पर्यटन उद्योजक बना

विवेक मराठी    28-Dec-2019
Total Views |

***प्रा. क्षितिज पाटुकले***

2000नंतर भारतातील पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढू लागला आहे. विशेषतः अर्थव्यवस्था विकसित होत असताना एकूण लोकसंख्येच्या मोठया वर्गाकडे पैसा खुळखुळू लागला आहे. त्याचबरोबर चांगले रस्ते, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहन उद्योगाचा विस्तार यामुळे पर्यटनासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांची मोठया प्रमाणावर निर्मिती होऊ लागली आहे.


Tourism Business_1 & 

पर्यटन हा फक्त भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे. कंबोडिया, मॉरिशस, बाली, थायलंड इ. देशांची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. गेल्या काही दशकांमध्ये - विशेषतः इ.स. 2000नंतर भारतातील पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढू लागला आहे. विशेषतः अर्थव्यवस्था विकसित होत असताना एकूण लोकसंख्येच्या मोठया वर्गाकडे पैसा खुळखुळू लागला आहे. त्याचबरोबर चांगले रस्ते, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहन उद्योगाचा विस्तार यामुळे पर्यटनासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांची मोठया प्रमाणावर निर्मिती होऊ लागली आहे. खरे तर गेल्या हजारो वर्षांपासून पर्यटन हा भारतातील जीवनपध्दतीचा एक मूलभूत भाग बनून राहिला आहे. जन्माला यावे आणि काशीला जावे हा भारतातला परमश्रध्देचा विषय आहे. मात्र तीर्थाटनाच्या माध्यमातून होणारे पर्यटन हे मुख्यतः धार्मिक परीघांमध्ये आणि संकल्पनांमध्ये मर्यादित राहिले होते. त्यामध्ये वैयक्तिक सुखसुविधांची फारशी पर्वा केली जात नव्हती. मात्र आधुनिक पर्यटनाच्या संकल्पनांमध्ये वैयक्तिक सुखसुविधांच्या उपलब्धतेविषयी जागरूकता हा एक कळीचा मुद्दा बनून राहिला आहे. पर्यटन व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात विविध ठिकाणी फिरायला जाणे, तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, रमणीय स्थळे पाहणे, मानवनिर्मित नजारे पाहणे इ. आकर्षणाचे विषय होते. त्यातही हॉटेलमधील सोयी, स्वीमिंग पूल, थ्री स्टार, फाइव्ह स्टार सुविधांचा अनुभव घेणे, एसी रूम, रूम सर्व्हिस, बटन दाबल्याबरोबर उपलब्ध होणारी सेवा यांचे औत्सुक्य होते. सुरवातीच्या काळात पर्यटन व्यवसाय म्हणजे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधांचे (उदा. निवास व्यवस्था, जाण्यायेण्याची व्यवस्था) व्यवस्थापन आणि नियोजन करणे असे स्वरूप होते. त्यामुळे पर्यटन व्यवसाय म्हणजे सुविधांच्या उपलब्धतेची माहिती देणे आणि प्रत्यक्ष नियोजन करणे या प्रकारची सेवा ग्रााहकाला देणे असे स्वरूप होते. मात्र काळाच्या ओघात आता पर्यटन व्यवसाय हा पर्यटन सेवा या स्वरूपाकडून पर्यटन उद्योग म्हणून विकसित होऊ लागला आहे, हे नीट समजून घेतले पाहिजे. पर्यटन उद्योग म्हणून पर्यटन क्षेत्र विकसित होत असताना तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया मोठया प्रमाणावर साहाय्यभूत होत आहे. विविध नवनवीन संकल्पना विकसित करून त्याद्वारे पर्यटन उद्योग बहुआयामी बनविण्याच्या अगणित संधी आता उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे भारतातील युवक-युवतींनी आता पर्यटनाकडे सेवा व्यवसाय म्हणून न पाहता पर्यटन उद्योग म्हणून पाहिले पाहिजे. त्याद्वारे त्यांना पर्यटन क्षेत्रातील अनेक संधी आणि संपत्ती निर्माणाच्या संधी लक्षात येतील आणि त्यातून भारतातील पर्यटन उद्योग फार मोठया प्रमाणावर विकसित होऊ शकेल.

पर्यटन उद्योगाचे सर्वात मोठे वैशिष्टय म्हणजे यामध्ये कोणताही प्रकल्प सुरू करताना करावी लागणारी गुंतवणूक अत्यल्प असते. कारण ग्रााहकांकडून म्हणजेच पर्यटकांकडून सर्व रक्कम आधीच मिळते. त्यामुळे पर्यटकांच्या खिशातून पैसे घेऊन त्यांच्यासाठी चतुराईने खर्च करणे आणि त्यांच्या प्रशंसेला प्राप्त ठरणे हे पर्यटन व्यवसायासाठी लागणारे मुख्य कौशल्य आहे. उत्तम संवादकौशल्य, संभाषणचातुर्य, माणसांना योग्य रीत्या हाताळणे, विनम्रता, समयसूचकता, साहस, जिज्ञासा, नियोजनक्षमता, कॉमन सेन्स, निर्णयक्षमता इ. गुण पर्यटन उद्योगासाठी आवश्यक आहेत. कमीत कमी गुंतवणूक आणि तुलनेने अधिक नफा हे पर्यटन उद्योगाचे रहस्य आहे.

कुणीही व्यक्ती वैयक्तिकरीत्या प्रोप्रायटर म्हणजे वैयक्तिक मालकीची संस्था काढून किंवा पार्टनरशिप, खाजगी कंपनी, सहकारी संस्था, ट्रस्ट इ. प्रकारे पर्यटन उद्योग सुरू करू शकते. मोदी शासनाच्या नवीन नियमानुसार फार्मर प्रोडयुसर कंपनी (शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी)सुध्दा पर्यटन उद्योग करू शकते. पर्यटन उद्योग सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या कायदेशीर संस्था आता सहजतेने स्थापन करता येतात. पर्यटन उद्योगाला सर्वात साहाय्यकारक तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया आज उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रााहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठा जाहिरात खर्च आता सुरुवातीला करावा लागत नाही. संकेतस्थळ, व्हॉट्स ऍप, फेसबुक आणि इंटरनेट बँकिंग याद्वारे आपल्याला पर्यटन उद्योग सुरू करता येईल. पर्यटन उद्योगामध्ये खालील प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत.

पारंपरिक संकल्पनांवर आधारित पर्यटन उद्योग

1) मौजमजेसाठी पर्यटन - यामध्ये केवळ घराबाहेर कुठेतरी दूरवर जाऊन चैन करणे, शॉपिंग करणे, सुखसुविधांचा अनुभव घेणे यावर आधारित पर्यटन असे स्वरूप आहे. यासाठी तोंडी लावायला काहीतरी आकर्षण म्हणजे पर्यटन ठिकाणाचे नाव असते. नेहमीच्या रुटीन जीवनापासून दूर जाणे हा मुख्य उद्देश असतो. उदा., महाबळेश्वर, पन्हाळा, गोवा, केरळ, उटी, कुलू मनाली, सिमला, मसुरी इ. थंड हवेची ठिकाणे. समुद्रकिनारे, हनिमूनच्या निमित्ताने पर्यटन हाही एक मोठा प्रकार यामध्ये दिसतो.

2) जगप्रसिध्द ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटन - वर्ल्ड हेरिटेज ठिकाणे, मंदिरे आणि स्थापत्य, नैसर्गिक आश्चर्ये, जगातील आश्चर्ये, मोठी शहरे, भव्यदिव्य शॉपिंग सेंटर्स पाहण्यासाठी पर्यटन करणे. यामध्ये चीनची भिंत, नायगारा फॉल, आयफेल टॉवर, अंगकोरवाट, वृंदावन गार्डन, म्हैसूर पॅलेस, ताजमहाल इ. ठिकाणचे पर्यटन. यामध्ये काही पूर्वापार अस्तित्वात असलेली ठिकाणे आहेत आणि काही नव्याने विकसित करण्यात आलेली ठिकाणे - उदा., दुबई शॉपिंग मॉल्स, सरदार वल्लभभाई पटेल यांचा केवडिया येथील पुतळा, बाली येथील भव्य विष्णू-गरुड कॉम्प्लेक्स इ.


3) धार्मिक पर्यटन - यामध्ये चारधाम यात्रा, जोतिर्लिंग यात्रा, शक्तिपीठे यात्रा, कुंभमेळे, कन्यागत महापर्व, पुष्कर, तिरुपती बालाजी, शिर्डी, कैलास मानसरोवर, स्वर्गारोहिणी, पंचकैलास, पंचकेदार, अयप्पा इ. धार्मिक ठिकाणचे पर्यटन यांचा समावेश होतो.

नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित पर्यटन उद्योग - गेल्या दोन दशकांमध्ये देशामध्ये नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित पर्यटन उद्योग विकसित झाला आहे. यामध्ये वरील पारंपरिक पर्यटनाच्या कल्पनांच्या पलीकडे जाऊन नवनवीन संकल्पनांवर आधारित पर्यटन उद्योग वेगाने विकसित होत आहेत. त्यांची आपण माहिती करून घेऊ या.


1) इंडॉलॉजी + आर्किऑलॉजीवर आधारित पर्यटन - यामध्ये विविध प्राचीन मंदिरे आणि स्थापत्य पाहण्यासाठी आणि त्याद्वारे शिल्पकला, चित्रकला आणि प्राचीन परंपरा व कौशल्ये यांचा अभ्यास करण्यासाठी पर्यटन केले जाते. यामध्ये पर्यटकांना पर्यटन + अधिक ज्ञान, माहिती हवी असते. उदा., हंपी, बदामी, कोणार्क, महाबलीपुरम, खजुराहो, खिद्रापूर, घारापुरी, कार्ला, कोकणातील मंदिरे इ. यातील नवीन संकल्पना म्हणजे प्राचीन गणितज्ञ भास्कराचार्यांचे गाव पटणादेवी चाळीसगाव येथील पर्यटन.


2) कृषी पर्यटन - शहरीकरणाला कंटाळलेल्या पर्यटकांना ग्राामीण जीवनाच्या परंपरांची आणि वैशिष्टयांची ओळख व अनुभव करून देणारी पर्यटन संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. यामध्ये ग्राामीण भागातील मंदिरे, नदी, तलाव, वैशिष्टयपूर्ण गोष्टी यांचा उपयोग करून घेतला जातो. निसर्गाबरोबर थेट अनुभूती हे कृषी पर्यटनाचे वैशिष्टय आहे.


3) साहसी पर्यटन - यामध्ये विविध प्रकारचे साहसी खेळ - उदा., दुर्गभ्रमण, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग, स्क्युबा डायव्हिंग, स्कीइंग, रिव्हर राफ्टिंग, बंजी जम्पिंग, वॉटर स्पोर्ट्स, रॅपलिंग इ. अनेक साहसी खेळ आणि त्याद्वारे पर्यटन या संकल्पना येतात. युवकांमध्ये या प्रकारचे आव्हानात्मक पर्यटन लोकप्रिय आहे.


4)
सांस्कृतिक पर्यटन - विविध प्रदेशांची काही काही सांस्कृतिक वैशिष्टये असतात. त्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे पर्यटन लोकप्रिय होत आहे. यामध्ये विविध प्रकारची घरे, वस्त्रसंस्कृती, जीवनपध्दती, खाद्यसंस्कृती, चालीरिती यांचे दर्शन होते. ते पाहण्यासाठी पर्यटक येतात. उदा. ईशान्य भारतातील पर्यटन, कोकणातील पर्यटन, गोंडवनातील पर्यटन इ.


5) नदी आणि धार्मिक स्थळांच्या परिक्रमा - नर्मदा परिक्रमा हे याचे उत्तम उदाहरण आहे. याचबरोबर कैलास परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा, अयोध्या परिक्रमा, अवध परिक्रमा, वैशाली परिक्रमा अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी परिक्रमा, सिंहगड बाह्य परिक्रमा, रायगड परिक्रमा इ. अनेक उदाहरणे विकसित झाली आहेत.


6) संवाद, चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांद्वारे पर्यटन - विविध प्रकारच्या विषयांवर चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्याद्वारे विचारांचे आदानप्रदान आणि त्यातून पर्यटन असे याचे स्वरूप असते. उदा., इतिहास, पर्यावरण, परंपरा, व्यवसाय, उद्योग इ. अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण कार्यक्रम, चर्चासत्रे आणि जोडीला पर्यटन या संकल्पना लोकप्रिय होत आहेत.


7) सण-उत्सवावर आधारित पर्यटन - विविध ठिकाणी विविध प्रकारचे सण-उत्सव प्रसिध्द असतात, त्यावर आधारीत पर्यटन संकल्पना विकसित होत आहेत. दिवाळी कार्तिकी पौर्णिमा, नद्यांचे उत्सव, मंदिरांचे उत्सव यांचा समावेश होतो. उदा. बत्तीस शिराळा येथील नागपंचमी, इ.


8) नावीन्यपूर्ण उत्सवांची निर्मिती करून पर्यटन - यामध्ये मगर महोत्सव, कासव महोत्सव, मोर महोत्सव, काजवा महोत्सव इ. संकल्पनांपासून ते हुरडा पार्टी, भरीत पार्टी, भात लावणी कार्यक्रम, ग्राामीण खेळातून पर्यटन असे प्रकार आहेत.


9) साहित्य, कला, नृत्य, संगीत यांच्या महोत्सवातून पर्यटन - दुबई लिटररी फेस्टिव्हल, जयपूर लिटररी फेस्टिव्हल, कोची लिटररी फेस्टिव्हल, गेट वे ऑफ इंडिया मुंबई लिटररी फेस्टिव्हल इ. साहित्यविषयक फेस्टिव्हल, सवाई गंधर्व, थिबा पॅलेस संगीत महोत्सव यासारखे संगीत उत्सव, नृत्य व कला यासंबंधी महोत्सवांचे आयोजन आणि त्याद्वारे पर्यटन उद्योग आता विकसित होत आहेत.


10) शिबिरे, संस्कार वर्ग यातून पर्यटन - ही पर्यटनाची नवीन संकल्पना आहे. यामध्ये मामाच्या गावाला जाऊ या, जीवनभान, तारुण्यभान इ. प्रकारे एक आठवडा ते तीन आठवडे एखाद्या ठिकाणी शिबिर आणि त्यातून पर्यटन उद्योग अशी ही संकल्पना आता लोकप्रिय होत आहे. याचबरोबर प्रसिध्द व्यक्ती, यशस्वी उद्योजक, कलाकार, खेळाडू, पत्रकार, राजकारणी यांच्या सानिध्यात दोन-तीन दिवस गप्पा, चर्चा असा पर्यटनाचा प्रकार दृढ होत आहे.

 

11) वैद्यकीय पर्यटन - आयुर्वेद, पंचगव्य उपचार, योग, निसर्गोचार, मसाज, पंचकर्म याद्वारे देश विदेशातील रुग्णांवर उपचारांच्या निमित्ताने पर्यटन संकल्पना विकसित होत आहेत. केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इ. राज्यांनी आघाडी घेतली आहे. उपचार आणि वेलनेसवर आधारित पर्यटनदेखील पर्यटन उद्योगांची उत्तम संधी आहे.


12) पर्यावरणीय संकल्पनांवर आधारित पर्यटन - पक्षिनिरीक्षण, प्राणिनिरीक्षण, जीवविविधता यावर आधारित पर्यटन उद्योग विकसित होत आहेत. देवराई, वनराई दर्शन, नक्षत्रवृक्ष परिक्रमा, राशीवृक्ष परिक्रमा, आकाशदर्शन, वाळवंटे दर्शन, इ. पर्यावरणीय संकल्पनांवर आधारित पर्यटन उद्योग विकसित होत आहेत. उदा., कास पठार, विविध अभयारण्ये इ.


13) गो ग्रााम पर्यटन - देशी गाईंचे आणि त्याच्या ए-2 दुधाचे तसेच गोमूत्र, पंचगव्य यांचे वैद्यकीय महत्त्व वाढत आहे. तसेच देशी गाईवर आधारित शेती ही संकल्पना मूळ धरू लागली आहे. प्राचीन भारतात देशी गाईवर आधारित कृषी व ग्राामीण जीवन अतिशय समृध्द होते. त्याचे दर्शन घडवणारे गो ग्रााम पर्यटन आता विकसित होत आहे.


14) शैक्षणिक पर्यटन / संग्राहालयांचे पर्यटन - शैक्षणिक उपक्रम व त्या निमित्ताने होणारे पर्यटन वाढत आहे. याचबरोबर नाशिकजवळील गारगोटी व त्र्यंबक रोडचे नाणी प्रदर्शन, गणपतीपुळयाचे ग्राामीण कोकण दर्शन, वॅक्स म्युझियम, इमॅजिका इ.द्वारा पर्यटन उद्योग विस्तार पावत आहे.


15) विदेशातील पर्यटन (भारतातून बाहेर आणि बाहेरून भारतात) - भारतातून पर्यटकांना विदेशात घेऊन जाणे हा पर्यटन उद्योग मोठया प्रमाणावर वाढत आहे. युरोप, अमेरिका, आफ्रिका, आग्नेय आशिया इ. ठिकाणी भारतीय पर्यटक मोठया प्रमाणावर जात आहेत. त्याचबरोबर विदेशातून भारतात होणारे पर्यटन मोठया प्रमाणावर विकसित होत आहे.


पर्यटन व्यवसायाचे आता उद्योगात रूपांतर झाले आहे. नवनवीन संकल्पनांद्वारे पर्यटन उद्योग विकसित होत आहे. पर्यटन उद्योगात फार मोठया प्रमाणात उद्योजकीय संधी आहेत
, त्याचबरोबर मोठया प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे व संलग्न आणि पूरक उद्योगांमध्ये वाढ होत आहे. पर्यटन उद्योगांकडे पाहण्याचा शैक्षणिक संस्थांचा दृष्टीकोन आता बदलण्याची गरज आहे. ट्रॅव्हल आणि टूरिझम विषयीच्या अभ्यासक्रमात अजूनही मोठया प्रमाणात रेल्वे-विमान बुकिंग, रूम बुकिंग, हॉस्पिटॅलिटी, सेवा, सॉफ्ट स्किल यावरच भर दिला जात आहे. ते आवश्यकही आहे. मात्र त्यातून फक्त नोकरी करणारे मनुष्यबळ निर्माण होत आहे. या अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलून त्यातून पर्यटन उद्योजक तयार होतील आणि ते असंख्य रोजगारांची निर्मिती करतील असे अभ्यासक्रम विकसित केले पाहिजेत. शिवाय हे अभ्यासक्रम कमी मुदतीचे तीन ते सहा महिन्याचे असावेत. त्यामध्ये प्रात्यक्षिके आणि प्रोजेक्ट असावेत. त्याद्वारे अध्यासक्रमानंतर लगेचच पर्यटन उद्योग सुरू करता येईल. दहावी पास ते पदवीधर अशा आर्ट्सच्या, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना पर्यटन उद्योगांमध्ये खूप चांगले भविष्य आहे. यातील बेरोजगार युवक-युवती पर्यटन उद्योगामध्ये मोठया प्रमाणात करियर करू शकतात. पर्यटन उद्योगाबरोबरच संलग्न असा गाइड प्रशिक्षण अभ्यासक्रमाचीही नितांत गरज आहे. प्रशिक्षित सर्टिफाइड गाइड्सची संख्या देशामध्ये खूप कमी आहे. गाइडचे मूलभूत प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम जागोजागी सुरू केले पाहिजेत. ते पर्यटन उद्योगाला साहाय्यभूत ठरतील आणि पर्यटन उद्योगाच्या विकासाला मदत करतील असा विश्वास वाटतो. प्रत्येक महाविद्यालयामध्ये पर्यटन उद्योग विकसित करण्याविषयी मार्गदर्शन करणारा सेल उभा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये 6500 महाविद्यालयांमध्ये जर अशा प्रकारे मार्गदर्शन यंत्रणा सुरू केली, तर त्यातून त्या त्या स्थानिक भागातील पर्यटनाला चालना मिळेल आणि ग्राामीण भागात मोठया प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल.


थोडेसे साहस
, कल्पकता, कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि यशस्वी व्हायची तीव्र इच्छा एवढेच भांडवल पर्यटन उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक आहे. युवक-युवतींनी आणि नवउद्योजकांनी आपापल्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वैशिष्टयांवर आधारीत पर्यटन संकल्पना विकसित करावी. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. स्वतः एकदा 'रेकी' - म्हणजे पूर्वतयारी करावी. सुरुवातीला दोन-तीन लहान ग्रुापना घेऊन पर्यटन आयोजित करावे. त्यातून आत्मविश्वास आल्यावर आपला पर्यटन उद्योग विकसित करावा. पर्यटन उद्योगातून अधिकाधिक युवकांनी करियर विकसित करावे, यासाठी मनःपूर्वक शुभेछा.

patukalesirgmail.com

(लेखक प्रख्यात इंडॉलॉजिस्ट, लेखक, संशोधक असून संस्कृती, वारसा आणि साहसी पर्यटन क्षेत्रातील उद्योजक म्हणून काम करत आहेत. विवेक व्यासपीठाद्वारे / साप्ताहिकाद्वारे आपापल्या भागातील स्थानिक संकल्पनांवर आधारित पर्यटन उद्योग विकसित करण्यासाठी लेखक नि:शुल्क सल्ला-साहाय्य करण्यास उपलब्ध आहेत.)