सावरकरद्वेषाची कावीळ झालेले डोळे

विवेक मराठी    31-Dec-2019
Total Views |

***पार्थ बावस्कर***

 

सावरकर हे फक्त स्त्री स्वातंत्र्याचा विचार करून थांबत नाहीत, त्यांच्यातील द्रष्टा विचारवंत आपल्याला स्त्री-पुरुष समानतेची नवी समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल बरेच काही सांगून जातो. केवळ भारताचाच नाही, तर जगभरातल्या अनेक देशांचा विचार करून आपल्या देशाने तारतम्याने स्त्री-पुरुष समानतेबद्दल कशी पावले उचलावीत हेही सावरकर सांगतात. नव्या काळात नव्या साधनांचा वापर करून सर्व क्षेत्रात संपन्न होण्यासाठी स्त्रियांनी पुढाकार घ्यावा असे सांगणारे सावरकर तथाकथित विद्वानांना अजूनही सनातनी का वाटतात कोण जाणे? सावरकर द्वेषाची कावीळ त्यांच्या डोळयांना झाली असावी बहुधा!


sawarkar_1  H x

 

असे म्हणतात की, विद्वान लोक कितीही ज्ञानवंत असले तरी प्रत्येकाला आपापल्या ज्ञानाच्या मर्यादा ठाऊक असतात - किंबहुना आपल्या ज्ञानाच्या मर्यादा ज्यांना खरोखर कळतात, तेच खरे विद्वान होत. जयदेव डोळेंना किंवा सावरकरांवर टीका करणाऱ्या इतर विद्वानांना मात्र त्याचा विसर पडलेला दिसतोय, हे पाहून अत्यंत खेद वाटतो. अगदी कालपरवा मिसरूड फुटलेल्या आणि कवडीची अक्कल नसलेल्या काही पोरांनी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता सावरकरांच्या, विवेकानंदांच्या पुतळयाला काळे फासले. माध्यमांनी त्यांना लगेच प्रसिध्दी दिली, त्यांची नावे झळकली. सगळयांचे लक्ष या घटनेने वेधून घेतले. अशांचा आदर्श डोळेंच्या डोळयासमोर आहे की काय कोण जाणे? असे असेल तर मात्र डोळेंचे भवितव्य अंधारात आहे. डोळेंच्या अशाच काही तर्कहीन विधानांचा समाचार घ्यायलाच हवा. या निमित्ताने सावरकर काय सांगतात हे आजच्या पिढीला समजणार आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे.

सावरकरांच्या लेखांचे आणि विचारांचे एक वैशिष्टय आहे. हिंदूंमधील चुकीच्या आणि भ्रामक कल्पना जशा त्यांना त्याज्य वाटतात, तशाच ख्रिश्चन, मुसलमान, यहुदी यांच्यातीलही चुकीच्या गोष्टींवर ते बोट ठेवतात. आजच्या तथाकथित विद्वानांना मात्र हेच रुचत नाही. मनुस्मृतीच्या किंवा इतर काही स्मृतिग्रांथांच्या आधारे सावरकरांनी जसा हिंदू धर्मातील स्त्री प्रश्नाला हात घातला, तसेच भारताबाहेरील देशात काय परिस्थिती आहे याचाही परामर्श घेतला आहे. काही काळापूर्वी यहुदी स्त्री कशी होती, 'नवा करार' या त्यांच्या ग्रांथात स्त्री स्वातंत्र्याबद्दल काय लिहिले आहे, बायबल, कुराण यात स्त्री स्वातंत्र्याबद्दल काय लिहिले आहे, हेही सावरकर सांगतात. आणि आजवर युरोपात त्यांची कशी गळचेपी झाली याची अनेक उदाहरणे सांगितली आहेत. ख्रिश्चन, इस्लाम धर्मात ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांचा ऊहापोह करायला सावरकर विसरत नाहीत. आणि स्त्री ही कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे हे महत्त्वाचे नाही, पण ती स्त्री आहे म्हणून तिच्यावर अन्याय व्हायला नको, अन्यायातून तिची मुक्तता व्हायला हवी, स्त्रीला स्वातंत्र्य हवेच असेच सावरकर सांगतात. परकीयांच्या देशातले चांगले ते घ्या, तो आदर्श समोर ठेवा, आणि आपल्या देशातल्या स्त्रियांच्या अन्यायाला वाचा फोडा हाच सावरकरांचा संदेश आहे. भारताच्या नव्हे, तर समस्त जगातल्या स्त्री जातीची चिंता त्यांना अस्वस्थ करत होती, याचेच हे द्योतक नाही का!

रत्नागिरीत सावरकर अस्पृश्यता निवारणाचे मोठे आंदोलन उभे करत होते, त्यातही स्त्रियांचाही बरोबरीने सहभाग होता. सावरकरांच्या एका पत्रात उल्लेख सापडतो - ब्राह्मण स्त्रियांनी महार, चांभार इत्यादी अखिल हिंदू जातीय स्त्रियांस हळदीकुंकू वाटण्याचे आनंदाने मान्य केले, पण महारणीनांही ते पचेना. त्या आल्या, पण अगदी ओटयावर त्यांच्याकरिता इतर स्त्रियांशेजारी केलेल्या बैठकीवर बसण्यास त्या धजेनात! लाजू लागल्या! तेव्हा सावरकरांनी त्यांस बाहेर येऊन पाचारण केले. त्या म्हणाल्या, ''दादा, सावली पडेल ना आमची!'' सावरकर म्हणाले, ''काही चिंता नको बाई! तुम्ही माझ्या धर्माच्या बहिणी आहात. तुमची सावली पडावी म्हणूनच तुम्हास बोलविले आहे. या तुम्ही, आपण सर्व हिंदू देवीचे चरणापाशी येताच विभिन्न राहत नाही.'' (सावरकरांची पत्रे, साप्ताहिक बळवंत - 29-4-1925.) स्त्रियांना समान हक्क मिळावेत यासाठी सावरकर 1925पासूनच किती क्रियाशील होते, याचे हे द्योतक!

आजच्या काळात अत्यंत काळजीचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घटस्फोट. घटस्फोटाच्या विषयात देशोदेशीच्या स्त्रियांची स्थिती, परदेशातील कायदे, निर्बंध, काडीमोड घेतल्यानंतर मुलाबाळांचा करायचा सांभाळ अशा मूलभूत प्रश्नांचीही त्यांनी पुरेपूर दखल घेतली आहे. सावरकर लिहितात, महिला वर्गात तर हा घटस्फोट स्वातंत्र्याचा प्रश्न अगदीच जिव्हाळयाचा, कारण घटस्फोटाच्या खिंडीत जर कोणाच्या जिवास अधिक धोका असेल तर तो आसन्नप्रसवा महिलांच्याच होय - ( रशियातील घटस्फोट स्वातंत्र्याचा प्रयोग) विवाह करण्याचे वय कुठल्या देशात काय आहे, लग्नापूर्वी स्त्रियांची आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत भेट झालेली असते का? ते होणे कसे हिताचे आहे हे सावरकर पटवून देतात.

कौमार्याचा प्रश्न आजकाल फार चर्चिला जातो, वाहिन्यांवर जोरजोरात चर्चा वगैरे घेतल्या जातात. सावरकरांनी आजपासून 80-90 वर्षांपूर्वी यावर सडेतोड भाष्य केले आहे. स्त्रीने अखंड कौमार्यत्व जपावे आणि पुरुषांनी ते जपले नाही, तर काही हरकत नाही हे चुकीचे आहे असे सावरकर स्पष्ट करतात. ते लिहितात, स्त्रीने तेवढे लग्न होईतो अखंड कौमार्य असले पाहिजे, पुरुषाने कसेही असले तरी हरकत नाही ही जुनाट नीतिमत्ता पक्षपाती नि टाकाऊ आहे (लेख - रशियातील घटस्फोट स्वातंत्र्याचा प्रयोग - स्वा. सावरकर.) आता यापेक्षा खरा आणि काळानुरूप असलेला आणि स्त्री स्वातंत्र्याची पर्वा करणारा विचार कोणता असू शकतो? आज पतींकडून स्त्रियांना मारहाण होते, दारू पिऊन घराघरात भांडणे होतात, या सगळया विरुध्द आवाज उठवण्याचे कोणत्या देशात कोणते कायदे आहेत आणि ते स्त्रियांना अनुकूल कसे आहेत ही गोष्ट सावरकर आजच्या भारतीय स्त्रीला पटवून देतात. सावरकर लिहितात, स्त्रियांना मारहाण करण्याची पाशवी प्रवृत्ती ही पुरुषांतून अजून थोडयाफार प्रमाणात सापडते. अशा उदाहरणात स्त्री जेव्हा घटस्फोट मागावयास येते, तेव्हा तेव्हा घटस्फोट स्वातंत्र्यामुळे सोव्हिएटमधल्या स्त्रिया दिवसेंदिवस धीट, स्वावलंबी आणि प्रेमादरावाचून धंदेवाईकपणे कोणाही परपुरुषाशी संबंध न ठेवणाऱ्या होत चालल्या आहेत, ही समाधानकारक गोष्टच प्रत्ययास येते. (उपरोक्त) स्त्रियांचा त्यांच्या शरीरावरचा अधिकार किंवा तो हिरावणारा पुरुष याबद्दल सावरकरांनी काय लिहिले? हा जो प्रश्न जयदेवरावांना पडला आहे, त्यांच्या या प्रश्नाचे सडेतोड उत्तर सावरकरांनी किती वर्षांपूर्वी देऊन ठेवले आहे, होय ना!

पुरुषाने स्त्रीला बलात्काराने अधीन करणे आणि भारतावरील इंग्राजांचे दीडशे वर्षांचे राज्य याबद्दल सावरकर कधी फरक करत होते का? असा प्रश्न डोळयांना पडला. बलात्कार, विधवांचे प्रश्न यावर त्यांनी केलेली 102 कडव्यांची कविता डोळेंच्या नजरेतून का निसटली, कोण जाणे? डोळेंनी सावरकरांची बालविधवा दु:खस्थितीकथन ही कविता डोळे उघडे ठेवून वाचावी, म्हणजे सावरकरांची भूमिका चांगलीच लक्षात येईल. मग भारतमाता जशी पारतंत्र्यात राहू नये तशीच आजची स्त्रीसुध्दा मुक्त व्हावी, तिचीही गुलामगिरी संपावी या दृष्टीने सावरकरांनी अगदी स्पष्टपणे जे लिहिले आहे, ते डोळेंसारख्या जाणकाराच्या अभ्यासात असू नये म्हणजे कमाल आहे.

सावरकर रक्तपाताचा गौरव करतात किंवा हत्याकांडाचे स्वागत करतात असा संदर्भ जेव्हा डोळे देतात, तेव्हा हिंसेचे समर्थन कशाला म्हणावे व कशाला म्हणू नये याबद्दल सावरकरांनी स्वतः लिहिलेली वाक्ये प्रसिध्द आहेत, त्याकडे मात्र जाणीवपूर्वक 'डोळे'झाक करतात. सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारक होते, देशाला जितके शास्त्र महत्त्वाचे तेवढेच शस्त्रसुध्दा हा सावरकरी विचार सगळया जगाला ठाऊक आहे. त्यांच्याकडून तुम्ही निरर्थक शांतिपाठाची अपेक्षा कशी काय करणार? लढाई, युध्द, आणि त्यात वीरमरण आलेल्या पराक्रमी स्त्रियांची यशोगाथा त्यांनी सांगितली आहे. आजही आपण राजपुतांच्या स्त्रियांनी स्वतः अग्निकुंडात उडी घेतली या घटनेला गौरवाने 'जोहर' असेच म्हणतो ना ! की त्यांनी तसे न करता शत्रूच्या स्वाधीन होऊन स्वतःचे शील भ्रष्ट करून घ्यायला हवे, असे शहाजोग सल्ले देतो? त्यामुळे त्यांनी अहिंसक मार्गापेक्षा शस्त्र उचला असे सांगितले, याबद्दल घेतलेला आक्षेप अगदीच निरर्थक ठरतो. देशासाठी शस्त्रे चालवणे, सापेक्ष हिंसा याबद्दलचे सावरकरांचे विचार डोळेंना माहीत नाहीत का? तरीही याचा संबंध डोळेंना का जोडावासा वाटला, कोण जाणे?

एका लेखात स्त्रियांनी आपल्या सौंदर्याची, शरीराची जोपासना कशी करावी याबद्दल त्यांनी एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. स्त्रीने तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी, लावण्य जपण्यासाठी काय करावे आणि आजच्या काळात ते किती महत्त्वाचे आहे हे सावरकर सांगतात. आपल्याला मिळालेल्या सौंदर्याची जोपासना करणे स्त्री आणि पुरुष दोघांना गरजेचे आहे, हे सावरकर सांगतात आणि अत्यंत रसाळ आणि लालित्यपूर्ण भाषेत त्यांनी यापैकी काही वर्णने केली आहेत. सावरकर स्त्रियांना आवाहन करतात - लावण्यवती कुमारींनो, जननींनो, तुम्हास जन्मतःच निसर्गाने दिलेल्या ह्या दैवी देणगीस आपल्या पूर्वपुण्याईचे वरदान माना आणि त्यास अत्यंत जपा! लावण्यच नव्हे, तर प्रत्येक स्त्रीला जे रूप जन्मतः लाभलेले असेल, ते त्यातल्या त्यात तिने खुलून दिसावे असा यत्न अवश्य करावा. प्रसाधनांनी आपली कांती, वर्णशोभा वाढवावी. स्त्रीचे सौंदर्य ज्यायोगे विकसेल, तिला त्याचा योग्य तो लाभ लागेल, असे उत्तेजन मिळाले पाहिजे. कालपरवा टी.व्ही.वरील एका वाहिनीवरील चर्चेत एक विद्वान तावातावाने ओरडून सांगत होता की सावरकरांचे विचार आजच्या काळात कालबाह्य झालेत. त्यांचे हे विचार वाचून लक्षात येते की सावरकरांचे विचार समाजापेक्षा चार पावले पुढेच होते. आजच्या काळात प्रत्येक स्त्री आणि पुरुषसुध्दा सावरकरांच्या याच विचारांचा अवलंब करताना दिसतात ना! भोवतालच्या स्त्रिया स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी पुरुषांप्रमाणेच जिम वगैरेसारखे पर्याय वापरू लागले आहेत. भोवताली वाढत असेलली ब्युटी पार्लरची संख्या आपल्याला काय सुचवते? नकळत का होईना, आजची स्त्री सावरकरांचे विचार प्रत्यक्षात जगतेच आहे. तेव्हा कुठलीही टीका करण्याआधी अभ्यासकांनी ते वाचण्याचे श्रम तेवढे घ्यावेत.

सावरकर स्वतः आपल्या ग्रांथामधून या अशा सर्व गोष्टींचा ऊहापोह करतात. तरीही जयदेव डोळेंनी मात्र सावरकर स्वतः काय सांगतात हे लक्षात न घेता त्यांच्यावर शर्मा काय म्हणतात, विद्याधर पुंडलिक काय म्हणतात याचेच दाखले दिले आहेत. मग अशा वेळी सावरकरांनी स्वतः लिहिलेला संदर्भ महत्त्वाचा मानायचा की कुणीतरी तिसऱ्याच माणसाने सावरकरांबद्दल लिहिलेले दाखले द्यायचे? हे असे प्रकार एखाद्या विद्वान अभ्यासकाला शोभत नाहीत. कुठलाही बादरायण संबंध नसताना असाच आणखी एक प्रसंग डोळेंनी ओढून ताणून या विषयात आणला आहे, त्याचाही संदर्भासह समाचार घेऊ या, पण पुढच्या भागात!

(क्रमशः)

पार्थ बावस्कर

9146014989, 8275204500

parthbawaskar93gmail.com