मुसाफिरीचा 'सोलो' मंत्र

विवेक मराठी    26-Dec-2019
Total Views |

***आदित्य दवणे***

'पर्यटन' आणि 'मुशाफिरी' या दोन शब्दांमध्ये फरक आहे. यापैकी आपण कोण आहोत, हे तपासण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला निदान घराचा उंबरठा ओलांडायला हवा. एखादी बॅग खांद्यावर अडकवून एकटे निघणारे हे मुसाफिर आज 'solo backpackers' या नावाने ओळखले जाऊ लागले आहेत. हे सोलो बॅकपॅकर्सची क्रेझ अर्थातच नव्या पिढीत अधिक आढळते. सोलो बॅकप्रकर्सचा अनुभव, हा त्याच्या भटकण्याच्या केंद्रस्थानी असतो. अनुभवाने समृध्द होत, तो आपल्या पुढील आयुष्याची वाटचाल करण्यास सज्ज असतो, असे म्हणायला हरकत नाही.


davane_1  H x W

काही परिचित व्यक्तींकडून चक्क 'माझा जगप्रवास झालाय' असे मी ऐकलेय. त्यांना पुढे विचारल्यानंतर कळते की त्यांनी बघितले आहेत या पृथ्वीवरचे मोजके देश आणि त्या देशांमधली मोजकी प्रसिध्द शहरे. मी त्यांना बरे वाटावे म्हणून फक्त आश्चर्याचा चेहऱ्यावरती आव आणतो, कारण मला कळून चुकलेले असते की यांनी खरा प्रवासही अजून सुरूही केलेला नाही. 'पर्यटन' आणि 'मुशाफिरी' या दोन शब्दांमध्ये फरक आहे. त्यामुळे अर्थातच तुम्ही 'पर्यटक' आहात की 'मुसाफिर' हे तपासण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला निदान घराचा उंबरठा ओलांडायला हवा. जिवंत वाघ पिंजऱ्यात आपण टाळी वाजवत सुरक्षित बघणे आणि जंगलातला वाघ आपण खुल्या जिप्सीमधून सर्व संवेदनांसकट बघणे यात जो फरक आहे, तोच 'पर्यटन' आणि 'मुशाफिरी' यामध्ये आहे असं मला वाटतं. या मुशाफिरीची सुरुवात पर्यटनापासून होऊ शकते, एवढे मात्र नक्की. बऱ्याचदा रुटीन हा शब्ददेखील नेहमीचा होत जातो, 'आपण आतून जुने होतोय की काय?' असा सवाल सतत कामाच्या व्यग्रतेत पडत राहतो आणि आपण अचानक ठरवून टाकतो, 'अब बहोत हो गया.. कही चलते है!' कुठे जायचे म्हटले की सामानाच्याही आधी माणसांची जमवाजमव करावी लागते. त्यांच्या होकाराचे आपण बांधील होऊन जातो आणि त्यांच्या नकाराने आपली भरलेली बॅग पुन्हा घरातच रिकामी होते. आणि म्हणूनच या 'कही चलते है'ची व्याख्या तरुण वर्गामध्ये गेल्या काही काळापासून बदलताना आपण पाहू शकतो. 'आलो एकटे-जाणार एकटे' या बुजुर्ग वाक्याला साक्षी ठेवताना एखादे ठिकाण ते ठरवतात, असेच एकटे बाहेर पडतात, जमलाच तर स्वत:चा शोध वगैरे घेतात. 'फिरायचे म्हणजे इथ्थेच जायला हवे' असे समीकरण बनलेल्या ठिकाणांना बगल देत, नवनवीन अस्पर्शित डेस्टिनेशन्सच्या शोधात हे मुसाफिर कायम असतात. एखादी बॅग खांद्यावर अडकवून एकटे निघणारे हे मुसाफिर आज 'solo backpackers' या नावाने ओळखले जाऊ लागले आहेत. कधी गिर्यारोहण, कधी अभ्यास दौरा, तर कधी निव्वळ भटकंतीचा उद्देश मनात बाळगून हे अवलिये सफरीवर निघतात. अद्याप दृष्टीआड असणाऱ्या नवख्या प्रदेशाला भेट देणे, तो प्रदेश, तिथली माणसे, स्थानिक खाद्यपदार्थ नखशिखांत अनुभवणे आणि मिळालेले खूप काही पापण्यांच्या कडांवर साचवत रुटीन आयुष्यात स्वत:ला पुन:श्च नवे करत प्रवेश करणे हा या मुशाफिरांचा उद्देश असतो.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

समूहात भटकणे हा मानवजातीचा सहज धर्म असला, तरी हे सोलो बॅकपॅकर्स ठरवून याला अपवाद ठरतात. अनेकदा समूहात भटकंती करताना जो प्रदेश कळतो आणि एकटे भटकताना जो प्रदेश कळतो, यात जमीनआसमानाचा फरक असतो. समूहात वावरताना वाटणारी सुरक्षितताच मुळी या सोलो बॅकपॅकर्सना स्वीकारायची नसते. 'चुकले तर चुकू देत, अनुभवातून शिकू देत' असा या सोलो बॅकपॅकर्सचा फंडा ठरलेला असतो. या 'सोलो' भटकंतीत तुम्ही जे घडत जाता, स्वत:ला पडताळत जाता याला अक्षरश: तोड नसते. सोलो बॅकपॅकिंग हे स्वत:तली क्षमता, निश्चय आणि जिद्द पडताळण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. ही भटकंती अनवट असली, तरीही तिच्यात एका अदृश्य नियोजनाचा धागा असावाच लागतो. अशा टूरला निघताना आधीच स्वत:चे बजेट स्वत:कडून मंजूर करावे लागते. ज्याप्रमाणे सर्वोत्तम सोयीसुविधांमुळे आरामशीर जगता येते, त्याचप्रमाणे मूलभूत सोयीसुविधांसकटही आनंदी जगता येऊ शकते, हे सोलो बॅकपॅकिंग तुम्हाला शिकवते. साहजिक जितके उंचावर राहाल तितकी जमीन तुम्हला दुरावते, त्याचप्रमाणे जर सोलो बॅकपॅकिंगचा खरा आनंद लुटायचा असेल तर योग्य त्या ठिकाणी जमिनीला घट्ट पकडणे गरजेचे आहे. अधिक खर्चात सर्वोत्तम प्रवास होऊ शकेल, तो तर सगळेच करतात. परंतु ठरावीक खर्चाची मांडणी करून, योग्य त्या ठिकाणी योग्य तो खर्च करत प्रवास केला तर ती सफर अनेक कारणांमुळे अविस्मरणीय ठरू शकेल. उदाहरणार्थ, चार तासांचा प्रवास कॅब्सच्या माध्यमातून आरामदायक आणि सुकर होऊ शकतो. परंतु त्या जागी उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक वाहनातून हाच प्रवास केला, तर कमी खर्चात, तितक्याच वेळेत आणि तुम्हाला अधिक समृध्द करणारा ठरू शकतो.


सोलो बॅकपॅकर्ससाठी न्यायचे सामान हा नेहमीच हुशारीचा विषय ठरतो. सपक प्रवासाच्या ठरावीक भीतीने जर आपण पॅकिंग करत गेलात
, तर तुम्ही जाणाऱ्या दिवसांची गैरसोय कदाचित होणार नाही, परंतु ते सामान म्हणजेच एखादा भलामोठा निर्जीव जीव सोबत घेऊन वावरल्यासारखी आपत्ती तुम्हाला कायम सोबत नंतर सांभाळावी लागेल. आणि म्हणूनच हे सामान बांधणे हुशारीचे काम ठरते. याही आधी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या सोलो बॅकपॅकिंगचा उद्देश एकदा मनात स्पष्ट असला की सारेच सुरळीत होते, सहज होते. संपूर्ण प्रवासात लागू शकणाऱ्या ठरावीक सामानासह आपल्याला एकटयाला सर्व सोयी-गैरसोयींसह वावरायचे आहे हे विचारात घेऊन जर आपण पॅकिंग केले, तर जितके ठरवले त्याच्या चाळीस टक्के सामान सहज कमी होते, असा माझा अनुभव आहे.


'आपला गुबगुबीत कम्फर्ट झोन ओलांडणे म्हणजे सोलो बॅकपॅकिंग होय' असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. चार-आठ जणांच्या समूहात फिरताना आपण याच चार-आठ मेंदूंमध्ये रमून जातो. या मेंदूंपलीकडे बघण्याची क्षमता आपण त्याक्षणी हरवून बसतो, अखंड अशा जगात त्या चार-आठ मेंदूंचे जग तयार करून बसतो. या प्रवासातला क्षणिक पझेसिव्हनेस, येऊ शकणाऱ्या शेकडो अनुभवांची नकळत कत्तल करतो. सोलो बॅकपॅकिंग करताना तुमच्या अनुभवाचे महाद्वार सतत खुले असते, जे सतत नवनवीन अनुभवांना आत खुल्या दिलाने प्रवेश करू देते. तुम्ही सतत सजग असता, त्यामुळे तुमची सहाही ज्ञानेंद्रिय जागी राहतात आणि येणारे अनुभव अधिकाधिक तावून सुलाखून ती पडताळून पाहतात. याच सोलो बॅकपॅकिंगमध्ये भेटणारे तुमच्याचसारखे इतर बॅकपॅकर्सच तुमच्या नव्या पुढच्या प्रवासाची प्रेरणा ठरतात. तुम्ही महाराष्ट्रातून असला, तर ते कदाचित आसाम, केरळ, पंजाब किंवा फ्रान्स, जर्मनीमधून असतात, तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारताना आपण अद्याप ऐकूही न शकलेल्या जगाचा उलगडा होतो. कदाचित सिक्कीममधला नव्याने भेटलेला मित्र त्याच्या गावातल्या जगावेगळया दुनियेशी तुमचा बोल-परिचय करून देताना तो प्रदेश आपल्यालाही जगावसा वाटतो आणि तुमचा पुढचा प्रवास निश्चित होतो. सोलो बॅकपॅकिंगनंतर स्वगृही परताना तुम्ही तिथे भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे नमुने आणि त्यातून निर्माण झालेले प्रसंगही भरभरून सोबत घेऊन येता. माणूसघाणा इसम अशा यात्रेत स्वत:ला सामावू शकणार नाही. परंतु, 'प्रवास तुम्हाला बदलतो' यावर त्याचा विश्वास असेल तर अशा व्यक्तीतही परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही घरी आल्यानंतर बघितलेल्या ठिकाणांचे, या व्यक्तींचे फोटो दाखवू शकता, परंतु त्यापलीकडे मिळणारे अनुभव आणि क्षणांचे फोटो काढताही येत नाहीत आणि सांगतानाही शब्दांना मर्यादा येतात.

 
davane_1  H x W

सोलो बॅकपॅकिंग करणाऱ्या कुठल्याही मुशाफिराला 'सहल' आणि 'प्रवास' यातला योग्य तो फरक आकळलेला असतो. सहलीमध्ये मजेचा अनुभव घेता येतो, तर सोलो बॅकपॅकिंग करणाऱ्या मुसाफिराला अनुभवाची मजा अनुभवायची असते. अनुभव हा त्याच्या भटकण्याच्या केंद्रस्थानी असतो. त्याची प्रवासाची बकेट लिस्ट एक एक करत पूर्ण होते आणि तो स्वत: समृध्दीचे शिखर गाठत असतो. मध्यंतरी एका अशाच दौऱ्यावर जोसेफ नावाच्या फ्रेंच मुलाशी मैत्री झाली. या इसमाने अठ्ठावीस देशांत सोलो बॅकपॅकिंग केले आहे. मुळात तो सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीतून आल्यामुळे त्याचे अधिक कौतुक वाटले. नव्या देशात काही महिने मिळेल ते (आणि जमेल ते) काम करायचे आणि त्यातून मिळालेल्या पैशातून लागणारा खर्च करायचा, असा त्याचा गेल्या दहा वर्षांपासून प्रवास सुरू आहे. जोसेफसारखे सर्वस्व झोकून आपल्याला भटकता येणार नाही कदाचित, परंतु वर्षातून निदान एकदा आपण अशा अनुभवला आपलेसे करूच शकतो. भालचंद्र नावाचा एकवीस वर्षांचा एक पोरगा मध्यंतरी हृषीकेशच्या सोलो टूरवर भेटला. हा गेल्या सहा महिन्यांपासून घरीच गेलेला नाही. त्याला भारत संपूर्ण बघायचा आहे असे तो म्हणतो. आपणही जग बघूच, परंतु सर्व जगाचे सार सामावलेला आपला देश आहे, जिथे वाळवंट, हिमालय, समुद्र, नद्या असे निसर्गाचे एकूणएक आविष्कार या अखंड शक्तीने साकार केले आहेत, त्याचा अनुभव आपल्याला इथे राहूनही घ्यावासा वाटला नाही, तर कुणाचेच काही जाणार नाही.. आपले मात्र प्रचंड नुकसान होणार आहे.


अशा सोलो बॅकपॅकिंगच्या बाबतीत काही ठरवणे आणि प्रत्यक्षात करणे यात केवळ एका उंबरठयाचे अंतर असते. आणि बऱ्याचदा हाच उंबरठा ओलांडण्याचे धैर्य अनेकांना होत नाही. हे फारसे कठीण असते अशातला भाग नाही
, परंतु पूर्वग्रहाचे जाळे मनात पसरल्यामुळे सगळा गोंधळ होतो. काहींच्या बाबतीत 'तो एक क्षण' येतो आणि एकदा अशा सोलो बॅकपॅकिंगला सुरुवात झाली की मग या धुंदीतून मुक्त होणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा प्रकारची अनोखी सफर 'एक तरी वेळ अनुभवावी', यात शंका नाही.