भारताबाहेरील रामकथा

विवेक मराठी    23-Dec-2019
Total Views |

 

 भारतीय संस्कृतीची ओळख बनलेला राम आणि त्याच्या कथा भारताबाहेरील अनेक देशांतही वेवेगळया रूपात आढळतात. भारताबाहेरील अशा रामकथांचा मागोवा या लेखात घेतला आहे.


jay shreeram_1  

 

 


रामकथा जो ऐकतो, तो मोहून जातो. ती कथा आपल्या भाषेत असावी, आपल्या धार्मिक ग्रंथात असावी असे त्याला वाटते आणि रामकथा वेगवेगळया देशांत तिथल्या भाषेतील साजेसे रूप घेऊन नटते.

 

रामाची कथा बौध्द साहित्यात आहे. गौतम बुध्दाच्या काळातदेखील राम इतका लोकप्रिय होता की बुध्दाने एका जातक कथेत सांगितले - मागच्या कुठल्याशा जन्मी मी राम होऊन पितृआज्ञा पालान करण्यासाठी 14 वर्षे वनवासात राहून आलो. जैन साहित्यात महाराष्ट्री प्राकृत भाषेत कैक सुंदर ग्रंथ आले आहेत. मात्र जैन धर्माला अनुसरून, या कथेतील राम अहिंसावादी असतो, मग रावणाचा वध लक्ष्मण करतो असा बदल दिसतो. शीख साहित्यात गुरूग्रंथसाहेबमध्ये रामायणाची दोन रूपे आली आहेत - एक रामकथेचे वास्तविक रूप आणि एक रामकथेचे आध्यात्मिक रूप. सोळाव्या शतकापासून, मुसलमान लेखकांनी लिहिलेली 40हून अधिक रामायणे अस्तित्वात आहेत. तसेच 17व्या शतकापासून डच, पोर्तुगीज व इतर युरोपीय मिशनरींनी केलेली भाषांतरे आहेत. अगदी अलीकडे फादर कमिल बुल्के या युरोपियन ख्रिस्ती फादरने हिंदीतून रामकथांवर अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे.

इथे पाहू या भारताबाहेरच्या रामकथा.

पर्शिया

सोळाव्या शतकात अकबराने अब्दुल कादर बदौनीकडून रामायणाचे पहिले फारसी भाषांतर करवून घेतले. हा ग्रंथ 150हून अधिक चित्रांनी सजवला होता. अकबरानंतर जहांगीरने दोन भाषांतरे करवून घेतली. यापैकी एक भाषांतर केले होते मुल्ला साद उल्ला याने. या कवीचे वैशिष्टय असे की तो काशीला 12 वर्षे राहून संस्कृत भाषा शिकला. नंतर त्याने दास्तां-ए-राम-ओ-सीता या नावाने रामकथा लिहिली. तेव्हापासून जवळजवळ 19व्या शतकापर्यंत रामायणाची अनेक फारसी भाषांतरे केली गेली. भाषांतरकार अरबी, पर्शियन जरी असले तरी बहुतेक सर्व भाषांतरे भारतात केली गेली आहेत. तसेच काही हिंदू कवींनीसुध्दा पर्शियन भाषांतरे केली आहेत.

अफगाणिस्तान, पाकिस्तान

दशरथाची भार्या कैकयी ही गंधारच्या उत्तरेला असलेल्या केकयची देशाच्या अश्वपती राजाची कन्या. गंधार म्हणजे आताच्या अफगाणिस्तानच्या व पाकिस्तानचा उत्तरेचा भाग. हा प्रांत म्हणजे भरताचे आजोळ. 'गांधार'ची आठवण आता अफगाणिस्तानातील 'कंदाहार' या शहराच्या नावात शिल्लक आहे. भरताची मुले - पुष्कल व तक्ष यांनी गंधार प्रांतात पुष्कलावती आणि तक्षशीला या नगरी वसवल्या, तर रामपुत्र लवने लवपूर नगरी वसवली असे म्हणतात. या नगरींची आताची नावे आहेत - पेशावर, तक्षीला आणि लाहोर.

गंधार प्रदेशात रामायणातील अनेक नावे आजही दिसतात. उदा. - काबुल नदीचे एक नाव होते सीता नदी. हिंदुकुश पर्वताच्या नावातील 'कुश' रामपुत्र कुशवरून आले आहे असे काही लोक मानतात. हिंदुकुश पर्वतरांगांमधील एका शिखराचे नाव आहे सीताराम / सिकाराम.

 

तिबेट, चीन, मोंगोलिया

पाटलीपुत्र येथून येणारा ऊत्तरापथ हा महामार्ग थेट तक्षशीलेला पोहोचत असे. तसेच युरोप, इजिप्त, पर्शिया, रशिया आणि चीन यांना जोडणारा प्राचीन रेशीम मार्ग तक्षशीलेवरून जात असे. इजिप्तची काच, पर्शियाची जाजम/गालिचे, भारतीय मसाले, चिनी रेशीम इत्यादी व्यापाराचा हा राजमार्ग. या महामार्गावरून रामकथासुध्दा मध्य आशियाई देशांत पोहोचली.

तिबेटमधल्या एका रामायणात राम हनुमानाबरोबर सीतेला देण्यासाठी एक पत्र देतो आणि सीता हनुमानाबरोबर रामाला पत्रोत्तर पाठवते, असे रंगवले आहे. तिबेटी रामायणाची काही जुनी हस्तलिखिते ब्रिटिश म्युझियममध्ये पाहायला मिळतात.

तिसऱ्या शतकात बौध्द जातकातून रामाच्या कथा चीनमध्ये पोहोचल्या होत्या. चीनमधील मोगाओ लेण्यांमध्ये श्रावणबाळाची कथा चितारली गेली. चिनी रामकथेतील पात्रांनी चिनी नावे धारण केली आहेत - लोमो (राम), लोमन (लक्ष्मण), नालोयेन (नारायण), पोलोरो (भरत) इत्यादी! चीनमध्ये हनुमान या सुपर हिरोच्या नवीन कथा लिहिल्या गेल्या. चीनमध्ये हनुमान लोकप्रिय झाला, तरी जपानच्या रामायणात हनुमान नाही! जपानच्या रामायणाचे नाव आहे रामाएन्शो. रामाची कथा यथावकाश मोंगोलियामध्येदेखील पोहोचली. कथेत बारीक बारीक बदल होत, मोंगोलियामध्ये पोहोचलेल्या रामायणात लक्ष्मणाऐवजी भरतच रामाबरोबर वनवासात गेला आहे.

कम्बुज व इतर आग्नेय देश

कौंडिण्य नावाचा एक ब्राह्मण समुद्रमार्गाने भारतातून कंबोडियामध्ये पोहोचला. साधारण इ.स.पूर्व पहिल्या शतकातील ही घटना असावी. याने तेथील नाग राजकन्या 'सोमा'शी विवाह केला. कौंडिण्यने तिथल्या लोकांना भारतीय भाषा शिकवली, लिपी शिकवली, संस्कृती शिकवली, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था शिकवली. कालांतराने भारतीय धर्म, तत्त्वज्ञान व धार्मिक साहित्य या भागात रुजले.

चौथ्या शतकात आणखी एक कौंडिण्य कंबोडियामध्ये पोहोचला. या भारतीय राजाला दृष्टांत झाला की तो काम्बुजचा म्हणजे कंबोडियाचा राजा होणार आहे, तेव्हा तो समुद्रमार्गे कंबोडियामध्ये पोहोचला. पुढच्या काळात अनेक गुजराती, बंगाली व दक्षिण भारतीय व्यापारी, बौध्द भिक्षू आग्नेय आशियामध्ये भारतीय संस्कृती घेऊन पोहोचले.

 
jay shreeram_1  

 

हळूहळू कंबोडियामध्ये ब्राह्मी लिपीतून तयार झालेल्या लिपीमधून संस्कृत भाषेतील शिलालेख दिसू लागले. दक्षिण भारतीय पध्दतीने बांधलेली शिव, विष्णू व बौध्द मंदिरे दिसू लागली. मंदिरांवर पौराणिक कथांची शिल्पे दिसू लागली. भारतीय शालिवाहन शक वापरू लागले. भारताप्रमाणे नवीन वर्ष, दिवाळी यासारखे सण इथे आजही साजरे केले जातात.

 

पौराणिक साहित्याबरोबरच रामायण, महाभारत व पुराणे आग्नेय देशांमध्ये पोहोचले. जसे भारतात प्रत्येक भाषेत रामायण लिहिले गेले, तसेच इथेसुध्दा स्थानिक भाषांमध्ये रामायणे लिहिली गेली. लाओसमधल्या रामकथेचे नाव आहे 'फ्रा लक फ्रा लाम'. हे लक्ष्मण व राम यांचे चरित्र आहे. या कथेत राम गौतम बुध्दाचा पूर्वजन्म सांगितला आहे. 'सेरी राम' हे मलेशियामधले रामायण. आज मलेशियामध्ये व इंडोनेशियामध्ये नौदलाच्या व तटरक्षक दलाच्या प्रमुखपदासाठी (ऍडमिरलकरिता) 'लक्ष्मण' ही पदवी वापरली जाते. इथे विशेष असे, की 17व्या शतकातील इथला सुलतान सिकंदरचे वर्णन 'रामासारखा थोर राजा' असे केलेले दिसते. कंबोडियामध्ये 'रामकेर्ती / रामाकीयन' या नावाने रामकथा लिहिली गेली. कंबोडियाचा राजा यशोवर्मा एका शिलालेखात लिहितो, 'माझी राजधानी रामाच्या अयोध्येसारखी आहे.' तर 10व्या शतकातील राजेन्द्रवर्मा हा 'रामासारखा प्रजावत्सल राजा होता' असे एका शिलालेखात लिहिले आहे. ब्रह्मदेशातला राम 'याम' आहे. फिलिपीन्समधील रामायणात 'रावण' 'महाराज लावण' होतो. या रामकथेत रावण स्वत: सुवर्णमृगाचे रूप घेऊन सीतेचे हरण करतो. नवव्या शतकात जावामध्ये काकविन (Kakawin) हे रामायण लिहिले गेले. थायलंडमध्ये 14व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आयुथ्या (अयोध्या) नावाचे राज्य भरभराटीस आले होते. आजही थायलंडचे राजे 'राम' हेच नाव धारण करतात. थायलंडचा सध्याचा राजा आहे - राम दहावा.


jay shreeram_1  

आग्नेयातील देशांवर रामकथेची विलक्षण पकड आहे. म्यानमारचे रामायण 'यामायन' हे म्यानमारचे राष्ट्रीय महाकाव्य मानले जाते, तर थायलंडचे रामायण - रामाकेन हे थायलंडचे राष्ट्रीय महाकाव्य (National Epic) आहे. तर रामाचे शब्द 'जननीजन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी' हे नेपाळचे ब्रीदवाक्य आहे. खरोखर, आपल्याला कळला नाही, पण या देशांना 'राम' कळला असे म्हणायला हरकत नसावी.

संदर्भ -

1. A Critical Inventory of Ramayana Studies in the World: Foreign languages - Volume II - edited by K. Krishnamoorthy, Satkari Mukhopadhyay