समरस समाज होण्याच्या दिशेने सामूहिक विवाह

विवेक मराठी    21-Dec-2019
Total Views |

संघकार्य करीत असताना कोणकोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतील, हे सांगता येत नाही. संघप्रचारक तसा अविवाहितच. परंतु तो समाजात विवाह नीट व्हावेत, याची चिंता करतो. त्याचा स्वतःचा परिवार नसतो, पण त्याला सामाजिक परिवाराची चिंता असते. समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट ही संघविचारधारेतील एक संस्था आहे. तिचे कार्य गुजरातमध्ये चालते. श्रीकांत काटदरे ज्येष्ठ संघप्रचारक आहेत. या समन्वय चॅरिटेबल ट्रस्टची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. या समन्वय चॅरिटेबल ट्रस्टच्या ग्रूपतर्फे 15 डिसेंबरला भरूच येथे सामूहिक विवाहाचा कार्यक्रम होता.

 


samrasta_1  H x

अतिशय भव्य मंडपात हा कार्यक्रम संपन्न झाला. भव्य मंडपात बारा जोडप्यांचे लग्नमंडप होते, फारच देखणी अशी त्याची सजावट होती. विवाह समारंभ संपूर्ण वैदिक पध्दतीने झाला. सकाळी साडेआठ वाजता ग्रहशांती आणि मंडपमुहूर्त झाला. त्यानंतर वैदिक मंत्राच्या उच्चारात विवाह संस्कार विधी सुरू झाले. मधला तासा-दीड तासाचा वेळ सोडला तर ते चार वाजेपर्यंत चालले. ज्यांचे विवाह होणार होते, ती हिंदू समाजातील सर्व जातीतींल जोडपी होती. त्यात जसे सवर्ण होते, तशी दलित जोडपीदेखील होती. 

 

 

हॉस्टेल ग्रााउंडवर झालेला हा कार्यक्रम वेळेच्या नियोजनाबाबतीत आदर्श कार्यक्रम होता. लग्न म्हटले की धावपळ आणि वेळ इकडे-तिकडे होणे, याची आपल्याला सवय झालेली असते. पण या कार्यक्रमात प्रत्येक विधी वेळेवर सुरू झाला, वेळेवर संपला. जयेश भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला नाही की, वैदिक विधीचा अधिकार अन्यांना नाही, तो फक्त ब्राह्मणांना आहे. संघकार्यातून जे समाजपरिवर्तन होते, ते असे आहे. पन्नास वर्षांपूर्वी वैदिक मंत्रात ब्राह्मणेतर जातींचे विवाह याची कुणी कल्पना करू शकत नव्हते. भरूचच्या त्या मंडपात मी एका क्रांतिकारक परिवर्तनाचा साक्षीदार होतो. 

samrasta_1  H x

 

 

या सामूहिक विवाहाचा सर्व खर्च भरूचमधील जनतेने उचलला. पैसा गोळा करणे तसे अवघड नसते, परंतु ज्या कामासाठी पैसा गोळा केला गेला, ते काम समाजाने स्वीकारले, असा त्याचा अर्थ झाला. प्रत्येक जोडप्याला नवीन संसार सुरू करण्यासाठी भांडीकुंडी, मिक्सर, पंखा, खर्ुच्या असे सर्व साहित्य आहेर म्हणून देण्यात आले. हा विवाह समारंभ म्हणजे समरस समाज निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. 

 

 

मला प्रमुख अतिथी म्हणून बोलाविले होते आणि दोन सत्रांमध्ये समरसता विषय मांडण्याचे काम मला दिले होते. विवाह मंडपातच हजार-बारशे स्त्री-पुरुषांसमोर, 'समरसता म्हणजे काय?' हे अनेक कथांच्या माध्यमातून मी सांगितले. विवाह समारंभात भाषण होत नाहीत, आलेले अतिथी वेगळया मानसिकतेत असतात; परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की मंडपात कमालीची शांतता होती आणि जेवढे पुरुष होते, तेवढयाच स्त्रिया होत्या. सर्व जण शांतपणे भाषण ऐकत होते. माझ्या दृष्टीने भाषणाचे महत्त्व नाही. हा सामूहिक विवाह समारंभ कोणत्या वैचारिक भूमिकेतून केला जात आहे, हे ऐकण्यासाठी लोक बसले होते. म्हटले तर हे मोठे समाजपरिवर्तन आहे. 

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन पटेल, विजय शहा, डॉ. दीपिका शहा, भाईलाल पटेल, डॉ. भास्कर रावल इत्यादींनी अतिशय परिश्रम घेतल्याचे जाणवत होते. गाजावाजा न करता समाजपरिवर्तनाचे काम कसे करायचे, याचे उत्तम उदाहरण भरूचच्या कार्यकर्त्यांनी सादर केले.