आनंद शोधताना 

विवेक मराठी    11-Feb-2019
Total Views |

आयुष्याची हाफ सेंचुरी म्हणजे वयाची पन्नाशी, आयुष्याचा नवा टप्पा. या आधीच्या टप्प्यात आपण बऱ्याच जबाबदाऱ्या, स्वतःच स्वतःला घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करत आपल्याबरोबर इतरांनाही त्या चौकटीत बांधण्यात कशोसीने प्रयत्न करत राहिलो. आयुष्याच्या या उत्तरार्धात छोटया-छोटया गोष्टींतून आनंदी राहण्याची कला शिकण्याचा काळ. नव्याने काही शिकण्याचा आणि त्यात रमून जाण्याचा काळ.

 

आपण वृध्दत्वाचा विचार व्यायामापासून सुरू केला होता, कारण पन्नाशीचा उंबरा ओलांडतानाचा हा कालखंड. आयुष्यातला हा नवा टप्पा. पन्नाशी. आयुष्याची हाफ सेंचुरी. आतापर्यंत जगणं कधी मजेत गेलं, कधी धावत सुटलो. एकामागे एक घडतच होतं काहीतरी. कधी आनंद, कधी गहिवरणं, कधी जुळवून घेणं, कधी तडकाफडकी वागणं... शरीराने साथ दिली. तसं किरकोळ ताप, सर्दी, साथीचे ताप सोडले, तर काही झालं नाही. कधीतरी हाड मोडलं असेल, नाही असं नाही. क्वचित कुणाला गंभीर आजार झालाही असेल. नाही असं नाही. पण एकूणच जगण्याला गती होती नाही म्हटलं तरी! नवी नाती जुळली, नवं घर झालं. आपणच कधी लहान होतो हे विसरून गेलो. वाटत होतं, अजून तरुण आहोत. तारुण्यातले ते स्पर्शतराणे.. त्यातही कधी धुसफूस होती. नाही असं नाही. पण झालं सगळं. आलं गेलं. फंक्शन्स. कार्यक्रम. नट्टापट्टा. व्यक्त होणं. स्वत:कडे बघणं. सजणं. सगळं सगळं...

आणि हो! नव्याला जन्मही दिला नि मग नवा रोल आला. त्यात दंग झालो, गुंतून पडलो. इतके... इतके की आपण आपल्याला विसरलो. शिवाय एव्हाना कुणीतरी झालोही. स्थिरावलो. तसं हे सगळं फारच गतिमान. एक क्षण असा आला, ज्यात ज्यात जगणं गुंतलं होतं, त्या त्या सगळयांनी हळूहळू सांगायला सुरुवात केली. ''आता आमचं आम्हाला जगू द्या. आमचे निर्णय आम्हाला घेऊ दे. आमच्या जगण्यात फार लुडबुड नको. आम्हालाही काही गोष्टी करू दे. प्रत्येक ठिकाणी सूचना नको. कळतंय आमचं आम्हाला...'' तोच हा क्षण ओळखण्याचा.. पन्नाशी आली.

आणि आता आरशात स्वत:कडे पाहू या. आणि आता आपल्याला आपल्या मनातही डोकवायचंय. आरसा सांगतोय कातडीवर सुरकुत्यांच्या लाटा उमटल्यात. केस रंगवले खरे, पण मानेकडे पाहिल्यावर कळतंय वय! आणि वाटतंच हो! तरुण दिसावं. जाहिराती पाहिल्यावर वाटतं, खरंच असं क्रीम असेल की चेहऱ्याला बदलेल! मन भुलतं. आता शेकहँड करताना हात थोडा सैल पडलाय. पाय दुखतात हो! हो, खाली बसताना-उठताना त्रास होतोच. उसाचा करवा नाही चोखता येतं नि कुडुम कुडुम नाही खाता येत. फोन नंबर बघताना पहिले 3-4 आकडे दिसतात. पुढचे 3 की 8 दिसत नाही. चश्मा शोधावाच लागतो. तोवर पहिले आकडे पुसतातच. टी.व्ही. बघायचाय, पण डोळे दुखतात. पावसात भिजलं की सर्दी होते. असं काय काय होतं नि शरीर सांगतं - इतके दिवस लक्ष नाही दिलं फारसं माझ्याकडे. आता तुला सांगतोय मी... मी आहे. माझ्याही मर्यादा आहेतच.

अशा वेळी काय करायचं? निराश व्हायचं, घरातली जागा बदलली म्हणून हताश व्हायचं? शरीराच्या कमकुवत होण्याने खचून जायचं? आमच्या वेळी असलं काही नव्हतं हो! म्हणून वाईट वाटून घ्यायचं? समोरचा बदलतोय म्हणून त्याला नावं ठेवत बसायचं? अधिकच हट्टी व्हायचं? घरातल्या निर्णयात लुडबुड करायची? लहानसहान गोष्टीत तेवढाच जीव गुंतवायचा? कुणी आजी/आजोबा म्हटलं तर वाईट वाटून घ्यायचं? 'केस पिकले आता' म्हटल्यावर वय झालं की, म्हणून व्याकूळ व्हायचं? अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं 'अजिबात नाही' अशी द्यायची तयारी आता करायलाच हवीय. आता पन्नाशीत आलोय. 'मन वढाय वढाय' तसं 'मन तरुण तरुण' असं म्हणायचंय. तरुण याचा अर्थ कुणी म्हातारचळ लागलाय असं म्हणू नये इतपत घ्यायचाय. आता आपण मांडलेल्या संसाराकडे आपणच आरशात पाहायचंय. थोडंसं नव्हे, स्वत:ला सोडवून घेऊन पाहायचंय.

इतके दिवस झालं मी म्हणेन तेच आणि तसंच. इतके दिवस समोरचे बस म्हटलं की बसत होते. तेच आता सांगणारच - आम्ही ठरवू ना काय ते! इतके दिवस जे झालं ते झालं. ते झालं वयामुळे, आताही जे होणार ते वयामुळे! त्यामुळे आता संवादकौशल्य आपलं आपणच पणाला लावणार आहोत. समोरची पिढी आपल्यापेक्षा काही चांगलं करणार असेल, करत असेल तर कौतुक करणार आहोत. शिवाय ते आपण केलं तसं कसं होईल! समोरचा काही गैर करतोय असं वाटलं तर सुचवणार आहोत. लगेच तत्त्वज्ञानाची भाषा, आयुष्याचं अपयश असं काही बोलणार नाहीच. इतके दिवस सुचवणं नव्हतं, सामंजस्यही थोडसं कमी होतं. ते आता येऊ दे शब्दांत. नको कठोरता वाणीत...

खरंच आता पुन्हा बदलायचंय. स्वत:ला बदलताना पाहून आपण आश्चर्य करू. ती तू मीच का गं! तो तू मीच का रे! असं वाटेल. नि आपण बदलताना पाहण्यात मजा येईल. इतके दिवस मनाने ताण घेतले, मनाने दडपण पेलवलं. मग काय, नवे जोडीदार मिळाले रक्तदाब, मधुमेहासारखे. ठीक आहे. त्यांनाही सोबत घ्यायचंय. नव्याने जगण्याला सुरुवात करायचीय. इतके दिवस आपण मनस्वी जगलो. आपल्या मनासारखं घडवून आणताना त्रासही झाला. मूल्यव्यवस्था वेगळी होतीच. बदलायचंय आपल्याला! कदाचित कुणी पाया नाही पडणार, म्हणजे जाताना नमस्कार नाही करणार, पण तरी मनात भावना आहेतच ना, हे पाहायचं. जाणारा मागे वळून पाहतोय ना! बस झालं. 'काही संस्कार राहिलेच नाहीत' असं नाही टवकारायचं. क्षण क्षण आता वेगळा असणार आहे. कुठल्या सादरीकरणासाठी, मांडणीसाठी जशी आपण तयारी करतो, तशीच पन्नाशीनंतरच्या जगण्याची हळूहळू तयारी करू या. चिडचिड होणारच!

चूलबोळक्यांचा मांडलेला संसार! ती फक्त भांडीकुंडी नसतातच. त्याच्याशी निगडित घटना असतात. नव्याला जन्म दिल्यावर त्यात गुंतणं असतं, घडवणं असतं. वेचलेले क्षण असतात. रांगणं, बोटाला धरून उभं राहणं आणि मग त्याच्याबरोबर मोठं होत जाणं... या सगळयातून जीव कसा एकदम निघणार? पण असं केलं नाही, तर जास्तच गुंतणं होतं नि पुढच्या काळाला ते आवडणारं नसतं.

म्हणून तर आपण बोलणार आहोत पन्नाशीनंतर आनंदात कसं राहता येईल याबद्दल. वानप्रस्थ म्हणजे सगळं सोडून जाणं नाही. शरीर इथेच असलं, तरी मनाने बाहेर पडणं. बघू या कसं घडतंय ते! कोण सेंचुरी काढेल नि कोण केव्हा कसं आउट होईल, हे आपल्या हातात नाहीच ना! नियती जगणं मागणार, तेव्हा आउट व्हावंच लागतं!

rrenudandekar@gmail.com

रेणू दांडेकर

& 8828786875