भविष्यवेत्ता जॉर्ज फर्नांडिस

विवेक मराठी    01-Feb-2019
Total Views |

देशाचे संरक्षण मंत्री आणि केंद्रातील एकमेव मंत्री, ज्यांच्या बंगल्यात वा व्यक्तिगत सेवेत कोणी सुरक्षा कर्मचारी नव्हते की ताफाही नसायचा. असला माणूस वा नेता विरळाच असतो. शब्द वा तत्त्व यापेक्षाही परिणामाला व हेतूला प्राधान्य देणारा हा नेता. 1998 साली बाजपेयी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला असताना, जॉर्ज सरकारच्या समर्थनाला उभे राहिले. त्यांनी आजकाल बोकाळलेल्या सेक्युलर पाखंडांचे धिंडवडे उडवणारे परखड भाषण केले होते.

 

2004च्या विधानसभा निवडणुकांचा काळ होता. तेव्हा नामदेव ढसाळची दलित पॅन्थर शिवसेनेबरोबर होती आणि अचानक एका रात्री त्याचा मला फोन आला. शिवसेना-भाजपा युतीने नामदेवसाठी विधानसभेच्या दोन जागा सोडल्या होत्या. एक होती नागपाडा ही मुंबईची आणि दुसरी होती सातारा जिल्ह्यातील दक्षिण कराडची. तर मुंबईत नामदेवच स्वत: लढणार होता आणि कराडला लढू शकेल असा उमेदवार त्याला हवा होता. त्याचा फोन आला, तेव्हा मी मुंबईत होतो आणि कराडला कमलाकर सुभेदारला उभा करता येईल, असे मी त्याला सुचवले. कमलाकर समाजवादी चळवळीतला आणि दलित पॅन्थरच्या आधीपासून नामदेवच्या सहवासातला मित्र होता. ते नाव नामदेवला आवडले. पण हा समाजवादी शिवसेनेच्या नावावर उमेदवारी भरील किंवा नाही, याची त्याला शंका होती. त्याने मलाच ते काम करायला सुचवले. तेव्हा कमलाकर साताऱ्याला माण तालुक्यातल्या महीमानगडला, त्याच्या गावी होता. रात्रीच मी त्याच्याशी फोनवर संपर्क साधला आणि त्याच्या गळी पडलो. त्याने काही आढेवेढे घेत मान्य केले. त्याला तत्काळ मुंबईला यायला सांगितले आणि बातमी नामदेवला दिली, तोही खूश झाला. त्यानेही मग कमलाकरशी फोनवर संपर्क साधला. अशा रितीने दक्षिण कराडला दलित पॅन्थर-शिवसेना युतीला उमेदवार मिळाला होता. दोन दिवसांनी आम्ही तिघे व नामदेवचे काही सहकारी मातोश्रीवर चिन्हाचे अधिकारपत्र मिळवायला गेलो होतो. तिथे घोटाळत असताना नामदेवला कुठून तरी सुगावा लागला, की जॉर्ज फर्नांडिस मुंबईत माहीम आलेले आहेत. वांद्रे येथून माहीम जवळ होते आणि पोर्तुगिजा नावाच्या तिथल्या एका हॉटेलात जॉर्ज असल्याचे कळताच नामदेव म्हणाला, ''चटकन त्याला भेटून येऊ.'' ही माझी आणि फर्नांडिस यांची दुसरी व शेवटची भेट. तिथे जो काही प्रकार घडला, तो नवलाईचा होता.

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/

मनावर कोरलेली भेट

वांद्रे येथून माहीमला जॉर्जला भेटायला जात असताना मी नामदेव आणि कमलाकर यांना एक घरातला किस्सा सांगितला. 1998 सालात प्रथमच बाजपेयी सरकार सत्तेत आले होते. त्याच्या विश्वास प्रस्तावावर बोलताना जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेले प्रभावी भाषण माझ्या शाळकरी कन्येला खूप आवडले होते आणि हा माणूस देशाचा पंतप्रधान व्हायला पाहिजे, असे तिचे ठाम मत झालेले होते. पुढेही कधीच ते मत बदलले नाही. आजच्या पिढीतल्या मुलांना तरुणाईतला जॉर्ज ठाऊक असायचे कारण नव्हते. पण मुद्देसूद बोलताना बाजपेयी विरोधकांचे धिंडवडे काढणारा जॉर्ज माझ्या मुलीला भावला होता. हे नामदेवने ऐकले आणि मनात ठेवलेले होते. माहीमला पोहोचल्यावर पोर्तुगिजा हॉटेल आम्ही शोधून काढले, तर तिथल्या एका कोपऱ्यात हा माजी संरक्षण मंत्री तळलेले मासे खात बसलेला होता. त्यांचे काही मित्र-सहकारीही आवतीभोवती होते. नामदेवला त्यांनी लगेच ओळखले आणि हालहवाल विचारली. तसा कमलाकरही जॉर्जचाच जुना कार्यकर्ता होता. मग अकस्मात नामदेवने माझ्या कन्येचा विषय छेडला. ती कॉलेजची मुलगी जॉर्जची फॅन असल्याचे सांगून त्याने तिच्याशी थोडे बोलावे असा आग्रह धरला. आजच्या पिढीतली मुलेही आपली फॅन असू शकतात काय? म्हणजे तसे आश्चर्य व्यक्त करून जॉर्जनी नामदेवचा आग्रह मान्य केला. मग नामदेव महोदय माझ्याकडे वळले आणि कन्येचा फोन नंबर विचारला. काम सोपे नव्हते. कारण तेव्हा कन्या अमेरिकेत मास्टर्स डिग्री करायला गेलेली होती आणि माझ्यापाशी तिच्या नंबर नव्हता. तर घरी फोनाफोनी करून ती जिथे होती तिथला नंबर मिळवला आणि नामदेवला दिला. त्याने विनाविलंब मोबाइलवर तो नंबर फिरवून माझ्या हाती दिला आणि म्हणाला ''पोरीला सांग, जॉर्जसाहेब बोलतोय म्हणून.'' सुदैवाने फोन लागला आणि तिचे अभिनंदन करून जॉर्जसाहेब मस्त पंधरा मिनिटे मराठीत तिच्याशी बोलले.

मी ऐकलेला संवाद असा होता - अमेरिका हा चोरांचा देश आहे. पण तिथे शिक्षण व्यवस्था उत्तम आहे. तिथे चांगले चांगले शिकून मग आपल्या देशात यायचे आणि भारतासाठी खूप काही चांगले करता येईल असे बघायचे. हा उपदेश या थोर नेत्याने केला. त्या काळात मोबाइलचे बिल खूप येत असे. पण त्याची नामदेवला फिकीर नव्हती की जॉर्जना. तिथून बाहेर पडल्यावर मी नामदेवला छेडले. म्हणालो, ''तू आजपर्यंत माझ्या पत्नीला भेटलेला नाहीस की मुलीचे तोंड बघितलेले नाहीस. मग हे धंदे तुला कोणी सांगितले?'' मख्ख चेहऱ्याने नामदेव उत्तरला, ''आपल्या पोरांचं कौतुक आपण नाही, तर कोणी करायचं?'' असा जिव्हाळयाचा वा मित्राच्या कन्येलाही आपलंच पोर मानणारा नामदेव, किती लोकांच्या नशिबी आला ते मला तरी ठाऊक नाही. त्याच्याइतकाच जॉर्ज नावाचा मनमोकळा नेता. त्यानेही कुठल्या कोणाच्या मुलीसाठी पंधरा मिनिटे उपदेश करण्यात खर्ची घालावीत, हे आक्रितच. नामदेव जॉर्जचा जुना कार्यकर्ता. पण त्याचा आग्रह बिनाअट मानून त्यांनी हे सर्व केले. ते मुलीने खूपच मनावर घेतले. मास्टर्स डिग्री केल्यावर ती फार काळ अमेरिकेत रमली नाही. तिला मायदेशी येण्याचे वेध लागले आणि बहुधा त्यात जॉर्ज नावाच्या नेत्याचे योगदान मोठे असावे. देशासाठी काही करावे, असे सहजगत्या बोलून गेलेल्या त्या नेत्याचे कोवळया वयात कानावर पडलेले शब्द तिला भारतात घेऊन आले. यूपीएससीची परिक्षा देऊन ती कायमची भारतात रमली. नामदेव असो की जॉर्ज, दोघेही तिला कधी व्यक्तिगत भेटलेले नाहीत. पण त्यांच्याच कृपेने आज ती मायदेशी टिकलेली आहे. सहकारी वर्गमित्र सगळे परदेशात स्थायिक होण्याच्या भवतालात तिला नकळत याच दोघांमुळे ही प्रेरणा मिळाली. आजही जॉर्ज फर्नांडिस तिचा आवडता नेता आहे. त्याच्या राजकीय भूमिकांविषयी तिला आस्था आहे आणि मध्यंतरी अनेक वर्षे तो आजारी असताना, ती मला अधूनमधून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारत राहिलेली आहे. अशी माणसे सहवासात यावीत आणि आपली व्हावीत, यासारखी श्रीमंती नसते.

पाखंडी गोतावळयातील व्रतस्थ

आजकाल सोबत गोतावळा घेऊन फिरणाऱ्या नेत्यांचा जमाना आहे. साधा कोपऱ्यावरचा नगरसेवकही सोबत डझनभर माणसे घेऊन फिरत असतो. आजी असो वा माजी असो. अशा काळात एक माजी संरक्षण मंत्री आणि मुंबईचा बंदरसम्राट म्हणून इतिहास घडवणारा माणूस, तिथे सामान्य हॉटेलात एका कोपऱ्यात जुन्या मित्रासह मासे खात आरामात गप्पा मारतोय, हे दृश्यच गुंगवून टाकणारे होते. आणि सत्ता गमावल्यानंतरचीच ही कहाणी नाही. मंत्री म्हणून दिल्लीत बंगला मिळाला असताना, त्यातली एक खोली स्वत:साठी ठेवून बाकी सगळा बंगलाच पक्षाला व कार्यकर्त्यांना बहाल करणारा हा नेता होता. जसा तुम्हाला टीव्हीवर दिसायचा, तसाच खाजगी जीवनातही होता. संरक्षण मंत्री एकदा असताना मुंबईच्या मंत्रालयात साध्या गाडीने आलेला होता आणि सवयीने तिथल्या पोलिसांनी त्याची गाडी रोखली होती. सुदैवाने एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जॉर्जना ओळखले आणि त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळाला होता. देशाचा संरक्षण मंत्री आणि केंद्रातील हा एकमेव मंत्री, ज्याच्या बंगल्यात वा व्यक्तिगत सेवेत कोणी सुरक्षा कर्मचारी नव्हते की ताफाही नसायचा. असला माणूस वा नेता विरळाच असतो. ढोंगी नेत्यांच्या व समाजवादी गोतावळयात त्याची कदर कशाला व्हायची? अखेर भाजपाच्या आघाडीत सहभागी झाला, म्हणून त्याच्याच आप्तस्वकीय समाजवादी मंडळींनी यथेच्छ टीका केली. ज्यांची हयात विविध ढोंगबाजी करण्यात गेली, त्यांना जॉर्जच्या व्रतस्थ जीवनाची किंमत कशाला वाटावी? शब्द वा तत्त्व यापेक्षाही परिणामाला व हेतूला प्राधान्य देणारा हा नेता, समाजवादी पाखंडी गोतावळयात खडयासारखा वेगळा व खटकणाराच होता. माणसे तोडण्यात आयुष्य खर्चलेल्यांना माणसे जोडण्यासाठीच आयुष्य वाहिलेला जॉर्ज कळावा तरी कसा ना? ज्या भूमीत असे झंझावात जन्माला येतात, ती भारतभूमी म्हणूनच अनेक आक्रमणे पचवून अजिंक्य राहिली आहे.


 

ढोंगी पुरोगाम्यांचा पर्दाफाश

आपल्या वैचारिक निष्ठा जपताना-जोपासताना तो कधीच पाखंडी नव्हता. ग्रंथप्रामाण्यवाद त्याच्यातल्या क्रांतिकारकाला कधी पचला नाही की रुचला नाही. म्हणूनच 1996 सालात ठामपणे आपल्या समाजवादी साथींच्या भ्रष्ट डावपेचांना झुगारून जॉर्जनी भाजपाशी हात मिळवला. काँग्रेस विरोध आणि विरोधी राजकारण करण्यात उभी हयात गेलेला जॉर्ज एकमेव समाजवादी किंवा डावा नेता नव्हता. पण जेव्हा काँंग्रेस नामशेष व्हायची वेळ आली, तेव्हा तेच जुने साथी व कॉम्रेड भ्रष्ट काँग्रेसला जीवदान द्यायला पुढे आले आणि त्यांच्यावर तुटून पडायला जॉर्जने मागेपुढे बघितले नाही. 1998 सालात बाजपेयी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला असताना हाच जॉर्ज सरकारच्या समर्थनाला उभा ठाकला आणि त्याने आजकाल बोकाळलेल्या सेक्युलर पाखंडांचे धिंडवडे उडवणारे भाषण केलेले होते. तेव्हा लोकसभेत काँग्रेस आणि माक्र्सवादी पक्षाचे खासदार एकाच सुरात बोलत होते आणि एकमेकांना प्रतिसादही देत होते, अशा वेळी जॉर्ज उभा राहिला आणि त्याची तोफ काँग्रेस विरोधात आग ओकू लागलेली होती. त्याच्या भाषणात व्यत्यय आणणारे त्याचेच जुने समाजवादी साथी होते आणि डाव्यांसह काँग्रेसचेही खासदार हलकल्लोळ करीत होते, कारण त्यांच्याच पाखंडांची लक्तरे जॉर्ज संसदेच्या वेशीवर टांगत होता. सरकारचे समर्थन करताना आणि तथाकथित सेक्युलर नाटकाचे मुखवटे फाडताना मध्येच जॉर्जनी एक पुस्तिका घेतली आणि त्यातले उतारे तो वाचू लागला. तर तो कुठली पुस्तिका वाचत आहे आणि तिची विश्वासार्हता किती, म्हणून अडथळे आणले जात होते. पण अध्यक्षीय संरक्षण मागून जॉर्जनी आपला हल्ला चालूच ठेवलेला होता. पुस्तिकेचा लेखक व जन्मदाता लवकरच कळेल, असे सांगूनही विरोध थंडावत नव्हता. हळूहळू काँग्रेसच्या मदतीला डाव्या आघाडीचेही खासदार पुढे सरसावले आणि मग त्यांच्यावर जॉर्जनी नामुश्कीची पाळी आणली.

''अध्यक्ष महाराज, मला इथे एका मोठया भक्कम संघटनेने काँग्रेसविषयी व्यक्त केलेली मते मांडायची आहेत. काँग्रेस पक्ष हा देशातील भ्रष्टाचाराचा शिरोमणी आहे. ब्रिटिश भारत सोडून गेले आणि त्यांची जागा काँग्रेसने घेतली. गेल्या पन्नास वर्षांत काँग्रेसने भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच प्रस्थापित केलेले आहेत. काँग्रेसचे मंत्री नेहमी कुठल्या ना कुठल्या घोटाळयात अडलेले आहेत किंवा गुंतलेले असतात. स्वातंत्र्योत्तर काळातील मुंदडा प्रकरणापासून ही घोटाळयांची मालिका सुरू होते आणि चुरहाट लॉटरी, बोफोर्स, सुखराम, हर्षद मेहता अशा घोटाळयांनी देशाला कंगाल करून टाकलेले आहे. देशातील प्रत्येक संस्था आपल्या स्वार्थासाठी वापरताना त्यांचा काँग्रेसने सत्यानाश करून टाकलेला आहे. लोकशाहीच्या प्रत्येक अंगाला काँग्रेसने भ्रष्ट व नामोहरम करून टाकलेले आहे.'' आता मात्र काँग्रेसला आणि डाव्यांना ऐकून घेणेही अशक्य झाले आणि त्यांनी सभापतींना जॉर्जना बिनबुडाचे आरोप करण्यापासून रोखायचा आग्रह धरला. कुठल्या पुस्तिकेतून हे आरोप वाचले जात आहेत, त्याचा खुलासा जॉर्ज फर्नांडिस यांनी द्यावा, म्हणून धुमाकूळ सुरू झाला. पण हा पठ्ठया बिचकला नाही की थांबला नाही. आपण निश्चितच या पुस्तिकेचा प्रकाशक व लेखक संसदेला कथन करणार असल्याचे आश्वासन देत त्यांनी आपले भाषण चालूच ठेवले. मात्र ते सत्य ऐकण्याचा संयम सेक्युलर काँग्रेसपाशी व डाव्यांपाशी उरलेला नव्हता. इतके उतावळे होऊ नका असे सांगून जॉर्ज पुढे म्हणाले, ''काँग्रेस पक्षाचा सेक्युलर चेहराही विद्रूपच आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना दिल्लीत तीन हजार शिखांची कत्तल झाली आणि देशात अनेक राज्यांत काँग्रेसची सत्ता असताना विविध दंगलीत शेकडयांनी लोकांचे बळी घेतले गेलेले आहेत. गैरकारभाराच्या आणि भ्रष्टाचाराच्या मदतीने जगातला कुठलाही देश प्रगती करू शकलेला नाही आणि काँग्रेसला तर याच दोन रोगांनी कायम ग्रासलेले आहे.''

हा सगळा प्रकारच पुरोगाम्यांना रडकुंडीला आणणारा होता. त्यामुळे आणखी ऐकून घ्यायला कोणीही राजी नव्हते. मग आपल्या धूर्त हास्यातून डाव्यांकडे दृष्टिक्षेप टाकत जॉर्ज म्हणाले, ''तुम्हाला इतकीच घाई असेल, तर पुस्तिकेचे आईबापच सांगून टाकतो, म्हणजे तरी शांत व्हाल.'' असे म्हणून त्यांनी आपल्या हाती असलेली पुस्तिका माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा त्याच लोकसभा निवडणुकीतला जाहीरनामा असल्याचे सांगून टाकले. तेव्हा हलकल्लोळ करणाऱ्या दोन्ही पक्षाच्या खासदारांची वाचाच बसली. मग मिश्कील हसत फर्नांडिस त्याच पुरोगामी मित्रांकडे वळून आणि अध्यक्षांना उद्देशून म्हणाले, ''काय झालं मित्रांनो? एकदम ही स्मशानशांतता कशी? तुम्हाला शरम वाटली पाहिजे. लोकांना काय सांगून मते मागितलीत आणि आता इथे कसले युक्तिवाद करीत आहात? कुणाचा बचाव करीत आहात? हा कसला आला आहे सेक्युलॅरिझम? डाव्या मित्रांनो, एकतर तुम्ही तुमच्याच पक्षाचा जाहीरनामाही वाचत नसणार, किंवा त्यात जे लिहिलेले आहे, त्याच्यावर तुमचाच विश्वास नसावा. ज्या काँग्रेसचे असे धिंडवडे काढून लोकांकडून मते मागितलीत, आज त्यांच्याच पापावर पुरोगामी म्हणून पांघरूण घालताना तुम्हाला लाज वाटायला हवी. ज्या काँग्रेसने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडलेत, त्यांचे समर्थन करताना तुम्हाला शरम कशी वाटत नाही? लौकर शहाणे व्हा, नाहीतर तुमचा पक्ष इतिहासजमा होऊन जाईल.'' किती नेमके शब्द होते ना? आज त्याच डाव्यांचे नावनिशाण त्रिपुरा व बंगालमधून पुसले गेले आहे आणि केरळात उरलासुरला माक्र्सवादी पक्ष अस्तित्वासाठी झगडतो आहे. हे सर्व पुरोगामी पाखंडांचा बचाव करताना झालेले आहे. एक प्रकारे जॉर्ज पुरोगाम्यांचा भविष्यवेत्ताच म्हणायचा ना? आगामी लोकसभा निवडणुकीत पुरोगामी म्हणून रोज नाचणारे लहानसहान पक्ष त्याच मार्गाने नष्टप्राय होऊन जाणार आहेत.