“सामाजिक, सांस्कृतिक ध्रुवीकरणात तटस्थता धोकादायक” - जे. नंदकुमार

विवेक मराठी    24-Dec-2019
Total Views |

पुणे (वि.सं.के.) – देशात सध्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि सांस्कृतिक ध्रुवीकरण सुरू आहे. अशा परिस्थितीत विचारवंतांनी, बुद्धिवंतांनी तटस्थ राहणे धोकादायक असून, त्यांनी ठाम भूमिका घ्यावी असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रज्ञाप्रवाहचे अखिल भारतीय संयोजक जे. नंदकुमार यांनी रविवारी केले.


Madhyam Sanvad Parishad _

विश्व संवाद केंद्र (पुणे), ऋतम प आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माध्यम संवाद परिषदेच्या समारोप सत्रात जे नंदकुमारजी बोलत होते. व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे (पुणे) अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, ऋतम अॅपचे कार्यकारी संचालक अजिंक्य कुलकर्णी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक आदी उपस्थित होते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक
 

नंदकुमारजी यांनी आपल्या विवेचनात देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. देशाचा स्वातंत्र्यलढा सामान्य नागरिकांनी दिला. सामान्य नागरिक उभा राहिल्यामुळेच लढा होऊ शकला. हा लढा कोणा एका व्यक्तीने अथवा परिवाराने दिलेला नाही. आताही सामान्य नागरिकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे. राष्ट्राच्या भवितव्यासाठी वैचारिक आंदोलन सुरू आहे. ही सत्यअसत्याची, न्याय-अन्यायाची लढाई आहे. देशात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ध्रुवीकरण सुरू असून अशा परिस्थितीत विचारवंतांनी, बुद्धिवंतांनी तटस्थ भूमिका घेणे योग्य नाही. तटस्थ भूमिका घेण्याने काही निष्पन्न होत नाही. वैचारिक लढा देण्यासाठी राष्ट्रीय विचारांची कास धरलीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत निष्पक्ष असून चालणार नाही, ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या नसानसात सर्वधर्मसमभाव ओतप्रोत भरलेला असताना धर्मनिरपेक्षता यासारख्या शब्दांची आपल्याला खरेच गरज नाही. आपल्या सभोवताली काय सुरू आहे याचे आकलन आपल्याला झालेच पाहिजे. बदलत्या काळाचा अंदाज आपल्याला यायला हवा. स्वयंस्फूर्तीने आपण नैतिक मूल्यांची जपणूक करीत राष्ट्रीय विचारांचा प्रसार होण्यासाठी सतत कार्यरत राहायला हवे असे त्यांनी या वेळी आवाहन केले.


Madhyam Sanvad Parishad _
 
गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या माध्यम संवाद परिषदेचे उद्घाटन इंडिया टुडेचे संपादक जगदीश उपासने यांच्या हस्ते झाले. या वेळी विश्व संवाद केंद्राचे (पुणे) अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, ऋतम पचे कार्यकारी संचालक अजिंक्य कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. बीजभाषण करताना ते म्हणाले की, “समाजात सध्या विचारधारेची लढाई सुरू असून त्याचे प्रतिबिंब माध्यमातही उमटत आहे. अशा परिस्थितीत माध्यमांनी समाजाला योग्य विचारधारेची दिशा देण्याची आवश्यढकता आहे. माध्यमात आता मोठ्या प्रमाणात बदल होत आहे.प्रेसटू `मीडियाअसे स्थित्यंतर झाल्याचे स्पष्ट करत जगदीशजी म्हणाले, "प्रेसचे आता मीडिया होण्याचे मोठे अंतर मीडियाने पार केले आहे. बातमी, लेख योग्य पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यातून आपल्याला काय संदेश द्यायचा हे वाचकांना समजले पाहिजे. एकेकाळी मुद्रित माध्यमाची एकाधिकारशाही होती. त्यातून विशिष्ट विचारधारा उभी राहिली. अनेक वर्षे राजकीय क्षेत्राभोवतीच पत्रकारिता फिरत राहिली. त्यामध्ये काही अनिवार्यता होती. आताही त्या पद्धतीत फार बदल झाला नसून तीच पद्धत सुरू आहे. आपणही समाजासाठी विशिष्ट काम करतो याची माध्यमातील पत्रकारांना जाणीव होती आणि काही प्रमाणात अहंकारही होता. बदलत्या काळात अनेक पर्याय उभे राहिल्याने पत्रकारितेतील अहंकार कमी झाला आहे. समाजात बदल होत गेले, त्या प्रमाणात पत्रकारितेतही बदल झाले. जगभरात डाव्या विचारसरणीने पत्रकारांना प्रभावित केले. तो प्रभाव अजूनही आहे. आता नवा साम्यवाद निर्माण होत आहे. ज्यांना राष्ट्र ही संकल्पना माहीत नाही, असे लोक या क्षेत्रात येत आहेत. त्यांचा बेमालूमपणे वापर सुरू असल्याचे आपल्याला सद्यःस्थितीतून दिसत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय विचारांचे पत्रकार, विचारसरणी उठून दिसत असून त्यांना बळ देण्याची आवश्यकता आहे. समाजाने कशा प्रकारे विचार करावा, हे अधिक चांगल्या पद्धतीने सांगण्याची वेळ आलेली आहे." असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी केंद्राचे कार्य आणि माध्यम संवाद परिषदेचा हेतू विशद केला. राजीव सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची, तर अजिंक्य कुलकर्णी यांनी ऋतम पची माहिती दिली.

Madhyam Sanvad Parishad _

परिसंवाद १) माध्यमे आणि आपल्या भूमिका


या माध्यम संवाद परिषदेत आपण आणि आपल्या भूमिका या प्रसिद्धी माध्यमांवर आधारित चर्चात्मक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात साप्ताहिक ऑर्गनायझर दिल्लीचे संपादक प्रफुल्ल केतकर, सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर आणि मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनी सहभाग घेतला. साप्ताहिक विवेकचे उपसंपादक निमेश वहाळकर आणि एकता मासिकाचे कार्यकारी संपादक देविदास देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. माध्यमांनी नेहमी वस्तुस्थिती मांडावी, त्यांना सातत्याने प्रश्न पडले पाहिजेत, व्यवस्थेला प्रश्न विचारणारा पत्रकार असावा, राष्ट्रीय दृष्टीने हिताची भूमिका माध्यमांनी मांडायला हवी, बातमी आणि त्याचे विश्लेषण, ब्रेकिंग न्यूजची सत्यता अशा अनेक मुद्दयांवर या वेळी चर्चा झाली आणि समारोपात आपण आपल्या भूमिका मांडताना विचारस्वातंत्र्याची पायमल्ली होणार नाही याचा सर्वंकष विचार करून वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्रीय विचारांकडे पहिले पाहिजे असा सूर उमटला.


Madhyam Sanvad Parishad _
परिसंवाद
२) सोशल मीडिया

या परिषदेत सोशल मीडिया - भास, आभास आणि वास्तव या विषयावर एका सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सोशल मीडियाच्या आघाडीच्या लेखिका शेफाली वैद्य, अॅड. सुशील अत्रे, विवेक मंद्रुपकर आणि हेतल राच यांनी सहभाग घेतला. अजिंक्य कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सोशल मीडिया हे सध्या समाजात नवीन आलेले हत्यार आहे. त्याचा चांगला व वाईट दोन्हींसाठी वापर होऊ शकतो. तटस्थपणे सोशल मीडियाकडे पाहता आले पाहिजे. प्रिंट माध्यमाला असलेली बंधने सोशल मीडियाला नाहीत, पण तरीही सोशल मीडियामध्ये सतत काहीतरी घडत असून त्याचा वास्तवावर निश्चित परिणाम होत आहे. त्यामुळे तो आभास नसून ते वास्तव आहे, असा विचार या वेळी व्यक्त झाला.

सोशल मीडियावर ब्लॉग लिहिणार्‍या शेफाली वैद्य यांनी सांगितले की मी अनेक कुटुंबांचा भाग बनू शकले आणि त्यातून वाचकांचे प्रेम मिळाले. ट्रोल होण्याचा प्रसंग अनेक वेळा आला, तरी त्यातून नक्कीच मार्ग काढू शकले. मुद्रित माध्यमाला छापलेल्या मजकुराला जबाबदारी असते, तसे सोशल मीडियाचे होत नाही, तर निनावी लिहिणार्‍या आक्षेपार्ह मजकुराचा लेखक शोधणे अवघड होते. त्यातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणे क्लिष्ट आहेअसे मत सायबर कायद्याचे तज्ज्ञ अॅड. सुशील अत्रे यांनी व्यक्त केले. हेतल राच यांनी सोशल मीडियामधील तांत्रिक मुद्दे आणि त्यांची तपशीलवार माहिती दिली, तर विवेक मंद्रुपकर यांनी सोशल मीडिया म्हणजे सामान्य माणसाच्या हातात सापडलेले एक प्रभावी शस्त्र आहे, असे मत व्यक्त केले.

संपूर्ण दिवसभर चाललेल्या या परिषदेचा आढावा घेताना अजिंक्य कुलकर्णी यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया, लेखक, प्रकाशक, स्तंभलेखक यांना सामावून घेऊन माध्यमांची जबाबदारी आणि आपली आव्हाने काय आहेत याबाबत एकत्र येऊन विचार मंथन करण्यास सुरुवात झाली आहे. ही परिषद त्याची नांदी ठरेल, असे मत व्यक्त केले. विश्व संवाद केंद्राचे उपाध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी आभार मानले.