पर्यटन व्यवसायाला यशस्वी करणारे पडद्यामागचे व्यवसाय

विवेक मराठी    31-Dec-2019
Total Views |

पर्यटन या एका विषयाशी निगडीत बुकींग एजंट, हॉटेल्स, ट्रॅव्हर्ल्स, गाइड, इतकेच नव्हे तर खाद्यपदार्थ पुरविणारे उद्योग, टोप्या, बॅग, टी शर्ट, गॉगल्स आदी प्रवाशांना भेट म्हणून देण्यासाठी लागणाऱ्या वस्तू पुरविणाऱ्या कंपन्या असे अनेक उद्योग जोडलेले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचा विचार करताना या पूरकउद्योगांचाही आपल्याला विचार करावा लागेल.

tourism business india_1&

नेहमीच्या धावपळीच्या जीवनापासून थोडे दूर, निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाचे क्षण घालविण्यासाठी आणि नवनवीन कलांशी, संस्कृतींशी ओळख करून घेण्यासाठी हल्ली अनेक जण पर्यटनाला जातात. वर्षातून एकदा तरी पर्यटनाला जायचे, हे प्रत्येक कुटुंबाच्या नियोजनातच असते. सध्या तर पर्यटनातही विविध आयाम खुले झाले आहेत.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, केंद्र सरकारने पर्यटन व्यवसायाचे महत्त्व ओळखून गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक पर्यटन स्थळांचा विकास करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पर्यटन स्थळी उत्तम दर्जाची हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत, उंच ठिकाणी जाण्यासाठी चांगले रस्ते बांधण्यात आले आहेत. गड-किल्ल्यांसाठी रोप-वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सर्व सोयीसुविधांमुळे पर्यटन संस्थांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. इंटरनेटमुळे जग खूप जवळ आल्याने दूरवरच्या प्रवासाला जाणं आजकाल त्रासाचे आणि धोकादायक मुळीच राहिलेले नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला पूरक अशा अनेक व्यवसायांच्या संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत.

पर्यटन या एका विषयाशी निगडीत बुकींग एजंट, हॉटेल्स, ट्रॅव्हर्ल्स, गाइड, इतकेच नव्हे तर खाद्यपदार्थ पुरविणारे उद्योग, टोप्या, बॅग, टी शर्ट, गॉगल्स आदी प्रवाशांना भेट म्हणून देण्यासाठी लागणाऱ्या वस्तू पुरविणाऱ्या कंपन्या असे अनेक उद्योग जोडलेले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचा विचार करताना या पूरकउद्योगांचाही आपल्याला विचार करावा लागेल.

आज पर्यटकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविणाऱ्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या दिसतात. यात टूर ऑपरेटर, टूर मॅनेजर, ट्रॅव्हल गाईड अशा पदांसाठी खास व्यक्तीची निवड केली जाते. यांच्या माध्यमातून पॅकेज टूर्सदेखील आयोजित केल्या जातात. इंटरनेटमुळे संपूर्ण प्रवासाचे नियोजन, आरक्षण करणे अगदी सोपे झाले आहे.


पर्यटन व्यवसायाचा विचार करताना प्रामुख्याने चार प्रकार पाहिले जातात -
CP, EP, MAP आणि AP.

CP : Continental plan - यात सकाळचा नाश्ता आणि हॉटेल यांचा समावेश असतो.

EP : European plan - यात केवळ हॉटेलचा समावेश असतो. बाकी इतर गोष्टी या योजनेत येत नाहीत.

MAP : Mini American Plan - यात हॉटेल, चहा नाश्ता आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश असतो.

 

AP : American Plan - यात सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण अशा सर्वांचा समावेश असतो.

या चार पर्यायांपैकी ग्राहक आपल्याला हवा असलेला कोणताही पर्याय निवडू शकतो. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आता आपण एकेका विषयाचा आणि व्यवसायाचा/उद्योगाचा विचार करू.

* एजंट : हे एजंट आपल्या माध्यमातून ग्राहक आणतात. मग ग्राहकाला हवा तो प्लॅन याच एजंटमार्फत तयार करण्यात येतो. ग्राहकाला विशिष्ट पॅकेज हवे असेल तर ते दिले जाते. राहण्याची, खाण्याची, फिरण्याची सर्व सोय एजंटद्वारे केली जाते. ग्राहकांच्या आवडी-निवडी ओळखून त्यांच्या मनासारखे टूर पॅकेज देण्याचा आणि चांगली सेवा देण्याचा प्रत्येक टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीचा प्रयत्न असतो.

याच एजंटमार्फत प्रवासाचे तिकीटही काढले जाते. तिकिटासाठीही प्रत्येकाच्या एजन्सीज ठरलेल्या असतात. मग ते विमानाचे तिकीट असो अथवा ट्रेनचे. ग्राहकांच्या आवडीनुसार ते ठरविले जाते.

 

* हॉटेल्स - प्रत्येक टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांची त्या त्या भागातील पाच ते सहा हॉटेल्स ठरलेली असतात. ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांना हॉटेल दिले जाते. मोठा ग्रूप असेल तर हॉटेल्स ठरलेली असतात. त्यामुळे हॉटेलधारकांनाही व्यवसाय मिळतो.

 

टि्रवागो, मेक माय टि्रप यांसारख्या वेबसाईट किंवा मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपल्याला हवे असलेल्या आणि सवलतीतील हॉटेलमध्ये आपण ऑनलाइन रूम बुक करू शकतो. एक-दोन दिवसांसाठी हा पर्याय चांगला आहे. पण पाच ते सहा दिवसांच्या पर्यटनासाठी शक्यतो पॅकेजचा वापर केला जातो. कारण यात जेवण, राहणे, फिरणे, खाणे या सर्वच गोष्टींचा समावेश करता येतो.

* स्थानिक एजंट्स - यात बस, गाडी, लोकल ऑटो रिक्षावाले यांचा समावेश असतो. प्रत्येक पर्यटन व्यवसायाचे हे स्थानिक एजंट्स ठरलेले असतात. त्यामुळे त्यांनाही काम मिळते. ग्राहकांच्या संख्येवर गाडी ठरवली जाते. जास्त ग्राहक असतील तर मोठी बस, 16 ते 17 जण असतील तर टेंपो ट्रॅव्हलर, त्याहून कमी असतील तर मोठी गाडी आणि तीन ते चार जण असतील तर छोटी गाडी असे ठरलेले असते. हे एजंटस् ट्रॅव्हल कंपन्या, हॉटेल्स आणि ग्राहक यांच्यातील दुव्याचे काम करतात.

काही ठिकाणी बाहेरच्या गाडया आत जाण्यास परवानगी नसते, उदा. सोमनाथ, द्वारका, मनालीतील रोहतांग पास, कूर्गचे अबे फॉल्स येथे स्थानिक वाहन चालकांना चांगला व्यवसाय मिळतो. टूर प्लॅन करतानाच या गोष्टी ठरविल्या जातात. त्यामुळे पुढे जाऊन काही अडचणी येत नाहीत. तसेच कुठल्याही जंगल सफारीत आपली किंवा टॅ्रव्हल्स कंपनीची गाडी घेऊन जाता येत नाही. तेथे त्यांच्या गाडयांनीच आत जावे लागते. त्यांचे बुकिंगही आधीच करावी लागते. उदा. गीरचे जंगल, जिम कॉर्बेट अथवा बंदिपूरचे नॅशनल पार्क या ठिकाणी बुकिंग न करता आपण जंगल सफारी करायचे ठरविले, तर आपला प्लॅन फसू शकतो. त्यामुळे टॅ्रव्हल कंपन्या या स्थानिक एजंटच्या माध्यमातून आधीच त्यासाठी बुकिंग करून देतात. सफारीसाठी आपल्याला जीप हवी की बस ही ग्राहकांची आवड असते. त्यांच्या आवडीनुसार पॅकेज तयार केले जाते.

 

* टूरिस्ट गाइड : एवढा खर्च करून आपण पर्यटनाला जातो, पण तिथल्या वास्तूंची, गडकिल्ल्यांची, संस्कृतीची माहितीच जर आपल्याला कोणी दिली नाही, तर ते केवळ आपले फिरणे होईल. त्यामुळे प्रत्येक टूर कंपनीचे गाइडदेखील ठरलेले असतात. हे गाइड तेथील स्थानिकच असल्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होतात. शिवाय आपला प्रवासही आनंददायक आणि माहितीपूर्ण होतो.

* स्थानिक बाजारपेठा : पर्यटन व्यवसाय हा त्या त्या पर्यटन स्थळातील स्थानिक बाजारपेठांना भरभराट देणारा असतो. बहुतांश पर्यटन क्षेत्रात या बाजारपेठा हाच उपजीविकेचा महत्त्वाचा स्रोत असतो. त्या भागातील विशेष पदार्थ, वस्तू यांची मागणी लक्षात घेऊन या बाजारपेठा सजलेल्या असतात आणि ग्रााहकांना आकर्षित करतात.


* खाद्यपदार्थ : पर्यटनामुळे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना, बचत गटांनाही व्यवसाय उपलब्ध होतो असे जर मी म्हटले, तर काही जणांना ते पटणार नाही. पण हे खरे आहे. लांबच्या प्रवासासाठी आपण काही जेवणाचे डबे वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. पण सुका खाऊ, सुका मेवा आपण प्रवासात घेऊ शकतो. हा सुका खाऊ, सुका मेवा पुरविणाऱ्या काही संस्था, कंपन्या, काही बचत गट मोठया प्रमाणात कार्यरत आहेत. पर्यटनामुळे त्यांच्यासाठीही उद्योगाची नवी कवाडे उघडी झाली आहेत.

अनेक टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांचे दुकानदार ठरलेले असतात. त्यामुळे त्या दुकानदारांनाही व्यवसाय मिळतो.


राजगुरू टूर्ससारखी कंपनी राज्यांतर्गत पर्यटनासाठी किचन सोबत घेऊनच फिरते. म्हणजे जेवण बनविण्याचे सर्व साहित्य
, आचारी यांना घेऊनच ते प्रवास करतात. प्रवाशांच्या जेवणाची आबाळ होऊ नये आणि प्रवासातही घरच्या जेवणाचा आस्वाद घेता यावा, हा यामागचा त्यांचा उद्देश असतो.


* वेगवेगळया भेटवस्तू : पर्यटनाला जाताना नेहमी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे, टोपी, बॅग, गॉगल, टी-शर्ट. हल्ली प्रत्येक टूर आणि ट्र्रॅव्हल कंपनी यापैकी कोणत्याही एका किंवा दोन गोष्टींवर आपला लोगो छापून आपल्या ग्रााहकांना या वस्तू भेट देत असते. त्यामुळे त्यांच्या कंपनीची जाहिरातदेखील होते आणि प्रवाशांना गिफ्ट मिळाल्याचे समाधान मिळते. प्रवाशांना देण्यासाठी या सर्व गोष्टी मोठया प्रमाणावर तयार करून घेतल्या जातात. साहजिकच यामुळे या छोटया उद्योजकांनाही व्यवसाय मिळतो. प्रत्येक टूर आणि ट्र्रॅव्हल कंपन्यांचे आपले विक्रेते ठरलेले असतात.


* जाहिरात : लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक टूर आणि ट्र्रॅव्हल कंपन्यांना आपल्या कंपनीची जाहिरात करावीच लागते. जाहिरातींसाठी प्रत्येकाच्या एजन्सीज ठरलेल्या असतात. पर्यटनाच्या जाहिरातीच्या माध्यमातून जाहिरात कंपन्यांनाही व्यवसाय मिळतो.


याशिवाय पाण्याच्या बाटल्या असतील
, स्टेशनरी असेल, प्रिंटर असेल, चहावाला असेल आणि आता तर कॅबदेखील पुरविल्या जातात. या सर्व छोटया उद्योजकांना या एका क्षेत्रातून मोठा व्यवसाय मिळत असतो.


तात्पर्य
, पर्यटन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी अनेक छोटया मोठया उद्योगांची, व्यावसायिकांची जोड गरजेची आहे. हे सगळे जोड व्यवसाय म्हणजे पर्यटनाच्या पडद्यामागचे महत्त्वाचे कलाकार आहेत. त्यांचे महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन या उद्योगांना बळ देणं ही आजची गरज आहे.