युवा पिढीचे साहित्यभान जागवणारे संमेलन

विवेक मराठी    07-Dec-2019
Total Views |

 
yuva vivek_1  H

आजची तरुण पिढी साहित्य विश्वापासून दूर चालली असल्याची तक्रार वारंवार ऐकायला मिळते. मात्र एखादा तरुण विसाव्या-बाविसाव्या वर्षी शेकडो पुस्तकांचा संग्रह करतो किंवा वाचून काढतो अशी काही उदाहरणे अपवादाने का होईना पाहायला मिळतात, तेव्हा वाटते की आपण समजतोय तितकी परिस्थिती बिघडलेली नाही. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या युवा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अशाच प्रकारची सकारात्मक जाणीव झाली. विवेक समूहाचा महत्त्वाचा आयाम असलेला विवेक साहित्य मंच, साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य आणि मुलुंड वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी 3 डिसेंबर रोजी हे एकदिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते, तर दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात झाली. उद्घाटन सत्रात व्यासपीठावर या दोन दिग्गजांच्या जोडीला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पेडणेकर, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, विवेक साहित्य मंचच्या समन्वयक प्रा. प्रतिभा बिस्वास, सा. विवेकचे सह कार्यकारी संपादक साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र गोळे, वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे प्रा. भास्कर मयेकर, डॉ. शिवाजी पवार आदी मान्यवर मंडळी होती. आणि समोर प्रेक्षकांमध्ये होता 250-300 विद्यार्थ्यांचा समुदाय. या उपस्थितांच्या उत्सुक नजरेत व्यासपीठावरील दिग्गज मान्यवरांविषयी जेवढे कुतूहल, आदर दिसत होता, तितकेच कौतुक व्यासपीठावरील मंडळींच्या डोळ्यात या विद्यार्थ्यांसाठी जाणवत होते.
 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक
 

संमेलनाध्यक्ष दवणे सरांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “काही तरी दाटून आल्यानंतर येणार्या ओढीतून अभिव्यक्ती होते. त्या अभिव्यक्तीची रूपं आपापल्या प्रतिभाधर्मानुसार आकाराला येतात. कुणाला चित्र काढावंसं वाटतं, कुणाला शिल्प कोरावंसं वाटतं, कोणाला काव्य करावंसं वाटतं. हे अभिव्यक्त व्हावंसं वाटणं हीच माणूसपणाची खूण आहे. मात्र सकारात्मक नवनिर्मितीसाठी सजग आत्मभान असणं गरजेचं असतं,” असे ते या वेळी म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी आजच्या पिढीच्यासेल्फीमग्नतेकडे लक्ष वेधले. “सेल्फीमग्नतेचा संसर्ग आपल्या अवघ्या जीवनशैलीला झाला आहे. आजच्या आत्मलुब्धतेच्या मार्केटिंगच्या काळात जाणिवांच्या मदतीने संवेदनांच्या कक्षा विस्तारा. या सेल्फीमग्न आभासी जगात जो युवक स्वतःच्या जाणिवांवर जागता पहारा ठेवेल, तोच पुढे टिकून राहणार आहेअसे ते म्हणाले.


pravin davane_1 &nbs

आजचा युवा मराठी साहित्य, मराठी कलाकृतीपासून दूर जात असल्याची खंत केदार शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला वाचनाची गोडी लावली. त्यामुळे आमचं अनुभवविश्व समृद्ध झालं. नव्या पिढीसाठी चांगलं साहित्य, कलाकृती निर्माण करणं ही आमच्या पिढीची जबाबदारी आहे. आपल्याला जे साहित्यप्रकार आवडत असतील, ते वाचले पाहिजेत. आजच्या अस्थिर वातावरणात आपल्या अंतर्मनाला स्थिर करण्यासाठी वाचन कराअसे मार्गदर्शन केदार शिंदे यांनी या वेळी केले. तर साहित्यातील गमतीजमती समजून घेतल्या तर त्याविषयी आवड तुम्हाला वाटेल, असा सल्ला दिग्पाल लांजेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. “गो.नि. दांडेकर यांचेकादंबरीमय शिवकालचे खंड वाचले आणि या विषयाची आवड मनात निर्माण झाली. फर्जंद, फत्तेशिकस्त या माझ्या चित्रपटांचे संवाद लिहिताना त्याची मदत झालीअसे सांगून त्यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.

सांस्कृतिक आणि साहित्यिक समृद्धीच्या आधाराशिवाय आर्थिक समृद्धी टिकू शकत नाहीअसे प्रतिपादन दिलीप करंबेळकर यांनी केले. आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की, “आज जगात मानव हा समाज म्हणून इतका सशक्त झाला आहे की इतर प्राणी त्याच्यावर अवलंबून राहू लागले आहेत. प्रत्येक पिढीत मानवाच्या जाणिवांचा विकास होत गेल्याने हे शक्य झालं. भाषेच्या शोधामुळे माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा ठरला. भाषेमुळे माणसाला आपलं अनुभवसंचित पुढच्या पिढ्यांपर्यंत सोपवणं शक्य झालं.” मानवी भावभावनांची अभिव्यक्ती उत्तम साहित्यात असते. त्यामुळे आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या भावनांची अनुभूतीही उत्तम साहित्य देते, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही काय वाचतो?’ या सत्रात काही विद्यार्थ्यांनी आपण वाचत असलेल्या पुस्तकांविषयीचे अनुभव मांडले. त्यानंतर सत्राचे अध्यक्ष लेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलं वाचत नसतील तर त्याला पालक जबाबदार असल्याचे सांगतानाच ते पुढे म्हणाले, “वाचनाची सवय लावायची असेल तर लगेच जड, गंभीर, तत्त्वज्ञान असलेल्या पुस्तकांनीच सुरुवात करण्याची गरज नसते. आमच्या लहानपणी आम्ही परिकथा, पंचतंत्रातील कथा वाचायचो. आपल्या आजूबाजूच्या त्रासदायक वास्तवापासून दूर जाऊन आम्ही त्या काल्पनिक जगात रमायचो. पुस्तकं म्हणजे दुसरं काही नसतं, तर जगाकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या खिडक्या असतात. पुस्तकं महाग झालीत अशी तक्रार केली जाते. मात्र महागड्या मोबाइलपेक्षा पुस्तकं स्वस्तच आहेत. पुस्तकं तुम्हाला कायम सोबत करत राहतात. आपल्याला अधिक चांगला माणूस बनायला मदत करतात. त्यामुळे पुस्तकाचं बोट सोडू नका. आपल्या वाचनाचा परीघ वाढवा.”

pravin davane_1 &nbs

काव्यसंमेलनाच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. यात स्वभान, आई-वडिलांविषयीची कृतज्ञता यांबरोबरच स्त्री-भ्रूण हत्या, शेतकर्यांच्या आत्महत्या अशा सामाजिक विषयांवरील कवितांचाही समावेश होता. या सत्राचे अध्यक्ष संगीतकार कौशल इनामदार यांनी विद्यार्थ्यांच्या कवितांचे आणि व्यासपीठावरून त्या मांडण्याच्या धैर्याचे कौतुक केले. मात्र त्याच वेळी कविता म्हणजे नक्की काय हे त्यांनी या नवकवींना त्यांच्या खास शैलीत समजावून सांगितले. ते म्हणाले, “कविता हे माध्यम सांगण्याचे नसून सुचवण्याचे आहे. त्यामुळेच प्रतिभावंत कवींच्या कविता तुम्ही पुन्हा पुन्हा वाचू शकता आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यात तुम्हाला त्यात वेगवेगळ्या छटा सापडू शकतात. कविता आपल्या आतून उत्स्फूर्तपणे आली पाहिजे. ती ठरवून लिहिता येत नाही. जी कविता अर्थाच्या पलीकडे जाऊन बोलते, ती आपल्याला भावते. मुक्तछंद कवितांबरोबरच छंदात कविता लिहिण्याचा प्रयत्न करावाअसेही त्यांनी आजच्या नवकवींना सुचवले.

 

या संमेलनात रंग भरले ते अभिनेत्री तितिक्षा तावडेच्या प्रत्यक्ष मुलाखतीने आणि अमोल बावडेकर यांच्या संगीत मैफलीने. ‘सरस्वती’, ‘कन्यादानयांसारख्या मालिकांमधून छोट्या पडद्यावर लोकप्रिय झालेली तितिक्षा मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाचीच माजी विद्यार्थिनी असल्याने तिचे उत्साहात स्वागत झाले. प्रथमेश साळुंखे आणि गौरी मुळेकर या विद्यार्थ्यांनी तिची मुलाखत घेतली. क्रिकेट ते हॉटेल मॅनेजमेंट आणि त्यानंतर छोटा पडदा असा आपला प्रवास तितिक्षाने उलगडून सांगितला. अमोल बावडेकर यांनीही संगीत मैफलीच्या दरम्यान प्रतिभा बिस्वास यांच्याशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये आपल्या करिअरच्या वेगळ्या वळणवाटांचे दर्शन घडवले. या दोन्ही मुलाखती या विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगळ्या आयामांची दिशा दाखवणार्या होत्या, हे निश्चितच.

 

गौरव नेवारे, प्रणया भोसले, नुपुरा बढे, अमेय पंपाळखरे या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या अन्य सहकार्यांचे संमेलनाच्या आयोजनातील आणि सूत्रसंचालनातील उत्साही सहभागासाठी सर्वांनीच कौतुक केले. वाणिज्य क्षेत्रासारख्या कोरड्या वाटणार्या क्षेत्रात शिक्षण घेणार्या या विद्यार्थ्यांना साहित्य क्षेत्राविषयी वाटणारी ही आस्था मराठी साहित्य विश्वाला नवसंजीवनी देणारी पिढी नक्कीच घडत असल्याचा दिलासा देणारी आहे.