नथुरामी विकृती संपायला हवी

विवेक मराठी    01-Feb-2019
Total Views |

 नथुराम गोडसे या खुन्याचे समर्थन ही निषेधार्ह बाब आहे. हिंसेचे समर्थन करता कामा नये. हिंसेने कोणतेही प्रश्न निकाली निघत नाहीत, हे नथुरामभक्तांनी समजून घ्यायला हवे. हिंसेने प्रश्न सोडवण्याचा हिंदू समाजाचा संस्कार नाही. आणि आज जे नथुरामच्या हिंसेचे समर्थन करत आहेत, त्यांना हिंदू समाज कळला नाही. ज्यांना हिंदू समाजाच्या हिताशी काही घेणे-देणे नाही, त्यांना नथुरामचे माहात्म्य अबाधित ठेवायचे आहे, म्हणजेच हिंसेच्या मार्गाचा अबलंब करायचा आहे. ते हिंदूंचा बुरखा पांघरलेले अतिरेकी आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.

  नुकतीच 30 जानेवारीला महात्मा गांधींची 71वी पुण्यतिथी साजरी झाली. हे वर्ष महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनावरही त्याचा प्रभाव पडलेला आपण पाहिला आहे. 30 जानेवारी रोजी अलिगढ येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळया चालवून महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे 'अमर रहे'च्या घोषणा दिल्या गेल्या. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव असणाऱ्या पूजा पांडे या महिलेने भगवे कपडे परिधान करून हे संतापजनक कृत्य केले. देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. पूजा पांडेंसह अन्य तेरा जणांना अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही चालू आहे. असे घृणास्पद काम करणाऱ्या या गणंगाना कडक शिक्षा झाली पाहिजे. अलिगढ येथील ही घटना म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी घडलेल्या घृणास्पद घटनेचे पुन्हा पुन्हा स्मरण करून त्याचे समर्थन करत राहणे होय. ही विकृत मानसिकता आहे. अलिगढ येथे घडलेल्या घटनेतून ही मानसिकता पुन्हा समाजपटलावर आली आहे.

महात्मा गांधींच्या हत्येनंतर नथुराम गोडसेला अटक झाली, रितसर तपास झाला आणि त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली.  नथुरामच्या मृत्यूबरोबरच या विकृत मानसिकतेचा अंत व्हायला हवा होता, मात्र तसे झाले नाही. महात्मा गांधींच्या या खुन्याला आणि त्याच्या विकृत मानसिकतेला जिवंत ठेवणारे दोन प्रकारचे लोक आपल्या हिंदू समाजात आहेत. पहिल्या प्रकारातील लोकांना महात्मा गांधींची जयंती, पुण्यतिथी आली की नथुरामची आठवण येते आणि त्याच्या शौर्याचे, विद्वत्तेचे गोडवे गाण्यास सुरुवात केली जाते. नथुरामचे उदात्तीकरण करताना ते महात्मा गांधींवर हीन पातळीवर जाऊन टीका करण्याचा सपाटा लावतात. नथुरामचे उदात्तीकरण करण्यासाठी या मंडळींनी त्याचे मंदिर बांधण्याचा घाटही घातला होता. सोशल मीडियातून हीन पातळीवरचे लेखन करून गंाधीहत्येऐवजी गांधीवध असा शब्द वापरणारा हा गट आहे. आपण म्हणतो तोच इतिहास खरा असा अहंकार बाळगणारी ही जमात आहे. यांना नथुरामच्या विकृतीने इतके ग्रासले आहे की समकालीन समाजव्यवस्थेचेही भान राहिलेले नाही. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना नथुरामशी काहीही घेणे-देणे नाही. ते तथाकथित पुरोगामी आहेत. त्यांना हिंदूंवर, हिंदुत्वावर टीका करण्यासाठी नथुराम हवा आहे. त्यामुळे त्याच्या ओठी कायम नथुराम गोडसेचे नाव असते. दाभोलकर-पानसरे हत्येनंतर तर या मंडळींना नथुरामचा टकळा लागला होता. हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी, त्याच्यावर चिखलफेक करण्यासाठी आजवर नथुरामचा हत्यारासारखा वापर स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे करत असतात. अशा दोन प्रकारच्या लोकांमुळे आजही नथुराम जिवंत आहे आणि तो संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम करत आहे.

काही मूठभर लोक जेव्हा अशा विकृत मानसिकतेने पछाडलेले असतात आणि त्या विकृतीचे वारंवार प्रदर्शन मांडतात, तेव्हा त्यांचा गंभीरपणे विचार करावा लागतो. कारण ते केवळ आपल्या विकृतीत जगत नाहीत, तर ते कायदा सुव्यवस्थेसमोरही समस्या निर्माण करत असतात. जे स्वतःला नथुराम गोडसेचे समर्थक किंवा भक्त मानतात आणि गांधींना व त्याच्या विचारांचा विरोध करतात, त्यांच्याकडे गांधी विरोधाशिवाय दुसरा कोणता सकारात्मक विषय आहे, ज्याने हिंदू समाजाचे भले होणार आहे, हे एकदा स्पष्ट करायला हवे. विद्वेष आणि हिंसेचे समर्थन हा हिंदू समाजाचा स्वभाव नाही. मात्र अशा कर्मठ नथुरामभक्तांच्या विकृत चाळयांमुळे हिंदू समाजाची प्रतिमा हिंसक समूह अशी होत आहे. या प्रतिमाहननामुळे हिंदू समाजाची जी हानी होते आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे?

नथुराम गोडसे या खुन्याचे समर्थन ही निषेधार्ह बाब आहे. हिंसेचे समर्थन करता कामा नये. हिंसेने कोणतेही प्रश्न निकाली निघत नाहीत, हे नथुरामभक्तांनी समजून घ्यायला हवे. हिंसेने प्रश्न सोडवण्याचा हिंदू समाजाचा संस्कार नाही. आणि आज जे नथुरामच्या हिंसेचे समर्थन करत आहेत, त्यांना हिंदू समाज कळला नाही. ज्यांना हिंदू समाजाच्या हिताशी काही घेणे-देणे नाही, त्यांना नथुरामचे माहात्म्य अबाधित ठेवायचे आहे, म्हणजेच हिंसेच्या मार्गाचा अबलंब करायचा आहे. ते हिंदूंचा बुरखा पांघरलेले अतिरेकी आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. अलिगढ येथे पूजा पांडे आणि तिच्या सहकाऱ्यांनी आपण अतिरेकी आहोत हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असे अनेक नथुरामभक्त आहेत, ते वेळोवेळी आपली भक्ती प्रकट करत असतात. त्यांच्या नथुरामभक्तीला गांधीद्वेषाची झालर असते.

नथुरामभक्ती आणि तिचे समर्थन ही आपल्या समाजाला लागलेली विकृत मानसिकतेची कीड आहे आणि ती जोरात फोफावू लागली आहे. ही वाढती विकृती हिंदू समाजाला केवळ बदनाम करत नाही, तर समाजात कायमस्वरूपी द्वेषाची पेरणी करते, हिंसेचे समर्थन करते व म्हणूनच तिचा निषेध करायला हवा. विकृत मानसिकता संपवण्यासाठी आधी नथुराम संपवला पाहिजे. कारण आज नथुरामचे उदात्तीकरण करून हिंसेचे समर्थन करणारे, तशी प्रतीकात्मक कृती करणारे स्वतःला हिंदू समाजाचे नेते म्हणवून घेत आहेत. अशा विकृतांकडे कधीही हिंदू समाजाचे नेतृत्व नव्हते, असणार नाही आणि म्हणूनच समाजात रुजू पाहणारी नथुरामी विकृती संपवली पाहिजे.