं निमित्त करून काही तथाकथित विचारवंत सावरकरांविषयीचीची त्यांच्या मनातली मळमळ बाहेर काढतात. राहूल गांधींच्या या ताज्या सावरकरसंदर्भातील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, एका विचारवंताने (?) लिहिलेला लेख वाचनात आला. त्यात त्यांना पडलेले काही प्रश्न त्यांनी मांडले होते. राहुल गांधी प्रभृती लोक असे काही बोलतात याचे आश्चर्य वाटत नाही, पण जेव्हा विचारवंत म्हणून मान्यता पावलेले जयदेवराव डोळे असे लिहू बोलू लागतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्याचा परामर्ष घ्यावाच लागतो, तो ही सविस्तर.

आमच्या फेसबुक पेजला
like करा : सा. विवेक

कोणत्याही ऐतिहासिक वाक्यांचा संदर्भ देताना त्या लेखकाने प्रत्यक्ष काय लिहिले आहे हे प्रमाण मानायचे असते. डोळे मात्र नेमके सावरकर सोडून दुसरे लोक काय म्हणतात याचेच संदर्भ देतात. आपल्या डोळयांना हेच का दिसते? राहुल गांधींचे स्त्रियांच्या सद्यस्थितीबद्दलचे वक्तव्य, त्यानंतर त्यांनी अस्थानी केलेला सावरकारंचा उल्लेख या सगळयावरून डोळयांनी थेट, सावरकराचे स्त्री स्वातंत्र्य संदर्भातील विचार, यावर उडी घेतली. या अनुषंगाने त्यांनी जे निष्कर्ष काढले आहेत, ते मात्र वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे, अगदीच विसंगत, हास्यास्पद आहेत. तेव्हा नेमके सत्य काय हे डोळयांना आणि त्यांच्या निमित्ताने सजग वाचकांच्या समोर आणणे यासाठी हा लेखनप्रपंच.

 

डोळयांनी त्यांच्या लेखात मनुस्मृती, प्राचीन काळातील स्त्रिया आणि सावरकर यांचा एक संदर्भ दिला आहे, म्हणून अगदी प्राचीन काळात स्त्रिया कशा नांदत आणि सावरकरांनी त्यांच्याबद्दल काय सांगितले आहे इथपासून सुरुवात करू या. आपल्या देशात प्राचीन काळात महिलांची स्थिती कशी होती, त्यांची दिनचर्या, त्यांच्यासंदर्भात आपल्या स्मृती ग्रांथांमध्ये सांगून ठेवलेले नियम याचे सखोल विश्लेषण करणारी लेखमाला सावरकरांनी रत्नागिरीत लिहिली. यात एकूण चार लेख आहेत. स्त्रीच्या जन्मापासूनच सावरकर सुरुवात करतात. मुलींची नावे कोमलता (उदा., वत्सला, शालिनी, मंजुळा अशा प्रकारची) सूचित करणारी असावी असे मनुस्मृती सांगते, ती जर भीषण (उदा., तारा, रोहिणी, इंदू अशी अनेक) असतील तर तशा स्त्रियांशी लग्न करू नये, या मनुस्मृतीमधील वचनाची सावरकरांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. जन्म झाल्यानंतर मुलींचे नाव कशा प्रकारचे ठेवावे, कशी असू नयेत याबद्दल मनुस्मृतीत विशिष्ट नियम सांगितले आहेत. नावे सौम्य असावीत हे ठीक आहे, पण जर ती तशी नसतील, तर अशा स्त्रियांसोबत विवाह करू नये या नियमावर मात्र सडकून टीका करताना सावरकर दिसतात. आजच्या काळात मनुस्मृतीचे दाखले देऊन तदनुसार वर्तन असावे असे सांगणारा जो ब्राह्मण समाज आहे, त्यांच्या घरातील बायकांची नावे कशी भीषण आहेत हे सावरकर सोदाहरण स्पष्ट करतात आणि या वचनाची थट्टा करतात. पण फक्त नावात दोष आहे म्हणून त्यांना बोहल्यावर चढवू नये असे जे सांगितले आहे, त्याबद्दल मात्र 'ही विवाहव्यवस्था आहे की वैधव्यव्यवस्था?' असा थेट सवाल सावरकर विचारतात. (प्राचीन अर्वाचीन महिला - स्वा.सावरकर - संदर्भ - 13.) जे लोक स्मृतिग्रांथाचा आधार घेऊन आजही स्त्रियांवर बंधने घालतात, त्यांना जाग यावी यासाठी सावरकरांनी ही मांडणी केली आहे हे जाणकारांना वेगळे सांगायला नको. इतकेच नव्हे, तर स्त्रियांच्या नावाचे असे नियम पाळू नयेत, नावे बदलण्याचेही त्यांना स्वातंत्र्य असावे, हेही ते सुचवतात.

स्त्री प्रश्नावरील दुसऱ्या लेखात स्त्रीने कुणाशी विवाह करावा याबद्दल तिला कसे स्वातंत्र्य आहे आणि ते कसे असले पाहिजे, पूर्वीच्या काळीही ते कसे अबाधित होते याचे दाखले देतात. विवाहाच्या संबंधात पटवून देतात की पूर्वी ब्राह्मण गुरूंना क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जातीमधील बायकांशी विवाह करता येत असे आणि त्यांच्यापासून झालेली संततीसुध्दा ब्राह्मणच समजली जाई. ब्राह्मण पत्नी आणि शूद्र पत्नी ही एकाच अधिकाराने नांदे. अशा जातिभेद मानत नसलेल्या आणि स्त्रियांना मानाची आणि हक्काची वागणूक देत असलेल्या स्मृतीचे कौतुक करताना सावरकर लिहितात - 'भगवन मनू हे या श्लोकापुरते तरी वर्णाश्रम रोटीबंदी व बेटीबंदी या मंडळाचे सदस्य होण्याचा पक्षाचे नसून जातपात मोडक मंडळाच्या पटावरचे आपले नाव नोंदवतीलसे दिसतात.' (मनुस्मृतीतील महिला - लेखक स्वा. सावरकर - लेख क्रमांक 2.) प्राचीन काळात सर्व वर्णांच्या स्त्रिया एकाच अधिकाराने वागत असत, नांदत असत. एक बाब लक्षात घ्यायला लक्षात घ्यायला हवी की रत्नागिरीच्या सगळया कर्मठांना सावरकर हे सांगू पाहतात. स्त्रीचा जन्म केवळ खालच्या जातीत झाला म्हणून तिला समाजात देण्यात येणारी वागणूक बदलत नसे, आजच्याही लोकांनी जातिभेद मोडून स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करायला हवा, असे स्पष्टपणे सावरकर सांगतात, तोही थेट मनुस्मृतीचा दाखला देऊन.


Life story of Veer Savark

स्त्रियांबद्दलचे दोष ज्या ठिकाणी लिहून ठेवले आहेत अशा काही श्लोकांवर आक्षेप घेताना सावरकर स्पष्ट सांगतात की या सगळयाचे रचनाकार पुरुष असल्याने त्यांना स्त्रियांचे दोष दिसले, दोष प्रत्येकात असतात. जर स्त्रियांनी शास्त्र लिहिले असते, तर त्यांनीही पुरुषांच्या दोषांचे वर्णन केले असते. सावरकरांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, 'स्त्रीदोषविषयक श्लोक बहुत आहेत. या प्रकरणी इतकेच ध्यानी ठेवायचे की शास्त्रकार पुरुष होते. जर शास्त्रकार स्त्रियाही असत, तर पुरुषदोष वर्णतांना हेच श्लोक त्यांनी पुरुषांनाही इतक्याच यथातथ्यपणे लावण्यास सोडले नसते.' (उपरोक्त भाग 3) असे सांगून सावरकर इथवरच थांबत नाहीत, तर त्या काळात स्वतःची बाजू मांडली नाही, त्यामुळे असे अपसमज पसरवले गेले आणि आता तसे होऊ नये म्हणून स्त्रियांनी आपापली बाजू मांडावी, लिहावे, असेही सावरकर सुचवतात.

पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जावे हा विधी मनुस्मृतीने कुठेही, किंबहुना भारतीय कायद्यात कुठेही सांगितलेला नाही, हेही सांगायला सावरकर विसरत नाहीत. सावरकर लिहितात, 'पतिनिधानानंतर नियोग किंवा पुनर्विवाह किंवा आमरण ब्रह्मचर्ययुक्त जीवन नेण्याचे विधवेचे तिन्ही धर्मसंप्रदाय सांगितले असतानाही विधवेने पतीसह सती जावे असा विधी इथे मात्र कुठेही धडधडीतपणे पुरस्कारिलेला नाही.' (उपरोक्त भाग 4). हे लिहिल्याने सावरकर तर त्या काळातले स्त्री प्रश्नाचे भाष्यकार ठरतात. आजच्या रूढी कशा चुकीचा आहेत आणि आपण त्यातून बाहेर येऊन आपला स्त्रीबद्दलचा दृष्टीकोन कसा बदलायला हवा हेही पटवून देतात.

हिंदू धर्मातील नियम सांगण्यासाठी प्रसिध्द असलेली जातिसंस्थाही कशी काळानुरूप अस्तित्वात आली, याचे दाखले देतात आणि या सर्व रचनेमागील घोटाळे लोकांना समजावून सांगतात. श्रुतीस्मृतीपुराणोक्त मानणाऱ्या समाजाचे कसे चुकले आहे हे सावरकर पटवून सांगतात. भिन्न भिन्न काळात ते लिहिले गेले आहेत हे आपण का विसरतो? तत्कालीन काळात आणि व्यवस्थेत मनुस्मृती उपयुक्त होती म्हणून मनुस्मृतीचे कौतुक सावरकरांनी केले, पण आताच्या काळातही ते नियम तसेच मानावे का? याबद्दल त्यांनी उपरोधाने ठिकठिकाणी टीकाही केलेली आहे, मनुस्मृतीमधील दोष दाखवून दिले आहेत. आजच्या काळात त्यात हवे तसे बदल करून घेणे हे समाजाच्या हिताचे कसे आहे, हेच सावरकरांनी पटवून दिले आहे.

एका लेखात विविध राज्यकारभाराचे परकीय उदाहरण देऊन सावरकर लिहितात - 'राज्याचे सूत्र हाती तो पुरुष थोर आहेच, पण पाळण्याची दोरी जीच्या हाती ती स्त्री काही कमी थोर नव्हे!'

(डोळयांसारखे इतरही काही विद्वान लोक यावरून असाही अर्थ काढतील की सावरकरांना असे म्हणायचे आहे का, की स्त्रियांनी फक्त पाळण्याची दोरी संभाळावी, बाकी काहीही करू नये?)

 

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सावरकर ज्या काळात हे लिहितात, त्या काळात स्त्रियांचे स्वातंत्र्य मर्यादित होते. स्त्रियांना किमान पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक मिळावी, त्यांचा तो अधिकार आहे हे समाजाला पटवून देणे किती आवश्यक आहे याकडे सावरकर लक्ष वेधत आहेत. आता हेही ज्यांच्या कुशाग्रा बुध्दीला पटत नाही, त्यांच्या थोर बुध्दीला साष्टांग दंडवत! आजच्या स्त्रियांनी आता आद्यतन (अप टू डेट) व्हायला हवे असे सांगताना सावरकर, 'जुने ते सगळेच चांगले नाही व सगळे वाईटही नाही', अशी समतोल भूमिका घेतात आणि लिहितात, 'जुने ते सोने हे जसे कधी खरे असते, तसे जुने ते शिळे हेही खरेच असते.'

 

स्त्रियांनी अद्ययावत व्हावे असे सांगताना, स्मृतिग्रांथातील आजच्या काळात सर्वथैव चुकीचा वाटणाऱ्या प्रथा मोडीत काढा, असे सावरकर जाहीरपणे लिहीत होते, बोलत होते, तरीही त्यांच्यावर सनातनी शिक्का मारण्याची बुध्दी डोळयांसारख्या ज्येष्ठांना का झाली, कुणास ठाऊक? अशांचे डोळे खाडकन उघडावेत म्हणून स्त्रीबद्दलच्या इतर काही महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात सावरकरांचे काय मत होते. हे पुढील भागात समजून घेऊ या.

(क्रमशः )

parthbawaskar93gmail.com

9146014989/8275204500