तंबूत घबराट

विवेक मराठी    14-Feb-2019
Total Views |

ज्या मोदींना हटवण्याचे स्वप्न सर्व विरोधक एकत्र येऊन पाहत आहेत, त्यांनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे अशा शुभेच्छा मुलायम यांनी भर सभागृहात दिल्या. त्यांच्या कामाची प्रशंसाही केली. त्याही सोनिया गांधी आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या सभागृहातल्या उपस्थितीत. याचाच एक अर्थ, 'मी कोणाला घाबरत नाही. माझ्यावर कोणाचे दडपण नाही. काँग्रेसचे तर नाहीच नाही' हा संदेशही त्यांनी संबंधितांपर्यंत नीट पोहोचवला.  भाजपा हा एक राजकीय विरोधक असला, तरी काँग्रेस हा मात्र कायमसाठी शत्रू नंबर एकच होता, हेही या निमित्ताने अधोरेखित झाले.




'मोदी हटाव' या एकमेव मागणीसाठी परस्परांमधले टोकाचे मतभेद, हेवेदावे गंगार्पण करून सगळे विरोधी पक्ष एकजुटीसाठी प्रयत्न करतात काय आणि त्याला त्यांच्यातलेच बुजुर्ग अपशकुन करतात काय... सगळेच अतक्र्य आणि अघटित. पाहता पाहता वर्तमान राजकारणाला कलाटणी देणारे. बरे, विश्वास तरी कोण कोणावर ठेवणार? सगळेच त्या बाबतीत एका माळेचे मणी. काही महिन्यांसाठी का होईना, एकमेकांमधल्या अविश्वासाला सोडचिठ्ठी द्यायचे त्यांनी ठरवले, तर मुलायमसिंह मांजरासारखे आडवे गेले. महागठबंधनातले सगळे मोहरे चक्रावले, तर लेकाच्या तोंडचे पाणीच पळाले. 'म्हातारे आहेत, सोडून द्या' असे सांगत त्याने बाजू सावरायचा प्रयत्न केला, तरी फसवण्याच्या धंद्यातले अतिरथी-महारथी त्याच्या या बोलण्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 सोळाव्या लोकसभेतील शेवटच्या अधिवेशनातील पंतप्रधान मोदी यांचे भाषण अनेकार्थांनी उजवे होऊनही मुलायम यांनी मारलेली धोबीपछाड सर्वांचे लक्ष वेधून गेली. नेताजींच्या काही मिनिटांच्या या भाषणाने माध्यमांमधल्या विरोधकांच्या भाटांच्या तोंडचेही पाणी पळवले. ज्या भाषणाचे ध्वनिचित्रमुद्रण उपलब्ध आहे ते नाकारण्याचाही केविलवाणा खटाटोप अनेकांनी करून पाहिला. महागठबंधनात कालपर्यंत शांत, एका कोपऱ्यात बसलेल्या नेताजींकडून वयाच्या पंचाहत्तरीला कोणी फारशी अपेक्षा ठेवलेली नव्हती. या प्रयोगामुळे नेताजींच्या सुपुत्रातही आगळा जोश संचारला होता, तिला बारीकशी टाचणी लावायचे काम नेताजींच्या भाषणाने केले.

कोणा एका पक्षाबरोबरच कायम सोयरीक केल्याचा नेताजींचा इतिहास नाही. लाभाचे गणित ज्याच्याबरोबर जमेल तिथे नेताजी, असेच त्यांच्या राजकीय वाटचालीतले आजवरचे दाखले आहेत. त्यामुळे त्यांच्या कालच्या भाषणाचा भाजपाला थेट किती लाभ होईल याबद्दल शंका असली, तरी (किंबहुना अशा वक्तव्यामुळे भाजपाने त्यांच्यापासून पुरेशी सावधगिरी बाळगायला हवी) भाजपाच्या विरोधकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करायला ते वक्तव्य नक्की हातभार लावेल यात शंकाच नाही. किंबहुना एव्हाना गोंधळाला सुरुवातही झाली आहे. आता हाही मोदी यांच्या व्यापक कटाचा भाग आहे, अशी बोंब ठोकायला पिसाळलेले विरोधक मागेपुढे पाहणार नाहीत.

कालच्या वक्तव्याने अनेपक्षित आणि संदिग्ध बोलण्यात प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्राच्या थोर नेत्यालाही नेताजींनी मागे टाकले आहे. पक्ष महागठबंधनाचा भाग आणि पक्ष संस्थापकांची साथ भाजपाला, असा संभ्रम निर्माण झाला आहे. या एकाच दगडात अनेक पक्षी - काही अपेक्षित, काही अनपेक्षित मारले गेले आहेत. आपल्या हाती पक्षाची सूत्रे दिल्यानंतरही, नेताजींचे मत ते पक्षाचे मत अशी भावना जनमानसात आहे, याची एक चुणूक अखिलेशला पाहायला मिळाली. ज्याच्या नावाने पक्ष आजही ओळखला जातो, ती व्यक्ती एखाद्या निर्णयात सहभागी झाली नाही तर त्यांच्याशिवायच्या पक्षाने सामील होण्याला फारसा अर्थ उरत नाही, हेही त्याच्या एव्हाना लक्षात आले असेल.

कट्टर विरोधक मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाशी अखिलेश यांनी केलेली मैत्री हेदेखील नेताजींच्या नाराजीचे एक कारण असू शकते. तेव्हा या वक्तव्याला अनेक गोष्टींची पार्श्वभूमी आहे. ज्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक अखिलेश यांनी केली, त्या चुकीचे माप वडिलांनी अशा प्रकारे पदरात घातले असावे. तेव्हा झालेला हा गोंधळ निस्तरून गाडे पुन्हा मुख्य रस्त्यावर आणणे, अन्य पक्षीयांच्या मनात नव्याने आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणे ही 'डॅमेज कंट्रोल'ची कामे तातडीने हाती घेण्यावाचून त्याच्यासमोर वडिलांनी पर्याय ठेवलेला नाही.

पक्षप्रमुख म्हणून आपले नाव घेतले जात असले, तरी मूळ नेत्याच्या म्हणण्याला - किंबहुना त्याच्याच वक्तव्याला आजही लोक गांभीर्याने घेतात, समाजवादी पक्ष म्हणजे मुलायमसिंह हे समीकरण आजही लोकांच्या मनात घट्ट अाहे, या बाबी अखिलेश यांच्या लक्षात आल्या तर त्यांच्यासाठी चांगले ठरेल. (महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षानेही यातून काही बोध घेतला, तर त्यांच्यासाठीही ते चांगले ठरेल.)

उत्तर प्रदेशचा पूर्व भाग प्रियंका यांच्या हाती सोपवल्यावर आणि महारॅलीला मिळालेल्या प्रतिसादानंतर, हे महागठबंधन म्हणजे 'पाँचो उंगलियाँ घी में' असा काँग्रेस पक्षाचा समज झाला होता. त्या समजाला छेद देण्याचे कामही नेताजींच्या वक्तव्याने केले आहे. प्रियंका यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश हे उत्तर प्रदेशातील भाजपासमोरचे नाही, तर समाजवादी पक्षासमोरचे मोठे आव्हान आहे, ही बाब या निमित्ताने अधोरेखित झाली.

महागठबंधनातील अन्य काही नेतेही नेताजींच्या बोलण्यावर प्रसारमाध्यमात बोलून अधिकच केविलवाणे होत आहेत. ''मुलायम म्हातारे झाल्याने ते काय बोलताहेत त्यांना कळत नाही'' अशा आशयाचे वक्तव्य केले आहे बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी... ज्यांचे राजकीय शहाणपणाने केलेले एकही वक्तव्य कोणालाही माहीत नाही अशा व्यक्तीने!

ज्या मोदींना हटवण्याचे स्वप्न सर्व विरोधक एकत्र येऊन पाहत आहेत, त्यांनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे अशा शुभेच्छा मुलायम यांनी भर सभागृहात दिल्या. त्यांच्या कामाची प्रशंसाही केली. त्याही सोनिया गांधी आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या सभागृहातल्या उपस्थितीत. याचाच एक अर्थ, 'मी कोणाला घाबरत नाही. माझ्यावर कोणाचे दडपण नाही. काँग्रेसचे तर नाहीच नाही' हा संदेशही त्यांनी संबंधितांपर्यंत नीट पोहोचवला.  भाजपा हा एक राजकीय विरोधक असला, तरी काँग्रेस हा मात्र कायमसाठी शत्रू नंबर एकच होता, हेही या निमित्ताने अधोरेखित झाले.

पुढच्या तीन/चार महिन्यांत सत्तेच्या सारिपाटावरच्या सोंगटया कशा हलतात, कोण कोणाला मात देते हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे. निवडणूक रंगतदार करायचा विडाच जणू सर्वांनी उचलला आहे असे दिसते.

कालपर्यंत शांत बसलेल्या उंटाने अचानक उभे राहून महागठबंधनाचा तंबू खिळखिळा करून घबराट निर्माण केली आहे. आता या उंटाला चुचकारायचे की बाहेरचा रस्ता दाखवायचा, ही उर्वरितांच्या धोरणीपणाची परीक्षा ठरेल. त्यासाठी आधी भीती विसरून अवसान गोळा करण्याची गरज आहे.