विदेशात जाताय? ही काळजी घ्या

विवेक मराठी    25-Dec-2019
Total Views |

***प्रा. सुहास द. बारटक्के***

जग खूप जवळ आलंय... फिरणं सोप्प झालंय... परदेशगमनासाठी हल्ली पत्रिका पाहायला नको की हातावरच्या रेषा पाहायला नकोत. हल्ली आज्जी-आजोबाही सहजपणे अमेरिकेतल्या मुला-मुलींकडे जा-ये करताना दिसतात. इंटरनेटच्या आणि संपर्काच्या अन्य सोयीसुविधांमुळे विमानाचं तिकीट, हॉटेलचं रिझर्वेशन, स्थानिक महत्त्वाच्या स्थळांना भेटी, टॅक्सीसेवा, सगळं सगळं हाताच्या बोटावर उपलब्ध होतं. फक्त कॉम्प्युटरचा स्क्रीन समोर हवा. असं जरी असलं, तरी प्रथम प्रवासाला जाण्यासाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या मंडळींना गांगरायला होतंच. काहींना दूरच्या विमान प्रवासाची भीती वाटते, तर काहींना विमानतळावरच्या कागदपत्रांच्या पूर्ततेची. काहींना कमी खर्चात साधी सोप्पी सहल हवी असते, तर काहींना आपल्या स्टेटसचा गर्व असतो. त्यानुसार मोठया बजेटची दिखाऊपणा असलेली सहल हवी असते. परंतु एकदा आपण आपली सहल निश्चित केली की, त्या कार्यक्रमात बदल करणं मात्र शक्य नसतं. म्हणूनच आधी काळजी घेऊन आपली सहल नीटपणे ठरवणं व पार पाडणं हे महत्त्वाचं असतं. विदेश प्रवास वारंवार घडत नसल्याने आपली टूर चिरस्मरणीय होण्यासाठी माणसं प्रयत्न करतात. टूर कंपन्यांवर भरवसा ठेवून एकदा पैसे भरून निश्चिंत होणं हा एक मार्ग असतो, परंतु तो थोडा जास्त खर्चाचा असतो. त्याऐवजी आपणही टूर प्लॅन करू शकतो. ज्या देशात जायचंय त्या देशातल्या टूरिस्ट साइटवर जाऊन आपण माहिती मिळवू शकतो व बुकिंगही करू शकतो. उदा. visitmalaysia.com/visitaustralia.com यासारख्या साइट्स पाहूनही आपल्याला खूप माहिती व मदत मिळू शकते. मात्र स्वत: टूर प्लॅन करताना काही गोष्टींचा जरूर विचार करावा लागतो. आपण हॉटेल्सची निवडही ऑनलाईन करू शकतो. मात्र हॉटेलजवळ मेट्रोचं स्टेशन असलेलं बरं. म्हणजे आपलं आपण सहज स्थलदर्शन करू शकतो.


Foreign Trip_1  

स्वत: टूर प्लॅन करताना आपल्याला विमान कंपनीच्या भाडयातही सवलत मिळवता येते. lastminute.com यासारख्या साइट्स विमान कंपन्यांची स्वस्त तिकिटं मिळवून देऊ शकतात. टूर कंपन्यांच्या तुलनेत आपल्याला हे तिकिट बरंच स्वस्त पडू शकतं.

परदेशात जाताना घडयाळामधला फरक हासुध्दा लक्षात घेऊन टूर प्लॅन करायला हवी. बदलणारा वार, वेळ (दिवस) यानुसार हॉटेलचं व विमानाचं बुकिंग करायला हवं. नाहीतर बदललेला वार व तारखेमुळे आपली टूर व हॉटेल बुकिंग अडचणीत येऊ शकते. उदा. दुबईमार्गे ऑस्ट्रेलियाला जाताना 9 तास घडयाळ पुढे असलेल्या ऑस्ट्रेलियात तारीख बदलते. त्यामुळे हॉटेलचं बुकींग 1 दिवस आधीचं करावं लागतं. नाहीतर पैसे वाया जातात. ट्रॅव्हल एजंटच्या तिकिटावर दिवस बदलत असेल तर स्टार दिलेला असतो. 'स्टार'चा अर्थ पुढचा दिवस. हा स्टार पहाणं गरजेचं असतं. त्या त्या शहरातला टुरिस्ट ब्युरोच्या ऑफिसला भेट देऊन माहिती घेणं केव्हाही फायदेशीर ठरतं. त्यात बस, ट्राम, मेट्रो यांचीही माहिती मिळू शकते. टुरिझम खात्याच्या अधिकृत ब्यूरोसमोर ! असा साईनबोर्ड असतो. स्वित्झर्लंडसारख्या देशात हे टूरिस्ट ब्युरो खूप चांगलं गाइड करतात.

परदेशात गेल्यावर तिथल्या चलनाचा आपल्या रुपयाशी दर ठरलेला असला, तरी आपण प्रत्यक्ष रुपया वापरू शकत नाहीच. आपल्याला त्या त्या देशाचं चलन विकत घ्यायला हवं. त्यासाठी भारतातून निघतानात पुरेसं परकीय चलन विकत घ्यायला हवं किंवा ते पुरवणारी कार्ड्स जवळ बाळगायला हवीत. हल्ली स्टेट बँकेसारख्या अनेक बँकांची कार्डे परदेशातही चालतात. त्यामुळे जादा चलन नेण्याची कटकट वाचते आणि धोकाही कमी होतो. परदेशात गेल्यावर तिथला स्थानिक वाहतुकीच्या सोयींची पूर्ण माहिती आधी घेऊन ठेवल्यास खूपच सोयीचं होतं. विमानतळ शहरापासून लांबच असतात. त्यामुळे तिथून शहरात येण्यासाठी अशा स्थानिक वाहतुकीच्या साधनांचा खूप फायदा होतो.

चोऱ्या कुठे होत नाहीत? जगात सर्वत्र होतात. एखादाच अपवाद. त्यामुळे विदेश प्रवासातही आपण चोरीबाबत दक्ष राहणं महत्त्वाचं असतं. विशेषत: आपल्या पासपोर्टची चोरी होऊ नये याची दक्षता सदैव घेणं गरजेचं असतं. पासपोर्ट हरवल्यास थेट तुरुंगातच जावं लागेल हे लक्षात घेतल्यास माणूस तशी दक्षता घेईलच. मात्र अनेक देशात चोर आधी पासपोर्ट चोरायला बघतात. कारण बेकायदेशीरपणे त्या देशात राहणारे लोक तुमच्या पासपोर्टचा वापर करून आपला हेतू साध्य करू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपला पासपोर्ट सदैव जवळ ठेवायला हवा. म्हणजे चक्क गळयात अडकवूनच फिरायला हवं. याशिवाय खालील सूचनाही कराव्याशा वाटतात.


1. विदेशी प्रवासाला निघताना आपल्याला उपलब्ध असणारा कालावधी बजेट (रक्कम) याचा ठोस आढावा घ्यावा.


2. टूर एक दिवसांनी जरी वाढली, तरी खर्च 10-15 हजारांनी वाढतो.


3. जगात जे इतरत्र पाहायला मिळणार नाही तेच प्रामुख्याने पाहायला हवं. सर्वच देश पूर्णपणे पाहणं शक्य नसतं. यासाठी आपल्या सहलीत प्रमुख पर्यटन स्थळांचा समावेश हवा.


4. सहज एकसुरी होणार नाही, तीच तीच ठिकाणं पाहायला लागू नये यासाठी ठिकाणं निवडताना दक्षता घ्यायला हवी.


5. परदेशात जाताना इंग्लिश भाषेचा कामचलाऊ अभ्यास हवाच. तरच विमानतळांवरचे बोर्ड वाचता येतील. तिथे संवाद साधायचा, तर स्थानिक भाषेचंही जुजबी ज्ञान हवं.


6. ग्रूपमधून सहलीला जाताना आपला वयोगट पाहून ग्रूप निवडावा. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी जायचं तर वेगवान हालचाली करताना फरक पडणारच.


7. परदेशात जेवणासाठी फार वेळ देऊ नये. सकाळी एकदा भरपेट नाश्ता केला (हॉटेलमध्ये तो हॉटेल खर्चातच समाविष्ट असतो) की दिवसभर फिरायला मोकळे. मध्ये लंच ब्रेक असू नये. एकदम रात्री भरपेट जेवावं.


8. परदेशात वैद्यकीय मदत खूप महाग असते. त्यासाठी आपली औषधं, गोळया आपल्याबरोबर घ्यावात. त्याची डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठीही जवळ बाळगावी.


9. तातडीच्या संपर्कासाठी आवश्यक ते पत्ते, फोन नंबर्स जवळ बाळगावेत.


10. कपडे, बॅगा याबाबत टूर लक्षात घेऊन योग्य नियोजन करावं. केबिन बॅगेत महत्त्वाचे कागदपत्र व 1-2 कपडयांचे सेट्स हवेतच. मोठी बॅग ही लगेजमध्ये वेगळी जात असल्याने तिच्यावर आपलं मार्किंग असणं गरजेचं, म्हणजे विमानतळावरील सामानाच्या पट्टयांवरून ती उचलणं सोपं जातं. चूक होत नाही.


11. ट्रॅव्हल इन्शुरन्स, पासपोर्ट, व्हिसा यासंबंधीचे सर्व कागदपत्र सदैव जवळच्या हँड बॅगेत बाळगावेत. त्या त्या देशातही नियम व अटी माहीत करून घ्याव्यात.


12. स्थानिकांविषयी त्या देशाविषयी आदर बाळगावाच, पण आपलं देशपे्रेमही व्यक्त करायला हरकत नाही. आपल्या देशाची प्रतिमा मलीन होईल असं वागू नये. उदा., परदेशात इथे-तिथे थुंकण्यावर बंदी आहे.


अशा काही गोष्टी सदैव ध्यानात ठेवल्या
, तर विदेशप्रवासाचा आनंद पुरेपूर लुटता येईल.